भुरकुंडीचे देव - २

शतकानुशतकांचा जुना असलेला, पण अजूनही टवटवीतपणा टिकवून असलेला शालू चापूनचोपून नेसून ती हळुवारपणे गाभार्‍याच्या पायर्‍या चढू लागली. गर्भागारातून पैंजणांचा रुणझुणता नाद उमटला आणि आतून भरजरी वस्त्रे नेसलेली ती दगडी उंबरठ्यापर्यंत आली.

"ये गो बाय, किती वर्सांनी आलीस गो?" मायेने कुंडीदेवीने चौकशी केली.

"अगो, वर्से म्हणशील तर आठवायासच हवीत हो.... वर्से नाही, शतके म्हण!"

"हो तर काय! त्या कारतलबखानाच्या चढाईच्या धामधुमीत आली होतीस, पण त्या पाण्यात कितीच्या किती आसूद मिसळलेले, नुसते लालभडक! आणि चिखल तो मातीचा की मांसाचा तो कळेना अशी स्थिती. आज जरा बरी आल्येस हो, ठीकठाक आहे ना सगळे?"

"ठीकठाकच म्हणायचे नि काय! तुला बरे आहे, जागचे हलायास नको.... मला मात्र जनलोकांनी त्याजलेल्या वस्तू घेऊन सागरास पोचवायाचे काम. अगदीच ओसांडून वाहिले तर एकांदा नारळ मिळेल तो.... नाहीतर काय काय माझ्या पदरात पडते विचारू नकोस. नाकारलेल्या अन्नापासून नाकारलेल्या संततीपर्यंत! ढवळून येते अगदी पोटात कधीकधी, आणि त्यावर ही माणसं "भोवरा झाला हो पात्रात, जरा जपून" म्हणून मोकळी होतात!"

"अगे, जागचे हलायास नको हे बरे की वाईट हे एकदा प्रत्यक्षच येऊन पहा म्हणजे झाले! खुद्द देवळात नसतील देहधर्म उरकीत, पण त्यांच्या 'विधीं'चे गंध मात्र पोचतात हो थेट गाभार्‍यात! आणि तुझ्या पदरात काय घालायचे नि भूमातेच्या उदरात काय दडवायचे याची बोलणीचालणीदिखिल देवळातच घडतात! शिवाय, हलायाची सोय नाही. त्यापेक्षा तुला बरे, वाहत रहाणे....."

"राहू दे बाय, आता एकमेकींची जागा घेऊ म्हटले तरी शक्य नाही. त्या कितीशा सहस्त्र वर्षांपूर्वी जर तसा विचार केला असता तर काही जमू शकले असते. असो. काय म्हणताहेत तुझी लेकरे?"

"आहेत आपली सामधामी. पण त्यात काय विशेष म्हणा, शतकानुशतके तशीच आहेत ती. भांडतात, तंडतात आणि एकत्र रहातात. पण सध्या जरा जास्तच भांडण-तंडण जाणवू लागले आहे हो. ह्या टीचभर खुर्द आणि बुद्रुकमध्ये जरा जास्तीच झकडपकड चालल्ये एवढ्यात. काय करावे काही उमगत नाही बघ."

"खरंच बघू का मी?" भुरीनदीचा स्वर एकदम खोडकर लागला.

"बघ हो बयो, खरंच बघ जमलं तर!" कुंडीदेवी जवळजवळ निरागसपणे म्हणाली. त्यातला मानभावीपणा ओळखायला भुरीनदीच व्हावे लागले असते.

"ठीक, बघतेच. तू फक्त मुळीच मध्ये पडू नकोस म्हणजे झाले" भुरीनदी फणकारली.

"बरं बाई, तू म्हणशील तसं" कुंडीदेवी गालात आवळे ठेवल्यासारखी खट्याळ हसली.

"ठीक आहे, बघतेच मग!" शालू फलकारत भुरीनदी परतली.

"फादरबरोबर डिस्कस करून मॅरेजचा प्रपोजल फायनल का नाही केला" म्हणून रिटाने विवेकला पिडले, आणि "त्यात फादरची परमिशन कशाला पाहिजे? मॅरेज काय त्याच्यासंगती करायचा आहे काय" असे म्हणून तिने "काय डिस्कस करायचा असेल तर फिनिश करून टाक मंथएंड पर्यंत" अशी सवलतवजा धमकी दिली.

विवेकने एक प्रॉजेक्ट नुकताच संपल्याच्या आनंदात सलग पाच दिवस रजा मिळवली आणि परत शनिवारी सकाळी तो घरी हजर रहाण्याच्या बेताने आला. पण पावसाने त्याला वडखळ नाक्यापासूनच जी समर्थ साथ दिली त्यामुळे, आणि कशेडी घाटातल्या उलटलेल्या टँकरने खोळंबवलेल्या वाहतुकीने, तो घरी पोचला तेव्हा दुपार उलटून गेली होती. सूर्य चार दिवस दिसलाच नव्हता, त्यामुळे तो माथ्यावरून ढळला असे म्हणायची सोय नव्हती.

का कुणास ठाऊक, त्या कुंद कोंदट वातावरणात त्याला उदास उदास वाटू लागले. शनिवारचा उरलेला दिवस त्याने अर्धवट ग्लानीतच काढला आणि रात्रीचे जेवण होताच माचल्यावर गोधडीत गुरफटून तो झोपला. दहावी शिरवलीतून पास करून कोल्हापूरच्या कॉलेजात शिकायला गेल्यापासून, म्हणजे गेली नऊ वर्षे, तो पावसाळ्यात कधीच घरी नव्हता. त्याला त्या आठवणींनी आणखीच उदासायला झाले. पडत्या पावसाच्या तालावर चित्रविचित्र स्वप्ने बघत आणि मधूनच दचकून जागा होत तो डुलकत राहिला.

सकाळी उठल्यावर त्याला अधिकच थकिस्त वाटू लागले. आईने केलेला आल्याचा कढत कढत चहा घेऊन तो बाहेर पडला. पाऊस ठिपठिपतच होता. त्या रबरबाटातून कुठे जायचे हा प्रश्न न सोडवताच तो चालत राहिला.

पाऊस थोडा उणावला होता, त्यामुळे भुरीनदीला जरा उसंत मिळाली होती. पात्राशेजारच्या खाचरातून विमनस्क अवस्थेत हिंडणार्‍या विवेकला पाहून ती क्षणभर थबकली. तिच्या खळाळाची संथ लयीत चालू असलेली गर्जना जरा संथावली. काहीतरी वेगळे घडल्याच्या जाणिवेने विवेक जरासा चमकला. पण नक्की काय घडले हे न कळल्याने त्याने परत चिखल तुडवायला सुरुवात केली.

"कोण रे तो फोकळीचा तिकडे? झोंडगिरी करत हिंडायला काय बापाचे शेत वाटले काय?" अशी गर्जना करत अच्युत गोटीआंब्यामागून एकदम भसकन पुढे आला. "तू विवेक ना रे गजाचा? कधी आलास? त्या काम्प्युटर की कायशा यंत्रात खुडबूड करतोस ना? गजा करीत असतो पुत्रचरित्राचे पारायण वेळीअवेळी. बाकी मैद्याच्या पोत्यासारखा पांढरा आणि फोपशा होत चाललाहेस हो. काही हालचाल करतोस की नाही दिवसाभरात? की सकाळच्या झाड्यालाही गाडीतूनच जातोस? बाप बघ तुझा, चांगला तुडतुडीत आहे हो अजून. आणि चेहरा असा का करून हिंडतोयस बाप मेल्यासारखा. गजा बरा आहे ना? कुल्यावर हापटला होता पायठणीवरनं, पण तेवढ्यान काय होईलसे वाटले नव्हते"

विवेक जरी हैदराबादेत माहिती तंत्रज्ञानावर उपजीविका करीत असला तरी होता तो भुरकुंडीचाच. त्यामुळे त्याने पटकन गजा खुशाल असल्याची द्वाही फिरवली. नाहीतर अच्युतने गजाच्या समाचाराला अख्खी भुरकुंडी लोटवली असती.
भुरीनदीच्या खळखळाटाने विवेकला काहीतरी झाले आणि [float=font:sagar;place:top;]त्याने सरळ त्या गोटीआंब्याखालीच अच्युतला 'रिटा'ध्यायाचे श्रवण घडवायला सुरुवात केली. आणि तिच्याशी लग्न झाले नाही तर आपण आजन्म ब्रह्मचारी राहणार असल्याचा निश्चयही बोलून टाकला.[/float]

अंगावर कुठेही चिमूटभर जादाचे मांस नसलेल्या अच्युतचा चेहराही तसाच चोपलेला होता. आणि निळ्या-घार्‍या डोळ्यांमुळे तो आणखीनच उग्र वाटे. पण कसे कुणास ठाऊक, त्याच्या चेहर्‍यावरचा उग्रपणा हळूहळू निचरत गेला. आणि वरकरणी रागाच्या सुरात त्याने विवेकला दटावले, "हे सगळे हितेच बोलणारेस की काय ह्या भुळभुळ गळत्या पावसात? काय माझ्या खळ्यात पाऊल घालायचे नाही अशी शपथ घ्यायला लावल्ये की काय तुझ्या बापसाने? नाही ना? मग चल जरा कोरड्याला बसू आणि बोलू".

अच्युतने घर अगदी म्हणजे अगदी टापटिपीने ठेवले होते. छत्री मिटवून विवेकने ती गजांच्या भिंतीला अडकवली तोच कोरडा पंचा घेऊन अच्युत हजर झाला. "डोके पूस हो आधी निगुतीने. नाहीतर तुम्ही शहरात राहून बैठ्या कामाला लालचावलेली मुले, लगेच अंथरूण धराल".

त्याला बसायला आपली आरामखुर्ची देऊन अच्युत आत चहा करायला गेला. वाफाळता चहा पोटात जाताच विवेकला बरे वाटले.

"बरा वेळ ठेवून आलायस ना? मग जेवायलाच थांब. असा फक्कड आंबटीभात रांधतो की बोटे चाटत बसशील." लगेच अच्युतने मागच्या पडवीत फाटी सारखी करायला आलेल्या रामा घडश्याला निरोप देऊन गजाच्या घरी पिटाळले. आणि विवेकला स्वैपाकघरात चुलीपाशीच पाट मांडून तो जेवणाच्या तयारीला लागला.

"बोल बघू काय म्हणतायस तो" विवेकला एवढी किल्ली पुरेशी होती. अच्युतचे रांधणे एकीकडे चालू राहिले, एकीकडे विवेकचे बोलणे चालू राहिले. दूर भुरीनदीचा खळखळाट अस्पष्ट ऐकू येत होता.

बोलणे रंगात आले तसा पावसाचा जोर हळूहळू वाढत गेला. नदीचा खळखळाट स्पष्ट होत गेला. दोघेही जेवायला बसेपर्यंत परत भुरीनदी देवळाची पायरी वलांडायला सिद्ध झाली.

"अरे, एक सांग, त्या रिटा का कोण त्या मुलीबरोबर संसार करणारेस ना सगळा जन्म? की घटकेत गोडगोड आणि घटकेत काडीमोड? एवढा विचार स्पष्ट करून ठेव आणि तिलाही करायला लाव. आणि उगाच कसल्या कसल्या स्वातंत्र्याच्या गप्पा ती मारीत बसली, तर आत्ताच उपरणे झटकून मोकळा हो. आयुष्याचा प्रश्न आहे."

विवेकने यावर तीव्र नाराजी दाखवत अख्खा जन्मच नव्हे तर जन्मजन्मांतरीचे कंत्राट घ्यायलाही तो तयार असल्याचे ठासून सांगितले. अच्युतने ते उडवून लावले. "त्या बोलाच्या गोष्टी ठीक आहेत. आप मेला नि जग बुडाला. नंतरचे पाहिलेय कुणी? पण आत्ताचे अगदी नीट निरखून पारखून घे एवढेच हो माझे म्हणणे"

आपल्या भरभरीत खर्जातल्या आवाजात अच्युत अजून बरेच काही सांगत बसला. विवेकच्या हुंकारांनी त्या संवादसमईची वात सरती होत राहिली. आवाज प्रकाशत राहिला.

देवळातून भुरीनदी अनिमिष नेत्रांनी हे पहात होती. तिच्या मागे कुंडीदेवी दोन हात राखून उभी होती.

"बघ, कसे जुळवले की नाही वेवस्थित? जरा नीट विचारांती वागले की सगळे होते हो....." भुरीनदीच्या आवाजात अगदी गर्वाच्या पायरीवर टेकलेला अभिमान झळकत होता. कुंडीदेवीने 'आहे बुवा' असा चेहरा केला, पण शब्द खर्चले नाहीत.

जेवणे झाली. हात धुऊन दोघेही ओसरीवर आले. जिकडेतिकडे साठून राहिलेल्या पाण्यावर पावसाचा ताशा डब्ब वाजत होता.

विवेकला अचानक सगळे सोपे सोपे वाटू लागले. 'बापाने अगदीच हटवादीपणा केला तर बिनधास्त माझ्याकडे ये' असा आशीर्वादही अच्युतने दिला होता. आता त्याने थेट पुढची स्वप्ने रंगवायला घेतली.

"निघू मी आता?" अखेर विवेकला आपल्याला निघायला पाहिजे याचे भान आले.

"अरे, आयशीन शिकवले नाही की काय तुला? 'निघू' म्हणू नये, 'येऊ' म्हणावे!" अच्युतचा स्वर थोडा हळवा लागला.

भुरीनदीचा चेहरा वात्सल्यकातर झाला. कुंडीदेवी गप्पच होती.

छत्री घेऊन विवेकने आंगणात पाऊल घातले आणि अचानक अच्युतचा चेहरा करडा झाला.

"तर आता सांगितले तसे नीटनेटके गणित सोडव. गरज पडली तर मला हाक मार म्हणालोच आहे. पण तुझ्या बापसाने सरळपणे सांगून ऐकलेनच तर मात्र इकडे फिरकू नकोस. शेवटी खुर्दची माणसे तुम्ही. एवढा खुब्याचे हाड सरकून पडलो होतो तळमळत दोन महिने, तर तुझा बापूस माझे गुणवर्णन करीत हिंडत होता दारोदार." अच्युतचा आवाज मिठाच्या पाण्यात भिजवलेल्या चाबकासारखा झाला होता.

"थोडक्यात, सगळे ठीकठाक झाले तर इकडे पाऊल घालू नकोस. नाहीतर उगाच येशील लाडीगोडी लावायला. पत्रिका वगैरे द्यायला यायचीदेखिल गरज नाही. कुंडीदेवीच्या देवळात ठेव पत्रिका, पोचेल मला".

कुंडीदेवी खळाळून हसली.

"तू आणि तुझी लेकरे" असे धुसफुसत भुरीनदी जी बाहेर पडली ती झपाट्याने मार्गाला लागली.

नदीचे पाणी जितक्या झपाट्याने चढले त्याच्या कितीतरीपट झपाट्याने उतरले याचीच चर्चा होत राहिली.
 
=====