उत्तरप्रदेशातील निर्वाचननिर्णयाचा अन्वयार्थ

उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या निकालाची बातमी आणि त्याचे विश्लेषण करणारे लेख आज निरनिराळ्या वृत्तपत्रात वाचायलामिळाले. ह्या विषयावर विचारांची देवाणघेवाण करणे सोपे जावे म्हणून मी म.टा. चा अग्रलेख येथे उतरवून ठेवीत आहे.मला विचार करण्यासारख्या वाटलेल्या मुद्द्यांना मी अधोरेखित केलेले आहे. मला आपली ही मते वाचायला आवडेल.

म.टा. चा अग्रलेख : उत्तर प्रदेशातील त्सुनामी!
दि. १२ मे २००७.

बहुजन समाज पाटीर्च्या मायावतींच्या मायाजालाने संपूर्ण उत्तर प्रदेशाला भारून टाकले असल्याचे विधानसभा निवडणुकीत त्यांनी ज्या पद्धतीने दणदणीत विजय मिळवला, त्यावरून स्पष्ट झाले आहे. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे, इतकेच नव्हे तर देशाचे सर्वाधिक पंतप्रधान याच राज्याने दिले.

देशाचे राजकारण फिरवण्याची क्षमता असलेले हे राज्य असल्याने उत्तर प्रदेशाच्या लढतीवर साऱ्या देशाचे लक्ष गेले दोन महिने खिळलेले होते. ही लढत मायावतींनी लाजवाबपणे जिंकली व सर्व विरोधी पक्षांबरोबरच हस्तिदंती मनोऱ्यात बसून आपले तथाकथित राजकीय विश्लेषण जनतेच्या माथी मारू पाहणाऱ्या 'पोलिटिकल पंडित' नावाच्या वाचाळ बुद्धिमंतांच्या समूहास चारीमुंड्या चीत केलेच; शिवाय ग्रहताऱ्यांची गणिते घालत राजकीय कुंडल्या मांडणाऱ्या ज्योतिषांनाही त्यांनी तोंडावर आपटले.

दोन दशके मायावती उत्तर प्रदेशच्या राजकारणात आहेत; दोन वेळा त्यांना मुख्यमंत्रीपदही मिळाले, पण प्रत्येक वेळी त्यांना कुणाची तरी साथ होती, कधी मुलायम सिंगांची समाजवादी पाटीर् तर कधी भारतीय जनता पक्ष यांच्या साह्याने त्या सत्तेच्या खुचीर्त बसल्या. आघाडीचे राजकारण करण्याची त्यांची वृत्ती नाही, त्यामुळेच त्यांचे 'सत्तेचे प्रयोग' फसत गेले. यावेळी मात्र त्यांना स्वबळावर सत्ता मिळाली आहे.

दोनशेहून अधिक जागा बसपाला मिळाल्याने पुढील पाच वषेर् त्यांना अन्य कोणत्याही पक्षाच्या कुबड्यांची गरज नाही. गेल्या चार विधानसभा निवडणुकांत एकाच पक्षाला संपूर्ण बहुमत मिळण्याची उत्तर प्रदेशातील ही पहिलीच वेळ. त्या दृष्टीनेही मायावतींचा विजय ऐतिहासिक आहे.

मायावतींनी आतापर्यंत दलितांचे राजकारण केले. उत्तर प्रदेशात हा समाज संख्येने मोठा असला, तरी सत्ता व सामाजिक प्रतिष्ठा यापासून तो सदैव वंचितच राहिला. काही मूठभर दलित नेत्यांना राज्यात, केंदात व काँग्रेसमध्ये सत्तेची पदे मिळाली हे खरे, पण त्यामुळे त्यांचे भले झाले, समाज होता तिथेच राहिला. कांशीराम आणि मायावतींनी दलितांच्या याच दुखऱ्या जखमेवर बोट ठेवले आणि दलितांच्या ऐक्याचा प्रयोग यशस्वी केला.

त्यासाठी त्यांनी कधी मुसलमानांना जवळ केले, कधी भाजपला 'मनुवादी' म्हटले, तर कधी याच मनुवादाकडे काणाडोळाही केला. या सर्व कसरती करूनही हुकुमी यश मिळत नाही, हे ध्यानात आल्यानेच मायावतींनी गेल्या वर्षभरात रूळ बदलले. आता त्यांनी 'बाह्माण कार्ड' खेळण्यास सुरुवात केली. त्यास या निवडणुकीत मोठे यश मिळाले. मायावतींचा जुगार कमालीचा यशस्वी झाला.

ज्या मतदारसंघांत ब्राह्माण मतांचे प्राबल्य आहे, तिथे भाजप नव्हे, मायावतींना मोठ्या प्रमाणावर यश मिळाले, यावरून राज्यातील भाजपचा पायाच उखडण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.

मंडल आणि कमंडल!

या निवडणुकीत मायावतींनी एकाच बाणाने अनेकांना विद्ध केले. हा त्यांचा हल्ला अनेकांना अनपेक्षित असला, तरी उत्तर प्रदेशातील बदलती राजकीय समीकरणे आणि मानसिकता यांचा अभ्यास ज्यांनी केला, त्यांना मायावतींचे सार्मथ्य कमालीचे वाढत असल्याची कल्पना होती. कांशीराम यांचे निधन झाल्यानंतर मायावतींनी कोणाचाही पाठिंबा न घेता संपूर्ण राज्य ढवळून काढले.

दलितांचा पाठिंबा होताच, त्यास ब्राह्माणांच्या सहभागाची झालर लागली आणि त्यामुळे त्यांच्या यशाचे प्रमाण वाढले. मतांच्या टक्केवारीचाच विचार केला, तर मायावतींची मते दहा टक्क्यांनी वाढली, ही वाढ ब्राह्माण मतांमुळे झाली. त्याचा फायदा म्हणून जागाही शंभरने वाढल्या. बहुपक्षीय संसदीय राजकारण करायचे, तर ही गणिते जमवावी लागतात. त्यात मायावतींनी हुषारी व कौशल्य दाखवले. ते फलदायी ठरले. त्यामुळे भाजपचे मात्र पानिपत झाले.

सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या व तशी प्रसिद्धी राष्ट्रीय माध्यमातून करण्यातच धन्यता मानणाऱ्या भाजपला जेमतेम पन्नासचा टप्पा पार करता आला. याचा अर्थ, उत्तर प्रदेशाच्या जनतेने भाजपला झिडकारले. गेल्या तीन निवडणुकांत राममंदिराची स्वप्ने जनतेला दाखवत भाजपने मते मिळवली. विविध जातींची गणिते करताना ब्राह्माण, जाट व ओबीसींची मते मिळवण्यासाठी राजनाथ सिंह, कलराज मिश्र-लालजी टंडन व कल्याणसिंग यांची मोट बांधण्यात आली. पण ते सर्वजण चीत झाले. यापैकी कलराज मिश्र व लालजी टंडन यांच्या अहंकारयुक्त देहबोलीमुळे मतदारच नव्हे, तर कार्यकतेर्ही वैतागले होते.

कल्याणसिंग यांनी गेल्या सहा-सात वर्षांत भाजपच्या आत-बाहेर चकरा मारल्याने त्यांची विश्वासार्हता संशयाच्या गतेर्त बुडाली. ही निवडणूक राजनाथ सिंह यांच्यासाठी महत्त्वाची होती. एकतर ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्यांची नजर दिल्लीतील पंतप्रधानकीवर लागली असल्याने आणखी दोन वर्षांनी तशी संधी आलीच, तर उत्तर प्रदेशचा पाठिंबा मिळणे गरजेचे होते. पण ते स्वप्नही आता भंगले आहे.

दोन महिन्यांपूवीर् उत्तराखंड या छोट्या राज्याची निवडणूक जिंकल्याने भाजपच्या नेत्यांना कंठ फुटला होता व त्यांचे (मनो)रथ हवेत दौडू लागले होते, ते जमिनीवर आले आहेत. उत्तराखंड म्हणजे उत्तर प्रदेश नव्हे, हे त्यांना आता कळून चुकले असेल. या निवडणुकीचा सर्वात मोठा फटका मुलायम सिंग यांना बसला आहे. २००३मध्ये ते मुख्यमंत्री बनले, तेव्हापासूनच ते वादळाचा केंदबिंदू होते. केवळ राजकीय अपरिहार्यता म्हणून त्यांचे मुख्यमंत्रीपद पराभूत होईपर्यंत टिकले.

या पराभवास ते स्वत:च जबाबदार आहेत. लोकशाहीत गटांचे नव्हे, जनतेचे राजकारण करायचे असते, याचा बहुधा त्यांना विसर पडला. अमर सिंगांसारख्या कसलीही चाड नसलेल्या उनाड आणि उद्दाम लटपट्या फिक्सरला साथीला घेतल्याचा असाच परिणाम होणार होता. निवडणुका चालू असताना स्वत:ला मुख्यमंत्र्यांचा उजवा हात म्हणवणारे अमर सिंग पाच दिवस अभिषेक बच्चन यांच्या विवाह सोहळ्यात टीव्हीसमोर मिरवत होते. त्याच वेळी समाजवादी पाटीर्चे भवितव्य काय असणार, याचा अंदाज आला.

मुलायम यांनी लोकशाही शुचितेचे सर्व संकेत बाजूला सारून राजाभय्यांसारख्या गुंडांना अभय दिले. सत्ता गेली, तर सारीच भांडी फुटतील, अशी भीती वाटल्याने निकालापूवीर्च कल्याण सिंगांबरोबर गणिते मांडण्यास सुरुवात केली. आता ते सारे संपले आहे. 'मंडल आणि कमंडल' या दोन्हीचे भांडवल करणाऱ्यांना मतदारांनी घरी पाठवले, हे बरे झाले.

' क्लब कल्चर'चे नेते

उत्तर प्रदेशच्या सत्तेच्या सारीपटावरून काँग्रेसची प्यादी बाद होऊन दीड तप उलटले. तरीही प्रत्येक वेळी काँग्रेस हिरीरीने मैदानात उतरते आणि मते नाही तरी अमाप प्रसिद्धी मिळवते. याचे कारण गांधी घराण्याचे या राज्यातील अस्तित्व. रायबरेली व अमेठीतून गांधी कुटुंबीय निवडणुका लढवत असल्याने त्यांच्या प्रचार मोहिमांना मोठी प्रसिद्धी मिळते. या निवडणुकीत 'राहुलकार्ड' काँग्रेसने वापरले. अमेठी-रायबरेलीत प्रियांका तर राज्यात अन्यत्र राहुल गांधी फिरले.

अमेठी-रायबरेलीत अपेक्षेप्रमाणे काँग्रेसने जागा राखल्या असल्या, तरी अन्य ठिकाणी जिथे जिथे राहुल यांचे बहुचचिर्त 'रोड शो' झाले, तिथे तिथे काँग्रेस रोडावली आणि अखेर गेल्या वेळेपेक्षा काँग्रेसच्या जागा कमीच झाल्या. मुंबई, दिल्ली महापालिका, पंजाब, उत्तराखंड यांच्या मागोमाग उत्तर प्रदेशातही पक्षाचे दिवाळे निघाले. राज्यात या पक्षाला नऊ टक्के मतेही मिळवता आली नाहीत, ही आकडेवारी पुरेशी बोलकी आहे.

सलमान खुशीर्द यांच्यासारखे बोलघेवडे 'क्लब कल्चर'चे नेते टीव्हीवरील शब्दबंबाळ चर्चांना ठीक असतात, त्यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष ठेवला, तर मते मिळवता येत नाहीत, हे यानिमित्ताने सोनिया गांधींच्या पुन्हा एकदा ध्यानात आले असेलच. असो. उत्तर प्रदेशाच्या या निवडणुकांचे निकाल हा भारतीय राजकारणाचा 'टनिर्ंग पॉईंट' आहे. गेली चार वषेर् भारतीय राजकारणात वाहणाऱ्या वाऱ्यांची दिशा बदलली आहे, हे या निकालांवरून स्पष्ट दिसते. मायावतींच्या त्सुनामी लाटेत समाजवादी पाटीर्, काँग्रेस आणि भाजप ही तिन्ही बेटे उद्ध्वस्त झाली आहेत.

त्यांना या राज्यातील स्वत:च्या घरांची उडालेली छपरे दुरुस्त करतानाच हा झंझावात अन्य राज्यांतही पसरणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. या निवडणुकीची छाया राष्ट्रपती निवडणुकीवरही पडणारच. त्यावर नंतर चर्चा करूच. सध्या तरी या अघटिताच्या कारणांची मल्लिनाथी पाठीला माती लागलेले मल्ल कशी करतात, हा अंमळ करमणुकीचा कार्यक्रम काही काळ पाहावा लागेल.


१. उत्तरप्रदेश हे राज्य खरोखरच देशाचे राजकारण फिरवण्याची क्षमता असलेले राज्य आहे काय?
२. बसपा ला विजय मिळाला तो ब्राह्मण दलित सहमतीने की भाजप, सपा, काँग्रेस ह्यांच्या चुकांमुळे?
३. ह्या लाटेत ह्या तिन्ही पक्षांची बेटे उद्ध्वस्त झाली आहेत हे पटते का?
४. ह्या निवडणुकीची छाया राष्ट्रपती निवडणुकीवर कशी आणि कितपत पडेल असे तुम्हाला वाटते?