अवघे बनु श्रीमंत!

एकमेकां सहाय्य करू।
अवघे बनू श्रीमंत॥


माझ्या हातातल्या माहिती पत्रकावरच्या या ब्रीदवाक्यानीच माझं लक्ष वेधून घेतलं. सॅटर्डे क्लब नावाच्या एका संस्थेचं माहिती पत्रक मी वाचत होतो आणि त्या संस्थेचे संस्थापक श्री माधवराव भिडे त्यांच्या कामाची माहिती मला अत्यंत उत्साहाने सांगत होते. मराठी व्यावसायिकांना एकत्र गुंफुन त्यांना एकमेकांच्या प्रगतीसाठी एकमेकांना मदत करायला प्रवृत्त करणारी ही आगळी बेगळी संस्था! मराठी माणूस व्यवसाय / धंद्यामधे उतरला पाहिजे आणि त्यात उतरून तो यशस्वी व श्रीमंत झाला पाहिजे या तळमळीपोटी काम करणारी. ते पत्रक व माधवरावांचं बोलणं हयामुळे मनामधे अनेक दिवस रुंजी घालत असलेल्या प्रश्नांना पुन्हा नव्यानं चालना मिळाली.


गुजराथी, मारवाडी, पंजाबी व सिंधी समाजाच्या तूलनेमधे कमी संख्या व प्रमाणात मराठी माणूस धंद्यामधे उतरलेला दिसतो. आणि अर्थातच त्याहून कमी प्रमाणात तो यशस्वी झालेला दिसतो. हे असं का? खरंतर मराठी माणसाचं सहसा कशावर एकमत होत नाही. पण एका विषयावर मात्र गेली अनेक वर्ष सर्व मराठी माणसांचं एकमत झालेलं दिसतं, ते म्हणजे ‘मराठी माणूस धंद्यामधे फार प्रगती करत नाही’, किंवा अगदीच मराठमोळ्या भाषेत सांगायचं तर ‘आपण कुठल्याही धंद्यात सपाटून मार खातो, उगाच नस्त्या भानगडीत पडू नये’


खरंतर खेळ, शिक्षण, साहित्य, संशोधन, कला, समाजप्रबोधन, या आणि अशा अनेक क्षेत्रांमधे अग्रेसर असलेला मराठी समाज व्यवसाय / धंद्यामधे मागे का? भारताची औद्योगिक राजधानी आपली मुंबई असूनही, भारताच्या औद्योगिक विकासाला चालना किंवा कलाटणी देणार्‍या किती औद्योगिक संघटना मराठी माणसानी सुरू केलेल्या किंवा चालवलेल्या आहेत? प्रगतीशील व द्रष्ट्या मराठी उद्योजकांची नावं सांगायला सांगितली तर ती हाताच्या बोटावर मोजण्याइतकीही का होत नाहीत? (माझी मोजदाद तर किर्लोस्करांपाशी सुरू होते आणि तिथेच थांबते, पण जाणकार / माहितगार व्यक्तीही फार मोठी यादी सांगू शकतील याची शक्यता वाटत नाही!)


मराठी माणुस व्यवसाय धंद्यामधे मागे का? यावर गेली अनेक युगे वेगवेगळ्या व्यासपीठांवर वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा सुरु आहे. (चर्चा करत रहाणं हा मराठी धर्मच आहे!) तरीही या अत्याधुनिक व्यासपीठावर ही चर्चा नव्यानं व्हावी असा प्रस्ताव मी मांडत आहे. चर्चेसाठी बरेच मुद्दे आहेत: 



  1. धंद्यापासून दूर रहाण्याची सर्वसाधारण मानसिकता आपल्या समाजात का निर्माण झाली? 

  2. अशी मानसिकता बदलण्यासाठी काय करायला हवं? 

  3. धंदा / व्यवसाय सुरु करण्यासाठी युवक प्रवृत्त व्हावेत यासाठी पोषक वातावरण आपल्या समाजात कसं निर्माण करता येईल?

  4. धंदा / व्यवसाय करत असलेल्या मराठी बांधवांना सहकार्य / आधार मिळावा यासाठी समाजात काय बदल व्हायला हवेत? 

  5. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यासाठी आपण आपल्या वैयक्तिक पातळीवर काय करू शकू?

एकेकाळी अटकेपार भगवे झेंडे फडकवणारा, आणि अलिअलिकडे सॅनहोजेपार छत्रपतींचे पुतळे उभारणारा मराठी माणूस! हा माणुस आपल्या कुटुंबाच्या, समाजाच्या आणि एकुणात देशाच्या सर्वंकश आर्थिक विकासासाठी खुल्या दिलानं व्यवसाय / धंद्याच्या मैदानात उतरणार आहे का? आणि त्यासाठी आपण काय करू शकू?