मराठी विश्वकोश (कोशातून आता विश्वाकडे!)

कालच्या सकाळात ही बातमी वाचायला मिळाली आणि आनंद झाला. बऱ्याच वर्षांपूर्वी मराठी विश्वकोशाचे काही खंड वाचायला मिळाले होते त्याची आठवण झाली. सर्वांना विचारांची देवाणघेवाण करता यावी या उद्देशाने ही बातमी येथे उतरवून थेवीत आहे.

सकाळातली मूळ बातमी : "मराठी विश्‍वकोश'पडणार "कोशा'तून बाहेर

पुणे, ता. १० - "मराठी विश्‍वकोश' ग्रंथालयांच्या काचेच्या कपाटातून बाहेर पडावा आणि विद्यार्थ्यांच्या हातात जावा, या उद्देशाने "महाराष्ट्र राज्य मराठी विश्‍वकोश निर्मिती मंडळा'तर्फे "विश्‍वकोश स्पर्धां'चे आयोजन सुरू झाले असून, स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड यांनी "सकाळ'ला ही माहिती दिली. या स्पर्धा महाराष्ट्रभर घेण्यात येणार आहेत. स्पर्धेची कल्पना अभिनव असून राज्यातील विविध ठिकाणांहून आणखी ६५ ठिकाणांची मागणी आल्याचे वाड यांनी सांगितले.

""विश्‍वकोश' म्हटले की वजनदार आणि रुक्ष मजकुराचा जाड ठोकळा, असे चित्र उभे राहते. ""विश्‍वकोशाचा उपयोग काय, तो कसा वापरायचा, याची माहितीच बहुतेकांना नसते. अनेक विद्वान पंडितांनी आपली आयुष्ये ज्या कार्यासाठी खर्ची घातली, त्यांच्या असाधारण योगदानाचा हा अपमान आहे. विश्‍वकोश फक्त "कोशा'त न राहता खऱ्या अर्थाने "विश्‍वा'त्मक व्हावा, या प्रेरणेने हा स्पर्धांचा उपक्रम सुरू केला आहे,'' असे डॉ. वाड यांनी स्पष्ट केले.

स्पर्धेचे स्वरूप सांगताना त्या म्हणाल्या, ""स्पर्धेसाठी शालेय (इयत्ता ९ वी आणि दहावी), कनिष्ठ महाविद्यालयीन (अकरावी आणि बारावी), महाविद्यालयीन गट (वरिष्ठ महाविद्यालय) करण्यात आले आहेत. गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीही वेगळे गट आहेत. गावागावांतील शाळांत जाऊन ही स्पर्धा कुठल्याही तयारीशिवाय घेतली जात आहे. स्पर्धक विद्यार्थ्यांचा गट करून त्यांना विश्‍वकोशाचा सतरावा खंड देऊन तो पाहायचा कसा, याची माहिती दिली जाते. त्यानंतर स्पर्धकांना आवडलेली त्यातली कुठलीही एक नोंद, स्वतःला का आवडली, याबद्दल सुमारे वीस ओळीत त्यांनी लेखन करणे अपेक्षित असते. मुले अतिशय उत्साहाने खंड हाताळतात, त्यातली माहिती शोधतात, वाचतात आणि ती आपल्या शब्दांत मांडतात, हे चित्र मला फार आशादायक वाटते.''

""विश्‍वकोश लोकप्रिय व्हावा यासाठी दर वीस स्पर्धांनंतर एकविसावी स्पर्धा दूरचित्रवाणीवाहिनीवर घेण्याचा मानस आहे. त्याला "विश्‍वकोशराज महास्पर्धा' अशी संज्ञा द्यावी, असे वाटते. सध्या मात्र मी विश्‍वकोशाच्या नव्या प्रतींच्या प्रतीक्षेत आहे. नव्या आठ हजार प्रतींची छपाई वेगाने सुरू आहे. या प्रती हातात येताच स्पर्धांची गती वाढेल,'' असे त्यांनी सांगितले.