लायसन्स, एक गुलबकावलीचे फूल (भाग २)

लायसन्स, एक गुलबकावलीचे फूल (भाग 1)

परदेशात गाडी चालवण्याचा अनुभव नगण्य होता. त्यामुळे मनावर नाही म्हटलं तरी थोडंसं दडपण होतंच. आज गाडी भाड्याने घ्यायची आणि उद्या परीक्षा द्यायची आणि उद्या संध्याकाळी गाडी परत करायची असं ठरलं. मी ऑफिसातून निघता निघताच धो धो पाऊस पडायला लागला. छत्री बाळगणं हे मी लहानपणापासून कमीपणाचं लक्षण मानत आलेलो आहे. त्यामुळे भिजत भिजतच मी त्या भाड्याने गाड्या देणाऱ्या स्वस्तोत्तम कंपनीच्या दुकानात शिरलो.

आतमधला कर्मचारी चिनी होता. त्याने माझ्या अवताराकडे बघून एक तुच्छतादर्शक कटाक्ष टाकला. बहुदा या आधीची नोकरी त्याने पुण्यात केली असावी. किंवा माझ्या अवताराकडे बघून एकंदरीत ह्या माणसाची लायकी फार फार तर गाडी धुण्याची असू शकेल असा त्याचा समज झाला असावा. मी बुकींग केलेले आहे हे मी त्याला सांगू लागलो. ते त्याला समजेपर्यंत, आणि मी सांगतोय ते त्याला समजलंय, हे मला समजेपर्यंत, थोडा वेळ गेला. आपण कितीही हिंदी चिनी भाई भाई असं म्हटलं, तरी हे भाई जेव्हा एकमेकांशी इंग्रजीत बोलायला लागतात, तेव्हा ह्या भाईचं त्याला आणि त्या भाईचं ह्याला काही कळत नाही. आम्हा बांधवांची परिस्थिती ह्याहून अधिक वेगळी नव्हती.

शेवटी हो नाही करता करता, सोपस्कार पार पडले. त्याने माझ्याकडे पैसे मागितले. ते बहुदा बरेच डॉलर आणि पंधरा सेंट असे काहीतरी होते. पैसे भरण्याकरता मी त्याला माझं बँकेचं कार्ड दिलं. त्या कार्डाला इथे EFTPOS असं म्हणतात. ते कार्ड पाहून हा भाई "एपॉ" "एपॉ" असं काहीतरी बरळायला लागला. मला काहीच कळेना. शेवटी त्याच्या उच्चारांवरून आणि हावभावांवरून तो वरचे पंधरा सेंट सुटे मागतो आहे असा माझा समज झाला. म्हणून मी सुटे पंधरा सेंट काढून त्याच्या हातावर ठेवले. ते पाहून तर तो शब्दशः वैतागला. आम्हा एकमेकांना इंग्रजी अजिबात येत नसल्याचा, आमच्या दोघांचाही समज झाला आणि तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली.

शेवटी तो ते कार्ड EFTPOS आहे हे का Credit हे मला विचारत होता हे मला कळले. गैरसमजाचा आट्यापाट्या संपून मी त्याला पैसेही दिले. त्याने मला गाडीची चावीही दिली आणि मी जाणार, इतक्यात मला त्याने, मी गाडी कुठे घेऊन जाणार असं विचारलं. आपण पडलो "सत्याजीराव". खरं काय ते सांगितलं. त्यावर त्याने "कसं पकडलं" अशा आशयाचे काहीतरी भाव चेहऱ्यावर आणत चावी माझ्या हातातून घेतली. पैसे परत केले आणि मी लायसन्स च्या परीक्षेला त्यांची गाडी घेऊन जाऊ शकत नाही हे जाहीर केलं.

परीक्षा दुसऱ्या दिवशी होती म्हणून बचावलो. लगेच घरी गेल्यावर इंटरनेटवर दुसरी एक स्वस्तोत्तम कंपनी निवडली आणि गाडी बुक केली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच परीक्षेच्या दिवशी मी जाऊन ती माडी भाडं भरून घेतलीसुद्धा. ह्यावेळी माझ्या, तिथल्या कर्मचाऱ्याशी झालेल्या संभाषणात मी परीक्षेचा "प" देखील येऊ दिला नाही. सोबत शहराचा नकाशाही मागून घेतला. इंटरनेटवरून, त्या दुकानापासून परीक्षेच्या ठिकाणापर्यंतचा, मार्गही काढून घेतला. एकदम सोपा रस्ता होता. तुरक रोडवरून फ्रीवेला लागायचं आणि मग वारिगल (Warrigal) रोडला डावीकडे वळायचं. वर तिथे पोहोचायला अर्धा तास लागेल अशी माहितीही मिळवली.

गाडी मी चालवणार असल्याने आणि माझा रस्ते आणि दिशा ह्यांचा अंदाज वादातीत वाईट असल्याने, मी दीड तास आधीच निघालो. तुरक रोड येईपर्यंत सगळं सुरळीत होतं. फ्रीवेला लागलो. पहिली पाटी दिसली त्यावरच "वारागल" (Warragul) असं लिहिलेलं दिसलं आणि बाण सरळ दाखवला होता. म्हटलं चला आता पाट्या बघत बघत योग्य ठिकाणी पोहोचू. जरा हायसं वाटलं. दहा मिनिटं झाली, पंधरा झाली, अर्धा तास झाला. तरी आपलं वारागल सरळ दिशेने असल्याच्या पाट्याच येत होत्या. हळूहळू काहीतरी चुकत असल्याचा संशय यायला लागला. कारण फ्रीवेवर फक्त दहा मिनिटं जायचं होतं आणि अर्धा तास होवून गेला होता. पुन्हा एक पाटी आली आणि पुन्हा तेच. वारागल सरळ दिशेने. काहीच कळेना. शेवटी मी मोबाईल फोनवरून एका मित्राला फोन केला आणि त्याला विचारलं. त्याच्या म्हणण्यानुसार मला ज्या रोडवर (Warrigal) जायचं होतं तो बरीच योजने मागे राहिला होता. आणि मी मूर्खासारखा वारागल (Warragul) च्या दिशेनं चाललो होतो.

त्याच्या सूचनेप्रमाणे मी गाडी वळवली आणि विरुद्ध दिशेने परतू लागलो. थोड्या वेळाने मला अपेक्षित असलेला वारीगल रोड आला. येताना वारीगल रोडवर डावीकडे वळा असं इंटरनेटच्या सूचनांमधे लिहिलेलं होतं. त्यामुळे उलट दिशेने येताना उजवीकडे असा विचार करून मी उजवीकडे वळलो आणि परीक्षेचं ठिकाण दिसतं का ते पाहू लागलो. पुन्हा तेच. जी जागा पाच मिनिटात यायला हवी होती, ती जागा पंचवीस मिनिटं झाली तरी येईना. तितक्यात मी वारीगल रोडला क्रॉस होणाऱ्या एका रस्त्याचं नाव पाहिलं. त्या रस्त्याचं नाव वाचून तर मला चक्करच यायची बाकी राहिली. कारण तो रस्ता दुसरा तिसरा कुणीही नसून ज्या रस्त्याने मी फ्रीवेला लागलो तो तुरक रोड होता. म्हणजे गेला तासभर ड्रायव्हिंग करत मी जिथून निघालो होतो तिथेच परत पोचलो. परीक्षा तीन वाजता सुरू होणार होती आणि आता सव्वा तीन वाजले होते.

पुढच्या गल्लीत गाडी वळवली आणि थांबवली. मित्राला पुन्हा फोन करायचा प्रयत्न केला. पण हाय रे दैवं. हॅलो म्हणताक्षणी माझ्या फोनच्या बॅटरीने मान टाकली. आता झाली का पंचाईत. बोंबला. आता करायचं तरी काय? शेवटचा प्रयत्न म्हणून गाडीबरोबर घेतलेलं नकाशाचं पुस्तक उघडलं. ते कसं वाचायचं हे समजल्यावर मी वारीगल रोडवर डाव्या बाजूला वळण्याऐवजी उजव्या बाजूला वळलो हेही समजलं. घड्याळात साडेतीन झाले होते. खरंतर परीक्षेचेच बारा वाजले होते. पण मनात विचार केला, जाऊन तर बघू.

शेवटी चार ला पाच मिनिटं असताना मी परीक्षेच्या ठिकाणी पोचलो. मला माहीत होतं की चूक माझी होती त्यामुळे पुन्हा परीक्षेची वेळ घेणं क्रमप्राप्त होतं. माझं गाडी भाड्यानं घेण्याचं आणि स्वस्तात परीक्षा देण्याचं गणित चांगलंच चुकलं होतं. एक शेवटचा प्रयत्न म्हणून माझ्या अभिनयक्षमतेचा पुरेपूर वापर करायचं मी ठरवलं. आतमध्ये जाऊन, अधिकाधिक भारतीय ऍक्सेंट काढत, मी माझी आता ड्रायव्हिंगची परीक्षा असल्याचं सांगितलं. समोरचा माणूस माझ्याकडे "आ" करून बघायलाच लागला. तो म्हणाला की दिवसाची शेवटची परीक्षा तीन वाजता होते आणि साडेचार वाजता आमचं ऑफिस बंद होतं.

आता "आ" करायची वेळ माझी होती, कारण आता माझी परीक्षा होण्याची कोणतीही शक्यता नव्हती. तितक्यात मला एक नवकल्पना सुचली. मी परीक्षेची वेळ फोनवरून घेतली असल्याने, मला फोनवर चाराची वेळच देण्यात आली, अशी चक्क मी लोणकढी थाप ठोकली. हे करताना मी जड भारतीय ऍक्सेंटचा पुरेपूर वापर करण्याची काळजी घेतली. वर जितका शक्य आहे तितका केविलवाणा चेहरा केला. बहुतेक समोरच्या माणसाला माझी दया आली. मला बहुदा इंग्रजी नीट समजत नसल्याने माझा घोटाळा झाला असावा असा बहुदा त्याने समज करून घेतला. चक्क त्याने मला आजची वेळ बदलून उद्या दुपारची दिली (म्हणजे गाडी परत करायच्या वेळेआधीची). उपकृत भाव चेहऱ्यावर घेऊन मी तिथून बाहेर पडलो.

दुसऱ्या दिवशी तासभर आधीच तिथे पोचलो. परीक्षा झाली. माझ्या अंगभूत हुशारीमुळे म्हणा किंवा माझ्या गाडी चालवण्याच्या कौशल्यामुळे म्हणा, शंभरी पंचाण्णव होतात तसा मीही पास झालो. लायसन्स मिळालं.

तात्पर्य. इंटरनेटवरून पत्त्यापर्यंत पोचवणाऱ्या सूचना घेऊ नयेत. घेतल्यास त्या तंतोतंत पाळाव्यात. विशेषतः रस्त्यांच्या नावांची स्पेलिंग्ज काळजीपूर्वक पाहावीत. नाहीतर "वारी"गल च्या ऐवजी "वारा" गल च्या पाठी लागून आमच्यासारखी हवा टाइट होते. तेही जमले नाही, तर आपली अभिनयक्षमता वाढवण्याचा प्रयत्न करावा.