बालपणीचं खाऊजगत

त्या पाश्वात्य रेस्टॉरंटमध्ये मेन कोर्स झाल्यावर सवयीनुसार पावलं डेझर्ट/आईसक्रिम कॉर्नरकडे वळली. खरं म्हणजे ’सॉफ़्टी’ नामक फुगवलेलं, फेसासारखं दिसणारं (आणि लागणारं) ते आईसक्रिम मला मुळीच आवडत नाही. त्याऐवजी केक/पेस्ट्री/पुडिंगच मी जास्त पसंत करते (आणि अशावेळेस आपल्या शाही भारतीय मिठाया हटकून आठवतात!) आणि याही पेक्षा त्याठिकाणी हे पदार्थ सजवण्यासाठी असलेल्या नखरेल गोष्टी पहायलाच मला फार आवडतं. लालचुटूक आणि हिरव्यागार रंगांचे थरथरणारे पारदर्शक जेली क्युब्ज, चौकटींचं डिझाईन असलेली त्रिकोणी पेपर किंवा वेफरच्या जाडीची कुरकुरीत बिस्कीट्स, पाकातल्या स्ट्रॉबेरीज, चेरी, फ़्रेश क्रिम, चॉकलेट सॉस किंवा चॉकलेटचा किस, जिरागोळ्या.............

जिरागोळ्या! एकेकाळी जबरदस्त आकर्षण होतं जिरागोळ्यांचं मला. लहानपणचं ते छोटं विश्व अजून रंगीबेरंगी होण्यात त्यांचाही सहभाग होताच ना! गोल नव्हे तर अंडाकृती आकाराच्या आणि पांढरा, गुलाबी, पिवळा, केशरी, निळ्या अश्या विविध रंगात डुंबलेल्या त्या जिरागोळ्या प्रथम माझ्या हातात पडल्या त्या भातुकलीतल्या ’फ्रिज’ नामक बड्या खरेदीमुळे. त्यामध्ये ज्या चिमुकल्या बाटल्या होत्या त्या या जिरागोळ्यांनी भरलेल्या होत्या. झालं! तेव्हापासून नादच लागला. पुढे नानाविविध आकारांमध्ये भरलेल्या स्वरुपात त्या खरेदी केल्या. जिरागोळ्यांमध्ये अशी खुबी आहे की केवळ त्यांच्या असण्याने एखादी अनाकर्षक गोष्ट आकर्षक व्हावी. आणि चव गोडच असल्याने न आवडण्याचा प्रश्नच येत नाही. जिभेवर जिरागोळ्या ठेवून त्या काही सेकंद नुसत्या चघळण्यात तेव्हा आम्हाला त्रिलोकीचा आनंद मिळत असे. बाकी जिरागोळ्यांचा आतमध्ये बडीशेपेचा दाणा असताना त्यांना ’जिरा’-गोळ्या का म्हणतात हा प्रश्न आम्हाला कायम पडायचा.

पुढे अजून एका आकर्षणाशी गाठ पडली जी अजूनही अतूट आहे. एए स्वीट्सच्या (आठवल्यांच्या बहुतेक) काजूवड्या. आखीव चौकोनी आकार. पिस्ता किंवा गुलाबी रंग. पारदर्शक प्लास्टीकच्या कागदाचं वेष्टण. आणि वर मधोमध ब्रॅडनेमची सोनेरी कागदी टिकली. काजूवडी म्हणा किंवा आताच्या भाषेतली एका प्रकारची कॅंडी म्हणा, ही छबी अजूनही डोळ्यासमोर तशीच्या तशी आहे. या काजूवड्या आणि श्रीखंडाच्या गोळ्या आम्हांत एकदम पॉप्युलर होत्या. या काजूवड्यांप्रमाणेच त्या श्रीखंडाच्या गोळ्याही लागतात मस्त पण ’श्रीखंडाच्या’ म्हणाव्या तर श्रीखंडासारखी चव कुठे असते त्यांची!

शाळेत मधली सुट्टी झाली की पावलं शाळेजवळच्या वाण्याच्या दुकानाकडे वळायची. त्या वाण्याच्या 'टिपीकल' दुकानात हमखास कपड्याच्या साबणाचा वास दुमदुमत असायचा पण तिकडे कोणाचं लक्ष जातंय? तिथल्या त्या दर्शनी भागातल्या बूड टेकवून उभ्या केलेल्या गोल काचेच्या बरण्यांतल्या मेव्याकडे आम्ही आशाळभूत नजरेने पहायचो. काय नसायचं त्यात! परीकथातले हिर्‍यांमाणकांनी भरलेले पेटारे आणि बालपणातली सर्व आकर्षणं एकाच ठिकाणी बंदिस्त केलेल्या त्या पारदर्शक बरण्या आमच्या दृष्टिने एकाच पातळीवर असायच्या. रंगीत लॉलीपॉप्स, लिमलेटच्या-संत्र्याच्या फोडीचा आकार आणि डिझाईन असलेल्या केशरी-पिवळ्या गोळ्या, रावळगाव चॉकलेट्स, पॉपिन्स नामक रंगीत चघळायच्या गोळ्या (त्याचं पॉकिंग मला भन्नाट आवडायचं) यांनी तुडुंब भरलेल्या त्या बरण्या पाहून डोळ्याचं पारणं फिटायचं. पण त्याचबरोबर शेजारच्या बरणीतली 'वैद्य यांची आवळासुपारी'ही खुणावायची. मग काय घ्यायचं यावर बरोबरच्या शाळूसोबतींशी सल्लामसलत करुन चार-आठ आण्यांत गोळी किंवा त्या आवळासुपार्‍या खरेदी करुन आरामात चघळत पुढच्या तासाच्या बाईंविषयी गंभीर चर्चा केली जायची.

या सर्वांमध्ये अत्यंत अप्रूपाची अजून एक गोष्ट असायची. कॅडबरीज जेम्स. पण त्या म्हणजे जरा श्रीमंती, दिखाऊ आणि बाकी गोळ्यांशी तुलना केल्यास महागडं वाटावं असं प्रकरण होतं. त्यामुळे त्यांच्याशी गाठ वाढदिवसानिमित्त किंवा अभ्यास वेळेवर करण्याच्या सत्कृत्याबद्दल मिळाणार्‍या बक्षिसामार्फतच घडत असे. लाल, पिवळ्या, शेंदरी वगैरे रंगांच्या चकचकीत गोल बटाणांसारख्या त्या आकारात आतमध्ये कॅडबरीसारखं काहीतरी असायचं. अश्या त्या रंगारुपात अत्यंत आकर्षक आणि चव तर काय बोलायलाच नको अश्या प्रकारची असल्याने जेम्सचं पाकीट हातात पडणं ही एक मोठी आनंदाची पर्वणीच होती. पण त्या हवा भरलेल्या पॅकेटमधून जेमतेम १० गोळ्या निघायच्या तेव्हा अस्सा राग यायचा (अजूनही येतो :)) पण तोंडात टाकल्यावर विरघळणार्‍या त्या सुमधुर चवीत ते विसरायलाही व्हायचं. या जेम्सचाच अजून एक राजेशाही चुलतभाऊ म्हणजे कॅडबरीज फाईव्ह स्टार. तो तर चॉकलेट जगतातील आकर्षणांतील परमोच्च बिंदू होता! हे कायम सामूहिक रित्याच, उपस्थित लोकसंख्येइतके भाग करुन खाण्यात आल्याने एक अख्खं फाईव्ह स्टार एकट्यानेच खाणं ही एक सुप्त मनिषा असायची. नाही म्हणायला अमूलची चॉकलेट्सही होती पण फाईव्ह स्टारच्या त्या सोनेरी झगमगाटापुढे त्या सौम्य वेष्टणातल्या अमूलकडे म्हणावं तितकं लक्ष जायचं नाही. याशिवाय कॅम्प्को, पॅरीज ही चॉकलेट्सही जोडीला होतीच. टीव्हीवर लागणार्‍या त्यांच्या जाहिरातीही विशेष आकर्षक होत्या.
शाळेजवळ शेजारीशेजारी अशी दोन वाण्याची दुकानं होती. पैकी एकाला आमच्याकडून जास्त भाव मिळायचा. कारण त्याच्याकडे फ्रिज होता आणि फ्रिजमध्ये काय तर पेप्सीकोला (आमच्या बोलीत 'पेप्शीकोला'). आता हल्लीच्या पेप्सी आणि कोकाकोल्याच्या युद्धात हा आमचा लहानपणचा दोस्त मिळतो की नाही कोणास ठाऊक पण ऑरेंज, कालाखट्टा, मॅंगो पासून ते कॉफी, पिस्ता, केशर या स्वादांच्या दुधाळ पेप्सीकोल्याची गारेगार दांडकी तोंडाने स्स्स आवाज करत, चोखत उन्हाळ्यातल्या सुटीतल्या कितीतरी दुपारी घालवल्यात! आणि तेही खाऊन समाधान नाही झालं तर आहेच आपला कुल्फीवाला भैय्या. त्याच्याकडच्या त्या अल्युमिनियमच्या कोनातल्या कुल्फ्या खात खात कितीक कॅरम किंवा पत्त्यांचे डाव खेळलेत त्याला सुमार नाही. याव्यतिरिक्त ती बारकी चन्यामन्या आंबटगोड, मीठ लावलेली बोरं, चिंचा, पेरु, खारेदाणे वगैरे विशेष आम्हाला दिवसातल्या कुठल्याही प्रहरी खायला चालत होतेच.

दूरदर्शन आणी डीडी मेट्रो या दोन चॅनेलचंच विश्व ठाऊक असणार्‍या त्या काळात 'रसना'ची तुफान क्रेझ होती. 'आय लव्ह यू' रसना असं म्हणणार्‍या त्या पोरीची आणि रसना काठोकाठ भरलेला काचेचा मोठ्ठा जग एकट्यानेच पिणार्‍या त्या अगडबंब मुलाची जाहिरात पाहून घराघरात रसना आणण्याचा हट्ट तेव्हा होत असे. चवीला फार अलौकिक वगैरे नसलं तरी रसनाला प्रत्येक बालमनात एक स्थान होतंच. त्या जाहिरातीतल्या सुंदर आकाराच्या काचेच्या ग्लासात कोसळणारे बर्फाचे क्युब्ज बघायला भारी आवडायचं. त्याकाळातील बहुतेक वाढदिवस रसनाबरोबर साजरे केले गेले असणार या शंका नाही. आता मध्ये एकदा भारतात गेल्यावर मुद्दाम पाहिलं, रसनाची जाहिरात जाऊ देत पण मागमूसही कुठे दिसला नाही! (नाही म्हणायला जेम्स, फाईव्ह स्टार आपलं स्थान जरातरी टिकवून आहेत. फक्त किटकॅट, मंच, पर्कबिर्क असल्या आधुनिक भावंडांसोबत किती टिकतात बघायचं)

कुतुहलाने मी आमच्याच बिल्डींगमधल्या एका छोटीला विचारलं, "काय गं रसना आवडत नाही का तुला?"

"रसना? म्हणजे?" डोळे मोठ्ठे करुन तिने मलाच विचारलं.
मी काय समजायचं ते समजले. म्हटलं हल्लीच्या पिढीची आकर्षणं काय आहेत विचारुया.

यावर तिने एकेक नावं घ्यायला सुरुवात केली. मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढत जाणार्‍या त्या फक्त चॉकलेटांच्या प्रकारांची नावं ऐकून खात्री पटली, ग्लोबलायझेशन, ग्लोबलायझेशन म्हणतात ते हेच. लिमलेट, रावळगाव, श्रीखंडाच्या गोळ्या, जेम्स आणि फाईव्ह स्टार यावर आमची यादी संपत असे. आणि आता काय!

पठ्ठी एकही भारतीय ब्रॅंडच्या चॉकलेटचं नाव घेत नव्ह्ती. नेसले काय, टोब्लेरोन काय, किसेस काय...काय नी काय. (खरं सांगते, तो मोदकांच्या आकाराचा तो चॉकलेटचा प्रकार मी आत्ता अलिकडे काही दोन-तीन वर्षांपूर्वी प्रथम पाहिला!) म्हटलं बरोबर आहे, बदलत्या काळात वाण्याची दुकान जाऊन मॉल्स आले मग त्याबरोबर वाण्याकडचे खाद्यविशेषही जाऊन त्याजागी देशोदेशींचे खाद्यप्रकार आले. यात नवल ते काय? हल्लीच्या मुलांना कॅडबरी ही पाण्याइतकीच कॉमन गोष्ट आहे. नुसती टॉफी किंवा कॅंडी म्हटलत तर विविध ब्रॅंडच्या, विविध आकार आणि चवीच्या अनंत प्रकारच्या टॉफीजनी मॉल्समधली शेल्फ नुसती भरली आहेत. फाईव्ह स्टार इज नो मोअर अट्रॅक्शन नाऊ बट इज जस्ट अनादर चॉईस!

मॉल्समधल्या खाऊने लगडलेल्या त्या भिंती मला अंगावर येतायत की काय असं वाटतं. हिंडून थकल्याने पावलं थबकतात आणि तिथेच एक आईसक्रिमचा कोन खरेदी केला जातो.
पण नेमक्या त्याच क्षणी अल्युमिनियमच्या साच्यातल्या, मिठाची किंचीत चव लागणार्‍या, आटीव दुधाच्या चवीच्या त्या मटका-मलई कुल्फीची चव मला आठवते...! फार त्रास होतो हो!!
-वर्षा