गंधआसक्त - ४

"आता पुढे काय करायचं?" मी विचारलं
"सर्वात
आधी मला आता प्रयोगाची निरीक्षणे आणि अत्तर तयार करण्याच्या कृतीची
रासायनिक सूत्रांसह नोंद करायची आहे. अत्तर तयार करण्याची पद्धत
माझ्याशिवाय कोणालाही - अगदी संपुनीतेलाही - ठाऊक नाही. आतापर्यंतच्या
सगळ्या चाचण्यांची आणि सूत्रांची नोंद मी मुद्दामच सांकेतिक भाषेत केली
आहे. सर्वप्रथम शास्त्रीय भाषेत सर्व लिहून काढण्याचे काम सुरु करतो. ते
पूर्ण झाल्यावर थोडी विश्रांती घेईन. पण आपला शोध मोठा क्रांतिकारी आहे.
आपण काय काय करू शकतो याचा विचार केलाय का तुम्ही? अगदी मोठी दंगल
थांबवणेही आपल्याला शक्य होईल. फक्त त्या जमावावर हे अत्तर फवारायचे.
शिवाय श्रीमंत स्त्रियांना हे अत्तर विकून आपण थोडी मायाही गोळा करू
शकतो." सुश्रुतने मला डोळा मारला.

त्याच वेळी एक भन्नाट आयडिया
माझ्या डोक्यात आली. मी एक बांधकाम व्यावसायिक आहे हे तुम्हाला आधी
सांगितलेच आहे. त्यामुळे माझी इच्छा नसतानाही माझा संबंध राजकारण्यांशी
येतो. त्यावेळी पुण्यामध्ये एका खासदार महाशयांनी राजकारणात थैमान घातले
होते. केवळ राजकारणच नव्हे तर म्हातारीची बोरे खाणार्‍या गोष्टीतील
कोल्ह्याप्रमाणे "चेअरमन" या नावाने ओळखल्या जाणार्‍या या दाढीबाबांनी
गणेशोत्सव, मॅरेथॉन स्पर्धा, रक्तदान शिबिरे, क्रीडा स्पर्धा या सर्व
ठिकाणी आपले बूड पुसून ठेवले होते. या सर्व कामांसाठी आवश्यक असणारा
"निधी" उभारण्यासाठी आम्हा व्यावसायिकांवर केवळ जुलमी सक्ती झाली असती तर
सर्व काही ठीक होते. मात्र आता बांधकाम प्रकल्पांमध्येही लुडबुड करण्यास
त्यांनी सुरुवात केली होती. त्यांना धडा शिकवण्याची नामी संधी मला आता
मिळू शकत होती. मी सुश्रुतला विचारले, "प्रयोगशाळेत आणखी किती अत्तर
शिल्लक आहे?"
"साधारण १० मिली."
"आणि एका वेळी आपण किती अत्तर वापरतो?"
"१ मिली. आता आपण तेवढेच वापरले प्रयोगासाठी."
"ठीक आहे. मग तू मला १ मिली अत्तर काढून वेगळे दे. मला ते घरी हवे आहे."
"थोडा धीर धरा. प्रयोगाच्या या अवस्थेत त्या द्रावाशी खेळणे खूप धोकादायक आहे. "
"सुश्रुत, आपला करार विसरू नकोस. जे काही प्रयोगातून मिळेल त्यात अर्धा हिस्सा माझा आहे."
थोड्या वादावादीनंतर सुश्रुत मला १ मिली अत्तर द्यायला तयार झाला.
"पण काळजी घ्या. या अत्तराचा शोध ही या शतकातली खूप मोठी घटना आहे. तिला आदराने वागवणे तुमचे कर्तव्य आहे."

सुश्रुतच्या
प्रयोगशाळेतून मी थेट एका मित्राच्या घरी गेलो. तो औषधे आणि वैद्यकीय
उपकरणे बनवणार्‍या कंपनीत कामाला होता. शस्त्रक्रियांसाठी व कृत्रिम
रोपणासाठी आवश्यक असे हृदयातील कृत्रिम पडदे, नाडीचे ठोके कमीजास्त
करणार्‍या वस्तू तो बनवत असे.
"तू मला बरोबर १ मिली द्रव बसेल एवढी
कॅप्सूल बनवून दे. ", मी म्हणालो. "शिवाय त्या कॅप्सूलला एक छोटासा टाईमर
बसवायचा आहे जो आपोआप त्या कॅप्सूलला उघडेल आणि कॅप्सूलमधला द्रव बाहेर
येईल. ही कॅप्सूल अर्ध्या इंचापेक्षा जास्त लांब नको. शिवाय त्या
कॅप्सूलमध्ये द्रव भरणे आणि टाईमर लावणे या गोष्टी मला सहजपणे करता यायला
हव्यात. तुला हे जमेल ना?"

दोनच दिवसांनी मित्राने मला ती कॅप्सूल
बनवून दिली. पण त्याच दिवशी अतिशय दुर्दैवी घटना घडली. त्या वासनापिसाट
संपुनीतेने प्रयोगशाळेतले सगळे अत्तर स्वत:च्या अंगावर ओतून घेतले.
सुश्रुत त्यावेळी प्रयोगशाळेतच त्याच्या नोंदींची तयारी करत होता.
अत्तराच्या प्रयोगाच्या नोंदी त्याने सुरुही केल्या नव्हत्या. तिथे काय
झाले हे सगळे सांगायची गरज नाही. पण कमकुवत हदयाच्या सुश्रुतचा त्या
प्रसंगातच अंत झाला. अत्तराच्या सूत्रांची कसलीही नोंद न करता सुश्रुत
कायमचा निघून गेला होता. माझे सर्व पैसे वाया गेल्याने मला वाईट वाटले. पण
माझ्याकडे १ मिली अत्तर अजूनही शिल्लक राहिलेले होते.

कॅप्सूलमध्ये
मी ते अत्तर भरून ठेवले आणि योग्य संधीची वाट पाहत बसलो. मला हवी असलेली
संधी लवकरच आली. पुण्याच्या क्रीडांगणांमध्ये सुधारणा करण्यासाठी चेअरमन
महाशय काही परदेशांच्या अभ्यासदौर्‍यावर जाणार होते. त्यानिमित्त आज
संध्याकाळी त्यांचा सत्कार करण्याचे ठरले होते. पेज थ्री पार्ट्यांमध्ये
नेहमी वावरणार्‍या पायल नावाच्या एका अर्धवस्त्रांकिता उठवळ अभिनेत्रीच्या
हस्ते हा सत्कार होणार होता. अशा प्रकारच्या पार्ट्यांमध्ये माझा
व्यावसायिक कारणांसाठी सहभाग असला तरी ती अभिनेत्री मला ओळखत नव्हती हे
फार चांगले होते. माझी योजना जर यशस्वी झाली तर वृत्तपत्रांमध्ये दुसर्‍या
दिवशी कशा प्रकारच्या बातम्या येतील याचा अंदाज मी बांधू लागलो.

पुण्याच्या भरजरी वस्त्रांची लक्तरे वेशीवर - सकाळ
चेअरमनचे पुण्यात लिंगथैमान - सामना
चेअरमनरूपी बांडगुळे आणि सोनियांचा वटवृक्ष - लोकसत्ता
'CHAIRMAN' INAUGURATES BLUE TV IN PUNE - The Indian Express
CHAIRMAN MAKES PUNEKARS VOYEURISTIC= The Times of India

प्रथेप्रमाणे
हा सत्कार केवळ निमंत्रितांच्या उपस्थितीत पुण्यातील ब्ल्यू डायमंड
हॉटेलमध्ये होणार होता. मी ताबडतोब सत्काराच्या ठिकाणी पोचलो. सत्कार सुरू
व्हायला अद्याप बराच वेळ होता. हॉटेलच्या बाहेर असणार्‍या एका
गुच्छवाल्याकडून मी फुलांचा एक गुच्छ घेतला आणि हॉटेलच्या स्वागतकक्षात
पोचलो.
"मला पायलजींना भेटायचे आहे. चेअरमनसाहेबांकडून भेट आलेला हा बुके त्यांना देणे आवश्यक आहे." मी स्वागतिकेला म्हणालो.

"ठीक
आहे. तुम्ही तो इथे ठेवा. मी आमच्या सेवकामार्फत तो त्यांच्या खोलीपर्यंत
पोचवण्याची व्यवस्था करते." आपल्या दंतमंजनाची जाहिरात करत स्वागतिकेने हे
शब्द उच्चारले.
"चेअरमन साहेबांनी हा बुके मला स्वत: देण्यास सांगितला आहे." मी म्हणालो.
चेअरमनसाहेबांचा
वट अशा हॉटेलांमध्ये अर्थातच असल्यामुळे मला काही अडचण आली नाही. पायलजी
५०१ क्रमांकाच्या खोलीमध्ये तयारी करत थांबल्या होत्या. तेथे जाऊन मी दार
ठोठावले. स्वत: पायलनेच दार उघडले.
"येस? हू आर यू? आय डोन्ट हॅव मच टाईम!", पायल.
"गुड आफ्टरनून मॅम. चेअरमनजी हॅज ऑर्डर्ड मी टु डिलिव्हर धिस टु यू इन पर्सन"
चेअरमनचे नाव ऐकताच ती मेणाप्रमाणे पाघळली. "हाऊ गॉर्जिअस ऑफ हिम." मी तिच्या हातामध्ये तो कागदात गुंडाळलेला पुष्पगुच्छ दिला.

"चेअरमनसाहेबांनी तुम्हाला त्या गुच्छाचे आवरण एकदा उघडून पाहण्यास सांगितले आहे." मी.
"सो स्वीट. हे आवरण तुमच्यासमोरच उघडणे आवश्यक आहे का?" पायल.
"माझी काही हरकत नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तो उघडून पाहा आणि चेअरमनसाहेबांना काही निरोप द्यायचा असेल तर तेही सांगा."
तिने
ते आवरण उघडले. "वॉव. ऑर्किड्स! पुण्यामध्ये इतकी सुंदर फुले कुठे मिळाली
त्यांना? पाहा ना! मी हा घाणेरडा गुलाब लावला आहे माझ्या ड्रेसवर. थांबा.
मी हा गुलाब फेकून देते आणि एक सुंदरसे ऑर्किडचे फूल लावते. सत्कारप्रसंगी
चेअरमनसाहेबांना खूप आनंद होईल."
तिला न शोभेलशा चपळाईने तिने गुलाबाचे फूल काढून टाकून दिले.

"आणि
हे फूल लावायला सेफ्टी पिन? ठीक आहे मी जुनीच वापरते." पायलने गुलाबाच्या
फुलाला लावलेली पिन काढून माझ्या हातातले ऑर्किडचे फूल खेचून घेतले. आणि
मी काही करण्यापूर्वीच फुलामध्ये ज्या ठिकाणी त्या अत्तराची कॅप्सूल लपवली
होती त्याच्या अगदी जवळ ती पिन घुसवायला सुरुवात केली. अर्थात ती पिन त्या
कॅप्सूलला जाऊन अडकली आणि पुढे सरकेना. तिने पुन्हा जोर लावला. पिन पुढे
सरकत नव्हती.
"हे काय? हे फूल वेगळेच दिसते. पिन पण आतमध्ये घुसत नाहीये!" ती ओरडली.
पण
"थांबा थांबा, मी करून देतो." असे मी म्हणण्यापूर्वीच तिने भयंकर जोर
लावून ती पिन जोरात ढकलली आणि कॅप्सूलमधून बाहेर आलेल्या अत्तराचा रंग मला
तिच्या ड्रेसवर दिसू लागला.

डोळ्याची पापणी लवण्यापूर्वीच तो गंध
मला येऊन धडकला. खरं तर तो फक्त गंध नव्हताच. काहीतरी वेगळाच प्रकार होता.
कोणत्याही गंधाचा फक्त वास येतो. पण या गंधाचा मला स्पर्शही होत होता.
पाण्यात बुडल्यावर वाटते तसे मला गुदमरल्यासारखे अगदी आत ढवळल्यासारखे होऊ
लागले होते. नाकातून आत येणारे गंधाचे रेणू पाण्याच्या जोरदार
प्रवाहाप्रमाणे मला जाणवत होते. हळूहळू तो प्रवाह माझ्या नाकाच्या अगदी आत
डोक्यापर्यंत पोचत आहे असे वाटू लागले होते. मी जोरजोरात गुरगुरलो. अचानक
पायलच्या कपड्यावरील तो अत्तराचा डाग मोठा मोठा होऊ लागला. मला माझ्या
हृदयाचे ठोकेही ऐकू येऊ लागले. नंतर काय झाले ते अजिबात आठवत नाही.
मी
जागा झालो तेव्हा माझ्या अंगावर एकही कापड नव्हते. पायल कुठे दिसत नव्हती.
वार्‍याच्या जोरदार झोताने विस्कटल्याप्रमाणे हॉटेलची रूम अस्ताव्यस्त
वाटत होती. मी ताबडतोब कपडे चढवले आणि बाहेर पडण्यासाठी दाराकडे धावलो
तेव्हा बेडखालून पायलचा आवाज आला.

"थॅंक यू यंग मॅन. चेअरमन साहेबांचे प्रेझेन्ट मला खूप आवडले!"

(समाप्त)

(Roald Dahl च्या Bitch या कथेचे मराठीत रुपांतर)