ह्यासोबत
सफाईदार वळण घेऊन कार खंबाटकीच्या माथ्यावर आली तेव्हा आठ वाजले होते. पंकजाने सभोवार पाहिले. चंद्रोदय झाला होता. खोल दरीतले दृष्य विलोभनीय दिसत होते. वाईला पोहोचण्याची घाई नसती तर तिने नक्की त्या रूपेरी झळाळी ल्यालेल्या आसमंताचा आनंद घेतला असता. दुपारी अचानक मामांचा खुशाली विचारायला फोन येतो काय, ते सहज येण्याचे आमंत्रण देतात काय आणि आपण ताबडतोब ते स्वीकारतो काय! पंकजाला राहून राहून मौज वाटत होती.गेला आठवडा फारसा चांगला गेला नव्हता. आठवड्याची सुरूवातच मक्याशी कडाक्याच्या भांडणाने झाली होती. कारण नेहमीप्रमाणेच क्षुल्लक होते, पण ते त्या क्षणी मोठे वाटले होते. शब्दाने शब्द वाढत गेला आणि अबोला यावेळेस चांगला दोन दिवस टिकला. सोमवारीच बाजारही वधारला. "आता डिसेंबरपर्यंत फारसे आशादायक चित्र नाही" असे गुंतवणूक विषयक चॅनेलवर ऐकून तिने काही शेअर्स काढून टाकले होते आणि त्यांना अचानक सोन्याचा भाव आला होता. त्यामुळे ती पश्चात्तापदग्ध अवस्थेत असतानाच तिने कार्यालयात फिरवलेली काही चक्रे उलटी फिरली होती आणि तिला सावरून घेता घेता नाकी नऊ आले होते. या सगळ्यातून मोकळी होते तो बुधवारी काकूंना ताप आला होता! त्यामुळे तिला गृहकृत्यदक्षही व्हावे लागले होते. इतके दिवस 'घर आपोआप चालते' या तिच्या गैरसमजाला तडा गेला होता आणि दोन दिवस कसेबसे रेटून काकू बर्या झाल्यावर तिने सुटकेचा निश्वास टाकला होता. आजचा शुक्रवार ती येणार्या आठवडाअखेरीकडे नजर ठेवून ओढत असतानाच मामांचा दुपारी फोन आला होता. त्यांनी बहिणीच्या तब्येतीची चौकशी करायला फोन केला होता, पण बहीण खुटखुटीत होऊन नाटकाला गेली असल्याने त्यांचा संपर्क झाला नव्हता. मक्या टप्प्याबाहेर होता, त्यामुळे त्यांनी पंकजाच्या भ्रमणध्वनीवर फोन करून काकूंच्या तब्येतीची चौकशी केली होती.
मामा सार्वजनिक बांधकाम खात्यातून चार वर्षांपूर्वी निवृत्त होऊन वाईला पिढीजात वाड्यात सपत्नीक रहात होते. त्यांनी रहायला आल्यावर हळूहळू घर चकाचक करून घेतले होते. पंकजाला तिथे जाऊन रहायला आवडत असे, पण गेली दोन वर्षे तिला आणि मक्याला दोघांनाही तिकडे फिरकायला सवड झाली नव्हती. मामा, मामी दोघेही अगत्यशील होते आणि मक्या त्यांचा विशेष लाडका भाचा होता. त्यामुळे मामांनी नुसते फोनवर "काय मग केव्हा येणार वाईला?" असे विचारताच पंकजाने "आजच येते!" असे उत्तर देऊन त्यांना चकित केले होते. "साडेआठपर्यंत पोचते." असे म्हणून मामांना तपशील विचारायला सवड न देता तिने फोन बंद केला होता. शनिवारी काकूंची भिशी होती आणि मक्याला जर्मन पाहुण्यांना पुणेदर्शनाची ओढवून घेतलेली कामगिरी होती. त्याने तिलाही येण्याबद्दल विचारले होते पण मागच्या वेळेस ती त्यांच्याबरोबर पर्वतीदर्शनासाठी गेली असताना कोण्या परदेशीद्वेष्ट्या भुरट्याने जर्मन पाहुण्याचे मंदिराबाहेर काढून ठेवलेले बूट पळवले होते आणि अनावस्था प्रसंग ओढवला होता! ती आठवण मनात ताजी असल्याने तिने शनिवारच्या कार्यक्रमाला साफ नकार दिला होता, पण रविवारी गोल्फ खेळायला मात्र ती त्यांच्याबरोबर जाणार होती.
पंकजाला वाईला एकटीच जाऊन एक दिवस निवांतपणे घालवण्याची कल्पना एवढी आवडली होती, की त्या भरात तिने राहिलेले काम दुप्पट वेगाने करून साडेपाचलाच कार्यालय सोडले होते. घरी येऊन पोतडी भरून निघताना तिने सहजपणाने काकूंना एक दिवस वाईला जात असल्याचे व शनिवार रात्रीपर्यंत परत येत असल्याचे सांगितले होते. काकूंना हल्ली तिच्या बाबतीत कसलेच आश्चर्य वाटत नसे. ती कधीही घरी येऊन जाहीर करी की उद्या मलेशियाला आठ दिवसासाठी जायचे आहे, परवा चेन्नईला दोन दिवसासाठी जायचे आहे. काकू निमूटपणे तिला सामान आवरायला मदत करीत आणि परक्या मुलखात स्वतःची काळजी घेण्याबाबत आग्रहाने सांगत. तिचा पाय घरातून बाहेर पडला, की काकू आणि मक्या एकमेकांवर कोणी तिला जास्त लाडावून ठेवले आहे याबाबत दोषारोप करत. पण त्या दोघांनाही आपले फार कौतुक आहे हे ती जाणून होती. काकूंचा जन्म 'चुलीत' गेला असल्याने त्या तिचा जन्म चुलीत जाऊ न देण्याबाबत आग्रही होत्या. मक्याने चार वर्षांपूर्वी तिला जेव्हा लग्नाचे विचारले होते, तेव्हा तिने आपली महत्वाकांक्षा आणि त्याच्या करियरपुढे आपली करियर दुय्यम ठरू शकण्याची शक्यता अशी चर्चा करायला घेतली होती. दहा मिनिटे झाल्यावर मक्या गोंधळलेल्या चेहर्याने म्हणाला होता, "एवढा सगळा विचार मी केला नव्हता, पण तुला हसताना पहातो तेव्हा असं वाटतं की हे सुहास्य आपल्या जीवनात कायम फुलावं!" तिच्या अतिशय वस्तुनिष्ठ चर्चेला त्याने भावनिक कलाटणी दिली होती आणि त्याचे पर्यवसान लग्नात झाले होते. पण लग्नानंतर मक्याने तिला पूर्ण सहकार्य करून तक्रारीला जागा ठेवली नव्हती.
ती मामांकडे पोचली तेव्हा बरोबर साडेआठ झाले होते. मामींनी तिला दारात उभे करून तुकडा ओवाळून टाकला आणि उंबर्यावर पालथे घातलेले फुलपात्र त्या आत घेऊन गेल्या. ताजीतवानी होऊन तिने संपूर्ण घरातून चक्कर मारली आणि घराच्या नूतनीकरणाचे कौतुक केले. जेवणे होत असतानाच मक्याचा फोन आला. तो टप्प्याबाहेर असल्याने ती वाईला गेल्याचा निरोप त्याला घरी आल्यावरच मिळाला होता. त्याच्या आवाजात निराशा स्पष्ट जाणवत होती. आज त्याला झाल्या भांडणाबद्दल त्याच्या खास पद्धतीने दिलगिरी व्यक्त करायची होती. तिच्या मनात थोडी चलबिचल झाली, पण 'त्यासाठी उद्याची रात्र आहेच की!' असा विचार करून तिने मक्याला शनिवारी रात्री परत येण्याचे तोंड भरून आश्वासन दिले. मामा-मामींना लवकर झोपायची सवय असल्याने आणि पंकजाही चांगलीच थकलेली असल्याने रात्री साडेनऊलाच घर चिडीचूप झाले.
"अहो, तिला उठवू नका! झोपू दे, बिचारी दमते आठवडाभर..."
"अगं तिनेच मला सांगितले होते सकाळी माझ्याबरोबर फिरायला येणार आहे म्हणून!" कुजबूज ऐकून तिने डोळे किलकिले केले. बाहेर अजून अंधार होता, पण घरात लगबग सुरू झाली होती. मग तीही उठली आणि चहा घेऊन मामांबरोबर फिरायला बाहेर पडली. बाहेर पडताच मात्र मोकळी हवा, नीरव शांतता आणि हलकासा अंधार यांमुळे ती प्रसन्न झाली. मामांबरोबर गप्पा मारत ती पार पसरणीच्या घाटापर्यंत गेली. किंचित दुखणार्या पायांनी तिला जाणवून दिले की गेला महिनाभर ती फक्त ट्रेडमिलवर चालली होती! जिने चढून चौथ्या मजल्यावरच्या कार्यालयात जाण्याचा आपला निश्चय तिला आठवे, तेव्हा नेमकी ती लिफ्टमधे असे आणि लिफ्ट चालू झालेली असे!
"मामा, ट्वेंटी-ट्वेंटीच्या मॅचेस पाहिल्या का?" तिने पृच्छा केली आणि आपली चूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. मामा महाविद्यालयात असताना क्रिकेट खेळत असत आणि फक्त कसोटी क्रिकेट म्हणजेच अस्सल क्रिकेट असे त्यांचे मत होते. तिने इंग्लंडहून त्यांच्यासाठी एक क्रिकेटचा सचित्र मोठा ग्रंथ आणला होता, जो ते आल्यागेल्याला कौतुकाने दाखवत असत.मामांनी संबंधित लोकांना चार शेलक्या शिव्या देऊन त्यांची नापसंती व्यक्त केली, तेव्हा पंकजानेही क्रिकेटचा नाद त्या दिवसापुरता सोडायचे ठरवले. आजचा दिवस तिला पूर्ण आनंदात घालवायचा होता. ती भरभरून चांगुलपणा लुटणार होती आणि थोडा आनंद मक्यासाठी घेऊन जाणार होती. क्रिकेटचा बार फसल्यावर तिने राजकारणाचा विषय काढला. मामा खुलले. क्रमाक्रमाने वैश्विक राजकारण, देशी राजकारण, राज्यकारण, गावकीचे राजकारण आणि मग गल्लीतले राजकारण अशी उतरत्या भाजणीने राजकारणावर सकाळी सकाळी चर्चा करायला मिळाल्याने मामा खूष झाले. त्यात पंकजाची भूमिका फक्त श्रोत्याची होती हेही त्यांच्या लक्षात आले नाही. मामांना काकूंशिवाय दुसरे भावंड नसल्याने आणि त्यांची दोन्ही मुले परदेशी असल्याने घरगुती राजकारणाकडे मात्र त्यांची गाडी वळली नाही.
हातात वर्तमानपत्रांचा गट्ठा घेऊन ती घरात शिरली तेव्हा मामी अंगण झाडत होत्या. तिने त्यांच्या हातातली केरसुणी घेऊन अंगण झाडले, सडा टाकला. दारापाशी, तुळशीपाशी, देवापाशी रांगोळी काढून झाल्यावर तिने इकडेतिकडे पाहिले. आता फक्त दुपारी जेवताना ताटाभोवतीच रांगोळी काढता येईल हे लक्षात आल्यावर ती जरा खट्टू झाली. मागच्या वेळेस ती आली होती तेव्हा तिने हौसेने सोपा आणि माजघर सारवले होते, पण आता तिला चकचकीत टाईल्स वेडावून दाखवत होत्या. तिने परसात जाऊन उगाचच नळ असूनही वरून बंद केलेल्या विहीरीतून रहाटाने दोन बादल्या पाणी काढून फुलझाडांना घातले. फुले घेऊन ती घरात आली तो मामींनी पांढर्याशुभ्र वाफाळत्या इडल्या काढल्या होत्या. त्यांनी आज खास तिच्यासाठी नाश्त्याला इडली चटणीचा बेत केला होता, पण तिला वाटले आज त्यांनी आंबोळ्या, पातोळे किंवा सुरळीच्या वड्या केल्या असत्या तर जास्त बरे झाले असते!
"हे काय! सांबार नाही का करायचं! नुसती काय चटणी!" मामांनी नाराजी व्यक्त केली. "पाच मिनिटांत कर आता सांबार!" मामींना हुकूम गेलेला पाहून पंकजा चमकली, पण मामींनी बत्तीस वर्षे संसार केलेला असल्याने त्या शांत होत्या.
"अहो! असं झटपट नाही करता येत सांबार...डाळ शिजायला लागते, भाज्या चिरायला लागतात, चिंच भिजत टाकावी लागते..." मामींनी सांबार मिळणार नाही असे निक्षून सांगितल्यावर मामांचा नाईलाज झाला.
"मामा, तुमची डाळ काही शिजली नाही बरे का!" पंकजाने मामांना चिडवले आणि स्वत:च्या कोटीवर ती बेहद्द खूष झाली. आणखी एखादी त्यावर कळस चढवणारी कोटी सुचावी म्हणून तिने खूप विचार केला. शालेय क्रमिक पाठ्यपुस्तकांमधे गेलेले सगळे वाक्प्रचार आणि म्हणी तिने आठवून पाहिल्या, पण काही जमले नाही. शेवटी 'मराठी वाचन जरा वाढवले पाहिजे' असे म्हणत ती आंघोळीला गेली.
आंघोळीहून येताच तिने जाहीर करून टाकले की आज दुपारी ती पिठले भाकरी करणार आहे. त्याला वेळ होता म्हणून ती मामींबरोबर कृष्णेच्या घाटावर गेली. घाटावर चार चकरा मारून त्या दोघी पाण्यात पाय बुडवून पायरीवर बसल्या. पलीकडे काही बायका, एखादा पुरूषही नदीत कपडे धुवत होता. काही अंतरावर नदीच्या पात्रातून वा़ळू खणून काढून गाढवांवर लादून नेण्याचे काम चालले होते. सहापैकी चार गाढवे आज्ञाधारक होती ती वाळू घेऊन मुकाट चालू लागली. एक आडमुठे होते ते मालकाच्या चार छपाट्या खाऊन चालू लागले. एक वेंधळे होते ते पाय घसरून पाण्यात पडले आणि त्याच्या पाठीवरची वा़ळू वाहून गेली. डोक्यावरून कलकलाट करीत पोपटांचा एक थवा नदीपलीकडे असलेल्या डेरेदार वृक्षावर जाऊन विसावला. खूप दिवसांनी तिने पिंजर्याबाहेर उडणारा पोपट पाहिला होता. 'आज आपणही आपल्या दैनंदिन पिंजर्याबाहेर आहोत!' ती विचाराने सुखावली. घाटावरील देवळांमधे अस्पष्ट मंत्रोच्चार ऐकू येत होता. एक शर्ट पँट घातलेला, कपाळाला गंध लावलेला माणूस मारूतीभोवती प्रदक्षिणा घालत होता. त्याच्या भाबड्या भक्तिभावाकडे तिने काही क्षण नवलाने पाहिले. साधे लोक, साधी दिनचर्या, साधे राहणीमान! तिला ते सगळे मनात साठवून ठेवावेसे वाटले. तिचे मन सैलावले. नेहमी योग्य वेळी, योग्य तेवढेच आणि योग्य तेच बोलणार्या तिच्या दक्ष मनाला तिने आज सुट्टी द्यायचे ठरवले.
"पुढच्या वर्षी आम्ही 'चान्स' घेऊ मामी! लग्नाला पाच वर्षे होतील ना...फार उशीर करूनही उपयोग नाही. मला मुलगी झालेली जास्त आवडेल. मी जे जे करू शकले नाही, त्या सगळ्या संधी मी तिला उपलब्ध करून देईन!" ती म्हणाली. मामींनी समजल्यासारखी मान डोलावली.
"मीनाताई आणि मी बरोबरीच्या! सहा महिन्यांच्या अंतराने आमची लग्ने झाली. पण त्यांना पहिला मकरंद झाला आणि मला तीनच महिन्यांनी शुभा झाली. एवढी सोन्यासारखी मुलगी, पण पहिले दोन महिने तिला पहायलाही इकडचे कोणी आले नाही!" मामींनी डोळ्याला पदर लावला. पंकजाला हा इतिहास नवीन होता. तिला मनापासून वाईट वाटले.
"मला तर मुलगीच पाहिजे बाबा! उगाच उतारवयात सुनेशी वगैरे कुठे पटवून घ्यायचे!" हे शब्द आपल्याच तोंडातून निघाले हे समजल्यावर पंकजाला धक्काच बसला. आपल्या या बाह्यरूपात एक तद्दन बायकी मन दडलेले आहे की काय! मग आपण तसे नाही हे सिद्ध करायचा सतत प्रयत्न का करत असतो! सरळ ते स्वीकारायचे आणि मोकळे व्हायचे!
आणखी थोडावे़ळ सुखदु:खाच्या गोष्टी करून मामी घरी जायला निघाल्या. तीरावरल्या सुखदु:खाची जाणीव नसलेली कृष्णामाई संथ वाहतच होती. पंकजाला दहा मिनिटे अजून तिथेच बसावेसे वाटले. इकडेतिकडे पहात असताना मघाशी कपडे धुणार्या बायकांपैकी एकजण डोक्यावर धुतलेल्या कपडयांचे पिळे आणि हातात भरलेली पाण्याची बादली अशी घाटाच्या पायर्या चढताना दिसली. तिच्या हातातले पाणी हिंदकळून निम्मे पायर्यांवर सांडत होते. पंकजाला सकाळचा आपला 'चांगुलपणा वाटण्याचा' केलेला निश्चय आठवला आणि तिने पुढे होऊन तिच्या हातातली पाण्याची बादली घेतली.
"कोण हो तुम्ही? नवीन दिसता!" त्या बाईने विचारले.
"मी देशपांड्यांकडे आले आहे. त्यांच्या नणंदेची सून!"
"हो का? आम्ही देशपांड्यांच्या शेजारच्या वाड्यातच रहातो... जाधव!"
"चला मग मी घरापर्यंतच येते तुमच्याबरोबर!" पंकजाने घरापर्यंत बादली नेऊन देताच जाधवबाईंनी तिला चहा घेऊन जाण्याचा आग्रह केला. त्यांचे घर छोटेखानी पण टापटीप होते. सगळ्या वस्तू जागच्याजागी आणि चमकणारी भांड्यांची रास! त्यांचा मुलगा गणिताचा अभ्यास करत होता. त्याला एक गणित अडले होते, ते पंकजाने सोडवून दिले. जाधवबाईंची मुलगी घासघासून भांडी चमकवत होती. तिला पंकजाने सहज विचारले, "काय गं, तुला नाही का अभ्यास? ते सोडून हे काय करत बसलीस?" मुलीने चमकून आईकडे पाहिले. जाधवबाईंच्या कपाळावर पडलेल्या हलक्या आठीकडे लक्ष जाताच पंकजाला आपण भलत्याच ठिकाणी समाजप्रबोधन करत आहोत याची लख्ख जाणीव झाली. नको नको, आजच्या 'चांगुलपणा वाटण्याच्या' कार्यक्रमाला असे गालबोट लागायला नको! तिने विषय बदलून घरातील टापटिपीचे कौतुक केले तेव्हा जाधवबाईंच्या कपाळावरील आठी अदृष्य झाली.
घरी येताच तिने स्वयंपाकघराचा ताबाच घेतला. तव्यातले खमंग पिठले, चुलीवरच्या खरपूस भाकरी करून तिने लसणीची चटणी आवर्जून खलबत्त्यात कुटली आणि कांदा बुक्कीने फोडला. तोवर मामींनी आणखी दोनतीन पदार्थ केले आणि हसतखेळत जेवणे पार पडली. मागचे आवरून दोघी बाहेर आल्या तो मामांनी जुने फोटोचे आल्बम काढले होते. "हा बघ तुझा नवरा!" त्यांनी दाखवलेल्या फोटोकडे पहाताच तिला हसू आवरेना. कोर्या झबल्यात मक्याचे बाळसेदार ध्यान मामाच्या मांडीवर बसून उष्टावण करून घेत होते. त्याचे गोंडस तोंड श्रीखंडाने माखले होते. ती ते लोभस रूपडे डोळ्यात साठवून घेऊ लागली आणि तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. आत्ता या क्षणी मक्या जवळ पाहिजे असे तिला प्रकर्षाने वाटले. तिने इतर फोटो चाळत हळूच डोळ्यातले पाणी पुसून टाकले.
थोडी वामकुक्षी झाल्यावर ती मामांबरोबर मेणवलीचा नाना फडणविसांचा वाडा, धोम धरण वगैरे पाहून आली. आल्यावर चहा घेऊन ती मामींबरोबर गणपतीच्या देवळात गेली. जाताना आवर्जून साडी, कुंकू, बांगड्या वगैरे जामानिमा करून गेल्यामुळे मामींनी आवर्जून तिची चार बायकांशी ओळख करून दिली. त्यांच्या सगळ्या प्रश्नांना तिने न कुरकुरता उत्तरे दिली. तिला आपल्या अद्ययावत गृहसंकुलातल्या अद्ययावत शेजारणी आठवल्या. सुरुवातीला तिचे काम आणि तिचे दौरे यावरून बर्याच जणींचे गैरसमज झाले होते. एकीने तिला पार्किंगमधे गाठून " 'बीपीओ'च्या क्षेत्रात सहकार्यांशी खूपच 'सलोख्याचे संबंध' असतात का" असे तिला विचारले होते. तिच्या डोळ्यांतली वेगळीच चमक पाहून तिला काय म्हणायचे आहे ते पंकजाच्या लक्षात आले होते आणि तिला धक्काच बसला होता. वैतागून तिने आपण त्या क्षेत्रात काम करत नसल्याने काही कल्पना नाही असे मोघम उत्तर देऊन पळ काढला होता! दुसर्या एका शेजीबाईने पंकजा घाईघाईत जिना उतरत असताना आपला 'मेनिक्युअर्ड' हात मधे घालून तिला अडवले होते आणि पॅरिसहून एका प्रसिद्ध फॅशन हाऊसचे सेंट आणायला जमेल का अशी विचारणा केली होती. हे ती आपल्याला का विचारत आहे, पॅरिसचा आणि आपला काय संबंध हे पंकजाच्या मनातले प्रश्न तिच्या पुढच्या बोलण्याने दूर झाले होते. शेजीबाई तिला चक्क 'हवाई छबकडी' समजली होती. वैतागून पंकजाने सगळ्या शेजारणींचा नाद सोडून दिला होता आणि 'शिष्ठ' अशी उपाधी मिळवली होती. नाही म्हणायला ती काकूंच्या भजनी मंडळातल्या बायकांची आवर्जून चौकशी करत असे, पण ती घरी येईतो त्या बायका बहुतेक आपापल्या घरी गेलेल्या असत.
ती मामींबरोबर घरी आली तेव्हा पावणेसात झाले होते. मामींनी सांजवात केली. मामांकडे कोणीतरी आले होते आणि त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. तिने कपडे बदलून तिची पोतडी भरली. "निघते मी मामी!" तिने मामींना सांगितले. "अगं जेवून जा म्हटलं असतं पण उशीर होईल ना! एकटी गाडी चालवत जाणार...का उद्या सकाळी निघतेस लवकर?" पण पंकजाला आता परतीची ओढ लागली होती. तिने मान हलवत निघण्याची तयारी केली. मामा मामी वाड्याच्या दारापर्यंत आले. "जपून जा गं...पोचल्याबरोबर फोन कर!" मामा म्हणाले. सकाळपासूनचा निवांतपणा, मोकळेपणा... पंकजाला एकदम गलबलून आले. किती प्रेमळ, साधी माणसे आहेत ही! आपणही निवृत्त झाल्यावर अशाच साध्याशा ठिकाणी येऊन रहायचे असे तिने मनोमन ठरवून टाकले. पण त्यासाठी बरीच वाट पहावी लागणार होती. मामा-मामीना नमस्कार करून तिने गाडी काढली. एक वळण घेईतो तिला पुण्याची चक्क आठवण येऊ लागली. तिथली प्रदूषित हवा, धावपळ, गोंगाट सगळे आपण मिस करतो आहोत असे तिला वाटू लागले. मक्या आता घरी आला असेल आणि तिची वाट पहात असेल....एका नव्या ओढीने ती पुण्याचा मार्ग आक्रमू लागली.