गंधआसक्त - १

टीप: मनोगत दिवाळी अंकासाठी पाठवलेली ही कथा परत आल्यामुळे येथेच वाचकांसाठी देत आहे.

मी सुश्रुतला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा एखाद्या केसाळ अस्वलाला पाहतो आहोत असं मला वाटलं होतं.

तीन
वर्षापूर्वी एका बाईबरोबर सुट्टी घालवायला मी पॅरिसला गेलो होतो. तिथं
हॉटेलबाहेरच्या हिरवळीवर निवांत बसलो असताना एक सावळा दिसणारा माणूस
माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला,
"नमोनम:, मी सुश्रुत."
"नमस्कार, मी हृदयनाथ", मी म्हणालो.

एखाद्या
शिंगे नसलेल्या पण किंचित फुगीर कानशिले असलेल्या केसाळ बोकडाच्या
नाकातूनही जर काही केस डोकावू लागले तर तो सुश्रुतसारखा वाटला असता. फक्त
सुश्रुतच्या हनुवटीवर थोडे अधिक केस होते.
"खरे म्हणजे मी बराच वेळ
तुम्हालाच शोधत होतो.", असं म्हणून सुश्रुत अगदी माझ्या समोर येऊन उभा
राहिला आणि त्याने बोलायला सुरुवात केली. सुश्रुत अतिशय उत्तम वक्ता आहे
हे थोड्या वेळातच माझ्या ध्यानात आलं. ऐकणार्‍याला अगदी संमोहित करण्याची
कला त्याला अवगत होती. आपली केसाळ बोटं एखाद्या नर्तकीप्रमाणे नाचवत,
हावभाव करत त्याच्या तोंडून अस्खलित भाषेत शब्दांची आतिषबाजी होत होती.
सुश्रुतला अजिबात ओळखत नसूनदेखील त्याची आगंतुक उपस्थिती मला खटकेनाशी
झाली.

सुश्रुत पॅरिसमध्ये एका अत्तरे, सुगंधी द्रव्ये बनवणार्‍या
कंपनीत कामाला होता. तो स्वत:ला "विद्यापीठाचा पदवीप्राप्त
रसायनशास्त्रज्ञ" म्हणवून घेत असला तरी तो तिथला एक साधारण सुपरवायझर होता
हे त्याच्या व्हिजिटिंग कार्डावरून सहज लक्षात आलं.

"खरे म्हणजे मी एक उत्तम सुगंधतज्ज्ञ आहे. भारतात या कलेची कदर होत नसल्यामुळे इकडे यावे लागले.", सुश्रुत म्हणाला.
"म्हणजे? वेगवेगळ्या वासांची तुला माहिती आहे?", मी.
"नो
नो नो, कोणताही वास नाही. फक्त सुगंध! कोणत्याही प्रकारच्या सुवासाबद्दल
मला जितके ज्ञान आहे तितके जगात क्वचितच कोणाला असेल. मी कोणत्याही
प्रकारचा गंध तयार करू शकतो. "
अशा अतिशयोक्तिपूर्ण दर्पोक्तीची मला अतिशय किळस येते. पण मी काही बोलण्यापूर्वीच सुश्रुतच्या शब्दांची आतिषबाजी सुरु झाली.

आपल्या तर्जनीचे टोक केसाळ नाकावर ठेवून "बघा, एखाद्या सामान्य नाकाप्रमाणेच वाटते की नाही?" सुश्रुतनं विचारलं.
त्याच्या
नाकाच्या आसपास असलेले केस विंचरायला त्याला माशांच्या हाडांपासून बनवलेला
एखादा स्वतंत्र कंगवा लागत असावा याकडे दुर्लक्ष करून त्याच्या नाकाबद्दल
काहीही वेगळं वाटत नाही हा अभिप्राय मी नोंदवल्याबरोबर "पण हे सामान्य
दिसणारे विशिष्ट इंद्रिय जबरदस्त संवेदी आहे. ओन्ली ट्वाईस, केवळ दोनदा
हुंगून रॉकेलच्या गॅलनमध्ये कापराची वडी पडलेली आहे हे मी ओळखू शकतो.
आयफेल टॉवरजवळच्या पर्यटकांच्या गर्दीतील काळ्या रंगाचे कपडे घातलेल्या
त्या तरुणीच्या अत्तराचा वास मला ३०० फूट अंतरावरही स्पष्ट जाणवतो." ,
सुश्रुतने समोर आयफेल टॉवरच्या दिशेने बोट केले. माझं लक्ष पुन्हा
त्याच्या केसाळ हाताकडे गेलं.

पुढे त्याने त्याच्या कंपनीने बनवलेल्या दोन प्रसिद्ध अत्तरांची नावे सांगून या अत्तरांचा फॉर्म्युला आपणच बनवल्याचा दावा केला.
"आणि त्या हरामखोर बाईने ही अत्तरे विकून २० बंगले बांधले आणि १० जणांशी लग्न केले. ", सुश्रुत म्हणाला.
"कोण बाई?"
"आमच्या कंपनीची मालकीण."
"आणि तुला काहीही फायदा मिळाला नाही?"
"कसा
मिळणार, मी केवळ एक गरीब पगारी नोकर आहे हो." एखाद्या कुत्र्याप्रमाणे
लाचारी चेहर्‍यावर आणण्याचा अभिनय करत सुश्रुतने आपले हात पसरले आणि खांदे
अगदी वर आपल्या कानांच्या केसाळ पाळ्यांपर्यंत आणले. खांदे खाली करून तो
पुढे म्हणाला, "पण माझे एक भव्य आणि महान स्वप्न आहे. पण त्या
स्वप्नपूर्तीसाठी मला दूरदृष्टी असलेल्या एका श्रीमंत माणसाच्या मदतीची
आवश्यकता आहे."

हम्म. अशी गोष्ट आहे तर. आता कुठे सुश्रुतची भामटेगिरी स्पष्ट होत होती. या महाशयांना माझ्याकडून आर्थिक मदतीची आवश्यकता होती.
"पण तुझे कौशल्य पाहता तुला कोणीही श्रीमंत माणूस सहज मदत करू शकेल." मी अंग झटकण्याचा प्रयत्न केला.
"कोणत्याही
ऐर्‍या गैर्‍या श्रीमंत माणसाच्या मदतीचा मला कवडीचाही फायदा होणार नाही.
श्रीमंत असण्याबरोबरच वैचित्र्याचे थोडे आकर्षण असलेली व्यक्ती मला हवी
आहे."
सुश्रुत काय बोलतोय मला नीट कळलं नव्हतं. थोडंसं खोदून विचारावं
म्हणून मी म्हटलं, "तुझं स्वप्न आहे तरी काय? स्वत:ची कंपनी सुरु करून
अत्तरं बनवणे?"

"छे... माझ्या दृष्टीने या अत्तरांना
सांडपाण्याच्या घाणेरड्या पाण्याइतकंच महत्त्व आहे. ही असली अत्तरे काय
कोणीही बनवेल. मला ते अत्तर बनवायचं आहे जे अद्याप कोणी बनवलेले नाही. जे
बनवल्यावर जगावर राज्य करणे मला शक्य होईल. "
सुश्रुतच्या केसाळ
पापण्यांआड झाकल्या गेलेल्या डोळ्यांमध्ये कुठे वेडाची झाक दिसते की काय
हे पाहण्याकरता मी जरा त्याला निरखून पाहू लागलो. तर

तो एकदम नॉर्मल होऊन म्हणाला,
"साहेब,
मी विनोद वगैरे करीत नाहीये. तुम्हाला थोडा वेळ असेल तर मी काय करणार आहे
हे जरा निवांत बसून स्पष्ट करून सांगतो. मी बसलो तर चालेल ना? काय आहे
मागच्या वर्षी हृदयविकाराचा एक लहानसा झटका आल्यामुळे मला थोडी काळजी घेणे
आवश्यक आहे. तसा फारसा धोका नाही."

सावकाश पुढे येत सुश्रुत माझ्या बाजूला बसला. त्याचा केसाळ स्पर्श होऊ नये म्हणून मी थोडेसे अंग सावरुन घेतले.
"तुम्हाला
माझ्या अत्तराबद्दल सांगण्यापूर्वी थोडी इतर माहिती देणे आवश्यक आहे.
कदाचित किचकट तांत्रिक बाबी तुम्हाला समजणार नाहीत पण एकंदर अत्तराबद्दल
थोडा अंदाज तर येईल. " आपला हात स्वत:च्या मांडीवर ठेवून सुश्रुत म्हणाला.
तो हात एखाद्या केसाळ उंदरासारखा दिसत होता.

सुश्रुतने बोलणं सुरु केलं.
"कुत्र्याचे
उदाहरण तुम्हाला परिचित असेल. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कुत्र्यांच्या
लैंगिक इच्छा खूपच तीव्र झालेल्या असतात. कुत्रीशी संबंध ठेवण्याचा
एकमात्र विचार डोक्यामध्ये घेऊन कुत्रा आपली जीभ लोंबत ठेवून इतस्ततः:
हिंडत असतो. आणि जर त्याला वेळीच आवरून धरले नाही तर त्याची इच्छा पूर्ण
केल्याशिवाय तो राहत नाही. कुत्र्याच्या या वागण्यामागचे कारण काय आहे
याबद्दल तुम्ही कधी विचार केलाय?
"गंध?"

सुश्रुतलाही हेच उत्तर अपेक्षित असावे. केसाळ चेहर्‍याआडचे स्मित मला दिसले.
"अगदी
बरोबर. कुत्रीपासून सुरु होणारे विशिष्ट आकाराचे गंधरेणू कुत्र्याच्या
नासिकापोकळीत प्रवेश करतात आणि गंधसंवेदनेचे मज्जातंतू - नर्व्हज -
उद्दीपित होतात. या मज्जातंतूमार्फत हा इशारा मेंदूपर्यंत पोचवला जातो.
मेंदूमधील विशिष्ट पेशी या गंधाचे विश्लेषण करून लैंगिक इच्छेवर नियंत्रण
ठेवणार्‍या पेशींकडे संदेश पाठवतात. एकूण काय तर कुत्र्याच्या
गंधसंवेदनेचा मज्जातंतू जर आपण नष्ट केला तर कुत्र्याला आयुष्यात केव्हाही
लैंगिक इच्छा निर्माण होणार नाहीत. हीच गोष्ट अनेक सस्तन प्राण्यांसाठीही
सत्य आहे. मात्र तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की मानवी लैंगिक इच्छा या
गंधसंवेदनेवर अवलंबून नसतात. दृष्टी आणि स्पर्श संवेदनांसोबत माणसाच्या
अचाट कल्पनाशक्तीचे - फॅन्टसीचे- मानवी वासनेवर नियंत्रण असते.
गंधसंवेदनेचे नाही!"

"मग काही दुकानांत विकत मिळणार्‍या त्या विशिष्ट अत्तरांचे काय?" मी कशाबद्दल विचारणार आहे हे जणू सुश्रुतला आधीच कळले असावे.
"छे
छे. लहान सुबक कुप्यांमध्ये विकली जाणारी मदनकामेश्वर, वाजीकरणेंद्र,
रतिप्रीतीकारिणी अशा विनोदी नावांच्या ह्या भयंकर महागड्या अत्तरांचा
मानवी वासनेवर काहीही परिणाम होत नाही. सुगंधनिर्मिती ही निदान मानवासाठी
तरी वैषयिक गोष्टींसाठी कधीच झाली नव्हती. प्राचीन काळामध्ये स्त्रिया
दुर्गंध लपवण्यासाठी सुगंधाचा वापर करत. आता केवळ स्वत:चा अहंकार
कुरवाळण्यासाठी सौगंध्याचा वापर होतो. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही;
पण पुरुषांना तर स्त्रियांच्या अंगावर तरंगणार्‍या सुगंधाची अशी वेगळी
जाणीवही होत नाही. समुद्रावरुन येणार्‍या खार्‍या वार्‍याचा ताजा गंध,
आवडती सिगारेट पेटवल्यावर चित्तवृत्ती प्रफुल्लित करणारा तंबाखूचा वास,
घराबाहेरच्या बागेला पाणी घातल्यावर येणारा मातीचा दरवळ हे कधीही कुपीतील
कृत्रिम सुगंधापेक्षा तुम्हाला प्रिय असतील. आजकाल बनवली जाणारी सर्व
अत्तरे ही रसायनशास्त्राची कमाल आहे. तुमचा तो कस्तुरीमृग काळा की गोरा
हेही मला माहिती नाही. पण एथिलिन सेबाकेट वापरलं की त्या हरिणीलाही मी
तयार केलेल्या गंधामध्ये उणीव शोधता येणार नाही! फेनाईल ऍसेटिक ऍसिड,
बेन्झल्डिहाईड असल्या रसायनांचा वापर करून बदामापासून ते जास्वंदापर्यंत
आणि कण्हेरीपासून लवंगांपर्यंत जो हवा तो गंध निर्माण करता येणे हा माझ्या
डाव्या हाताचा मळ आहे."

माझं लक्ष त्याच्या केसाळ डाव्या हाताकडे
पुन्हा गेलं. एवढा वेळ बोलल्यामुळे त्याला थोडी धाप लागली होती. त्याच्या
नाकपुड्यांच्या आसपास ओलसरपणाही दिसू लागला होता. खिशातून हातरुमाल काढून
चेहरा पुसण्याच्या निमित्ताने त्याने नाक स्वच्छ करून घेतले.

"आता
तुमच्या लक्षात आलंच असेल की माझी महत्त्वाकांक्षा काय आहे ते. तुम्ही
तेवढे चतुर नक्कीच आहात. कुत्रीच्या विशिष्ट गंधाचा कुत्र्यावर जो परिणाम
होतो तसाच परिणाम मानवावर करणारा गंध मला निर्माण करायचा आहे. बस्स एकदा
तो परिमळ मानवाच्या आजूबाजूच्या हवेत दरवळला की मनुष्यप्राणी हे अभिधान
सार्थ करत आपल्या सर्व वस्त्रप्रावरणांचा त्याग करून दृष्टीस पडेल त्या
स्त्रीशी संग करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी अगदी काहीही करण्यास तो
तयार झाला पाहिजे."

(क्रमश:)

हीच कथा येथेही वाचता येईल.