पाटलांची चंची - शंकर पाटलांची स्मरणगाथा

शंकर पाटील हे मराठी साहित्याला नव्या वाटांवर नेणाऱ्या लेखकांपैकी एक बिनीचे लेखक. दुर्दैवाने त्यांच्या लेखनाची म्हणावी तितकी गंभीर दखल घेतली गेली नाही असे म्हणावेसे वाटते.

त्यांनी बऱ्याच मराठी चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या हे त्याचे एक कारण असू शकेल. निळू फुले या गुणी नटाला खलनायकाच्या साच्यात अडकवणारे असे हे बहुतेक चित्रपट होते. त्याच चित्रपटांनी शंकर पाटलांना "पाटील - तमाशा - बाई - बाटली - राजकारण" या प्रकारचे(च) लिहिणारे अशा साच्यात ढकलून टाकले. त्यामुळे 'कथा अकलेच्या कांद्याची' सारखे सरस लिखाणसुद्धा फारसे लक्षात राहिले नाही.

आणि ऐशीच्या दशकात कथाकथनाच्या ध्वनिफितींचे जे पेव फुटले, त्यामुळे 'मीटिंग', 'धिंड' या प्रकारच्या कथा सोडल्यास शंकर पाटील या नावाने पटकन दुसरे काही आठवत नाही.'टारफुला', 'वेणा' या स्मृतीकोषातल्या अंधुक होत चाललेल्या आठवणी. त्यामुळे शंकर पाटलांनी बरेचसे एकसुरी, एका मापाचे, एका छापाचे लिखाण केले असे चित्र बऱ्याच लोकांच्या नजरेसमोर उभे राहते.

त्या मानाने व्यंकटेश माडगूळकरांनी ग्रामीण कथेतही वैविध्य राखले. आणि इतर क्षेत्रातही (जंगल वाचन, नाटक, चित्रपट, नागर लिखाण) बऱ्यापैकी नाव कमावले. तुलनेत पाटील माघारले. आणि त्यांचे निधनही तसे अकालीच झाले.

'पाटलांची चंची' हे शंकर पाटलांच्या आत्मकथनात्मक लेखांचे पुस्तक आहे. संपूर्ण पुस्तकाचा स्वर गप्पा मारण्याचा आहे. त्यामुळे थोडे पाल्हाळिक वाटू शकेल.

पाटलांचे बालपण तसे कष्टातच गेले. म्हणजे अगदी 'बालकांड' नसले तरी सर्व काही सुरळीत पार पडले असेही नव्हते. पण सुदैवाने पाटलांनी त्याबद्दल हळवा सूर फारसा न लावता 'मजेत गप्पागोष्टी' याच स्वरात बहुतेक सगळे कथन केले आहे.

'आईचा आशीर्वाद' मध्ये खरे तर मॅट्रिकची परीक्षा चालू असतानाच त्यांच्या आईचे कर्करोगाने निधन झाले त्याबद्दल आहे. पण पाटील तिथेही कथानकाच्या गरजेनुसार चेष्टा-मस्करी करायला कचरत नाहीत. (अभ्यासक्रमातल्या विषयांचा प्रत्यक्ष जीवनाशी फारसा संबंध नसतो याबद्दल ते लिहितात - "असाच आणखी एक विषय म्हणजे शरीरशास्त्र... माणसाच्या शरीरात हाडे किती असतात? किती का असेनात.... ती पिचवण्याखेरीज आम्ही काय करणार?... हृदयाला दोन झडपा असतात; पण हे कळून पुढल्या आयुष्यात आम्ही काय करणार? हृदरोग झाल्यावर डॉक्टरकडेच जाणार ना? का घरात बसून झडपा खोलत बसणार?")

कोल्हापुरात त्या काळी निरगुडकर पाटील हे एक मोठे बिलंदर प्रस्थ होते असे दिसते. त्यांची झडती शंकर पाटलांनी दोन तीन लेखांमध्ये घेतली आहे.

शंकरराव स्वातंत्र्य चळवळीतही होते. बाँब करण्यात त्यांचा एक सहकारी हात गमावून बसला होता. शंकररावांवर पोलिसांचे अटक वॉरंट होते. त्याच काळात रायफल हाताळताना सहकाऱ्याचा निष्काळजीपणा झाल्यामुळे शंकररावांच्या डोक्यापासून अर्ध्या इंचावरून गोळी गेली. या सगळ्याबद्दल त्यांनी सविस्तर लिहिले आहे.

त्यांचे थोरले बंधू हे तसे सगळ्या कथानकातले खलनायक. त्या बंधूंचा लोभीपणा शंकररावांनी सविस्तर वर्णिला आहे. पण हे चित्र एकांगी आणि एकरंगी होऊ नये याची खबरदारीही ते घेतात. "असं असलं तरीही अण्णा कुटुंबवत्सल होते. लहान भाऊ म्हणून माझ्यावरही त्यांचं प्रेम होतं" हे त्यांचेच शब्द.

कोल्हापुरातले अनुभवही त्यांनी मजेत रंगवले आहेत. त्यांनी नाटक कंपनी काढली. त्यासाठी पठाणाकडून कर्ज काढले. मग पठाण दारी उभे राहण्याची नामुष्की सोसली. शिकताना शाळा बदलल्या. अध्यापकांशी मैत्री आणि भांडणे दोन्ही केले.

गडहिंग्लजला शाळेत असताना सदैव भुकेची वखवख असे. मग बाजारात धुळीत पडलेली नाणी वेचून त्या पैशातून पोट भरण्याचा उद्योग केला. पैसे संपत पण भूक संपत नसे. मग त्या बाळूची उधारी केली. ती भागवण्यासाठी मित्राकडून उधारी. ती भागवण्यासाठी थोरल्या बहिणीला साकडे असले प्रकार करावे लागले.

सर्व लेखांचा गोषवारा इथे मांडत नाही. नाहीतर हे दहावी/बारावीचे गाईडच होईल!

'खास कोल्हापुरी शब्दयोजना' अशी मलपृष्ठावर ग्वाही दिली असली तरी ती शब्दयोजना अंगावर येण्याइतकी ताणलेली नाही. अर्थात लिखाण करताना सहजपणे ते अनेक म्हणी, वाक्प्रचार, उपमा वापरून जातात. थोडा वानवळा:

"...बघता बघता एका अंगानं फळी धरून पाऊस सुरू झाला. टपोरे थेंब पडू लागले. माझ्या मनातल्या तंबाखूचा चाप पुरता भिजला. यातून आता तरायचं कसं? ह्या तुराळीनं जीव धरायचा कसा?"

"भरल्या पोटावरून हात फिरवत ते सलाम पडण्याची मी वाट बघत पडायचो. दोन-अडीच तासांनंतर ओढ्याचा पूर ओसरावा तसं पोट खाली खाली जायचं"

"हे ऐकून मी भिऊन गाबागाब झालो"

"मुलांपेक्षा मुली लवकर वाढतात. निलगिरीच्या झाडासारख्या झपाट्यानं वाढत जातात".

मात्र, हे आत्मचरित्र नाही हे जरी खरे असले तरी लेखांचा क्रम बराच उलटसुलट आहे. त्यामुळे वाचताना थोडे भरकटल्यासारखे वाटते. आणि याच कारणाने असेल, काही ठिकाणी पाल्हाळ लावल्यासारखे वाटते.

एकंदरीत एक निश्चितच वाचनीय असे हे पुस्तक आहे. निराशा होणार नाही!

एकंदरीत मुद्रणाचा दर्जा खूपच सुरेख आहे. मराठी पुस्तकांत हे अभावानेच आढळते.

प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.

प्रथम आवृत्ती: जुलै १९९५, द्वितीय आवृत्ती: जान्युआरी २००७