मे महिन्याचे ऊन चांगलेच तळपू लागले होते. दुपारी जेवणाची वेळ होत आली आणि अर्धांगिनीचा भ्रमणध्वनी केकला. जगातल्या यच्चयावत भ्रमणध्वनीसेवा पुरवणाऱ्या आस्थापना आमच्या घराच्या वाटेला जात नसल्याने आमच्या घरात भ्रमणध्वनीचा 'टप्पा' येत नाही. त्यामुळे त्यावर बोलायचे म्हणजे मुंडके खिडकीबाहेर काढून जगाला संबोधत संवाद करावा लागतो. मी पाने मांडेपर्यंत अर्धांगिनीने ते आन्हिक उरकले आणि हनुवटी किंचितशी थरथरवत ती (म्हणजे तिचे मुंडके; उरलेली ती आतच होती) आत प्रवेश करती झाली. तिच्या महाविद्यालयातून तो भ्रमणध्वनी आला होता.
एव्हाना मी लग्नात 'मुरलो' होतो. हे हनुवटी थरथरवणे मला समजू लागले होते. अर्धांगिनी एका 'नामांकित' महाविद्यालयात कंत्राटी अध्यापिका (तासिका वेतनावर) म्हणून कार्यरत होती. नुकत्याच उत्तरपत्रिका तपासून झाल्या होत्या. बऱ्याचशा मुली नापास झाल्याने 'त्यांना (काहीतरी करून) पुढे ढकला' असा विभागप्रमुखांचा आदेश प्रमाण मानून, प्रत्यक्ष लिहिलेल्या उत्तरापेक्षा 'काय उत्तर लिहिले जाऊ शकले असते' असा विचारपतंग उडवून त्याआधारे गुण देऊन जमेल तेवढ्या मुलींना उत्तीर्ण करून झाले होते.
पण मी दुपारी पाने मांडायच्या वेळेला घरी कसा? तर, मी लग्न झाल्यावर शपथेपुरती एक वर्ष नोकरी करून मग स्वायत्त बर्छीगिरी (free-lancing) करत होतो. एका व्यवस्थापनाचे धडे देणाऱ्या संस्थेत मी सायंकाळी धुमाकूळ घालायला जाई. आणि दिवसा व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून घरूनच आंतरजालावर काम करी.
तर घरात (मुंडी)प्रवेश करून पत्नीने जाहीर केले, "तू जेवून घे, मला जरा कार्यालयात जायला लागेल". दुपारचे जेवण (वेळेवर) घेणे नाकारण्याचा एकंदर आविर्भाव हा कुठल्याही हुतात्म्याला लाजवेल असा होता. तत्क्षणी मला धोका कळला.
"काय झाले?" मी दरडावलो (दरडावावे केव्हा हेही तोपावेतो समजू लागले होते - ज्या प्रश्नाचे उत्तर कुणातरी खलनायकाच्या/खलनायिकेच्या गळ्यात बांधता येते असा कुठलाही प्रश्न दरडावून विचारायला हरकत नाही!).
"अधीक्षिका बाईंचा फोन होता. त्यांना उत्तरपत्रिकेवरची गुणांची बेरीज समजत नाहीये. म्हणून तिथे जाऊन येते" मुसमुसत्या स्वरात (विचारणारे कुणी असेल तर मुसमुसण्यात अर्थ आहे...) उत्तर आले.
"काही गरज नाही जेवण टाकून जायची", मी गरजलो. "जेवून झाल्यावर मीही येतो. बरोबरच जाऊ".
सोप्या सोप्या गोष्टींचा ह्या बायका कसा चिवडा करून ठेवतात! 'व्यवस्थापनतज्ञ' असल्याने तर मला हे चांगलेच डाचले. आज चांगलीच 'शिकवणी' घ्यायची या हेतूने मी बरोबर जाण्याचा प्रस्ताव मांडला होता.
जेवण पार पडले. मग दुपारच्या चांदण्यात स्कूटर दामटत ते महाविद्यालय गाठले.
पहिली फेरी त्या अधीक्षेकेबरोबर झाली. प्रत्येक उत्तरपत्रिका तपासताना प्रश्नाप्रमाणे गुण देणे अपेक्षित होते (जे पत्नीने केले होते). ते (प्रश्नाप्रमाणे) गुण पहिल्या पानावर एका तक्त्यात भरणे अपेक्षित होते (जे पत्नीने केले नव्हते). संपूर्ण उत्तरपत्रिकेतल्या गुणांची बेरीज करून ती पहिल्या पानावर भरणे अपेक्षित होती (जे पत्नीने केले होते). सगळ्या उत्तरपत्रिकांचे सार एका वेगळ्याच तक्त्यात भरणे अपेक्षित होते (जे पत्नीने केले होते).
आता ती मधली गाळलेली पायरीच का महत्त्व पावली? उत्तर मनोरंजक होते.
बहुतेक मुली प्रथम वर्षाचा अभ्यास 'अंतर्गत' विद्यार्थिनी म्हणून (महाविद्यालयाचे शुल्क भरून, गरजेपुरती हजेरी लावून उरलेल्या तासिकांना बुट्टी मारून) करीत असत. त्यांनी सर्व १०० गुणांची प्रश्नपत्रिका सोडवणे अपेक्षित होते. काही मोजक्या मुली 'बहिर्गत' विद्यार्थिनी म्हणून (मागल्या वर्षी नापास झालेल्या; या नोकरी ते संसार या इंद्रधनूपैकी कुठल्याही रंगात रंगलेल्या असत) परीक्षेला येत असत. त्यांनी केवळ ६० गुणांची प्रश्नपत्रिका सोडवणे अपेक्षित होते. पण (बहुधा) कार्यबाहुल्यामुळे, या बहिर्गत विद्यार्थिनी आपण 'आतल्या' नसून 'बाहेरच्या' आहोत हे विसरल्या होत्या. त्यांनी खच्चून शंभर गुणांची प्रश्नपत्रिका सोडवून टाकली होती. आणि बहुतेकजणी दणकून आपटल्या होत्या. आता त्यांना उत्तीर्ण करण्यासाठी एकच मार्ग होता. कोंबडी दाणे निवडते तसे सगळ्या १०० गुणांच्या उत्तरपत्रिकेपैकी चांगले गुण मिळालेलीच उत्तरे मोजणीत धरणे, आणि त्या प्रश्नांची गुणसंख्या ६० व उत्तरांची गुणसंख्या २१ भरली तर "जीतम जीतम" करीत त्यांना पुढच्या वर्षात ढकलणे. नाहीतर नोकरी ते संसार या इंद्रधनूत त्यांना आपापले रंग लेण्यासाठी परत पाठवणे.
आणि हे करण्यासाठी प्रत्येक उत्तरपत्रिकेच्या आतली पाने चाळणे हे अधीक्षिकाबाई किंवा त्यांच्या हाताखालच्या कोणालाही अगदीच अपमानास्पद काम होते. जेव्हा अध्यापिका नामक पावपगारी (शिकवण्याच्या तासाला ८४ रु; उत्तरपत्रिका तपासणे फुकट) मोलकरीण उपलब्ध असते तेव्हा काम करणे कुणाही 'कायम' शिक्का बसलेल्या कर्मचाऱ्याला अपमानास्पदच म्हणायचे.
आता पत्नीने उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावरचा तो तक्ता न भरण्याचे गर्हणीय कृत्य का केले होते? तर तिला एवढ्या तीनचारशे उत्तरपत्रिकांचे ते तक्ते भरत बसणे फारच किचकट आणि वेळखाऊ वाटले (शेवटी मोलकरीण झाली तरी पैशाचे काम आणि बिनपैशाचे काम हा भेदभाव ती करणारच). शिवाय पत्नीचे गणित कच्चे (तिचा विषय भाषा). त्यामुळे आकड्यांशी खेळणे हे तिला आगीशी खेळण्यासमान भासे. तिने कार्यालयात दूरध्वनी करून उप-अधीक्षिकाबाईंना विचारले आणि त्यांनी 'ते तक्ते भरायची गरज नाही' असा (तोंडी) शेरा मारला.
मी "हे तक्ते का भरले नाहीस?" असे त्या अधीक्षिकाबाईंसमोर पत्नीवर गुरकावलो. तिने "मी दूरध्वनी करून उप-अधीक्षिकाबाईंना विचारले होते" असे उत्तर दिले. उत्तर खरे असल्याने, आणि एकसमयावच्छेदेकरून अधीक्षिका व उप-अधीक्षिकाबाई एकमेकांसमोर उपस्थित असल्याने (हा मणीकांचन योग होता; अधीक्षिका आणि उप-अधीक्षिकाबाई आलटून पालटून मुंबईला मुख्य कार्यालयात चकरा मारीत असत) त्या दोघींनी एकमेकींकडे निराश होत्साते बघितले, आणि आता 'हे काम आपल्यालाच करावे लागणार' असा सुस्कारा टाकून त्यांनी शिपायाला (चुकलो, मामांना) गठ्ठे माळ्यावरून काढण्यासाठी साद घातली.
पण एवढ्यात सगळे संपले नव्हते. दुसऱ्याच एका वर्गाच्या तिसऱ्याच कोणी तपासलेल्या एका गठ्ठ्याबाबत तिथल्या वरिष्ठ कारकून बाईंना काही शंका होती. तो गठ्ठा पत्नीने तपासला असेल असे त्यांनी गृहीत धरले होते. त्यामुळे पत्नी कार्यालयात येणार ही खबर लागताच त्यांनी रांगेत आपलीही बादली सरकवून ठेवली होती.
त्यात परत गुंता - एका उपकारकुनाला अजून एका चौथ्या वर्गाच्या प्रश्नपत्रिका कुणी काढल्या याबद्दल काही मूलभूत शंका होती आणि ती त्याला पत्नीकडूनच निरसन करून घ्यायची होती. तोही आपले डबडे घेऊन रांगेला आला.
तर आम्ही वरिष्ठ कारकून बाईंसमोर उभे. "द्वितीय वर्षाच्या उत्तरपत्रिका तुम्ही तपासल्यात का" या त्यांच्या प्रश्नाला "नाही, तुम्ही अमुकतमुक बाईंना विचारा, त्यांनी तपासल्या आहेत" हे पत्नीचे उत्तर. पण या दोन संवादांमध्ये त्या उपकारकुनाची "प्रथम वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्हीच काढल्या ना?" ही पृच्छा घुसली. त्यामुळे पत्नीचे उत्तर वरिष्ठ कारकूनबाईंपर्यंत पोचले नाही. त्यामुळे त्या पृच्छेनंतर पत्नीचे उत्तर उमटण्याआधीच "थांबा हो तुम्ही, मी विचारतेय ना त्यांना" हा वरिष्ठ कारकूनबाईंचा (संहितेत नसलेला) संवाद आला. आणि त्या संवादानंतर अर्थातच पत्नीचे उत्तर ("नाही, तुम्ही...") निरर्थक ठरले. नाइलाजाने वरिष्ठ कारकूनबाईंना तो प्रश्न दुसऱ्यांदा विचारावा लागला.
पण उपकारकून असला म्हणून काय झाले? तो अशी हार मानणार? त्याने अचूकपणे आपली पृच्छाफेक परत केली. परत ते संहितेत नसलेले वाक्य. परत पत्नीचे उत्तर. परत ते 'आत' न पोचणे.
या नाट्याचे तीन प्रयोग झाले. अखेर पत्नीने त्या उपकारकुनाला "थांबा जरा, मी तुमच्या मेजाकडे येते" असे म्हणून वाटेला लावले. हे त्याला पटले. ज्या व्यक्तीला प्रश्न विचारला त्या व्यक्तीकडून उत्तर मिळाल्याखेरीज (मग ते उत्तर "नंतर सांगते" असे का असेना) तो तर्कशुद्ध महात्मा गप्प बसणार नव्हता. प्रश्न विचारल्यावर तिसऱ्याच कुणी "थांबा हो जरा" म्हणणे हे तर नेहमीच घडत असते, आपण त्याला दाद द्यायची नसते असे त्याचे तत्त्वज्ञान असावे.
मग वरिष्ठ कारकून बाई आणि उपकारकूनबुवा यांना वेगवेगळे वाटेला लावले आणि आम्ही परतलो.
'शिकवणी' घेण्याइतके व्यवस्थापन मला येते काय हा विचार करीत मी गप्प बसलो.
ता. क. १: मी तेव्हा माहिती तंत्रज्ञान या विषयातून लक्ष काढले होते. त्यामुळे 'संगणकीकरण' केल्याने (एक दणकट असा माहिती-तळ करून दिला की असले सर्व अहवाल आपोआप तयार करता येतील इ इ) हे सगळे यडपटछाप प्रश्न सुटतील असे तयार मत मजकडे नव्हते. माझ्या एका (मा तं वाल्या) मित्राचे असे मत त्याने मला वेडावल्यासारखे बोलून दाखवले. त्याच्यासाठी (आणि त्याच्यासारख्या इतरांसाठी) हा उपसंहार:
त्या कार्यालयातील एक संगणक कुणातरी तज्ज्ञ व्यक्तीने सुरू करून तसाच सोडून दिला होता. त्याचा वापर करून एक अर्ज टंकित करावा म्हणून एक कनिष्ठ कारकून मुलगी त्याच्यासमोर बसली होती. टंकित काय करायचे होते ते काही फारसे जमले नव्हते. पण जे काही जमले होते ते 'वाचवावे' या इराद्याने ती बापुडवाणेपणे इकडेतिकडे कुणी 'तज्ज्ञ' दिसतो का शोधत होती. तिला अष्टदिशांनी सल्ले येत होते.
"कंट्रोल 'एस' दाब, 'एस' म्हणजे 'सेव्ह'"
"छे, मुळीच नाही. कंट्रोल 'ए' दाब. 'ए' म्हणजे 'ऑल'. मग तू केलेले सगळे सेव्ह होईल"
"नको, नको. ते 'होम' दाब म्हणजे ते तुझ्या मूळ फाईलमध्ये सेव्ह होईल. नाहीतर दुसरीकडे कुठेतरी सेव्ह होईल आणि शोधत बसशील"
"अगं माझा मुलगा तर सारखा 'कंट्रोल-आल्टर-डिलीट' म्हणत असतो. करून बघ ना"
"ते 'एस्केप' दाबू नकोस हां, अगदीच नाइलाज झाल्याशिवाय"
संगणकतज्ज्ञांनी (स्वतःच्या) डोक्यावरचे केस उपटायला हरकत नाही.
ता. क. २: घटना खरी आहे पण नावे कुठे घातली नाहीत. नावे घेऊन खरे बोलणे बऱ्याचदा बोलणाऱ्याच्या अंगाशी येते असा अनुभव आहे.