प्रसन्न सकाळ उजाडली. चित्र रंगवण्यासाठी त्याने कागद आणि कुंचले जुळवले.
अनाघ्रात कागदावर पहिला फटकारा कुठल्या रंगाचा मारावा याचा त्याने विचार सुरू केला.
लाल रंगाकडे त्याचा कुंचला वळताच रक्ताचे पाट, बेधुंद आरोळ्या, हातात नंग्या तलवारी घेऊन चाललेल्या लुटारूंच्या टोळ्या, आयुष्याच्या कमाईची काही क्षणात झालेली राखरांगोळी नजरेसमोर भिरभिरू लागली. घाईघाईने त्याने हात मागे घेतला.
निळ्या रंगाकडे कुंचला वळताच संथ गहिरे वाटणारे निळेशार पाणी मृत्युदूत होऊन कसे हळूहळू चढणाऱ्या जीवघेण्या लाटांनी चराचर व्यापून टाकते आणि 'चुबुक, चुबुक' अशी मृत्युघंटा वाजवीत जाते ते जीवघेण्या अलगदपणे पुढे होऊ लागले. त्याने परत हात मागे घेतला.
हिरव्या रंगाकडे कुंचला वळताच प्रसन्न, तजेलदार वाटणारा रंग वेडाची झाक घेऊन अर्ध-शिक्षित/अशिक्षित लोकांकडून कशी मालमत्तेची आणि अब्रूची राखरांगोळी करतो ते टक्क डोळ्यांसमोर उभे राहिले. त्याने परत हात मागे घेतला.
पिवळ्या रंगाकडे कुंचला वळताच काविळीने पिवळी झालेली नजर, शंभर वर्षांच्या जुन्या पोथीतून लावलेला आजच्या जगाचा अर्थ, त्यासाठी मारलेल्या अतर्क्य कोलांट्याउड्या, सर्वत्र 'आपले' राज्य येईल या आशेवर जगलेले आणि मेलेले असंख्य कार्यकर्ते आक्रोशत पुढे झाले. त्याने परत हात मागे घेतला.
काळ्या रंगाकडे कुंचला वळताच अशुभ मानून हद्दपार केलेली 'काळ्या' तोंडाची अनेक भुते नाचत समोर आली. पाठोपाठ त्या रंगाचा पोषाख चढवला म्हणजे आपण देवाचे दूत आहोत असे दर्शवून सैतानी कृत्ये करणारे हैवान खदाखदा हसू लागले. त्याने परत हात मागे घेतला.
पांढरा रंग. पांढऱ्या कागदावर पांढरा रंग? नवीन प्रयोग करू म्हणून त्याच्या कुंचला तिकडे वळला.
त्या रंगाच्या वसनांच्या आड दबलेले अनेक हुंदके आणि अतृप्त उसासे, जन्मदाता जाहीर न झाल्याने जन्मदात्रीच्या बाजेच्या खुराखाली चिरडून मेलेली अर्भके, नैसर्गिक भावनांना मारण्यासाठी केलेले अनैसर्गिक उपाय, सर्व सर्व कलकलत आले. त्याने परत हात मागे घेतला.
=====
आता तो पाण्याने चित्र रंगवतो.