गंधआसक्त - ३

प्रयोगशाळेच्या बंद दारावर मी टकटक केली. सुश्रुतने दार उघडले तेव्हा
वर्षभरात त्याचे रुपांतर एका अस्वलामधून याकामध्ये झाले आहे असे मला वाटून
गेले. त्याला अंघोळीसाठी शांपूची एक बाटली रोज लागत असावी.

"एक मिनिट थांबा. अजिबात आत येऊ नका. "
सुश्रुत
आत पळाला आणि एक दोन सेकंदातच हातामध्ये इयरप्लग सारखी दिसणारी दोन ओशट,
गुळगुळीत बोंडे घेऊन आला. प्रत्येक बोंडाच्या मागील टोकाला एक निळसर दोरी
बांधलेली होती. स्वत:च्या नाकाकडे बोट दाखवत त्याने ती बोंडे माझ्या नाकात
खुपसली. त्या दोर्‍यांचा उपयोग ती बोंडे पुन्हा बाहेर खेचून काढण्यासाठी
करायचा होता.

"नाकावाटे हवा आत येता कामा नये. श्‍वासोच्छवासासाठी
तोंडाचा उपयोग करा." अंगठ्याने ती बोंडे माझ्या नाकात वर वर ढकलत
सुश्रुतने सूचना दिली आणि नाटकातल्या पात्राप्रमाणे हात पसरून
"हदयनाथसाहेब, आत यावे. माझ्या आगाऊपणाबद्दल क्षमा करा, पण आजचा दिवस हा
माझ्या आयुष्यातील सर्वात रोमांचकारी दिवस आहे." असे म्हटले.

सर्दी
झाल्यावर येतो तशा चोंदलेल्या आवाजात सुश्रुत बोलत होता. प्रयोगशाळेतील
एका कपाटाच्या आतल्या कप्प्यात हात घालून त्याने जाड काचेची छोटी बाटली
काढली. त्या बाटलीत लालसर केशरी रंगाचा द्राव होता. ती बाटली माझ्यासमोर
नाचवत सुश्रुत म्हणाला. "हाच तो. जगातील सर्वात मौल्यवान द्रवपदार्थ. मी
ते अत्तर तयार करण्यात यशस्वी झालो आहे."

हातातली बाटली अतिशय काळजीपूर्वक टेबलावर ठेवत त्याने थोडे स्पष्टीकरण दिले.
"१०४८
क्रमांकाच्या या मिश्रणाचा एक शुद्ध थेंब मिळवण्यासाठी सुमारे अर्धा तास
लागतो. शिवाय प्रत्येक थेंब हा बंद झाकणाच्या भांड्यामध्ये गोळा करावा
लागतो. हा पदार्थ बाष्पीभवनशील असल्यामुळे त्याचा उघड्या हवेशी संपर्क
येता कामा नये. मी आज प्रयोगशाळेत सकाळी आलो तेव्हा या पदार्थाचा वास
घेतला आणि त्यानंतर झालेला प्रकार अवर्णनीय आहे. मी स्वत:वरचे नियंत्रण
पूर्णपणे गमावले होते. मी अक्षरशः: प्राणी झालो होतो. शब्दांत व्यक्त
करण्यासारखा तो प्रकारच नाही. त्यावेळी मला फक्त स्त्री हवी होती. जर ती
मिळाली नाही तर माझा स्फोट होईल की काय असे मला वाटत होते."

डोळ्यानेच वासंतीच्या खोलीकडे खूण करून मी म्हणालो, "वासंती ठीक आहे ना मग आता?"
"वासंतीने केव्हाच नोकरी सोडली, आता संपुनीता आहे तिच्या जागेवर." सुश्रुत म्हणाला.
"मग संपुनीता कशी आहे. हॉस्पीटलमध्ये दाखल करावे लागले नाही ना?" मी थोड्या खोचकपणानेच विचारले.
"दुर्दैवाने
संपुनीता आज नेमकी उशीरा आली. कामाला उशीरा येण्याची तिची ही पहिलीच वेळ.
त्यावेळी मी अक्षरशः: वेडा झालो होतो. बागेतून पुढे रस्त्यावर मी पळत
गेलो. पण तिथेही मला कोणी स्त्री दिसली नाही. थोड्याच वेळात मला पुरेसे
भान आले. मी प्रयोगशाळेत ताबडतोब परत आलो आणि नाकात ही बोंडे घालून
तुम्हाला बोलावले."

"तोंडावाटे हा वास आपल्या मेंदूपर्यंत पोचत नाही का?" .
"नाही
. तोंडावाटे जरी तुम्ही हे गंधरेणू आत घेतले तरी ते गंधसंवेदनस्थळांपर्यंत
पोचू शकत नाहीत. त्यामुळे तोंडावाटे केलेल्या श्‍वासोच्छवासामध्ये
तुम्हाला कोणत्याही गंधाची जाणीव होणार नाही. तुम्हाला बोलावेपर्यंत
संपुनीता प्रयोगशाळेत आली होती. मला पाहून ती बेशुद्ध पडायचीच बाकी होती.
तिच्यासमोर मी संपूर्ण विवस्त्र उभा होतो. बहुधा रस्त्यावर मी माझे सर्व
कपडे काढून फेकून दिले असणार. मी लगेच हे कपडे चढवले आणि तिला काय झाले हे
सांगितले."

सुश्रुतचा अनुभव ऐकून मी थरारलो होतो. ती बाटली मी
हातात घेऊन पाहिली. बाटलीमध्ये तळापासून अर्धा इंच वरपर्यंत जास्वंदाच्या
रसाप्रमाणे दिसणारा गडद गुलाबी-लालसर रंगाचा द्रव होता.
"सांभाळून
हाताळा किंवा बाटली खाली ठेवून पाहा. आता पुढची पायरी म्हणजे या अत्तरावर
एक शास्त्रीय प्रयोग करणे आवश्यक आहे. त्यासाठी मला हे अत्तर स्त्रीवर
फवारून एका मनुष्याला तिच्या जवळ जाण्यास सांगायचे आहे. ह्या प्रयोगाच्या
नोंदी अतिशय काळजीपूर्वक घेणेही आवश्यक आहे."
"म्हणजे या प्रयोगाच्या निमित्ताने तुला तुझा कंड शमवायचा आहे म्हण ना." मी म्हणालो.
"नाही
नाही. मी केवळ एक रसायनशास्त्रज्ञ आहे. आणि या प्रयोगात मी स्वत: सहभागी
होणार नाही. प्रयोगासाठी योग्य वातावरण निर्माण करून नोंदी करण्याचे काम
मी करणार आहे."
"ठीक आहे मग. मी स्वत: या प्रयोगात सहभागी होईन.", संपुनीता या नावानेच मला तिचे आकर्षण वाटू लागले होते.
"थोडा
धीर धरा. ह्या अत्तराच्या प्रभावाखाली असताना जर स्त्री जवळ आली तर काय
होईल हे अद्यापही आपण पाहिलेले नाही. मला खात्री आहे की हे अत्तर अतिशय
शक्तिशाली आहे. तुम्ही प्रौढवयीन आहात. स्त्रीच्या संगतीत हे अत्तर वापरणे
तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. उगाच विषाची परीक्षा घेऊ नका. या कामासाठी
आवश्यक असा पुरुष मी आधीच शोधून ठेवला आहे. तुम्हाला स्थानिक समाजात फारसा
त्रास होऊ नये म्हणून मी एका बाहेरच्या व्यावसायिक मुष्टीयोद्ध्याला या
कामासाठी बोलावले आहे. तो केव्हाही इथे येईल. मानवी लैंगिक मानसशास्त्राशी
निगडित अशा गुप्त प्रयोगात सहभागी व्हायचे आहे असे मी त्याला सांगितले
आहे. मात्र त्याला या प्रयोगाबाबत फार कमी कळेल याची काळजी घेणे आवश्यक
आहे. "
"आणि या प्रयोगासाठी स्त्री?"

"अर्थातच संपुनीता! ती
स्वत: शास्त्रज्ञच आहे असे समजा. माझ्यापेक्षाही जास्त जवळून ती
पुरुषाच्या प्रतिक्रियांचे निरीक्षण करू शकते. मी तिला या संपूर्ण
प्रयोगाची कल्पना नोकरी देतानाच दिली होती. मानवी जीवनावर सखोल परिणाम
करणार्‍या अशा प्रयोगांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणे हा तिचाच गौरव
आहे. शास्त्रीय संशोधनांमध्ये असे प्रसंग फार कमी येतात."

सुश्रुत
हे सांगत असतानाच दारावर टकटक झाली. सुश्रुतने ताबडतोब कपाटातून दोन नवीन
बोंडे काढली आणि तो दार उघडण्यासाठी गेला. दरवाज्यामध्ये जोसेफ उभा होता.
हाच तो मुष्टीयोद्धा. सुश्रुतने त्याच्या नाकात बोंडे खुपसून त्याला आत
आणले. एकमेकांची औपचारिक ओळख करून दिल्यानंतर आम्ही प्रयोग करण्यासाठी थेट
संपुनीतेच्या खोलीत गेलो. संपुनीता तिशीची असावी. तिच्या प्रसन्न
चेहर्‍याला लांबसडक केसांचा अंबाडा शोभून दिसत होता. एखाद्या
परिचारिकेप्रमाणे तिने संपूर्ण पांढरा पेहराव केला होता. आम्ही आत
गेल्यावर तिने तिच्या डोक्यावरही परिचारिकेची टोपी चढवली. एखाद्या
हॉस्पीटलमध्ये येतो तसा स्पिरिटसारख्या द्रव्याचा वास खोलीभर तरंगत होता.
संपुनीता निर्जंतुकीकरण केल्यासारखी अगदी स्वच्छ वाटत होती. तिने आपल्या
टपोर्‍या डोळ्यांनी जोसेफला व्यवस्थित पाहून घेतले. सुश्रुतने सर्वांना
तयार होण्यास सांगितले. खोलीमध्ये प्रत्येक अर्ध्या मीटरवर वेगळ्या
रंगांची एक रेघ मारली होती.

"संपुनीता या खुर्चीमध्ये बसेल आणि
जोसेफ तू समोर सहा मीटरची खूण केलेली पिवळी रेषा आहे त्यापलीकडे जाऊन उभा
राहा. तुझ्या नाकातील बोंडे - प्लग्ज काढू नकोस. मी संपुनीतेच्या
कपड्यांवर थोडे अत्तर फवारणार आहे. तुला इशारा केला की नाकातली बोंडे
काढून हळूहळू तू तिच्या दिशेने चालू लाग. आपल्याला या अत्तराचा प्रभाव
किती अंतरावरून होऊ शकतो हे मोजायचे आहे." सुश्रुतने सूचना देण्यास
सुरुवात केली.
मला थोडीशी शंका वाटत होती. मी सुश्रुतला विचारले. "संपुनीतेने जोसेफला सहकार्य करणे अपेक्षित आहे की विरोध? "

"तिच्याकडून
काहीही प्रतिसाद अपेक्षित नाही. तिने आपण प्रयोगातील केवळ एक निर्जीव
वस्तू आहोत अशी भावना मनात ठेवणे आवश्यक आहे. तिला हे सर्व आधीच समजावून
सांगितले आहे.", असे म्हणून सुश्रुतने तिला अत्तर आणायला सांगितले.

संपुनीतेचे
ओठ कोरडे पडले होते. तिने ओठांवरून जीभ फिरवून ते पुन्हा ओलसर करून घेतले.
हे करताना ती जोसेफकडे चोरून पाहत होती की काय असे मला क्षणभर वाटले.
संपुनीता अत्तर आणायला प्रयोगशाळेत गेली तेव्हा तिने नाक झाकलेले नव्हते
हे माझ्या लक्षात आले. मात्र स्त्रियांवर या अत्तराचा काही प्रभाव पडत
नाही हे सुश्रुतने काही विचारण्याआधीच सांगून टाकले.

"त्या वूमनवर सेंट मारल्यानंतर मी स्लोली वॉक करत जाणे एक्स्पेक्टेड आहे. बट व्हॉट हॅपन्स देन?" जोसेफने प्रथमच तोंड उघडले.
"तेच तर आपल्याला पाहायचे आहे यंग फेलो. तुला भीती वाटत आहे का?", सुश्रुतने विचारले.
"कोण मी? आणि एका वूमनला घाबरणार? हॅ हॅ हॅ.", जोसेफचा आत्मविश्‍वास भलताच दांडगा होता.
"गुड
बॉय!" सुश्रुतने खोलीमध्ये पुन्हा एकदा खुर्चीची स्थिती, अंतरे, सर्व खुणा
वगैरे व्यवस्थित तपासून घेतल्या आणि खुर्चीच्या आसपास असलेल्या काचेच्या
वस्तू बाहेर बाहेर प्रयोगशाळेत घालवल्यावर समाधान व्यक्त केले.
संपुनीता
हातामध्ये अत्तराची लहान स्प्रे-बाटली घेऊन आली आणि ती बाटली सुश्रुतच्या
हातात देऊन खुर्चीवर जाऊन बसली. सुश्रुतने खिशातून स्टॉप वॉच काढले.

"रेडी?" सुश्रुत म्हणाला.
सर्वांनी
तयार असण्याचा इशारा दिल्यावर सुश्रुतने स्टॉप वॉच सुरु केले आणि हलकेच
बटण दाबून तो फवारा संपुनीतेच्या मानेजवळ उडवला. मला स्प्रेचा स्स-स्स असा
आवाज ऐकू आला. अगदी चोरपावलांनी मागे येत सुश्रुत माझ्या शेजारी येऊन उभा
राहिला. सुश्रुतने स्टॉपवॉचमध्ये पाहून काही क्षणांनंतर जोसेफला नाकातून
बोंडे काढण्याचा इशारा केला.

"हां... आता हळूहळू चालायला सुरुवात कर. अं हं इतकं जोरात नाही. नॉट सो फास्ट. तू जितका हळू चालशील तितका प्रयोग अधिक यशस्वी होईल."
सुश्रुत
थोडा उत्तेजित झाला होता. अर्थात मलाही फार उत्सुकता वाटत होती. मी
खुर्चीत अवघडून बसलेल्या संपुनीतेकडे पाहिले. ती प्रचंड तणावाखाली दिसत
होती. जोसेफच्या प्रत्येक पावलासरशी आपले शरीर आकसून घेतले तर आपण इथून
अदृश्य होऊ व पुढचा प्रसंग टळेल असे तिला वाटत असावे. काही दिवसांपूर्वी
एका सर्पोद्यानात मी पांढर्‍या उंदराला अजगराच्या पिंजर्‍यात सोडल्याचे
पाहिले होते. संपुनीतेचा चेहरा पाहून मला त्या उंदराची आठवण झाली. अजगर
उंदराला गिळंकृत करणार हे उंदरालाही माहिती होते. पण संमोहित
झाल्याप्रमाणे उंदीर एकाच जागेवर आपल्या दिशेने हळूहळू सरकणार्‍या
अजगराकडे पाहत खिळून राहिला होता.

जोसेफने पाच मीटरची रेषा ओलांडली
तेव्हा संपुनीतेने मांडीवर ठेवलेले आपले हात उचलून हाताची घडी घातली. आणि
पुन्हा मन बदलून त्या हातांनी खुर्चीला घट्ट पकडून ठेवले. जोसेफने हळूहळू
चालत दोन मीटरची रेषा ओलांडली. तेव्हा तो थांबला. मी सुश्रुतकडे पाहिले.
त्याने जोसेफला थांबण्याचा काहीही इशारा केला नव्हता. जोसेफचे डोळे
चमकल्यासारखे झाले आणि पायातील जीव गेल्याप्रमाणे तो हेलपाटला. तो तोल
जाऊन खाली पडतो की काय असे वाटत होते पण क्षणार्धात त्याने स्वत:ला
सावरले. त्याला स्थिर उभे राहणे जमत नव्हते. तो दोन्ही बाजूला हेलकावे खाऊ
लागला. नाकातून फुरफुरण्याचे, गुरगुरण्याचे आवाज करू लागला. आणि अचानक
त्याने संपुनीतेच्या दिशेने उडी घेतली.

त्यानंतर काय झालं असेल हे
ज्यांना माहिती आहे त्यांना सांगायची गरज नाही आणि ज्यांना माहिती नाही
त्यांना सांगून काही उपयोग होणार नाही. पण सुश्रुतने या प्रयोगासाठी मला
निवडण्याऐवजी सुदृढ प्रकृतीच्या व तरुण जोसेफला निवडले हे योग्य झाले असे
मला वाटून गेले. माझे मध्यमवयीन शरीर त्या प्रसंगाला सामोरे जाऊ शकले
नसते. या प्रसंगाच्या मध्ये अचानक सुश्रुतने खिशातून एक रिव्हॉल्वर काढले.
ते रिव्हॉल्वर घेऊन तो पुढे आला आणि जोसेफच्या अगदी जवळ जाऊन ओरडला.
"लीव्ह हर, एल्स आय विल किल यू. जर तुला तुझ्या प्राणांची पर्वा असेल तर
तिला सोड." पण जोसेफने सुश्रुतकडे लक्ष दिले नाही. प्रयोग संपल्यावर
बाजूच्या खोलीत कपडे घालण्यासाठी जाणार्‍या संपुनीतेकडे मी पाहिले तेव्हा
आपली हाडे शाबूत आहेत हेच आपले नशीब असे भाव तिच्या चेहर्‍यावर होते.

"फॅन्टॅस्टिक! मॅग्निफिशिअन्ट!! अनबिलिव्हेबल!!!" सुश्रुतला त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द सापडत नव्हते.
"हृदयनाथ, आपण जिंकलो. आपल्याला जे हवे होते ते साध्य झाले आहे."
आश्चर्याची गोष्ट म्हणजे झालेल्या प्रसंग जोसेफला पुसटसाही आठवत नव्हता.

"माझा
ड्रेस इथे कसा? आणि चेअरवर बसलेली ती वूमन कुठे गेली. मी काही केले का?
व्हॉट डिड आय डू?" जोसेफने खाली पडलेले आपले कपडे उचलत प्रश्‍न विचारला.
"नथिंग
माय डिअर, यू आर टेरिफिक! तुझ्यामुळे माझा प्रयोग अतिशय यशस्वी झाला आहे.
हे घे तुझे पन्नास हजार रुपये. आणि तू जा आता. थॅंक्स फॉर को-ऑपरेशन!"
तेव्हढ्यात अचानक खोलीचा दरवाजा उघडून संपुनीता पुन्हा आत आली. ती विवस्त्रच होती.
"पुन्हा एकदा तो स्प्रे माझ्यावर फवारा. फक्त एकदाच", घोगर्‍या आवाजात ती जोरात ओरडली.
"बिहेव युवरसेल्फ संपुनीता, प्रयोग कधीच संपला आहे. " सुश्रुतने तिला धरून बाजूच्या खोलीत बंद केले.
"थोड्या वेळाने ती शांत होईल." सुश्रुत म्हणाला.
नंतर सुश्रुत आणि मी आमच्या बंगल्यामध्ये चहा घेण्यासाठी गेलो.

(क्रमशः)