उंदीर खिदळतात! ... मला माहित नव्हते. तुम्हाला?

हो. खरे आहे ते म्हणे.

उंदीर आणि आपण ह्यांच्यात शरीररचने शिवाय बरेच काही साम्य आहे. उंदरांना स्वतःचे भान असते. अंगाला ठराविक ठिकाणी गुदगुल्या केल्या की ते खिदळतात. ते आपल्यासारखी स्वप्नेही पाहतात. स्वप्नात संकटांपासून दूर पळू पाहतात.

मद्य, कोकेन, निकोटीन वगैरेंची त्यांना माणसाप्रमाणेच चटक / व्यसन लागू शकते. कधी ते जीवही धोक्यात घालतात. उंदीर समाजात मिळून मिसळून राहतात. त्यांना कुतूहल असते आणि (मायेने!) स्पर्श केलेला आवडतो. एखादा आवाज आल्यावर एखादी गोष्ट होणार अशी त्याला भीती असेल, आणि तशी गोष्ट झाली नाही, तर ते सुटकेचा निश्वास सोडतात.

आणि लैंगिक सुखाचे बाबतीत ते माणसाच्या तोडीस तोड असतात. चांगले आणि वाईट लैंगिक जीवन ह्यातला फरक त्यांना नीट कळतो. चांगल्या लैंगिक सुखाची ते वाट पाहतात. 

प्रयोगशाळेतले उंदीर मोकळ्यावर सोडल्यावर अगदी मोकाट उंदरांप्रमाणे वागतात. त्यांना आपल्यासारखीच व्यक्तिमत्वे असतात. संस्कार आणि वातावरण ह्यानुसार ते उत्साही किंवा उदास होतात. चांगले अनुभव आलेले उंदीर आशावादी तर न आलेले निराशावादी होतात.

गमतीचा आणि थोडासा आश्चर्यचा भाग असा की त्यांना स्वतःच्या विचारशक्तीचे भान असते, म्हणजे एखादा विचार करता येईल की नाही ह्याचा ते विचार करू शकतात. एखाद्या परीक्षेत आपल्याला कितपत यशस्वी होता येईल हे जसे विद्यार्थ्याला जाणवते तसे त्यांनाही जाणवते, त्यामुळे एखादे आव्हान स्वीकारणे कितपत फायदेशीर होण्याची शक्यता आहे त्यानुसार ते आव्हान स्वीकारायचे की नाकारायचे हे ते ठरवू शकतात.

अरेच्चा मग फरक तरी काय राहिला?

हो! उंदरांना आपल्याप्रमाणे खोटे बोलता येत नाही आणि दुसरे म्हणजे ते कधी माणसाप्रमाणे जुगार खेळत नाहीत.

आता बोला! खोटं वाटत असेल तर चुणचुणीत, उत्सुक .... उंदीर? हा लेख वाचून सांगा मला कळले ते बरोबर की नाही! (त्याच लेखाचा गोषवारा आहे हो हा! चित्रही त्यातलेच आहे.)