लंपन

लंपन या छोट्याश्या पण विलक्षण संवेदनशील व्यक्तिमत्त्वाला आपल्यात आणणारे प्रकाश नारायण संत याच महिन्यात २००३ साली आपल्याला सोडून गेले.

महाराष्ट्र - कर्नाटकाच्या सीमेवरच्या गावातले लंपनचे भावविश्व, संगीत, त्याचे आजीआजोबांच्या कडे असणे, बाबूराव, चंब्या, कणबर्गी गंग्या, परळ्या, यमज्या आणी इतर ही सगळीच पात्र सुरेख रीतीने एक अप्रतिम अनुभव विश्व आपल्या समोर प्रकाश नारायण संत उभे करतात. हे सगळे 'मॅड सारखे कितीही वेळा वाचले तरी त्याचा फेस काही डोक्यातून जात नाही.'

मी पाहिली कथा एका मासिकात वाचली, पण त्यावेळी काही कळलेच नाही. सुमी काय? हे पात्र सारखे प्रत्येक ठिकणी 'मॅड' का म्हणते? काय लिहिलेय हे? असा विचार करत राहिलो.

अचानकपणे काही दिवसांनी 'पंखा' हा कथा संग्रह अश्विनी कुलकर्णीने हातात ठेवला 'अरे हा घेऊन जा जसे काही तुझ्यासाठीच लिहिलेय हे पुस्तक अस समज' असं म्हणून!

एका दमात पुस्तक वाचले. नि वाचले नि परत परत वाचले. लंप्यानी त्यातल्या सावकाराच्या गोष्टीने एकदम  मोहिनीच घातली. मग वनवास मिळवले, वाचले. अजून अजून लंपन हवाहवासा होत गेला. त्याचे निर्मळ विचार, सुमी चे असणे प्रगल्भ आजी-आजोबांची सोबत हवी हवीशी वाटायला लागली. मग शारदा संगीत. संगीताच्या सुरावर लंपनचा विहार, त्याची घसरगुंडी, यमज्याच्या 'टिंब' चे क्रिकेट. सगळ्याचे अगदी वेडच लागले म्हणाना!

शेवटी झुंबर! सगळे पुस्तक वाचले पण शेवटची 'स्पर्श' नावाची कथा एकदाच पूर्ण वाचली. मग ते नीट सगळ्या पुस्तकांच्या खाली ठेवूनच दिले. नकोच वाटायला लागले एकदम. लंपनचे मोठे होणे नकोसे वाटले! त्याच्या त्या 'नकादु' च्या मनोहर विश्वातून बाहेर येऊन विक्राळ प्रत्यक्षाची झालेली टक्कर खूपच त्रासदायक गेली मनाला. अजूनही मी ते वाचत नाही. सगळी पुस्तके कधीही काढतो. परत परत वाचतो, पण शेवटची कथा सोडून!

असे उमलणारे भावविश्व अगदी साध्या शब्दातून सामर्थ्यशालीपणे मांडणारे संत आज आपल्यात नाहीत. त्यांचे लिखाण वाचल्यावर जाणवत राहते की एका थोर लेखकाला मराठी मुकली आहे.

अगदी मॅड सारखे काहीतरी आता वाचत जावे असे वाटत असेल, तर लंपन ला नक्की भेटा एक वेगळाच अनुभव असेल तो.

प्रकाश नारायण संत यांचे कथा संग्रह - वनवास, शारदा संगीत, पंखा, झुंबर.

( किंमती अगदीच ठीक आहेत रु.१०० ते रु.१५० च्या दरम्यान)

प्रकाशक - मौज प्रकाशन गृह

खटाववाडी, गिरगाव, मुंबई.

या शिवाय ही पुस्तके ऑनलाईन मायबोली डॉट कॉम वर उपलब्ध आहेत.

-निनाद