खऱ्याखुऱ्या नाना फडणीस आणि सखारामबापू बोकील यांनी पेशवेशाहीची उडवली नसेल इतकी हबेलंडी या एकविसाव्या शतकातल्या नाना आणि बापूंनी भुरकुंडीच्या जनतेची उडवली. पण डोहात टाकलेला दगड कितीही मोठा असेल, तरी काही काळानंतर खडुळलेले पाणी शांत होतेच. त्याप्रमाणे हळूहळू भुरकुंडी पूर्वपदावर आली.
श्री श्री श्री श्री विश्वगुरू विधिभास्कर रत्नाकरानंद महाराज यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची उच्चपातळीवरून चौकशी करण्याची मागणी परस्पर आपल्या पित्त्यांमार्फत 'जनआक्रोश' निर्माण करून पुढे रेटण्याचा मा. वनमंत्र्यांनी प्रयत्न केला. "हे सर्व हिंदू साधुसंतांच्याच बाबतीत घडते... ---च्या किंवा ---च्या बाबतीत कधीच नाही... मर्द हिंदूंनो, पेटून उठा... म्हणा, तुमचे एकशेपन्नास तर आमचे सदतीस (मा. वनमंत्र्यांचे गणित पहिल्यापासून कच्चेच. सुदैवाने त्यांना अर्थमंत्री करण्याची पाळी यावी इतके आमदार त्यांच्या मागे नव्हते)... आसिंधू हिमाचल आसेतू रामेश्वरम (भूगोलही कच्चा, पाठांतरही कच्चे) सारा भारत एक आहे... गर्व से कहो..." असे भाषणही त्यांनी आपल्या 'कुंडीदेवी शिक्षण प्रसारक मंडळ' इथे चिकटवून घेतलेल्या व्यायामाच्या मास्तरांकडून (हे आबनावे गुरुजी मुळात मराठीचे द्विपदवीधर; नोकरी देण्यासाठी त्यांच्याकडून धन प्राप्त करून आणि खर्चून झाल्यावर ही मराठीची भानगड मा. वनमंत्र्यांच्या लक्षात आली. पण हार जातील ते मा. वनमंत्री कसले. "बरी बावडी दिसतेय मास्तराची" असा तोंडी शेरा मुख्याध्यापकांसमोर मारून त्यांनी आबनावेंना केशवसुतांच्या तुतारीऐवजी कवायतमास्तराचा ढोल हाती धरायला लावला) तयार करून घेतले.
मा. वनमंत्र्यांचेही बरोबरच होते. भारत स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत कधीही हा मतदारसंघ अपक्षाकडे गेला नव्हता, तो भाजप आणि काँग्रेसच्या मारामारीत या बोक्याच्या ताटलीत पडला होता. तो राखून ठेवायचा तर दोन्ही बाजूंच्या प्रतिस्पर्ध्यांचे 'गेम' करणे (इंग्लिश शब्दांबद्दल क्षमस्व; पण मा. वनमंत्र्यांना हीच भाषा कळे) भाग होते. त्यामुळे आता भगवे झेंडे नाचवून भाजपला झिणझिण्या आणायलाच हव्या होत्या. पुढे मोहर्रमच्या मिरवणुकीत मशीदीवर दगड पडले की सर्वधर्मसमभावाची आरोळी ठोकत 'दगडफेकीत जखमी झालेल्यांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी' अशी मागणी करून काँग्रेसची फेफे उडवायची याचे गणितही बसवणे भाग होते. मा. वनमंत्र्यांनी दगडांची जुळवाजुळव सुरू केली होतीच.
अशा पुढाऱ्यांमुळे समाजाला काय धोका निर्माण व्हायचा तो होवो, पण भुरकुंडीच्या (खुर्द आणि बुद्रुक दोन्ही) ग्रामस्थांना मात्र 'आत्ता, इथे, ताबडतोब' असा धोका होता. आणि तो वामनभटांच्या टकलात बरोबर उमटला. उच्चस्तरीय चौकशी म्हणजे समिती बसणार... ती चौकशीला येणार... आताशी कुठे फेब्रुआरी महिना उजाडतोय... म्हणजे समिती रंगात यायच्या वेळेला आंबे-काजू-फणस यांचा मोसम भरात आलेला असणार... मग घाला त्यांच्या बोडक्यावर डझनाने आंबे-फणस आणि शेकड्याने काजूची बोंडे... (भंडारवाड्याला भीती घालण्यासाठी त्यांनी तिथल्या प्रयोगात या संवादात "डझनावारी पापलेटे आणि माडीचे शिसे, शिवाय परत तो दारूबंदी मंत्री फुरशासारखा निघेल त्याच्या बोडक्यावर सगळ्या कोंबड्या" असा बदल केला).
अखेर दोन्ही गावांनी वामनभटासमोर शरणागती पत्करली. "म्हंजे बघा हो माझे प्रतिपादन कांय ते.. न्हाईतर परत आपले उलटून बोलाल या बाबल्यासारखे अन किरवेकरासारखे (बाबल्या आणि किरवेकर आधी काहीच उलटून बोलले नव्हते; वामनभटाने 'रंगवून खोडलेली दोन अक्षरे' आणि 'म्हातारा साधू' हे आपले जुने हिशेब पूर्ण करण्यासाठी त्यांची शेंडी उपटली)... उगाच संन्याशाची शेंडी आणि भाजीला भेंडी (म्हणींच्या बाबतीत वामनभट स्वयंभू होते)" असे म्हणून अजून एक गाठ मारून वळसा पक्का केला. वनमंत्री पुरस्कृत 'जनआक्रोश' रत्नागिरीत उमटायचा होता, तिथे जाऊन त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यासाठी गावाने वर्गणी गोळा केली. आणि "मी म्हणेन ती उत्तर आणि करेन ती पूर्व" असे गावाकडून कबूल करून घेऊन वामनभट रत्नागिरीला पावते झाले. आपला मुक्काम थेट त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या माटेकराच्या मिसळ शॉपमध्ये टाकला.
पहिले म्हणजे त्यांनी पोटाला तडस लागेपर्यंत मिसळ आणि भजी हादडली. मग डराडर ढेकरा देत वायूचा निचरा करीत ते मोर्चेकऱ्यांची वाट पाहू लागले. जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा काढणारे सर्व जण प्रथम तिथेच येतात. कारण पोट भरल्याखेरीज स्वतंत्र भारतात कोणी 'भुकेलेल्यांना अन्न द्या' अशी घोषणा द्यायलाही तयार नसतो हे त्यांना ठाऊक होते.
असे भुकेलेले, दिवसाला पन्नास (घोषणांना शंभर) अशा ठोक भावामध्ये आणलेले चेहरे हळूहळू माटेकराची बाकडी भरू लागले. वामनभटांनी हळूच त्यातला 'मुकादम' कोण असेल याचा अंदाज घेतला आणि आपण त्या गावचेच नाही असा साळसूदपणा आणून "काय हो, तुम्ही हितलेच काय?" असा सवाल टाकला. 'मुकादम' (मा. वनमंत्र्यांचा उजवा हात जानू तेली) चांगलाच तापला होता. गोव्याहून फेणीच्या बाटल्या दमणला घेऊन जाणारा ट्रक हातखंब्याजवळ उलटला होता आणि एस्टीतून रत्नागिरीला येताना ते मनोहारी दृश्य बघताच 'आक्रोश' करू इच्छिणारे निम्म्याहून अधिक 'जन' टाकोटाक खाली उतरले होते.
"व्हाट बिजिनेस यू?" जानू गुरकावला. (जानू चिडला की त्याच्या जिभेवरून गटार वाहू लागे. असा माणूस जवळ बाळगणे म्हणजे आजच्या प्रसिद्धीच्या युगात गळ्यातली धोंडच. पण जानूच्या शब्दाखातर 'राडा' करायला तयार असलेली फौज पाहता त्याला नाकारणे हाही मूर्खपणा झाला असता. त्यावर मार्ग म्हणून मा. वनमंत्र्यांनी जानूला "डोस्का फिरला तर जरा विंग्रजीत बोलत जा... नायतर काढशीत कुनाचीपन आईभैन... मेल्या तुका काय करूचा तां कर त्यांच्या आयाभैनींवांगडा, पन बोलून दाकवा नुको... भाईर कुटे तर अजाबात नुको" असा प्रेमळ दम दिला होता) जानूवरचे चार खून आणि एक तडीपारी हे डाग मा. वनमंत्र्यांनी 'दाग अच्छे है' म्हणत नाहीसे करून टाकले होते, त्यामुळे जानूच्या गळ्यातील साखळी त्यांच्या हातात होती.
ही खरीतर जानूसारख्या भाषिक कलाकाराच्या स्वातंत्र्याची असह्य गळचेपी होती. प्रतिपक्षातल्या स्त्रियांशी जानू जे संबंध (शाब्दिक रित्या तरी) जोडू पाहे त्यांचा साकल्याने विचार केला तर 'मानव सगळा एक' ही तळमळच त्यातून व्यक्त होत असे. पण कलेच्या गळचेपीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या सगळ्यांनी कायमचे स्थलांतर करून गुजरात गाठले होते. बरोबरच आहे, माल विकेल तिथेच व्यापारी जाणार. इथे बिचाऱ्या जानूला दिवसातून दहा वेळा इंग्लिशच्या वस्त्राला हात घालावा लागे.
"न्हाई, म्हटले हितले बाबूशेट (मा. वनमंत्र्यांचे टोपणनाव) चांगलेच धडाडीचे दिसतात हो... पुण्यास असतो मी, गेल्या काही वर्षांत हिते येणे झाले नव्हते... आता येताना बघतो तर आंबे सगळे काय मोहरलेत... तेव्हाच मी म्हंटले, ही बाबूशेटचीच कर्तबगारी असणार... न्हाईतर काय वनमंत्री झाले न्हाईत पहिल्यांदा, पण हे प्रकरणच निराळे हो".
जानू चांगलाच बावरला. त्याचा शरीरशास्त्राचा (त्यातल्या त्यात स्त्री-पुरुष संबंधांचा) अभ्यास चांगला पक्का होता. शस्त्रविद्येतला तर तो राष्ट्रीय पातळीवरचा तज्ज्ञ ठरला असता. या दोन्हीची एकत्र सांगड घालायचे काम असेल तर जानूपुढे कुणाचा आवाज निघणे शक्यच नव्हते. तलवारीचा घाव शत्रूच्या हातावर किती अंशात आणि किती ताकद वापरून घातला तर त्याचा निर्णय साल निघणे, खोल जखम होणे आणि हात तुटून पडणे असा वेगवेगळा येतो हे गणित त्याला पाठ होते. डोक्यात लाठी घालताना किती ताकदीला टेंगूळ येते आणि किती ताकदीला नारळासारखी कवटी तडकते यात त्याचा हात धरणारा कोणीच नव्हता. पण आंब्यांचा मोहोर?
आंब्यांना मोहर येण्यात बाबूशेटची कर्तबगारी असेल असे त्याला जेवढे जीवशास्त्र माहीत होते त्यावरून तरी जानूला वाटले नाही. पण कोण जाणे, असेलही... दिवसा दगडांचा साठा करणारे बाबूशेट रात्री गुपचूप आंब्याला मोहर चिकटवून येतही असतील.
आणि गेले काही दिवस जानूला एक शंका छळत होती... हल्ली बाबूशेट दाभोळच्या गुलामभाईकडे जरा जास्तच कृपादृष्टी वळवताहेत असा त्याला संशय होता. आणि गुलामभाईचा आणि बाबूचा 'स्नेह' जुना होता (बाबूच्या खांद्यावर आणि गुलामच्या पायावर त्याच्या खुणा चांगल्याच खोल होत्या). आपले 'काम' व्यवस्थित नाही असा आळ घेऊन गुलामला रान मोकळे करून देण्याचा तर बाबूशेटचा विचार नसेल, या विचाराने गेले काही दिवस जानूला दारू कडू लागत नव्हती. त्यामुळे बाबूशेटविरुद्ध वाटेल असा 'ब्र' सोडाच, खाकराही घशातून निघू नये याची तो जिवापाड काळजी घेत होता.
"खरो तडपदार हो आमचो बाबूशेट... त्येंका खरा म्हनजे शेंटरलाच जाऊक व्हया व्हता, पन मराटी मानूस ना, तितेच फसलां सगळां... तिते सगळे भो..भें..भिकारी (रंगात आल्यावर ही अशी गाडी सायडिंगला टाकावी लागे)... मराटी मानूस मोटा झालो तर मराट्याच्याच पोटात दुकतां" अशी जानूने आपल्यामते री ओढली.
वामनभट 'त'वरून ताकभात ओळखण्यात प्रवीण. इथे तर ताकाचा गडू, भाताचे तपेले, केळीचे पान, मिठा-लोणच्याचे सट, सगळे साग्रसंगीत तयार होते. वामनभटांनी पंगत गाठायला उशीर केला नाही (तसा तो ते कधीच कुठल्याच पंगतीत करत नसत म्हणा).
"हे त्या रत्नाकरानंदाला शेपाटून काढला हे बाकी बरें केलें हो बाबूशेटनी" जानूने भजे तोंडात सोडून वर मिसळीचा चमचा चेपला ही संधी वामनभटांनी साधली. जानूच्या चेहऱ्यावर झपाट्याने बदल झाले. पण माटेकराच्या मिसळीच्या रश्श्यातील आगडोंबाचा वामनभटांचा अंदाज बरोब्बर होता. काहीतरी (बहुधा मराठीतच; आताच्या भावना इंग्लिशमध्ये व्यक्त झाल्या असत्या असे चेहऱ्याकडे पाहून वाटत नव्हते) बोलण्याचा जानूचा प्रयत्न जीवघेण्या ठसक्यात परावर्तित झाला. त्याला पाणी देण्याच्या आणि पाठीवर थापटण्याच्या बहाण्याने वामनभटांनी आपली गाडी सोडली. आता शेंडी तुटो वा पारंबी ही वेळ आलेली आहे (आणि शेंडी जरा अंमळ अधूच वाटते आहे) हे त्यांना कळले होते. "मुळात त्या रत्नाकरानंदाला गुजरातेतूनच आणलेला हो 'त्यां'नी, पण बाबूशेटनी बरोब्बर ओळखले ते". इथे जानू किंचित थबकला. गुजरातेत कलेची, साहित्याची, अभिव्यक्तीची, मानवतेची, अहिंसेची, करुणेची, गांधीजींच्या तत्त्वांची, शाश्वत मूल्यांची (आणि तत्सम सर्व गोष्टींची) गेली काही वर्षे कायम गळचेपी होते याबद्दल त्याला काहीच ठाऊक नव्हते. पण गुजरातेत भाजपचे राज्य आहे आणि भाजप बाबूशेटच्या विरुद्ध पार्टीतला एक आहे हे त्याला चांगलेच माहीत होते.
"अहो, त्या वेड्यांनी कानफटवल्यानंतर चक्क गुजरातीत ओरडला म्हणे तो". इथे गेल्या काही वर्षात न आलेल्या या शेंडीवाल्याला इतकी माहिती कुणी दिली, गुजरातीतले ओरडणे हे आसामी किंवा स्वाहिलीमधील ओरडण्यापेक्षा काय वेगळे असते, हे प्रश्न जानूला पडले नाहीत. पैसा आणि माहिती कुठूनही आली तरी ती पवित्रच असते हा राजकारणातील पहिला धडा त्याला आता कळू लागला होता. त्याची नजर चांगलीच मवाळ झाली.
"अहो, आणि त्याच्याकडे संघाच्या माणसांची उठबस चालायची म्हणे रात्र रात्र... या ----नीच आणले असणार हे पात्र... बाबूशेटनी बाकी वेळेत ओळखलें हो... बाबूशेटच्या कुठच्याशा माणसास बाईच्या लफड्यात गुंतवायचे आणि बाबूशेटच्या नावास काळे फासायचे असला बेत होता म्हणे त्यांचा...".
तुम्हाला आठवत असेल, तर 'स्त्रीविषयक बालंट' हा जि प सभापती (आणि बाबूशेटचे जिल्ह्यातले वारस ) रावसाहेब यांचा दुखरा भाग होता. आणि त्याची चांगलीच माहिती जानूला होती. रावसाहेबांची 'गुलछबू नार' आणि जानूची 'डुप्लिकेट मल्लिका' या एकाच 'मॅडम'च्या छपराखाली नांदत होत्या. हे प्रकरण आपल्यावरही शेकले असते या विचाराने जानूचा थरकाप झाला. त्याने विचार करायचे सोडून देऊन (विशेष नाही करावे लागले नाही), तोंडातून आवाज न काढता (बरेच काही करावे लागले या मनोनिग्रहासाठी) श्रवणभक्ती सुरू केली. सावज ताब्यात आल्यावर मग वामनभटांनी वीतभर लाकडाच्या सव्वा हातच काय, पण अख्ख्या माणसाच्या मापाच्या ढलप्या काढल्या.
जानूला एकदम एका वेळेला चार पेग पाणी न घालता रेटल्यासारखे वाटू लागले. म्हणजे तो ट्रक उलटला आणि माणसे आली नाहीत ते बरेच झाले तर. अनवधानाने त्याच्या तोंडून तसे बाहेर पडले. वामनभट बहिरी ससाण्यासारखे झेपावले, "अहो, कशास उगीच प्रसिद्धीपराग़्मुख होताय (जानूला त्याच्याच भाषेत सांगायचे तर '@#@# काय समजला नाय'), तुमचे व्यवस्थापन (हे थोडेसे कळले) बाकी चोख हो... आजच्या आंदोलनाला (हे कळले; नुसते बोंबलणे म्हणजे 'आंदोलन' आणि समोरच्यांची डोकी फोडणे म्हणजे 'तीव्र आंदोलन' हे धडे त्याचे पाठ होत आले होते) चांगला प्रतिसाद मिळाला तर बाबूशेटची चांगलीच पंचाईत झाली असती हो, मग दिल्लीची स्वप्ने सोडून थेट गल्लीत उतरावे लागले असते (जानू चांगलाच धसकला; स्वतः बाबूशेट गल्लीत उतरले असते तर जानूने कुठे राज्य केले असते? आपल्या परसात?).. तुम्ही म्हणून हो... वेळीच हे जाणून तुम्ही आलेल्या लोकांना परस्पर टळवण्यासाठी त्या ट्रकवाल्यास पैशे चारून तो ट्रक उलटवला नसतात तर..." वामनभटांनी शहारल्याचा अभिनय केला.
आपण एवढे सगळे केले हे जाणून घेतल्यावर मात्र जानूची छाती दीडपट फुलून आली. या शेंडीवाल्या म्हाताऱ्याचे उपकार कसे फेडावेत हे त्याला कळले नाही. पण राजकारणातले गमभन गिरवताना त्याला हे ठाऊक झाले होते की केलेले उपकार लगेच फेडायला ते काय द्रौपदीचे (किंवा जानूला अधिक कळणाऱ्या भाषेत म्हणजे 'मल्लिका'चे) वस्त्र नव्हते. गरज पडेल तेव्हा हा शेंडीवाला आपल्याला कुठूनही शोधून काढेल हे त्याला ठाऊक झाले होते. त्यावेळेस मदत करायची की नाही हे तेव्हाचे तेव्हाच ठरणार होते. जानूने त्या म्हाताऱ्याचे बिल मात्र भरले. आणि बाबूशेटना आपली कर्तबगारी कशी रंगवून सांगायची याबद्दल सांगोपांग विचार करण्यासाठी बंदरावरच्या मिनार लिकर शॉपकडे मोर्चा वळवला. त्या लिकर शॉपच्या मागे जानूसाठी खास खुर्ची-टेबल मांडले जाई आणि मालक जंगम स्वतः सुरमई तळून आणून देई (एकदा हर्णैच्या बंदरात जंगमाचा 'गेम' होताना जानूने त्याला वाचवला होता). बाबूशेट युरोपातल्या वनांची पाहणी करण्यासाठी एक आठवड्याच्या दौऱ्यावर गेले होते, म्हणजे विचार करायला भरपूर वेळ होता. आपल्या 'कर्तबगारी'च्या अहवालात काहीतरी करून गुलामभाईचा हिशेब मिटवून टाकायचा तर सविस्तर आणि सांगोपांग विचारच गरजेचा होता.
माटेकराचे बिल जानूने दिले होते. एक मिसळ अजून चेपली असती तर बरे झाले असते असा विचार करत वामनभट एकशेसदतिसावी ढेकर देत बाहेर पडले आणि परत भुरकुंडीला पोचले. गावच्या संयुक्त बैठकीसमोर त्यांनी आपली मर्दुमकी (माटेकराच्या बिलाचा भाग वगळून) मोठ्या आवेशात पेश केली. संकट खरोखर टळले याची खात्री होईपर्यंत लोकांनी (विशेषतः बुद्रुकच्या) ऐकून घेतले.
मग मात्र अण्णा खोत आणि जनार्दन किरवेकर यांनी पैज लावल्यासारख्या कडाकड जांभया दिल्या. "ठीकय अण्णूशेट, चिल्लरखुर्दा पाठवूनच काम झाले हे बरे झाले, नाहीतर उगाच आपल्याला मोठ्या माणसांना उतरावे लागले असते" असे म्हणत जनार्दन किरवेकर अण्णा खोतासोबत चालू लागला. बुद्रुकच्या उरलेल्या सगळ्या लोकांनी चकार शब्द न काढता त्यांची पाठराखण केली.
"येवढी माटेकराची मिसळ खायची गरज नव्हती हो, नुसते आपले बाकड्यावर बसायचे त्या जानू की कोण तो त्याच्याशी बोलावयास... माटेकर काय नाय म्हणाला असता नुसते बाकड्यावर बसावयास? ... पण म्हणतात ना, 'मुफतका चंदन, घिस मेरे नंदन', त्यातली गत. असो, कसे का होईना, काम झालेले दिसते" असे म्हणून बाबल्याने आपला हिशेब परत चुकता केला आणि तो चालू पडला.
"अरे, काय झकास काम केलेय.... मग, सासरे कुणाचे होणारेत?" असे उच्चारून विनू पळून गेला.
थोडक्यात, भुरकुंडीचे ऐक्य पुन्हा विस्कटले आणि ते सर्व पूर्वीप्रमाणे सुखा-समाधानात आणि भांडत-तंडत नांदू लागले.
(काही भाग संपादित : प्रशासक)