मराठी माणूस

मराठी माणूस

घरात एक मूल जन्माला आलं की थोरामोठ्यांच्या गर्दीनं भरलेलं घर खऱ्या अर्थानं भरून जातं.. प्रत्येक घरात मुलाच्या आगमनाचा आनंद अवर्णनीयच असतो... वाढतावाढता मूल आपल्या घराचे संस्कार उचलत असतं. काल  टीव्हीवर आषाढी एकादशीनिमित्त एका कार्यक्रमातल्या चर्चेत एक मुद्दा स्पर्श करणारा ठरला.
... `मराठी माणूस', `मराठीची अस्मिता' असे शब्द आजकाल हरेक मराठी माणसाच्या तोंडावर आहेत. मराठीच्या भवितव्याची चिंता तर राज्यकर्त्यांपासून सामान्य मराठी माणसाला छळते आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अमेरिकेत मराठी जपण्यासाठी ५० लाखांचे (अनु)दानही दिले. मराठी जपण्यासाठी मराठी माध्यमाच्या शाळा हव्यात, इ़ग्रजीचे आक्रमण थोपवावे, वगैरे चिंताग्रस्त विचारही उमटत असतात. पण मराठी माणसाचं पहिलं लक्षण कोणतं? 

... घरातलं मूल खाणाखुणा ओळखून प्रतिसाद द्यायला लागतं, तेव्हा अवघ्या घराला आनंदाचं भरतं येतं. बाळाच्या प्रत्येक ‘पहिल्या कृती'चं कौतुक कसं करू, अन काय, असं प्रत्येकाला होऊन जातं... बाळ पहिल्यांदा हासलं, बाळानं खेळणं उचललं, बाळ टाळ्या वाजवायला लागलं... सगळ्याचा एक आगळा आनंद घराच्या भिंती ओलांडून ओसंडत असतो... बाळ टाळ्या वाजवायला लागलं, की घरातल्या आजी-आजोबांपासून, ते बाळाच्या मोठ्या भावंडापर्यंत सगळेच नकळत विठूनामाचा गजर सुरू करतात.... ज्या घरात हे अजूनही सहजपणे होतं, ते मराठी माणसाचं घर... तिथली माणसं इंग्लिश मिडीयममधून शिकलेली असली तरी...
खूप वर्षं झाली... आमच्या कोकणातल्या गावात आमच्या वर्गात मुंबईच्या इंग्लिश शाळेत शिकलेला एक मुलगा दाखल झाला. तेव्हा आम्हाला इंग्लिशची भीती वाटायची. लहानश्या त्या गावात, इंग्लिश जाणणारा एखाददुसराच कुणीतरी असायचा. अशा गावात, मुंबईच्या शाळेत, इंग्लिश शिकलेला मुलगा वर्गात आल्यामुळे आम्हा मुलांमध्ये त्याचा भाव एकदम  वधारलेला होत. त्याच्याशी दोस्ती करण्यासाठी आमची स्पर्धा असायची... तोही, मुंबैच्या शाळेतल्या गमती सांगायचा, तेव्हा आम्ही भारावल्यासारखे कान देत असू...
आमचे गणिताचे सर त्यांच्या तासाला फळ्यावर एक गणित लिहीत, आणि वर्गातल्या एखाद्या मुलाला बोलावून ते सोडवायला सांगत. बकासुराच्या भोजनासाठी जाण्याची पाळी असलेल्या माणसासारखी आम्हा प्रत्येकाची अवस्था असायची त्या तासाला... तर, एका दिवशी सरांनी फळ्यावर गणित लिहिलं आणि या मुंबईकराला खूण केली... तो दिमाखात उठलाही... पण जागेवरून हलला नाही. सरांनी खुणेनच ‘काय’ म्हणून विचारलं, तेव्हा तो म्हणाला, ‘सर, मला हे गणित सोडवता येणार नाही. माझं इंग्लिश मीडियम होतं...’
सरांनी गणित पुसलं, आणि तो विजयी मुद्रेनं खाली बसला... आम्ही सगळेजण त्याच्याकडे पाहात होतो. सरांकडे आमचं लक्षच नव्हतं. काही वेळानं सरांनी त्याला पुन्हा उभं केलं, तेव्हा आम्ही भानावर आलो... फळ्यावर मघाच्याच गणिताचे आकडे आणि अक्शरं होती... फक्त रोमन लिपीत!... आता तो घामाघूम झाला होता. ‘नाही येत’... एवढच काहीतरी बोलून तो मटकन खाली बसला. आम्ही पुन्हा त्याच्याकडे पाहात होतो.. पण तोपर्यंत आम्हाला वाटणारी मराठीची लाज पळाली होती.
दुसरा किस्साहि असाच आठवणीत आहे. आमच्या गावात नव्यानच कॊलेज सुरु झालं होतं. कोकणात तेव्हा शिवाजी विद्यापीठ म्हणजे, ‘मराठमोळं’ विद्यापीठ होतं. आम्ही कॊलेज एन्जॊय करत होतो, अन अचानक सरकारी फतवा आला. आमचं कॊलेज मुबई विद्यापीठाला संलग्न झालं होतं. पुन्हा इंग्लिश मीडियमच्या भीतीनं आम्ही धास्तावलो. काही शिक्षकांचीही तीच अवस्था होती. पण आम्हाला चॊईस होता. ते एक बरं होतं. एका शिक्षकानं आम्हाला निवडीचा सल्ला दिला... ते म्हणाले, ‘ मी मराठी मीडियम घेऊन एम. कॊम झालोय. माझा एक मित्र इंग्लिश मीडियम घेऊन एम. कॊम झालाय. मी आज एका चांगल्या कॊलेजमध्ये लेक्चरर आहे, आणि तोही कुठेतरी लेक्चररच आहे.’... आम्हाला खूप बरं वाटलं, आणि सहाजिकच, आम्ही मराठी मीडियमचा पर्याय निवडला...

आता विचार करतो, तेव्हा वाटतं, आम्ही तेव्हा मराठी `जगवली'? का ती आमच्या पराभवच्या भीतीची प्रतिक्रिया होती? मराठी माणूस म्हणून मराठीच्या भविष्याची चिंता करताना, अशाच एखाद्या भीतीचं अनामिक ओझं तर आपण वागवत नसू ना? ते झुगारून देता येईल, असा विश्वास मराठी घरात रुजला, तर मराठमोळ्या घरांवरचं मोठ्ठं दडपण कमी होईल.

टाळ्या वाजवायला लागलेल्या बाळाच्या प्रत्येक टाळीसोबत विठूनामाचा गजर घुमायाला काय हरकत आहे?