मराठी वाचनाची आवड लावण्यासाठी : अक्षरयात्री

आजच्या ईसकाळात ही माहिती आलेली आहे. मराठीसाठी कार्य करणाऱ्या सर्वांनाच स्वारस्य वाटेल ह्या हेतूने ती येथे उतरवून ठेवत आहे.


पुणे, ता. २६ - शालेय विद्यार्थ्यांमध्ये मराठी पुस्तकांच्या वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतूने अध्यापन क्षेत्रातील मंडळींनी एकत्र येऊन "अक्षरयात्री' या मंडळाची स्थापना केली आहे. .........
या उपक्रमाद्वारे दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी विद्यार्थ्यांसाठी सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत नवी पेठेतील पत्रकार संघाच्या सभागृहात उत्तम साहित्यातील निवडक भागांचे वाचन केले जाणार आहे.

"अक्षरयात्री'च्या अध्यक्षा संजीवनी बोकील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्या म्हणाल्या, ""पुण्यातील बावीस शिक्षकांनी एकत्र येऊन या मंडळाची स्थापना केली आहे. विविध शाळांच्या इयत्ता ९ वीच्या १८० विद्यार्थ्यांचा "अक्षरमैत्र' नावाचा संघ स्थापन करण्यात आला आहे. मराठी पुस्तकांच्या वाचनाची आवड विद्यार्थ्यांमध्ये जोपासणे, या हेतूने कार्य केले जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी वाचनाच्या कार्यक्रमात विविध कलावंत सहभागी होणार आहेत.''

""या उपक्रमाचा पहिला प्रयोग ११ ऑगस्ट रोजी सादर होणार असून, त्यात (कै.) रणजित देसाई यांच्या "श्रीमानयोगी' व (कै.) पद्माकर गोवईकर यांच्या "मुंगी उडाली आकाशी' या पुस्तकातील काही भाग; तसेच सफदर हाश्‍मी यांच्या "किताबे कुछ कहती है' या कवितेचा दासू वैद्य यांनी केलेला अनुवाद श्रीकांत मोघे, राहुल सोलापूरकर, हेमा लेले सादर करणार आहेत. २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमात अभिनेते गिरीश ओक पु. ल. देशपांडे यांचे "चितळे मास्तर' हे व्यक्तिचित्र सादर करणार आहेत,'' असेही त्यांनी सांगितले.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी संजीवनी बोकील यांच्याशी ९८५०६६०६०० अथवा ९३२५०१०३३० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


१. असा समूह निर्माण करून मराठी भाषेची आवड निर्माण होईल असे तुम्हाला वाटते का?

२. नववीच्या विद्यार्थ्यांना अशी आवड निर्माण करण्यासाठी कलाकारांची कितपत आवश्यकता आहे असे तुम्हाला वाटते?