मस्कतमध्ये 'गोनू' वादळ. - १

२ जूनला व्हिसा नुतनीकरणानिमित्त मस्कतला आलो. २-३ दिवस जून्या मित्रांना भेटण्यात, मस्कतचे हालहवाल विचारण्यात गेले. ५ तारखेला CNN वर बातमी पाहिली की 'गोनू' नामक वादळ मुंबईपासून दूर सरकत असून, त्याचा रोख आता मस्कतकडे आहे.

एकमेकांना फोनाफोनी करून माहिती देताना साहजिकच त्यात भर पडत जाऊन अफवांना उधाण आलं. १५० कि.मी. पासून ते २५० कि.मी. वेगावर शपथा घेतल्या जाऊ लागल्या. ५ तारखेला काही वादळ आलं नाही. ६ला सकाळी पाऊस सुरू झाला. पाणी साचू लागलं. आणि हळूहळू लोकांमध्ये 'धांदली'चे वातावरण निर्माण होऊ लागले. भारतियांपेक्षा इथले स्थानिक लोकं जास्त घाबरट. त्यात पाऊस, वादळाचा विशेष अनुभव नाही. त्यामुळे वादळात आख्ख मस्कत 'झोपणार' आणि खायचे प्यायचेही वांधे होणार. बहुसंख्य जनता उपासमारीने मरणार अशा आशंकेने जो तो सुपरमार्केटला धावू लागला. खनिज पाण्याच्या बाटल्या, डाळी, पीठ, तेल, दूध, मटण, मासे जे मनाला येईल ते, जे समोर दिसेल ते खरेदी करण्यास लोकांनी सुरुवात केली. परिणामतः सुपरमार्केटच्या खजिनदारांसमोर वळणावळणाच्या रांगा मैल-मैल दिसू लागल्या. अर्ध्या तासाच्या (सामान्य परिस्थितीत) खरेदीसाठी ३ ते ४ तास लागू लागले. खजिनदारांची त्रेधातिरपिट, भांडणं, मारामाऱ्या, समजवासमजवी आणि शांतता अशा विविध माध्यमातून गिऱ्हाइके खरेदी करीत होते. बाहेर पाउस आडवातिडवा कोसळत होता. मस्कतमध्ये मुरुमाची जमीन असल्यामुळे पाणी मुरत नाही. रस्त्यात सर्वत्र तळी साचली. ह्या परिसरात पावसाचा अभाव असल्यामुळे, मला वाटतं, रस्तेबांधणीत पाण्याचा निचरा होण्याचा पर्याय विचारातच घेतलेला नाही. जरा अर्धा तास पाऊस झाला तरी चौकाचौकात एक-एक फुट पाणी साचते. 

पहिल्या दिवशी माझ्या उपहारगृहातून घरी परतताना (अंदाजे २ कि.मी.) गाडी ५ वेळा बंद पडली. वरून आभाळ कोसळत होते, खाली एक फूट पाणी. नाईलाज होता. गाडी धक्कामारून बाहेर काढताना आपण एखाद्या धबधब्यातून चाललो आहोत असा भास होत होता. माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना घरी आणण्यासाठी २ खेपा मारणं आवश्यक होतं. पण पहिल्या अनुभवानंतर मार्ग बदलून, प्रसंगी वाहतुकीच्या नियमांविरुद्ध जाऊन सगळ्यांना घरी आणलं. त्या दिवशी मला माझ्या मित्राघरी रात्रीच्या भोजना निमित्त बोलावले होते. त्याला फोन केला. तो म्हणाला, 'सर्व स्वयपाक झाला आहे पण पावसाची परिस्थिती पाहून ठरव.' जरा विचार केला. त्याच्या सासूबाईंनी स्वयपाक केला होता आणि माझ्या घरापासून त्याच्या घरापर्यंत कुठे साचलेले पाणी लागणार नव्हते. मी जायचे ठरवले. घरून निघाल्यापासून त्याच्या इमारतीपर्यंत कुठेही पाणी साचलेले नव्हते. व्वा.‌. स्वतःच्याच नियोजनाबद्दल स्वतःचीच पाठ थोपटण्याच्या विचारात असतानाच, दूरूनच त्याच्या इमारतीखाली साचलेले भले थोरले तळे दिसले. कपाळाला हात लावला. पण आता परत जाणे नाही. गाडी २ इमारती अलिकडे उभी करून. पावसात भिजत, धावत-धावत त्याच्या घरी पोहोचलो. इकडतिकडच्या (पावसाच्या संदर्भातच) गप्पा करत आम्ही त्याच्या खिडकीपाशी उभे होतो. बाहेर पावसाच्या जोडीने भन्नाट वारा सुटला होता. समोरच्या इमारतीवरील जाहिरातींचे भलेमोठे फलक अंगात आल्यासारखे घुमत होते. रस्त्यावर काही गाड्या पाण्यात अडकल्या होत्या. खाली पार्कींग मध्ये १-२ गाड्यांचे दिवे चालू होते. रात्रभरात त्यांची बॅटरी निष्प्राण होणार हे दिसत होते. 'इतकी साधी अक्कल असू नये चालकाला?' ह्यावर आमच्याच चर्चा झाली. आता इथे गंमत अशी की माझी गाडी तिथून दिसत नव्हती पण तिचेही दिवे चालूच होते. आणि माझ्या गाडीची बॅटरीही दोन तासातच गतप्राण झाली. (अर्थात, हे सगळे मला रात्री उशिरा कळले.)

बाहेर वाऱ्याचा आक्रस्ताळेपणा प्रमाणाबाहेर वाढला होता. वारा कोणाचीच पर्वा करीत नव्हता.  इतका वेळ बाहेरची मजा पाहणाऱ्या आम्हाला,' आपण उभे आहोत ही इमारत पडणार नाही नं?' अशी शंका भेडसावू लागली. वाऱ्याचे, ताकदीचे प्रदर्शन मनमुराद चालू होते. गच्चीतल्या तबकड्या (डिश-अँटेना) उचकटून भिरभिरत होत्या. झाडे अजून घुमत होती. थकत नव्हती. काही झाडांनी धरतीचा आश्रय घेतला. तसे करताना जवळ उभ्या असलेल्या गाड्यांना आपल्या वजनाखाली चिरडून, वाऱ्याचा राग गाड्यांवर काढला होता. जाहिरातीचे लहान-लहान फलक, वाहतुकीचे दिशादर्शक फलक असहाय्यपणे पाण्यावर तरंगत होते. काही झाडाझुडपांच्या आश्रयाला गेले होते. झुडपांनीही प्राप्त परिस्थितीचे अवलोकन करून त्यांना सहृदयतेने आश्रय दिला होता. आता पाण्यात अडकलेल्या गाड्यांनीही जागा सोडायला सुरुवात केली. त्या तरंगून, घसरून एकमेकांवर, दिव्यांच्या खांबांवर आदळू लागल्या.

 त्यांच्या मालकांनी केव्हाच त्यांना एकटे सोडून स्वतःचा जीव वाचवला होता. आत्तापर्यंतची त्यांनी केलेली, त्यांच्या मालकांची सेवा कामी आली नव्हती. त्या गाड्या असहाय्य होत्या. वारा आणि पावसासारख्या महाकाय शत्रूंपुढे त्यांची मात्रा चालेना. नशिबाचे भोग म्हणून बिचाऱ्या शरिरावर घाव सोसत होत्या.

जेवण झाल्यावर मी तिथेच झोपावे असा मित्राचा आग्रह होता. पण म्हंटले, 'प्रयत्न करून पाहतो. जमल्यास पोहचीन घरी. नाहीतर येईन इथेच झोपायला.' खाली जाऊन पावसात भिजत धावत-धावत गाडीजवळ पोहोचलो. गाडीत बसून किल्ली लावली. पण गाडी मख्खासारखी ढ्ढीम्म बसून राहीली. मनात धस्स झाले. दिवे तपासले तर दिव्यांची कळ तशीच सुरू होती. गाडीची बॅटरी, कोल्डरुम मध्ये ठेवलेल्या प्रेतासारखी, निश्चल झाली होती.

क्रमशः