व्यसन

संध्याकाळचे कितीतरी वाजले असावेत. पँट्रीत जाऊन त्यानं ताजमहाल चहाच्या तीन पिशव्या कपात टाकल्या. कॊफीयंत्रातुन गरम पाणी घेतलं आणि कप परत मायक्रोवेव्हमध्ये ठेवून चहाला चांगली उकळी येऊ दिली. रंग सुधारेपर्यंत दुधपावडर टाकली आणि उगाचच म्हणून साखरेचा एकच ठोकळा कपात टाकला. हे सर्व ढवळत असतानाच त्याने डब्यातून चार बटर चकल्या टिशू कागदात घेतल्या. चकलीचा एक तुकडा तोंडात टाकत आणि चहाचा घुटका घेत तो जागेवर येऊन बसला.

आउटलुकच्या खिडकीमध्ये आठ नवीन पत्रं दिसली पण पाठवणारांची नावं कळल्यावर त्याच्या बोटांनी आपोआपच पुढची खिडकी उघडली. प्रोग्रॅमच्या त्या खिडकीत सतरा चुकांची जंत्री  नजरेस पडताच त्याच्या बोटांनी एखाद्या समंजस मित्राप्रमाणे सराईतपणे एक्सप्लोररची खिडकी उघडली आणि त्याला उगाचच थोडं बरं वाटायला लागलं. 

पत्त्याच्या पट्टीत ऒर्कुट्च्या संकेतस्थळाचा पत्ता टाकला गेला. आज दिवसातल्या एकोणिसाव्या वेळी ऒर्कुटचे मुखपृष्ठ उघडले गेले असले तरी मुखपृष्ठावरचे हसरे चेहरे बघून त्याला चहा निम्म्यापेक्षा जास्त संपल्यानंतर आणि बऱ्याच वेळानंतर पहिल्यांदाच तरतरी वाटली. विपत्र आणि परवलीचा शब्द टाकून कळफलकावर एंटरची कळ हात वरती घेऊन जरा जोरानंच ठोकल्यावर त्याच्या शेजाऱ्यालाही कळलं की आंतरजालावरची मुशाफिरी सुरू झाली आहे. शेजाऱ्याची नजर उगाचच आपल्याकडे वळल्याचं ध्यानात येताच खिडकीचा आकार कमी करून, प्रोग्रॅमची खिडकी नुसतीच उघडून आणि डेस्कटॊपवर उंदीर नुसताच इकडे तिकडे पळवून त्याने काम करण्याचा आभास निर्माण करायचा केविलवाणा प्रयत्न केला. मग कामाचाच एक भाग असल्याच्या आविर्भावात त्यानं एक्सप्लोररची खिडकी पुन्हा उघडली. एव्हाना ऒर्कुटमधलं त्याचं वैयक्तिक मुखपृष्ठ उघडलं होतं. स्क्रॅपच्या संख्येत गेल्या अठरा वेळी आणि आतासुद्धा एकाचीही भर पडली नव्हती. मित्रांच्या यादीकडं लक्ष जाताच दोन मित्र तब्बल दोन दिवसांनी दिसल्याचं त्याला जाणवलं. त्यांचं कसं चालू आहे हे विचारावं म्हणून त्यानं एकाचं स्क्रॅपबुक उघडलं तर त्याला स्वतःचाच तीन दिवसांपूर्वीचा स्क्रॅप रांगेत पहिल्यांदा दिसला. दुसऱ्या मित्राला "काय कसं काय?" असा स्क्रॅप टाकून तो कदाचित आपल्याला नवीन स्क्रॅप आला असेल असं वाटून जरा गडबडींतच परत आपल्या वैयक्तिक मुखपृष्ठावर  आला. पण स्क्रॅपच्या संख्येत काही प्रगती नव्हती.

थोडा वेळ वाट पाहायला हरकत नसावी हे जाणवताच त्याच्या बोटांनी परत एकदा कुठल्याही आदेशाशिवाय एक्सप्लोररची आणखी एक खिडकी उघडली. याहूची पत्रपेटी पंचविसाव्यांदा उघडली गेली. पत्रसंख्येत दोनाची भर दिसताच तो जागच्या जागी उगाचच थोडा सावरून बसला. पण दोन्ही पत्रं दररोज येणारी एका बॅंकेच्या कर्जाची जाहिरातपत्रं होती.

तिसरी एक्सप्लोररची खिडकी उघडण्याआधी तो परत एकदा ऒर्कुटच्या खिडकीत आला आणि पानं ताजतवानं करून त्यानं परत एकदा स्क्रॅपच्या संख्येचा आढावा घेतला. संख्या प्रोग्रॅमच्या चुकीमुळे तीच राहिली असेल वाटून तो परत स्क्रॅपबुकमधे एक चक्कर मारून आला. तिसऱ्या खिडकीत पंधराव्यांदा रिडीफची पत्रपेटी उघडली. रिडीफचा पत्ता फारसा वापरत नसल्याने तिथे नवीन काही पत्र आले असण्याची शक्यता नव्हतीचं. आणि त्याच्या या शक्यतेचं क्षणार्धांतच सत्यतेत रुपांतर झालं.

त्याला आंतरजालाच्या अतिप्रचंड वेगाचा उगाचच रागच आला. पूर्वी नव्यानंच सुरू झालेल्या नेटकॅफेमध्ये बसून प्रत्येक संकेतस्थळ उघडताना पाहावी लागणारी वाट आणि वाट पाहताना शिगेला पोचणारी उत्कंठा यातला आनंद आपण गमावून बसल्याचं जाणवून त्याला थोडं वाईटच वाटलं.

मग त्याने रिडीफचं मुखपृष्ठ उघडून बातम्या वाचायला सुरुवात केली. चार दिवसानंतर प्रदर्शित होणाऱ्या एका गाजलेल्या नटाच्या दाक्षिणात्य चित्रपटाची माहिती देणाऱ्या चार नवीन दुव्यांची भर, त्याच्या गेल्या वाचनानंतर म्हणजेच सातव्या वाचनानंतर पडली होती. तसेच निवडणुकांची आणि भारतीय क्रिकेट संघाच्या नियमित अपयशाची चर्चा करणाऱ्या प्रत्येकी दोन नवीन दुव्यांचीही भर होती. सगळे दुवे उघडून वाचल्यासारखे करून तो परत ऒर्कुटच्या खिडकीमध्ये आला आणि ताजेतवाने करायला एफ्-५ ही कळ दाबून तो वाट बघत बसला. पण त्याला क्षणाचीही उसंत न देता तेच पान जसेच्या तसे त्याच्या डोळ्यांवर फेकले गेले. मग त्याने ऒर्कुटवरच्या त्याच्या आवडत्या कम्युनिटीमध्ये चक्कर टाकली. तिथेही चार नवीन सदस्यांचे आणखी कुठल्या वेगळ्याचे कम्युनिट्यांचे सभासद व्हायचे आमंत्रण देणारे संदेश होते.

ऒर्कुटमधे असतानाचं त्याला डेस्कटॊपवरचं चित्रं बदलायची कल्पना सुचली. त्याने लगेच गुगलचे संकेतस्थळ उघडून पटापट सात आठ वेगवेगळ्या खिडक्या उघडून मनासारखे चित्रं शोधायला सुरुवात केली. चाळीसएक चित्रं चाळल्यानंतर त्याला मनासारखं चित्र सापडलं आणि दिवसातला तिसरा डेस्कटॊपचा चित्रबदल त्यानं अमलात आणला.

इ-सकाळ उघडून काही भर पडली आहे का याची तपासणी करून आणि एक दोन बातम्या परत वाचून त्यानं मनोगतावर एक चक्कर टाकली. दोन नवीन आलेल्या कविता वाचून त्या कळल्या नसल्यातरी काहीतरी नवीन घडल्याचं समाधान त्याला उगाचच वाटून गेलं.

तेवढ्यात प्रकल्प व्यवस्थापक येताना दिसताच अगदी काही घडलंच नसल्याच्या आविर्भावात त्यानं साळसुदपणे सर्व खिडक्या व्यवस्थित झोपवल्या. अगदी गंभीरपणे आपल्या कामाची प्रगती जरा जास्तचं तांत्रिकपणे समजावतं त्यानं काम संपवायला अजून वेळ लागेल हे पटवून द्यायचा प्रयत्न केला. प्रोग्रॅममध्ये काहीतरी गडबड असल्याने  संगणकावर काही दाखवणे शक्य नसल्याचे ठासून सांगितले.

व्यवस्थापक गेल्यावर आपले जीमेलवर अकाउंट असल्याचे अचानक त्याला आठवले. आणि जीमेलचे संकेतस्थळ उघडले आणि पत्रपेटी तपासली. पण तिथही अपेक्षेप्रमाणे काही नव्हतचं.

पस्तिसाव्यांदा गुगल टॊक उघडण्याचा प्रयत्न केला. चुकून जालप्रशासकाकडुन काही मुभा दिली गेली असावी अशी आशा उगाचच त्याला वाटली आणि म्हणून त्याने एक दोनदा प्रयत्न केला. सर्व आंतरजालाच्या एक्सप्लोरर खिडक्या बंद करता करता, काम सुरू करायच्या आधी अखेरीस एकदा ऒर्कुटचं पान ताजतवानं करून बघायला तो विसरला नाही. सदैव जिवंत (आणि हॅपनिंग वगैरे..) असणाऱ्या आंतरजालावर आपल्याच बाबतीत काही विशेष घडत नाही आणि आपणच एवढे दुर्लक्षिले जाऊ शकतो ही जाणीव पुन्हा एकदा थंडपणे, निर्विकारपणे, अगदी काम्युच्या आउटसायडर मधल्या नायकाइतक्या निर्विकारपणे त्याने स्वीकारली आणि तो डोके प्रोग्रॅममध्ये खुपसून बसला.

डोके बधिर झाले आहे असे वाटेपर्यंत त्याने प्रोग्रॅममध्ये वाकडे तिकडे बदल केले आणि प्रोग्रॅम आधीपेक्षा चांगला चालतो आहे असं उगाचच स्वतःचं समाधान करून घेतलं. आणि त्या आवेशात संघनायकाला त्या अर्थाचं पत्र पाठवून उलटतपासणी करण्याचं सुचवलं. 

ऒफिसच्या दुसऱ्या टोकाच्या लांबच्या स्वच्छतागृहात जाऊन आल्यावर त्याला खूप वेळ होऊन गेला असं वाटलं. काम करून थकल्याची भावना उगाचच दाटून आली. बराच वेळ आपण आंतरजालापासून लांब असल्याचं जाणवून त्याच्या बोटांनी एखाद्या समंजस मित्राप्रमाणे सराईतपणे एक्सप्लोररची खिडकी उघडली आणि....