एक दिवस असेच नेहमीसारखे मी आणि आजी गप्पा मारत होतो.एकदम ती मला म्हणाली या मंगळवारी येतेस आमच्या चर्चाच्या सहलीला? आम्ही बाड कांबेर्ग ला जाणार आहोत.मी काय तयारच होते नवा अनुभव घ्यायला. सहल होती ज्येष्ठांची, सगळे किमान सत्तरीच्या पुढचे आजीआजोबा.सांक्ट मार्कुस किर्श म्हणजे सेंट मार्क्स चर्च तर्फे ज्येष्ठ मंडळींसाठी सहल,ऑपेरा,नाटके असे अनेक कार्यक्रम आयोजले जातात. आकिम आजोबा काही चर्चच्या कार्यक्रमांना जात नाहीत.ते "कोन जातो रे चर्चात?मी तर क्रिसमस नाय तर लग्नाबिग्नाला जातो चर्चात." या फटार्डोच्या पंथातले! तर त्सेंटा आजी मात्र दर शनिवार रविवार 'गॉटेस डीन्स्ट' अर्थात 'मास'ला जाणारी असल्याने ती या इतर कार्यक्रमांना सुद्धा उत्साहाने जात असे. तर तिच्याबरोबर मी ही ट्रीपला जायचे ठरले. बाड कांबेर्ग हे ताऊनुस टेकड्यांमधील लिंबुर्ग-वाईलबुर्ग जिल्ह्यातील एक छोटेसे गाव.फ्रांकफुर्ट पासून साधारण ४४ किमी अंतरावर असलेले हे १००० वर्षाचे प्राचीन गाव पाहायची उत्सुकता अर्थात होतीच.बाड म्हणजे बाथ.बाड ने सुरू होणारी अनेक गावे जर्मनीत आहेत,इथे गरम पाण्याचे झरे,कुंडे असे काही पूर्वी होते आणि त्यामुळे त्यांची नावे बाड पासून सुरू होणारी आहेत.उदा. बाड होंबुर्ग,बाड सोडन,बाडेन बाडेन इ. बाड कांबेर्ग मधील झरे हे हेसन राज्यातील सर्वात जुने झरे असल्याचे सांगतात. अर्थात आता सर्वच ठिकाणी असे झरे,कुंडे आहेतच असे नाही पण नावे मात्र तशीच राहिली आहेत. आपल्याकडे नाही का धोबीतलावावरील तलाव,चर्चगेटमधील चर्च,घोडबंदर वरील घोडे गायब झालेत तसेच!
ज्येष्ठांची सहल त्यांना झेपेल अशीच अर्ध्या दिवसाची. दुपारी १ वाजता जेवून खाऊन मंडळी निघणार आणि रात्री आठाच्या सुमाराला परत! मी आणि आजी १२.३० च्या सुमाराला घरातून चर्चात जायला निघालो. पावसाची किंचित भुरभूर सुरू झाली म्हणून आजी थोडी वैतागली पण चर्चच्या आवारातील मित्र मैत्रिणी पाहून परत उत्साहित झाली.एकेक जण जमायला लागले. सगळे ७०,७२,७६ अशा चढत्या वयांचे 'तरुण' कोणी काठी घेऊन तर कोणी वॉकर घेऊन येऊ लागले.एक आजी तर चक्क व्हील चेअर वरून आली.पण उत्साह मात्र शाळेला ट्रीपला जाणाऱ्या मुलांच्या वरताण होता.पाऊण च्या सुमाराला बस आली,थोमासने (थॉमसचा जर्मन उच्चार! हे लोक जॉनला यॉन,पिटरला पेटर,मायकेल ला मिशाईल म्हणतात.)आजीआजोबांचे वॉकर्स बसच्या पोटात ठेवायला सुरुवात केली आणि एकेक आजीला हात देऊन बसमध्ये बसवायला लागला.आमची आजी आणि मी त्याला मदत करू लागलो. बरोब्बर एक वाजता "हुर्रा.." असे ओरडून बस सुटली.टायर पुढे नारळ फोडून 'गणपतीबाप्पा मोरया'ऐवजीचा हा किरकोळ बदल होता.बस हाय वेला लागली आणि आज्या जणू आपली वयं चर्चात ठेवून आल्यासारख्या गाणी म्हणायला लागल्या. एकाहून एक जर्मन लोकगीतांनी जोर धरला.आपल्या सारखे हे लोक भेंड्या नाही खेळत तर हातात हात गुंफून कडे करतात आणि जागेवर बसले असले तरी गाणी म्हणत डोलतात. आजी आजोबा सगळे एकमेकांचे हात गुंफून घेऊन डोलायला लागले.हाय वे संपून गाडी आता छोट्या रस्त्याला लागली.ताऊनुसच्या टेकड्या जवळ यायला लागला,वळणावळणाच्या रस्त्यावर दोबाजूला मयूरपंखी आणि मेपल्स चवऱ्या ढाळत होते. सगळीकडे हिरवाई आणि फुलांचे रंगीत मखमालीचे गालिचे पसरले होते.थोमासने गाडीचा वेग कमी करून रसिकता दाखवली.आजीआजोबांनीही आपापली छबीयंत्रं बाहेर काढली.या तासाभराच्या प्रवासादरम्यान सर्व आजी आजोबांशी आमच्या आजीने अगदी कौतुकाने माझी ओळख करून दिली.त्यात एक ८० च्या पुढचे चित्रकार आजोबाही होते.आफ्रिकेत राहिलेले, ६ भाषा येणाऱ्या या आजोबांनी हिंदीत नमस्ते करून धन्यवाद देऊन मला एक धक्काच दिला.
कुर हाउस रेस्टोरांक्ट पाशी आमची बस थांबली आणि सारे आजीआजोबा पायउतार झाले.आपापल्या काठ्या,वॉकर्स घेऊन कुर हाउस च्या शेजारील प्रसिद्ध स्पा गार्डन मध्ये फिरत फिरत मला एकेका हर्बची ओळख करून देऊ लागले. साधारण तासभर फिरल्यावर कुर हाउस मधील 'काफे उंड कुकन' चा स्वाद घेणे अत्यावश्यक होते.या जर्मन मंडळींचे एक कप कॉफीवर समाधान नाही होत.ते किमान २,३ कप कॉफी तरी पितातच, ती ही कडक,काळी,कडसर कॉफी! त्यामुळे आपल्याला कोणता केक हवा आहे ते सांगून तो यायच्या आतच कॉफीचे कपच्या कप रिचवणे चालू झाले.तिथेच मुद्दाम तयार केलेली ती अप्रतिम चीज पेस्ट्री, अम्म!! आजही माझ्या जिभेवर ती चव घोळते आहे.
कॉफीपान झाल्यावर आता गावात फेरफटका मारायचा होता.सुझन,आमची गाईड घाईघाईने कॉफी संपवून उठलीच.थोमास,सुझन,मी आणि आमच्या आजीसारखे स्वतःची काळजी घेऊ शकणारे आजीआजोबा यांनी वॉकर वाल्या आज्यांना मदत करायची आणि त्यांना मागे पडू द्यायचे नाही असे ठरले. अमाथोफ ही अतिभव्य इमारत,तिच्यावरील लाकडी कोरीव काम अत्यंत पाहण्यासारखे आहे.आता तिथे सरकारी कचेऱ्या आहेत.१४ व्या शतकातील ओबरटुर्म म्हणजे अप्पर गेट टॉवर आणि त्याच्या आतील लहानसे संग्रहालय पाहण्यासारखे आहे.अनेक पुरातन वस्तू तिथे जतन करून ठेवल्या आहेत.बाड
कांबेर्गचा लोअर गेट टॉवर हा झुकलेला मनोरा म्हणून प्रसिद्ध आहे.आपल्याला पिसाचा झुकता मनोराच माहिती! त्यामुळे थोडी शंकाच मनात होती.म्हणजे मी तरी आधी कधी या बद्दल वाचले,ऐकले नव्हते.१३३५ मध्ये सुरुवात करून १३८० मध्ये पूर्ण झालेला हा टॉवर १.४४ मीटर झुकला आहे.(inclination 1.44 m) पण आता तिथे आत प्रवेश बंद आहे.
बाड कांबेर्गमध्ये जून मध्ये अगदी जुन्याजुन्या फोल्क्स वागनचे (VW-volkswagen)प्रदर्शन असते ही रोचक माहिती मिळाली आणि शीळच वाजली माझी आनंदाने!(मनातल्या मनात जून मध्ये इथे यायचा बेत मी ठरवूनही टाकला.)
ही चर्चची सहल, त्यामुळे येथील सांक्ट पेटर उंड पाऊल किर्श= सेंट पीटर आणि पॉल चर्च पाहणे आलेच. १५८० मध्ये बांधलेला गोथिक टॉवर आणि फ्रिड्रिश लुडविकने बांधवून घेतलेल्या ह्या कॅथॉलिक चर्चचे काम इस.१७७७ ते १७९९चालले. अतिभव्य आणि अतिशय सुंदर अशा ह्या चर्चबाहेरचा परिसरही तितकाच छान आहे.असेच रमत गमत,चालत गावात चक्कर मारून परत बसकडे यायला निघालो.
सगळ्याच आजीआजोबांचा चालण्याचा आणि सहलीचा उत्साह आता वयोमानाने थोडा थकला होता.त्यामुळे परतीच्या वाटेवर तो पेंगुळला.पण मन मात्र ताजं होतं.आता पुढची सहल कोठे? असा सवाल विचारूनच एकेक जण गाडीतून उतरत होता.