मालिकांच्या विळख्यातले आयुष्य

चित्त यांच्या "चार दिवस..' सारख्या मालिकांवर बंदी आणावी" या चर्चाप्रस्तावरुन आठवल्याने हा लेख. (पूर्वप्रसिद्धी - 'अंतर्नाद' ऑगस्ट २००५). या विषयावर बरीच साधकबाधक चर्चा झाली आहे. तरीही 'तेवढेच 'ज्ञानप्रकाशा' त'! 

मालिकांच्या विळख्यातले आयुष्य

"ताज्जुब की बात नही है नवीन, आज कौन बचा है इन फिल्मों के चक्कर से?" 'गुड्डी' मधील प्राध्यापक मामा आपल्या भाच्याला विचारत असतो. "आजकल मियां-बीबी भी एक दूसरे में दिलीपकुमार-सायराबानू ढूंढतें हैं!"

सिनेमाचे बेगडी, चकचकीत रंगीत विश्व आणि नीरस, क्रूर वास्तव यांतली विसंगती दाखवणारा 'गुड्डी' पडद्यावर येऊन आता पंचवीसाच्या वर वर्षे होऊन गेली. सिनेमाचे माणसाचे आयुष्य बदलूनच नव्हे, तर उलटेपालटे करून टाकले. माणसाचे बोलणे, वागणे, कपडे आणि मुख्य म्हणजे विचार यावर सिनेमाने घेतलेली पकड हतबल, असहाय करून टाकणारी होती‌ सिनेमाच्या या झिंग आणणाऱ्या आक्राळविक्राळ लाटेमध्ये गुदमरुन वहात जाण्यापलीकडे काही करता येणे शक्य नव्हते.. पुस्तके, वर्तमानपत्रे, रेडिओपेक्षा कितीतरी पटीने प्रभावी अशा या माध्यमाने अल्पावधीतच माणसाच्या आयुष्याचा कबजा घेतला. दृक-श्राव्य माध्यमातला सिनेमा हा शेवटचा शब्द ठरणार असे वाटत असतानाच टेलिव्हिजनचा उदय झाला. त्यातही टीव्हीची मूळ कल्पना घरच्या घरी बघता येणारा सिनेमा अशी खास फिल्मीच होती. आणि टीव्हीचे सुरुवातीचे स्वरुप हे काहीसे अपेक्षाभंग करणारेच होते. मनोरंजनाच्या शासकीय कल्पनांमध्ये बसणारे बरेचसे कार्यक्रम रुक्ष, कंटाळवाणे असेच असत. त्यांना कंटाळून लोक पुन्हा जोमाने सिनेमाकडे वळणार अशीच चिन्हे होती. व्हीडीओवर सिनेमा पहाण्याच्या मध्यंतरीच्या लाटेमुळे टीव्हीपेक्षा सिनेमाच जास्त लोकप्रिय झाला. अखेर टीव्हीचे स्वरुप सिनेमा बघण्याचे एक माध्यम असेच होऊन रहाणार असे वाटत असतानाच केबल टीव्हीचे आगमन झाले. मनोरंजनाच्या आतापर्यंतच्या सगळ्या कल्पनाच पिळवटल्यासारख्या झाल्या.

ज्याला वेळ आहे आणि ज्याची इच्छा आहे त्याला केबल टीव्हीच्या माध्यमातून दैनंदिन आयुष्यातून जवळजवळ पूर्णपणे सुटका मिळवणे शक्य झाले.टीव्ही बघणे याचे स्वरुप मनोरंजन हे न रहाता आयुष्याचे उद्दीष्ट असल्यासारखे झाले. यातून जोवर श्वास आहे तोवर टीव्ही चालू राहिला पाहिजे, नव्हे, श्वास बंद पडला तरी चालेल, पण टीव्ही बंद पडता कामा नये अशी मानसिकता तयार होऊ लागली.

हा कैफ वाढवण्यासाठीच म्हणून की काय, टीव्हीवरील विविध वाहिन्यांवर असंख्य मालिकांचे मोहोळ उठले. 'दूरदर्शन' च्या एकछत्री दिवसांत 'साप्ताहिकी' बघण्यासाठी विलक्षण गर्दी होत असे.'हमलोग', 'बुनियाद' या मालिकांचे त्यांच्या दर्जापेक्षा साप्ताहिक मालिका - म्हणजे तुकड्यातुकड्यांत दाखवला जाणारा चित्रपट या नवीन कल्पनेमुळेच अधिक कौतुक झाले.'महाभारत' ची कानावर ओरखडा उमटवणारी आरोळी कोण विसरेल? पण लोकांच्या मनोरंजनाच्या भुकेला हा साप्ताहिक डोस फार कमी पडतो, हे चतुर निर्मात्यांच्या लगेचच लक्षात आले. त्यातूनच मग एकाआड एक दिवस, आठवड्यातून चारदा आणि शेवटी रोज प्रक्षेपित होणारी मालिका ही कल्पना प्रत्यक्षात आली. आपल्या आयुष्याचे काटे फिरवत ठेवण्यासाठी लोकांना एका स्थिर बिंदूची आवश्यकता होतीच.मालिका हा तो स्थिर बिंदू झाला. एरवीची बेशिस्त आयुष्ये मालिकांच्या वेळापत्रकांमुळी चौकटीत बसवल्यासारखी शिस्तबद्ध झाली. रात्रीचे जेवण लवकर घ्यावे असे म्हणतात, तर ते अमुक मालिकेआधी घ्यावे लागतेच. जेवणानंतर लगेचच झोपू नये असे म्हणतात, तर ते तमुक मालिका संपेपर्यंत शक्य होतच नाही. दुपारी झोपू नये, असेही म्हणतात. ते तर कसे शक्य आहे? ती फलाणी मालिका नसते का दुपारी?

त्यातून जर मालिकेचा एखादा भाग चुकलाच, तर तो लगेचच दुसऱ्या दिवशी 'रिपीट टेलिकास्ट' मध्ये बघण्याची सोय आहेच. आदल्या दिवशी बघीतलेलाच भाग परत दुसऱ्या दिवशी बघण्याचा उत्साह दाखवल्यास विशेष प्राविण्य मिळण्याचीही शक्यता आहे.

टीव्हीवरील दैनंदिन मालिकांच्या निरर्थकतेविषयी आता चर्चा करण्यासारखे काही राहिले नाही. पण या सगळ्या उहापोहाचा मालिकाग्रस्त लोकांवर यत्किंचितही परिणाम झाल्यासारखे वाटत नाही. त्यामुळे मालिकांना एक नकोशी अपरिहार्यता 'नेसेसरी एव्हिल' म्हणून स्वीकारणे भाग आहे. पण हे करत असताना या सैतानाने आपले नक्की काय काय हिरावून, नव्हे हिसकावून घेतले आहे, याचे तरी भान राहिले पाहिजे. मालिकांचे व्यसन लागल्याने लोक घरकोंबडे झाले, त्यांचे फिरणे, बाहेर जाणे बंद झाले., होऊ दे. शेवटी शरीर हे मर्त्य आहे. मालिकांच्या बंधनांमुळे लोकांशी संपर्क, सामाजिक देवाणघेवाण, माणसांमाणसांमधील बोलणेसुद्धा कमी झाले, होऊ दे. शेवटी ती मानसिक गरज जर मालिका भागवत असतील तर त्यात वावगे ते काय? मालिकांमुळे माणसांची जीवनशैली बदलली, हेही ठीकच आहे. ज्याला जसे हवे तसे जगण्याचा अधिकारच आहे. पण मालिकांमुळे माणसांची मानसिकता, त्याचे मनच बदलत असेल तर ती मात्र सर्वात गंभीर बाब मानावी लागेल.

'अंधानुकरण' हा मुळातच मानवी मनाला पडलेला तडा आहे. जुने केवळ जुने म्हणून टाकाऊ आणि नवे केवळ नवे म्हणून उपयुक्त ही धारणा चुकीची आहे. पण असे जर व्ह्यायला नको असेल तर प्रत्येक नवी गोष्ट स्वीकारण्यापूर्वी किमान स्वतःपुरती तरी पारखून घ्यावी लागणार. आणि त्यासाठी विचार करणे आले. त्यापेक्षा नवे ते सगळे आंधळेपणाने स्वीकारणे जास्त सोपे आणि म्हणूनच जास्त लोकप्रिय. नव्यातले सर्वच नवे आपल्याला पचण्यासारखे नसल्याने त्यातले सोपे आणि सुलभ तेवढे घेणे ही त्यातही केलेली तडजोड. मालिकांमधून हे असे सोपे आणि घेण्यासारखे, मग ते कितीही पोकळ का असेना, बरेच काही पुरवण्याची सोय केलेली आहे. मग त्यात मुलांनी आपल्या आई-वडिलांना 'पप्पा-मम्मी' म्हणणे (ते तर हिंदी सिनेमावाल्यांनी आपल्याला पूर्वीच शिकवले आहे म्हणा!), सकाळ संध्याकाळ घरातल्याच माणसांना गुडमॉर्निंग-गुडनाईट म्हणणे, त्रिकोणी विदूषकी टोप्या, भिंतीवर चिकटवलेली इंग्रजी अक्षरे, 'हॅपी बर्थ डे' असे लिहिलेला केक, (वेफर्स आणि कोला!) चकमक भरलेले फुगे अशा लख्ख गोष्टींसह  अगदी चाळीशीच्या पुढच्या स्त्री पुरुषांचे वाढदिवस साजरे करणे हे सगळे सगळे आपण मालिकांमधून शिकू लागलो आहोत. खरेच, मालिका नसत्या तर आपल्याला कुणी बरे हे शिकवले असते?

पण हे सगळे आपल्या आयुष्याशी नाळ ठेवणारे आहे की नायिकेच्या फडफडत्या पापण्यांइतके खोटे याचा विचार सध्या तरी करण्याची गरज नाही. पण ते आहे बाकी सोपे. आणि आजच्या आज करता येण्यासारखे! टीव्ही मालिकांनी आपल्याला हा निर्लज्ज रेशमी भोगवाद दिला आहे.आपल्या आयुष्याला सदैव कसली ना कसली झालर लावण्याचा लसलसाट दिला आहे. आयुष्य हे अशा झालरीशिवाय सुंदर दिसूच शकत नाही, आणि जे सुंदर नाही ते आयुष्यच नाही असे समजण्याचा हिडीस पलायनवादही. कारण मालिकेतल्या नायिकेचे दु:खही तिच्या अंगावरील काश्मिरी शालीप्रमाणे गुलगुलीत आणि नक्षीदार असते. अंतिम वेदनेच्या तीव्र क्षणीही तिच्या चेहऱ्यावरचे मोहक विभ्रम तेवढेच आकर्षक असतात. मालिकेत निव्वळ कुरुप, बीभत्स आणि ओंगळवाणे काही असत नाही, त्यामुळे तसे काही आयुष्यातही नसते हा समज मालिकांनी आपल्याला दिला आहे. सतत मोबाईल फोनवर बोलणारा आणि सक्सेना, खुराणा किंवा कपूर अशा आडनावाचा प्रत्येक जण यशस्वी उद्योजक असतो. फ्रेंच दाढी वाढवलेला आणि निमुळत्या ग्लासातून मद्य पिणारा प्रत्येक माणूस हा खलनायक असतो.केसांना चपचपीत तेल लावून ते मागे वळवलेला, गळ्यात सोन्याची जाड चेन घातलेला शर्टाची तीन बटणे उघडी टाकून सतत सिगरेट ओढणारा हा गुन्हेगारी जगतातला 'भाई' असतो.बिनबाह्याचे कपडे घातलेली ही खलनायिका असते आणि खांद्यांवर पदर घेणारी सत्शील नायिका. मानवी वृत्तीच्या या ठाशीव व्याख्या मालिकांनी आपल्याला बेतून दिल्या आहेत.

पण आयुष्य हे असे 'आफ्टर शेव्ह लोशन' सारखे नसते. आणि ते तसे नसावेच. लष्करी शिस्तीतले आयुष्य हे यशस्वी आणि विस्कटलेले ते अयशस्वी असा न्यायाधीशी निवाडाही कुणी देऊ नये. तालाबाहेर पडलेल्या पावलांचा स्वतःचा असा एक वेगळा ताल असू शकतो. (असे थोरो म्हणतो)  मालिकेच्या स्क्रिप्टला बाकी असे काही वेगळेपण मानवत नाही. मालिकेमधला कलंदर भणंगही घरचे बरे असावे असे दिसणारा असतो. त्याचा कुडतादेखील ( कलंदर म्हटल्यावर कुडताच!) उसवलेला असला तरी परीटघडीचा असतो. मालिकेतले वास्तवदेखील पुरेसे नाटकी असावे लागते.

कल्पनेतले हे वास्तव खऱ्या वास्तवाची जाणीव असणाऱ्यांना उबगवाणे, विटाळलेले वाटते. पण खऱ्या वास्तवाचे भान सुटावे हाच अशा मालिकांचा हेतू असेल तर सगळेच संपले म्हणायचे! कडुनिंबाच्या खऱ्या पालवीपेक्षा प्लास्टीकचे मनीप्लांट सच्चे वाटत असेल, कांदेपोहे-इडलीपेक्षा टोस्ट-ज्यूस ओळखीचे वाटत असतील. काळ्याभोर डोळ्यांच्या सावळ्या पण तरतरीत पोरापेक्षा मालिकेतले सुखाचे अजीर्ण झालेलेले गब्दुल बाळ अधिक गोंडस वाटत असेल, तर आपण खऱ्या जगात आहोत, की खऱ्याला 'समांतर' अशा दुसऱ्याच हे  एकदा तपासून पहावे, इतकेच.

अवांतर: या लेखाच्या प्रसिद्धीच्या वेळी 'समांतर' ही एक लोकप्रिय मालिका होती!