रेहेकुरी काळवीट अभयारण्य आणि सौताडा धबधबा..

    रेहेकुरी काळवीट अभयारण्य नगर जिल्ह्यातल्या कर्जत जवळ वसलेलं आहे. २१७ हेक्टर एवढ्या जागेवर पसरलेलं हे अभयारण्य आणि पुढे जवळच असलेला सौताडा धबधबा नुकताच पाहिला. पर्यटकांची फारशी वर्दळ नसलेली ही दोन्ही ठिकाणं खूपच छान आहेत. म्हणूनच इतरांसाठी हा माहितीलेख. ( अवांतर: एकदम गर्दी करुन यकदम टूरिष्ट स्पाट बनवून टाकू नये )

रेहेकुरी अभयारण्यात काळवीट आणि चिंकारा जातीची जवळजवळ ५०० ते ६०० हरणे आहेत. क्वचित प्रसंगी दिसणारे कोल्हे आणि लांडगे हे त्यांचे नैसर्गिक शत्रू आहेत.वाघ आणि बिबटे या भागात आढळत नाहीत (हे एक बरं आहे.) त्यामुळे अभयारण्यात अगदी पायीसुद्धा फिरता येतं. आपली स्वतःची गाडी अभयारण्यात नेता येते. येथील वनकर्मचारी मात्र सोबत असावे लागतात.

सकाळी लवकर आणि संध्याकाळी चार वाजल्यानंतर हरणं खास करुन दिसतात.दुपारची वेळ थंडगार सावलीत विश्रांती घेण्याची असते. काळ्या पांढऱ्या रंगातला आणि वळत गेलेली सुरेख शिंगं असणारा काळवीट नर खूपच सुरेख दिसतो आणि टणाटण उड्या मारणाऱ्या हरणांवर तर नजर ठरत नाही.

भरपूर संख्येने ही हरणं असली तरी त्यांचं दर्शन फारवेळ होत नाही. अगदी थोड्याशा आवाजानेही कळप बुजतो आणि चौखूर उधळत क्षणार्धात नाहीसा होतो.(त्यामुळे फोटो काढायचे कसब पणाला लागते. त्या तयारीने जावे.) माळरानच असलेलं हे अभयारण्य विरळच आहे, मात्र आता वनविभागाने खूपशी कडुनिंबाची झाडं लावल्याने थोडाफार दाटपणा आला आहे (अरे वा!! लगे रहो!!) 

    रेहेकुरी पाहून झाल्यावर येथून पुढे कर्जतवरुन जामखेड गाठावे. तेथून जवळच सौताडा येथे धबधब्याचे सुंदर ठिकाण आहे. श्री क्षेत्र रामेश्वर नावाचे हे एक शंकराचे स्थान आहे.मंदिरात पोहोचण्यासाठी साडेतीनशे पायऱ्या दरीत उतरावे लागते. येथेच महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचे देखील नमस्करणीय स्थान आहे. या ठिकाणाची समुद्रसपाटीपासून उंची साधारण २५०० फूट आहे.  
दरीत उतरुन गेल्यावर प्रवाहापलीकडे शंकराचे मंदिर आहे. प्रवाह पार करण्यासाठी दोराची व्यवस्था करण्यात आली आहे तरीही खूपच काळजी घ्यावी. कारण पाणी मांडीजवळ येते आणि कुठल्याही क्षणी सगळ्या सहलीवर पाणी पडू शकते.

 त्यामुळे उत्साही वीरांनी जरा नमते घेतलेले बरे. तरीही काहीजणांना काही करुन दाखवायचे असेल तर अशांसाठी या बोर्डची खास 'येवस्था' करण्यात आली आहे.

  असल्या या नामी बोर्डाचे सौजन्य जामखेडातले असले तरी त्यात पुणेरी हात असल्याच्या शंकेला बराच वाव होता.

त्यामुळे धबधबा आणि त्याखालचा डोह लांबूनच बघून समाधान मानावे आणि घरचा रस्ता पकडावा.

माहिती:   पुण्यापासूनचे रेहेकुरीचे एकूण अंतर साधारणपणे १४० किमी आहे. जाण्यासाठी पुण्यावरून सोलापूर हायवेवरुन चौफुला गाठावे.(चौफुला हे गाव आहे.मात्र पुढे प्रवासात चौकालाही चौफुला म्हंटले जाते म्हणून रस्त्याने पत्ता विचारल्यास गोंधळून भलतीकडेच जाऊ नये. आम्ही गेलो नाही! ) तेथून दौंडसाठी वळून सिद्धटेकचा गणपती करता येतो. त्यानंतर राशिन मार्गे कर्जत गाठावे. ही बऱ्यापैकी डांबरी सडक आहे. कर्जतपासून रेहेकुरी सहा-सात किमी आहे. ऑगस्ट ते जानेवारी हा भेट देण्याचा सर्वोत्तम काळ आहे. शनिवारी सकाळी निघून बारा-एक वाजेपर्यंत रेहेकुरी गाठावे.त्यादिवशी रेहेकुरीला तीन-चारदा भेट देऊन तेथेच मुक्काम करावा, दुसऱ्या दिवशी परत सकाळी भेट देऊन साधारणपणे नऊ वाजता सौताड्यासाठी निघावे.दुपारी एक वाजेपर्यंत सौताडा आटोपून दोन-तीन वाजता परत फिरता येते. परतीच्या वेळेस आल्या मार्गाने पुण्यास जाण्यापेक्षा जामखेड वरून हाय-वेने नगरमार्गे पुणे गाठणे अधिक चांगले. 

रेहेकुरी अभयारण्यात पर्यटकांसाठी विश्रामगृह आहे, मात्र त्याचे आगाऊ आरक्षण पुण्यातून करावे लागते, असे तेथील आगाऊ कर्मचाऱ्याकडून आम्हाला 'तेथे' गेल्यावर समजले त्यामुळे तोंडचे पाणी पळाले व एका मुष्किलीने सापडलेल्या व एकाच वेळी गलिच्छ आणि अस्वच्छ असलेल्या लॉजिंग आणि बोर्डिंगात पथारी टाकणे आले. आगाऊ आरक्षणासाठी वन्यजीव संरक्षण विभाग,फॉरेस्ट कॉलनी,साळुंखे विहार,पुणे येथे समक्ष जावे. रेहेकुरीला गेल्यावर अभयारण्यात मोठमोठ्याने बोलू नये,भडक रंगाचे कपडे घालू नये, परफ्युमचा वापर टाळावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही प्रकारचा कचरा हरणांच्या माथी मारू नये हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही(सांगून झाल्यावर!)

धन्यवाद!