सोडून मोकळे

रामायणात सीता अशोकवनात केस मोकळे सोडून बसलेली दाखवतात. महाभारतात द्रौपदी केस मोकळे सोडून पांडवानी कौरवांचा सूड उगवल्याशिवाय  केस बांधणार नाही अशी प्रतिज्ञा करते . अलिकडे स्वातंत्र्यपूर्व काळात प्रसिद्ध झालेल्या एका कवितेत शोकाकुल भारतमाता " सोडून मोकळे माथ्यावरचे केस " अशी बसली असल्याचे वर्णन आहे.थोडक्यात केस मोकळे सोडण्याचा दु:ख , क्रोध किंवा अशुभ याच्याशी संबंध आहे असे समजण्यात येत होते. आजकाल मात्र मुली केस मोकळे सोडून सारखे एका किंवा दोन्ही हातानी सावरण्याची कसरत करताना दिसतात. वैद्यकीय महाविद्यालयातील माझ्या मित्राने तर शस्त्रक्रिया करताना त्यांच्या केसाला आवर घालायला अनेक वेळा सांगावे लागते अशी तक्रार केली. केस मोकळे सोडणे कुठल्याच दृष्टीने सोयिस्कर नसताना ते तसे सोडण्याचा अट्टाहास करताना आजकालच्या बऱ्याच मुली दिसतात असे का?