भुरकुंडीचे देव - १

भुरकुंडीमध्ये उन्हाळा नेहमीसारखाच आला नि गेला. वेगळे म्हणजे एवढेच घडले, की उन्हाळा आरंभतानाच अच्युतने त्याच्या खळ्यातल्या दिव्याच्या उजेडाला आलेल्या माकडांना हाकलण्याच्या नादात नादुरुस्त होऊन घेतले. मुळात त्या माकडांनी उजेडाला बसण्याखेरीज त्याचे काहीही नुकसान केलेले नव्हते. अगदी खळ्याला लागून असलेल्या गोटीआंब्याला चांगलाच बहर आला होता त्यालाही हात लावला नव्हता. पण का कुणास ठाऊक, अच्युतचे आधीच तिरके असलेले डोके सरकले. विजेची देयके चढत्या भाजणीत भरत असल्याने त्याला आता त्या विजेबरोबरच त्या प्रकाशावरही आपला अधिकार असल्याचे भासू लागले होते. त्या उजेडात कांबळ्यांच्या जनूला प्रेमपत्र लिहायला आलेल्या रामा घडश्याच्या 'इनय'ला त्याने अर्वाच्य (म्हणजे नेहमीच्या) शिव्या देत पिटाळून लावले होते.

तरीही, त्या भगभगीत उजेडाला आलेल्या, आणि पोक काढून त्या खांबाखाली बसलेल्या माकडाला हाकलायला कुणीही शहाणा माणूस बचकेत मावेल एवढा धोंडा भिरकावेल, किंवा फारतर लाठी घेऊन चाल करील. पण अच्युतचे डोके अर्थातच सरळ चालायला तयार नव्हते. तो त्याला लाथ घालायला पुढे झाला. लाथ घालण्याआधी पायाखालची जमीन तपासावी हा मूलभूत नियम विसरला, आणि पेकाटाचे हाड मोडून घेऊन बसला. ते मूळपदावर येईपर्यंत पार पावसाची चिन्हे दिसू लागली होती.

'फुकट फौजदारी करायला हा लॉर्ड फॉकलंड नसल्याने माझा आंबे घाऊकीत घेऊन मुंबई बाजाराला पाठवायचा व्यवसाय या वर्षी चांगला बहरला' असे सांगत गजा बापट दारोदार हिंडला. पेकाटाचे हाड मोडल्याने सक्तीचे अंथरूण धरावे लागलेल्या अच्युतने हे ऐकताच जी शिव्यांची माळ धडकावली, ती ऐकायला येण्याचे धाडस गजाला अर्थातच करवले नाही.

उन्हाळा संपायला आला. भाजावळीचा खमंग वास दरवळू लागला. आणि "एकदा तरी येऊन जा. घरचे आंबे आहेत ते सोडून तिकडे कसले बेचव फळ दसपट दाम देऊन खातोयस" या गजाच्या सततच्या टुमण्यामुळे का असेना, विवेक एकदाचा आला.
पण त्याच्या येण्यामागे आंबे खाण्यापेक्षा दुसराच हेतू जास्त प्रबळ होता. त्याच्याच कंपनीत काम करणार्‍या रिटा साधवानी नामक कन्येने त्याचे चित्तहरण केले होते. तिला पाहून त्याच्या मनात जे होई त्याला पूरक भावना तिच्याही मनात उमटते हे तिनेही स्पष्ट करून टाकले होते. आणि त्यांचे सहजीवन कसे असेल/असावे याचे चित्र रंगवणे ताबडतोब सुरू केले होते. देशस्थांबरोबर सोयरीक करणे म्हणजे सामाजिक सुधारणेची अत्युच्च पायरी गाठणे असे मत असलेला (विवेकच्या एका डॉक्टर आत्याने कुलकर्णी नामक व्यवसायबंधूशी लग्न केले होते; तिला भाऊबीजेला येण्यासाठी सात वर्षे वाट पहावी लागली होती) आपला बाप हे लग्न कदापि मान्य करणार नाही हे विवेकला माहीत होते. पण रिटाने ओठांचा चंबू करून "व्हिव" अशी साद घातली की त्याला सगळे सगळे व्यर्थ वाटू लागे. तिच्या सोबत वेळ मिळावा म्हणून त्याने onsite जाण्याची एक संधी सोडली होती आणि पुण्याला बदली करून घेण्याचे सगळे प्रयत्न थांबवले होते. आता जे काय होईल ते रिटासोबतच असा त्याच्या मनाचा निश्चय जवळपास पक्का झाला होता.

काहीतरी करून आपल्या बापाच्या कानावर आपला निश्चय घालावा असा हेतू मनात धरून विवेक एका आठवड्याच्या अखेरीस प्रगटला.  शुक्रवारी रात्री हैदराबादहून उशीरा मुंबईत उतरल्यावर त्याने सरळ एक भाड्याची इंडिका ड्रायव्हरसकट घेतली आणि उजाडताच तो घरी पोचला. तो रात्री उशीरा मुंबईत पोचणार आहे एवढेच माहीत असलेला गजा, मुलगा आता सकाळी सहाच्या बाँबे सेंट्रल - शिरवली गाडीने जेवणवेळ उलटून गेल्यावर घरी पोचेल अशा समजुतीत होता तो विवेक हजर झाला. गजाची एकदमच गडबड उडाली. विवेकला आणायला शिरवलीला जायला लागेल म्हणून त्याने बुद्रुकमधल्या सुनीलची नवीन रिक्षा सांगून ठेवली होती. आणि तिथपर्यंत रिकामी रिक्षा कशास न्या म्हणून शिरवलीतल्या खोतांकडे टाकायच्या चार आंब्याच्या पेट्या निगुतीने बाजूला काढून ठेवल्या होत्या. त्या आता या मुलाने आणलेल्या गाडीतूनच नेता येतील काय असा एक विचार तत्परतेने त्याच्या मनात आला. पण खुर्द-बुद्रुकमधले स्नेहसंबंध लक्षात घेता सुनील हा ऐनवेळेचा खाडा धरेल की कसे याबद्दल त्याच्या मनात अधिक तत्परतेने संदेह उपटला. आणि तो राग त्याने मुलावरच काढला. "यवढा मुंबईपासून गाडी घेऊन आलास? शेपाचशे तरी पडले असतील. कशास उगाच वायफळ खर्च? तो तुमचा कांपुटर की काय झाला म्हणून काय झाले? नोटा तर नाही छापत ना?"

खर्च हा शेपाचशेच्या घरात भागणारा नसून ड्रायव्हरसकट चांगले चार हजार मोजले असल्याचे अर्थातच विवेक बोलला नाही. तेवढ्यात "अहो, एवढा दमून-भागून आलाय बिचारा, त्याला जरा दम तर टाकूं दे. तुमची आपली सदाचीच कटकट आणि वटवट. जिवाला धाया म्हणून कशी ती नाही. 'ये', 'ये' म्हणून सत्रांदा तुम्हीच ना पत्रे लिहीत होतात, नि शिरवलीस जाऊन फोन करीत होतात? मग आता कशाला उगाच वसवसतांय?" असे म्हणत त्याची आई त्याच्या संरक्षणाला सरसावली. लग्नानंतर वीसेक वर्षे नवर्‍यासमोर ब्र काढण्याची तिची हिंमत नव्हती. पण तो हिशेब पठाणी व्याजाने मिटवायचा अशा इराद्याने ती कामाला लागली होती.

गजाने माघार घेतली. पहिली वीस वर्षे त्याच्या मदतीला लाल आलवण घट्ट लपेटलेली त्याची आई होती. ती गेल्यापासून गजाच्या नशिबी माघारच लिहिली होती. "हो, लाडका लेक आलाय ना. करून घाल हो आता त्यास पानग्या आणि शिरा". गजाच्या दृष्टीने ही चैनीची परमावधी होती. आणि गजा बागेत शिपणे करावयास चालू पडला. लेक हैदराबादेसून येवो वा लंडनसून, त्याने माडा-पोफळींची तहान तर भागणार नव्हती ना?

क्लायंट मीटींग्जमध्ये एव्हाना तरबेज होऊ घातलेल्या विवेकला ही मीटींग मात्र चांगलीच जड वाटू लागली. गजा बापटासारखा खवीस क्लायंट जगात कुणालाही आणि कुठेही सापडणे शक्य नव्हते. विवेकने मातोश्रींकडे सूतोवाच करायचा यत्न केला. त्या माउलीच्या प्रतिक्रियेचा पहिला भाग जरी त्याला खुषावणारा असला (तुला पसंद आहे ना? मग झालं तर..... आता मी कितीही म्हटलं तरी येणारी सून थोडीच माझ्याशी जुळवून घेणारे? मलाच जुळवून घ्यायला लागणारे ना तिच्याशी? आता तुलाच पसंद आहे म्हटल्यावर झालं) तरी पुढचा भाग (सैंपाकपाणी करते ना वेवस्थित? चारीठाव करून घालेल ना तुला वेळेवर? मग झालं तर. पाहिजे तर शिकवीन हो मी तिला 'आपली' रीत) त्याला निरुत्तर करून गेला.

डॉमिनोज आणि पिझ्झा हट हेच दोन गव्हाचे प्रकार माहीत असलेल्या रिटाला या पुढच्या भागातला एकही शब्द लागू पडत नाही हे आईला कसे सांगावे या नव्या विवंचनेत विवेक पडला. मात्र "तू तात्यांशी काही म्हणजे काही बोलू नकोस. मीच विषय काढीन तेव्हा काय ते बघू" एवढे मात्र त्याने तिच्याकडून कबुलावून घेतले.

गजा शिपणे करून परतेस्तवर विवेकने मनातल्या मनात बापाबरोबरच्या मीटींगची तयारी करत आंगण्यातल्या मांडवाखालच्या माचल्यावर शवासन सुरू केले होते. "झोपू देस हो बिचार्‍यास, दमला असेल बिचारा", गजा हळूच बायकोला म्हणाला. "मी कशास जात्ये उठवायास त्यास? तुम्हीच काहीतरी खेकटे काढून झोपमोड कराल त्याची. स्वस्थ म्हणून बसवलांय कधी तुम्हांला?" असे सणसणीत प्रत्युत्तर मिळाल्यावर मात्र तो मुकाट गाय छाप जर्दा चोळत झोपाळ्यावर झोके काढत बसला.
दुपारी जेवणवेळेला विवेकला हाक मारायला म्हणून गजा आंगण्यात उतरला तोच वर रस्त्यावर एष्टी थांबली, आणि मिनिटाभरातच पायवाटेने अंतू बाळू उतरताना दिसला. तो येत होता थेट गजाच्याच घराच्या रोखाने. आता हा महापुरुष कशास उपटला यावेळेस असा गजाचा विचार होतो न होतो तोच अंतूने गजाला बघितले आणि हाळी घातली, "गजाशेट, कांय म्हणतांय?".

दुसर्‍याचा घरी जाऊन स्वतःच हा सवाल करणारा अंतू बाळू नामे गृहस्थ नक्की कशावर जगे याचा कुणालाही हिशेब लागत नसे. जमीन म्हणावी तर त्यातून पोतंभरसुद्धा भात निघत नसे. नारळ, सुपार्‍या, आंबे, फणस हे सगळे घरखर्चालाच जेमतेम पुरत. एकुलता एक मुलगा मुंबईला असे, पण तो मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये कारकुनी करून कांदिवलीला दोन खोल्यांच्या घरात कसाबसा संसार रेटत होता. इकडे हातभार लावणे त्याच्या कुवतीबाहेरचे होते.

पण गावकीचे आणि विशेषतः भावकीचे कुठलेही काम असले की [float=font:sagar;place:top;]अंतू बाळू सर्वांपेक्षा चार पावले पुढेच असे. लग्न, गंभीर आजार आणि मयत हे त्याचे चढत्या भाजणीने आवडीचे प्रसंग होते.[/float] पण यातील शेवटच्या दोन प्रसंगांमुळे त्याला लग्नाला बोलावायचे कुणाचे धाडस होत नसे. बाबल्याच्या मुलीच्या लग्नात सप्तपदी सुरू झाल्यावर अंतूने "पण खांद्यावर मडके कुठे दिसत नाही ते" अशी (त्याच्या मते हलक्या आवाजात) कुजबूज करून बाबल्याला फेफरे आणले होते.

त्यामुळे आता अंतू बाळू आला म्हणजे लोकसंख्या कमी होऊ घातली आहे वा झाली आहे हे गजाच्या लक्षात आले. 'कोण' एवढाच माफक औत्सुक्याचा प्रश्न होता, तो अंतूने आंगण्यात पाऊल टाकायच्या आतच निचरला. "जोगळेकरांचा....." "आबा?" गजाने गाळलेली जागा भरली. "छे! आबा कुठला जातो इतक्यात? आबाचा नातू, सुधीर चचला. आबा पंतवंडांचे श्राद्ध जेवल्याशिवाय निघायचा नाही"

आबा जोगळेकर हे खरे तर आबणवलीचे प्रस्थ. पण गजाच्या वडिलांच्या आतेबहिणीची नणंद तिथे दिली होती. वडिलांना आतेबहीण अतीप्रिय (त्यांना सख्खी बहीण नव्हती). आणि आपल्याला छळछळ छळणारी जाचखोर नणंद एकदाची पदरात घेतली म्हणून त्या आतेबहिणीला इतके हुश्श झाले होते, की तिने अगदी वेवस्थित जाणेयेणे ठेवून जरीमरी असलेले नातेसंबंध चांगलेच गुटगुटीत केले होते. आबा नव्वदी ओलांडून अजूनही बिनचष्म्याचे, बिनकर्णयंत्राचे होते. पण त्यांचा नातू सुधीर जन्मतेवेळी हातपाय गार पडल्याने चोळलेल्या ब्रँडीला जागला होता आणि चाळिशी ओलांडायच्या आतच लिव्हर नादुरुस्त करून घेऊन अखेर गचकला होता. शुद्धीत असे तेव्हा सुधीर गजाला थोरल्या भावासारखा मान देत असे. आणि विमान उडाल्यावर तो गजाला बाप म्हणायला तयार असे.

म्हणजे तिकडे जाणे आले.

आळसावून माचल्यावर लोळत स्वतःच्या चेहर्‍यावर उतरलेल्या उन्हाच्या तिरीपीला हाकलायचा प्रयत्न करत असलेल्या विवेकच्या जाणीवेत हळूहळू हे सर्व उतरले. आपले तीर्थरूप आता दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंत काही येत नाहीत याची अचानक खात्री झाल्याने तो हुशारला. त्याला दुसर्‍या दिवशी सकाळी अकरापर्यंत निघणे भाग होते. म्हणजे Meeting postponed! एकदा हा विषय झडझडून बोलून टाकायलाच हवा असे त्याने हैदराबादपासून आणायचा प्रयत्न केलेले उसने अवसान अखेर गळाले आणि या भेटीत तरी तो अप्रिय प्रसंग टळला म्हणून त्याने हुश्श केले. आता परत गणपतीत यावे आणि त्यावेळेस काय तो सोक्षमोक्ष लावून टाकावा असा बेतही त्याने स्वतःची (खरे तर रिटाची) समजूत घालायला आखून टाकला आणि अनेक वर्षांनी आठवलेली "माता दिसली समरी विहरत" ही ओळ भसाड्या आवाजात (तानांसह) रेकत तो आंघोळीला गेला.

छान लसणीच्या फोडणीचे कुळथाचे पिठले, जिरग्या तांदळाचा भात आणि लालभडक पोह्याचे पापड. विवेक तुडपून जेवला आणि परत आडवारला. मृतरेषा पुढे ढकलली गेल्यावर जो आनंद होतो तो सांगोपांग आणि आकंठ अनुभवायला माहिती तंत्रज्ञानात काम करणाराच माणूस हवा!

मग संध्याकाळी तो दोन मैल रस्ता तुडवत समुद्रावर जाऊन आला आणि येता येता आबणवली तिठ्यावर पक्या दळवीने घातलेल्या हाटेलात रात्रीच्या जेवणाचा बेत पक्का करून आला. कोकणात एकंदरच पर्यटकांचे प्रमाण फारच वाढल्याने पक्याचे हाटेल चांगलेच भरारले होते. तिथे रात्री डीएसपी च्या साथीने पक्याच्या मिनी-पोल्ट्रीतली एक कोंबडी सद्गती पावली आणि डुलत विवेक परतला.

डीएसपी बहुधा नकली होती. सकाळी तो नकलीपणा आणि अनेक दिवसांचे अर्धजागरण यांनी आपला अंमल लौकर सोडला नाही. त्यामुळे निघायची वेळ होईपर्यंत विवेक सरबरलेलाच होता. तो पोहे खाऊन निघता निघता डोळे तांबडे करून गजा परतला आणि थेट न्हाणीघरात शिरला. "येतो लौकरच परत" असे बाहेरूनच ओरडून बजावून विवेक परत गाडीत बसला आणि डुलक्या मारत रिटाकडे परतला.

=====

पाऊस येणार या आशेवर उकडहंडीत गदमदणारी सगळी माणसं टुकत बसली होती. दोन दिवस उशीर करून का होईना, तो आला. आणि आला अशा जोषात की जणू दोन दिवसांचा नव्हे तर दोन दशकांचा हिशेब चुकता करायचा राहिला होता. पहिल्या पावसाने उसासून फुलणारी धरती त्या संततधारेला कंटाळून चुलीच्या उबेला डुलक्या मारणार्‍या मांजरीसारखी सुस्त झाली. हवेतला दमटपणा स्पर्शालाही जाणवू लागला. चुलीची धगच नव्हे, तर त्या धुराचा वासही हवाहवासा वाटू लागला.
भिंती शेवाळल्या. पायठण्याही शेवाळू लागल्या. त्यावरून रपाटून आपटून गजाने कंबर शेकवून घेतली. मग बायकोच्या हस्ते त्यावर वेखंडाचा लेप घालून घेऊन तो निपचित पडला. तोस्तवर अच्युत आपले मोडलेले पेकाट नीट दुरुस्तावून घेऊन फिरता झाला होता. त्याने लगोलग येऊन गजाची वास्तपुस्त केली, आणि "शेवटी लबाडीचा पैसा हो तो, पचायाचा नाही असा" असे प्रोत्साहनपर सांत्वनाचे (वा सांत्वनपर प्रोत्साहनाचे) शब्द उच्चारून चालता झाला. बायको समोर असल्याने गजाला त्याचा शरीरशास्त्राचा सखोल अभ्यास समर्पक शब्दांत मांडण्याची संधी सोडावी लागली.

भुरी नदीला येऊन मिळणारे असंख्य पर्‍ह्ये आणि नाले लाल पाण्याने फेसाळत वाहू लागले. ग्रामपंचायतीच्या समोरचा साकव मोडला. तो ग्रामपंचायतीच्याच खर्चाने बांधलेला असल्याने कुणाला वाईट वाटले नाही वा कुणाची गैरसोयही झाली नाही. कारण त्याच्या एका टोकाला होती निवडुंगाची बने आणि दुसर्‍या टोकाला आग्या आंबा (त्यावर आग्यामाशांचे मोहोळ होते). नाही म्हणायला तो ज्याने बांधला होता तो इसूप गनी पारकर तेवढा खुषावला.

पावसाचा जोर वाढतच राहिला. "लक्षण कांही बरोंबर नाहीं हों" असे नाकातून रेकत शिरूभट जमेल तेवढा हिंडला. शेवटी "आबा, ह्या निसरड्यात धडपडून घ्याल कुठेतरी, आणि श्रावणातल्या पुजांची कमाई सोडून डाक्तराला पैसे घालावे लागतील" या विनूच्या बोलण्याला शिरूभटाने मान दिला आणि तो थंडावला.

आणि नवल वर्तले. पाणी चढत चढत कुंडीदेवीच्या देवळाच्या पायरीला लागले. गावोगाव खबर पोचली. आपण आपल्या हयातीत असले काही पाहिले नाही असा आबा जोगळेकरांचा आबणवलीवरून कबुलीजबाब आला. चिपळुणातल्या दंतवैद्याने वामनभटांकडून शेकड्यात रुपये उपटून शिवाय बरेचसे दातही 'कवळी करून टाकू' या सबबीवर उपटले होते, आणि त्याच्याकडे जाणे आता पाऊस उणावल्याखेरीज शक्य नाही हे कळल्याने वामनभट "कलियुग हो हे, कलियुग" असा भाता फुटलेल्या पेटीसारखा फुसफुसाट करत हिंडू लागला. त्याला अच्युतने लगोलग खोडा घातला. "वामन्या, तुझ्या प्रपितामहांच्या प्रपितामहांचा जन्मही कलियुगातच झाला हों, मग तू काय त्याआधी जन्मास यायला हवा होतास कांय?.... उगाच नव्या बायलेसारखा मुरकत बसू नकोस.... तूस कांय वाटले, कलियुग नसून सत्ययुग अवतरले की काय?" झोपाळ्याच्या बिजागरीसारखा निम्मा मनातच कुरकुरत वामनभट गप्प बसला.

बघता बघता पाणी पायरी ओलांडून आतल्या आवारात झिरपले.