ताजमहाल की अंकोरचे मंदिर की दोन्ही?

आजच्या ईसकाळमध्ये ही बातमी वाचायला मिळाली. ताजमहालाबरोबरच अंकोरच्या मंदिराचा विचार व्हावा असे काहीसे हे म्हणणे आहे. सर्वांना विचारांची देवाणघेवाण करता यावी म्हणून येथे उतरवून ठेवत आहे.

ई सकाळातील लेख : "ताज'प्रमाणेच "अंकोर' मंदिरालाही मते द्या!; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आवाहन

नवी दिल्ली, ता. २० - सध्या जगभरात "सात आश्‍चर्ये' ठरविण्यासाठी सुरू असलेल्या ऑनलाईन मतदानाची चर्चा सुरू आहे. ....
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या "पाञ्चजन्य'नेही याची दखल घेतली असून, भारतीयांनी "ताजमहाला'प्रमाणेच कंबोडियातील हिंदू शिल्पकलेचा अत्युच्च नमुना असलेल्या "अंकोर' मंदिराला मतदान करावे, असे आवाहन केले आहे.

या मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका लेखात म्हटले आहे, "आपण जगातील सात आश्‍चर्यांमध्ये ताजमहालाचा समावेश व्हावा, यासाठीच्या मोहिमेत निःशंकपणे सहभागी झाले पाहिजे; मात्र, सर्व भारतीयांनी आणि विशेषतः हिंदूंनी जगातील सर्वांत मोठे मंदिर असलेल्या "अंकोरवाट'च्या प्राचीन मंदिराचाही समावेश या यादीत व्हावा, म्हणून त्या मंदिरालाही मत दिले पाहिजे. त्यामुळेच "ताज'ला तुम्ही मत दिले, तर आणखी एकदा माऊस क्‍लिक करून "अंकोर'लाही मत द्या. "ताज' जितका आपला आहे, तेवढेच हे मंदिरही आपले आहे.'

या लेखात पुढे म्हटले आहे, "या मंदिरामुळे आपल्याला आपला प्राचीन भव्य इतिहास लक्षात येतोच; शिवाय भारतीय संस्कृतीचा प्रभाव जगभर, विशेषतः आग्नेय आशियात किती मोठ्या प्रमाणात होता, हे समजते. अफगाणिस्तानातील बामियान येथील बुद्धांच्या प्रतिमा नष्ट केल्या गेल्यामुळे आता "अंकोर' हेच भारतीय संस्कृतीचे भारताबाहेर असलेले एकमेव आणि सर्वांत मोठे प्रतीक उरले आहे.'

भारत सरकारने "अंकोरवाट'ला भरपूर मदत केली आहे. विशेषतः १९८६ ते १९९३ या काळात कंबोडियातील राजकीय अस्थैर्यामुळे कोणताही देश त्या देशाला मदत करण्यास तयार नव्हता, तेव्हा भारत सरकारने "अंकोरवाट'च्या जीर्णोद्धारासाठी तीन कोटी रुपये खर्च केले आहेत.

"अंकोरवाट'विषयी...
कंबोडियात सुमारे २०० चौरस किलोमीटरच्या परिसरात तब्बल तीनशे लहान-मोठ्या मंदिरांचा समूह पसरलेला आहे. त्यालाच "अंकोरवाट' (मंदिरांचे शहर) असे नाव आहे. ही जगातील सर्वांत मोठी पुरातत्त्व वास्तू असून, येथेच जगातील सर्वांत मोठे जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. हे मंदिर कंबोडियातील हिंदू राजा सूर्यवर्मन (दुसरा) याने इसवी सन १११३ ते ११५० दरम्यान बांधले. हे मंदिर कंबोडियातील ख्मेर वास्तुकलेचे सर्वांत देखणे प्रतीक मानले जाते.


ह्या शिवाय

मनोगतावर पूर्वी आलेले कंबोडियाचे हिंदू साम्राज्य आणि जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर हे दोन्ही प्रियाली ह्यांचे लेखही ह्या संदर्भात वाचण्यासारखे आहेत.