गणितात भारतीयांचा 'पाय' न्यूटनच्या आधी??

Newtonहे मी सांगत नाहीये; मँचेस्टर विद्यापीठाचे डॉ जॉर्ज घेवर्गीज, एक्झेटर विद्यापीठाचे श्री अलमेडा इत्यादी अभ्यासक सांगत आहेत.

'केरळ विचारसरणी' च्या गणितज्ञांना न्यूटनच्या आधी सुमारे अडीचशे वर्षे (इ‌. स. सुमारे १३५०) गणितातील अनंत मालिकेची माहिती होती. अनंत मालिका हा गणितातील 'कलना'चा महत्त्वाचा घटक आहे हे आपल्याला माहीत आहेच. अनंत मालिकेचा शोध सध्या (चुकीने) न्यूटन आणि लिबनिझ ह्या शास्त्रज्ञांचा म्हणून सांगितला जातो असे डॉक्टरमजकूर लिहितात.

मँचेस्टर आणि एक्झेटर मधील चमूंनी केरळ आश्रमातील भारतीयांनी 'पाय'ची किंमत काढायला लागणारी मालिका आणि ती वापरून पायची किंमत नऊ, दहा आणि नंतर सतरा दशांशस्थळांपर्यंत अचूक काढली होती.

पंधराव्या शतकात भारतात आलेल्या गणिताचे ज्ञान असणाऱ्या जेसुइट धर्मगुरूंनी हे ज्ञान युरोपात पोहोचवले असावे असा परिस्थितीजन्य पुरावा आहे असे म्हणतात. ह्याने न्यूटनचे महत्त्व जराही कमी न होता केरळ आश्रमातील माधव आणि नीलकांत ह्यांचे नाव न्यूटनच्या जोडीने घ्यावे असे डॉ साहेब म्हणतात. युरोपीय वसाहतींतून जे वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे दुर्लक्ष झाले त्यामुळे हे शोध जगापुढे येऊ शकले नाहीत असे त्यांचे म्हणणे. ज्या मध्ययुगीन मल्याळी भाषेत हे लिहिलेले होते त्या तिचे अपुरे ज्ञान हे दुसरे कारण असावे.

तेरावा ग्रेगरी ह्या पोपने ज्युलियन कालमापनाचे आधुनिकीकरण करावयास घेतलेले होते. जर्मन खगोल/गणितज्ञ क्लाव्हियस ह्याने जगात इतरत्र दिनदर्शिका कशा तयार करतात त्याची माहिती वारंवार मागवलेली होती. त्यावेळी केरळ आश्रम ह्यात आघाडीवर होता. जेसुइट धर्मगुरू त्याच भागात होती आणि त्यातले काही गणितात तरबेज होते.

तसेच त्याकाळी नौकानयनपद्धतींत सुधारणा करून समुद्रप्रवासाला लागणारा वेळ बिनचुक काढता यावा ह्यासाठी प्रयत्न करणाऱ्या गणितज्ञ खगोलशास्त्रज्ञांसाठी बक्षीसे लावलेली होती आणि केरळी शास्त्रज्ञा ह्या क्षेत्रात अतिशय कुशल होते.

मी हे आजच मँचेस्टर विद्यापीठाच्या ह्या पानावर आणि फिझॉर्गच्या ह्या पानावर  वाचले.  चित्र फिझॉर्गच्या पानावरून ओढलेले आहे.

तुम्हीही वाचून पाहा (आणि लिहा!) मला समजले ते बरोबर आणि पुरेसे आहे काते! भारतीय स्वातंत्र्याच्या हीरकमहोत्सवी वर्षात असे हिरे हाती आले तर आपले विज्ञान क्षेत्र उजळून जाईल असे वाटते.