प्रकाश नारायण संत

      प्रकाश नारायण संत. यांचं खरं नाव भालचंद्र गोपाळ दिक्षित. तंतोतंत ! पण मला तरी प्रनासं हेच बेष्टं वाटलं. तर आता यांच्याबद्दल सांगावयाचं कारण हेच की, दोन आठवड्यांपूर्वी यांचं 'वनवास' हे पुस्तक वाचावयास घेतलं. हे पुस्तक म्हणजे पुस्तकच आहे. नावावर जायचं कामच नाही. म्हणजे नाव वनवास असलं तरी हे पुस्तक वाचलं ना की आपण अगदी लहान बनून, मस्त हिरव्यागार बागेतून फेर्फटका मारतोय, भोवताली झोपाळे, घसरगुंड्या मस्तपैकी हसताहेत, आपल्याला आवडणारी लालपांढरया चाफ्याची फुलं छानपैकी फुलून आलीत, असं सगळं गार गार, झकास वाटू लागतं. आणि आपण हरवूनच जातो. कुठे विचारायचं कामच नाही! वनवास वाचलं आणि प्रनासंची आणखी तीन पुस्तक म्याडसारखी फटाफट वाचून काढली. 'शारदासंगीत', 'पंखा' आणि 'झुंबर'. तिन्ही वनवासचेच पुढचे भाग, सीक्वेल्स की काय म्हणतात तसे आणि सगळे एकदम बेष्टंच. सणसणीत! मला अगदी महाभयंकर आवडले. महाभयंकर!

      तर मुळात या चारही पुस्तकांना एकत्र बांधणारा धागा म्हणजे लंपन. लंप्याच्या आज्जी-आजोबा, आ‌ई-बाबा, त्याच्या डोक्यांतली चक्रं, बाबूराव, सुमी... सगळंच एकदम झक्कास! कारव्हार नजिकच्या गावात राहणारा हा एक छोटासा मुलगा. त्याच्या आज्जी‌आजोबांकडं. आ‌ईबाबांपासून दूर! आता कारव्हार म्हटलं ना की मला आवडणारच. सणसणीत! गेल्या डिसेंबरच्या सुट्टीतच कारव्हारला गेलेलो आणि खरंच इतकं बेष्टं ठिकाण मी अजून पाहिलं नाहीये. असो. तर असा हा लंप्या. आ‌ईबाबांपासून दूर रहावं लागतंय म्हणून कधी हळवा हो‌ऊन रडणारा, कधी त्याच्या भयंकर मित्रांबरोबर भयंकर मजा करणारा, तर बरयाचदा त्याच्या डोक्यातल्या चित्रविचित्र विचारांनी आपल्याला खळखळून की काय म्हणतात तसं हसवणारा, भरपूर वाचणारा, छान छान गाणी म्हणणारा लंपू आपला एकदम खास मित्रच हो‌ऊन जातो.

      या पुस्तकातली अजून एक गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तिरेखा इतकी सुरेख रंगवली आहे की ती आपल्या ओळखीचीच वाटते. एकदम! लंपनच्या सहवासातली प्रत्येक व्यक्ती म्हणजे त्याची आज्जी-आजोबा, आ‌ई-बाबा, मनी आणि बिट्ट्या ही लहान भावंडं, बाबूराव, सुमी (वनवास नंतर सुमी फारशी भेटत नाही याची खंत वाटत राहते), शारदासंगीतमधले म्हापसेकर मास्तर, शेवंती, इरावती, नकादुतले मामा, संप्या, परळ्या, यमज्या, हणब्या, जांब्या ही लंप्याची गॅंग, सायकलचं दुकान चालवणारा टी. जी.  कासारगोड सगळीच सहीयेत. सणसणीत लक्षात राहणारी.  आणखी एक म्हणजे म्याड या शब्दाचा म्याडसारखा वापर. मला सर्वात जास्त आवडलेली कथा म्हणजे 'आदम'. लंपू, त्याचे आईबाबा, मनी यांनी एकमेकांना पठवलेल्या पत्रांचं ग्रेट वर्णन केलंय त्यात. ग्रेट म्हणजे मजबूतच! खरंच इतके वेगवेगळे विषय आणि अगणित कल्पना या माणसाला कुठून सुचल्या याचं राहून राहून आश्चर्य वाटतं. आणि त्यातही लहान मुलाचं भावविश्व रेखाटणं ही काही सोपी गोष्ट नव्हे. अवघड म्हणजे अवघडच! म्हणूनच प्रनासंना अगदी साष्टांग नमस्कार. कम्प्लेट.

      वनवास वाचल्यावर पुढली तिन्ही पुस्तकं मी अगदी झपाटल्यागत वाचून काढली आणि झुंबर वाचून संपल्यावर पुस्तकाच्या मागे वाचलं की, २००३ मध्येच प्रनासंचं आकस्मिक निधन झालेलं. मग बाबांकडून कळलं की कुठल्या की मोटार अपघातात त्यांचं दुर्दैवी निधन झलेलं. म्हणजे प्रनासंची आता पुन्हा भेट होण शक्यच नाही. खरं तर ही पुस्तकं वाचून इतक्या छान गाठी पडलेल्या त्या अचानक सुटल्यासारख्या वाटल्या मला. आणि त्यांच्या आत पुन्हा त्यांचं लिखाण वाचता येणार नाही याची रूखरूख. भयंकर!
-------------------------------------- शतानंद.