३०/७/०७ला केशवसुमार यांनी ज्या गझलचं मस्त विडंबन केलं ती मूळ गझल
फ़ुलांना जर असे आहेच कोमेजायचे
कशाला जीव लावुन ताटवे फ़ुलवायचे
कशासाठी पसारा मांडला तू एवढा
तुला आहेत सारे सूर्य जर विझवायचे
पुन्हा भिजलो न मी भिजलो मिळुन दोघे जसे
विसरले मेघही नंतर तसे बरसायचे
विचारे सारखी येऊन आठवणीत ती
किती वेळा ठरवले तू मला विसरायचे
नको पाहू अशी तू एकटक माझ्याकडे
तुझ्या डोळ्यात माझे गीतही हरवायचे
'पुन्हा भेटू' जरी म्हटले निरोपाच्या क्षणी
उमजलो मी पुन्हा नाही कधी भेटायचे
सदा माझे तुझे माझे तुझे माझे तुझे
अमीबांचे कधी या विश्व विस्तारायचे
तुला बघताच माझी गझल बोलू लागते
मला नाहीच जमले पण कधी बोलायचे
प्रमोद बेजकर