गंधआसक्त - २

"कल्पना मजेदार आहे खरी." मी म्हणालो.
"मजा? अहो आपण जगावर राज्य करू शकू, जगावर. आहात कुठे?", सुश्रुत थोडा उत्तेजित झाला.
"पण तू तर आताच सांगितलं की गंधसंवेदनेचा मानवी वासनेवर काहीही परिणाम होत नाही म्हणून!"
"खरे
आहे ते. सध्या असा परिणाम होत नाही. पण मनुष्य हा प्राणी असताना तो नक्कीच
व्हायचा. उत्क्रांतीमधील हिमकालखंडोत्तर मनुष्यामध्ये स्त्रीकडून विशिष्ट
गंधनिर्मिती झाली की पुरुषामध्ये संग करण्याच्या प्रेरणांचा उद्भव होत
होता याचे पुरावे मला मिळालेले आहेत. अश्मयुगानंतरच्या कालखंडांमध्ये
त्याची गंधाधारित लैंगिक प्रेरणा ही कमी होऊ लागली. इजिप्त आणि चीनमध्ये
समूहजीवनाच्या प्राथमिक खुणा दिसू लागल्यानंतरच्या उत्क्रांतीच्या
टप्प्यामध्ये ही प्रेरणा संपूर्णत: नष्ट झाली.
मी सांगतोय त्याचा तुम्हाला कंटाळा तर येत नाहीये ना?"

"नाही
नाही. उलट मलाही उत्सुकता वाटू लागली आहे. पण एक गोष्ट कळली नाही. या
सगळ्या कालावधीत आपल्या श्वसनसंस्थेमध्ये काही मूलभूत बदल झाले का? म्हणजे
रचना किंवा कार्य करण्याची पद्धत यामध्ये?"
"अजिबात नाही. जर असे झाले
असते तर आपण आता काहीही करू शकलो नसतो. तो विशिष्ट गंध ग्रहण करण्याची
यंत्रणा आपल्या शरीरात अजूनही आहे. तुम्हाला अशी काही माणसे माहिती आहेत
का जी आपले कान हलवू शकतात?
"माहिती काय? मी स्वत:ही असं करू शकतो." मी माझे कान थोडे मागेपुढे करण्याचा प्रयत्न केला.
"पाहा.
कान हलवण्यासाठी लागणारे स्नायू तिथे आहेतच. मानव जेव्हा आपले कान एखाद्या
श्वानाप्रमाणे ऐकण्यासाठी पुढे आणू शकत होता त्यावेळच्या क्षमतेचे हे
स्नायू अवशेष आहेत. त्याची ही ताकद हजारो वर्षांपूर्वीच नष्ट झाली पण
स्नायू अद्यापही तसाच आहे. अगदी हेच स्पष्टीकरण गंधग्रहण करणार्‍या
शरीरातील संस्थेविषयी देता येईल. आपल्याला आवश्यक असणारे मज्जातंतू आपल्या
शरीरात आहेत. त्यांची क्षमता मात्र नष्ट झाली आहे म्हणा किंवा ती सुप्त
आहे म्हणा. "
"पण या मज्जातंतूंच्या अस्तित्वाची तुला इतकी खात्री कशी?"

"यासाठी
तुम्हाला मानवी गंधयंत्रणा स्पष्ट करून सांगणे भाग आहे. थोडेसे क्लिष्ट
वाटले तरी तुम्हाला समजण्यास फारशी अडचण येऊ नये. तुम्ही जेव्हा श्‍वास
घेता तेव्हा ती हवा नळीसारख्या पोकळ अशा तीन हाडांमधून नासिकेच्या वरच्या
भागात जाते. तेथे ती किंचित उष्ण आणि शुद्ध होते त्यानंतर अतिशय अरुंद
वाटेने थोडा प्रवास केल्यावर गंधसंवेदी इंद्रियांजवळ जाऊन पोचते.
हळदीसारख्या गर्द पिवळ्या रंगाच्या पेशींचा अंतर्भाव असलेल्या या
इंद्रियांमध्येच गंधज्ञान होणार्‍या मज्जातंतूचे अंत्यबिंदू असतात. या
प्रत्येक बिंदूवर अतिशय नाजूक अशी केशिका - तिला आपण गंधसंवेदिका किंवा
रिसेप्टर म्हणूयात - ती असते. ही संवेदिका गंधरेणूंच्या अस्तित्वाने
उत्तेजित होते आणि मज्जातंतूंद्वारे मेंदूपर्यंत तो संदेश प्रसारित केला
जातो. सकाळी उठल्यावर तुमच्या पत्नीने स्वयंपाकघरात केलेल्या फोडणीच्या
गरमागरम पोह्यांचा वास तुमच्यापर्यंत पोचल्यावर तुमच्या तोंडाला पाणी का
सुटते हे आता कळले का?"

"माझं लग्न झालेलं नाही आणि मला पोहेही अजिबात आवडत नाहीत." मला त्याची फाजील सलगी आवडली नाही.
सुश्रुतने माझ्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले.
"आता
जर तुम्हाला ह्या संवेदिका दोन वेगवेगळ्या गंधामधील फरक कसा जाणतात हे
जाणून घ्यायचे असेल तर थोडे अधिक काळजीपूर्वक ऐका. प्रत्येक संवेदिकेच्या
शेवटी नारळाच्या करवंटीप्रमाणे अंतर्वक्र असा पृष्ठभाग असतो. यालाच
गंधसंवेदनस्थळ म्हणतात. अशा हजारो गंधसंवेदिका गंधरेणुंची वाट पाहत दबा
धरून बसलेल्या असतात. एखाद्या विशिष्ट गंधाचे ज्ञान होणे म्हणजे त्या
गंधाचे रेणू हे गंधसंवेदनस्थळामध्ये पूर्णपणे सामावून जाणे असे सोपे सूत्र
आहे हे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे गंधरेणू वेगवेगळ्या आकाराचे
असतात. त्यामुळे गंधसंवेदनस्थळेही विविध आकाराची असतात. विवक्षित आकाराचा
गंधरेणू हा एका विशिष्ट गंधसंवेदनस्थळातच पूर्णपणे सामावला जाऊ शकतो."

"एक
मिनिट, एक मिनिट. याचा अर्थ मी जेव्हा गुलाबाचा वास घेतो तेव्हा हे रेणू
गुलाबाच्या वासासाठी असलेल्या संवेदनस्थळामध्ये घट्ट बसतात का?"
"होय!"
"पण मग जगातील प्रत्येक गंधासाठी आणि त्याच्या संवेदनस्थळासाठी इतरांपेक्षा संपूर्ण वेगळा असा एक विशिष्ट आकार असतो का?"

"नाही
नाही. खरी गोष्ट अशी आहे की मानवी गंधयंत्रणेमध्ये केवळ ७ वेगवेगळ्या
आकाराची संवेदनस्थळे असतात. मनुष्य केवळ सात "शुद्ध गंध" जाणतो. इतर गंध
हे या सात गंधांच्या मिश्रणातून तयार होतात.
एक उदाहरण देतो. आपली रसना
ही गोड, कडू, तिखट, खारट, आंबट आणि तुरट अशा सहा मूळ चवींचे ज्ञान वापरून
इतर क्लिष्ट चवींचाही आस्वाद घेऊ शकते. अगदी तशीच ही पद्धत आहे. आपल्या
पूर्वजांनी चवींचा असा अभ्यास करून "रसास्वाद षट् मधुराम्ललवण कटु तिक्त
कषायाः" सारखी सूत्रे लिहिली. मात्र गंधांचा असा शास्त्रशुद्ध अभ्यास
वैदिक संस्कृतीत झाला नाही. मात्र द्रविड संस्कृतींमधील काही दुर्लक्षित
संशोधनांमध्ये सात मूळ गंधांची नोंद द्राविडी भाषेत आढळते. त्यांना मी
कर्पूरगंध, उग्र गंध, कस्तुरीगंध, स्वर्गीयगंध, पुष्पगंध, श्यामवल्लीगंध
आणि विस्रगंध अशी देशी नावे दिली आहेत. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे या
संशोधनामध्ये आठवा आणि आपल्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा असलेला गंध
मात्र नोंदलेला नाही. या आठही गंधांसाठी आवश्यक असलेली संवेदनस्थळे आपल्या
शरीररचनेमध्ये अर्थातच उपलब्ध आहेत."

"समजतंय. पण हा आठव्या क्रमांकाचा गूढ गंध हल्ली आपल्या नाकापर्यंत पोचत नाही का?"
"अगदी
नियमितपणे पोचतो. कदाचित आताही तो तुमच्या नासिकेत असेल. पण आपल्याला
त्याची जाणीव होत नाही. या गूढ गंधाचे गंधरेणू संवेदनस्थळामधे बंदिस्तही
होतात. मात्र पुढे त्याचे काहीही होत नाही. वीज नसेल तर कितीही वेळा कळ
दाबली तर दिवा पेटत नाही हे तुम्हाला ज्ञातच असेल. अगदी तसेच आहे हे.
मात्र सध्या कार्यरत नसलेली ही यंत्रणा पुन्हा चालू करणे शक्य आहे. मी
त्याचा पुरेसा अभ्यास केला आहे. आपल्याला काही निवडक मज्जातंतूंवर काम
करावे लागेल. खरे तर मज्जातंतू आणि स्नायू यांच्या मूलभूत रचनेत फरक असतो.
एखादा स्नायू जर कार्यरत नसेल तर तो पुन्हा कार्यक्षम करणे अशक्य असते.
मात्र मज्जातंतू पुन्हा कार्यक्षम करणे शक्य आहे. त्या विशिष्ट गंधाची
तीव्रता काही हजार पटींनी वाढवून एखादा योग्य उत्प्रेरक त्यात मिसळला की
त्या गंधाच्या प्रभावाने हा मज्जातंतू पुन्हा कार्यरत होईल.
मनोरुग्णालयांमध्ये देण्यात येणारी 'शॉक ट्रीटमेंट' अशाच पद्धतीची असते.
आता मी आवरते घेतो. इतकी तोंडओळख तुम्हाला पुरेशी आहे. यापुढील अधिक
तांत्रिक माहिती द्यायला मला आवडेल पण तुम्हाला त्यातले काहीही कळणार
नाही."

सुश्रुतच्या स्पष्टीकरणानंतर मी थोडासा विचार केला आणि
त्याला आवश्यक ती मदत देण्यास तयार झालो. त्याची सध्याची नोकरी सोडून
भारतात परत येऊन माझ्या बंगल्याशेजारच्या औटहाऊसमध्ये एक छोटी प्रयोगशाळा
उभारण्याचे त्याने मान्य केले. प्रयोगासाठी होणारा सर्व खर्च -
सुश्रुतच्या गलेलठ्ठ पगारासहित - मी उचलावा व बदल्यात प्रयोगाची जी काही
निष्पत्ती असेल - फायदा वा तोटा - त्यामध्ये निम्मा हिस्सा माझा व निम्मा
हिस्सा सुश्रुतचा असे करण्याचे ठरले.
दुसर्‍याच दिवशी सुश्रुतने
"वैयक्तिक अडचणींमुळे नोकरीत राहणे शक्य नाही" असे सांगून आपला राजीनामा
मालकीणबाईंकडे सूपूर्त केला आणि पॅरिसमधला गाशा गुंडाळून भारतात परतला.
पुण्याहून नगरकडे जाणार्‍या रस्त्यावर चंदननगरच्या थोडं पुढे मुख्य
रस्त्यापासून बराच दूर असा माझा भव्य बंगला होता. ठरल्याप्रमाणे
बंगल्याच्या औटहाऊसमध्ये केवळ एका आठवड्यात संपूर्ण प्रयोगशाळा सुश्रुतने
उभारली. प्रयोगांसाठी आवश्यक अशी दोन माकडेही - एक नर व मादी - त्याने
कुठुनशी मिळवली. त्यांना ठेवण्यासाठी पिंजर्‍याची व्यवस्था केली. माझा
बंगला वर्दळीपासून दूर, जरा आडबाजूला आहे हे त्याच्या पथ्यावर पडले होते.
त्याच्या कामामध्ये मदत म्हणून वासंती नावाची एक सुस्वरुप नसली तरी बरीच
सुबक-नीटनेटकी आणि आकर्षक अशी तरुणी त्याने सहाय्यक म्हणून ठेवली.

भारतात
परत आल्यावर माझ्या दैनंदिन व्यापामध्ये मी आकंठ बुडून गेलो. सुश्रुतच्या
प्रयोगाकडे व वाटचालीकडे लक्ष द्यायला मला वेळ मिळत नव्हता. पुणे शहराच्या
बाहेर नवीन आय-टी पार्क तयार करण्याचा प्रस्ताव तेव्हा शासनाच्या
विचाराधीन होता. त्याचे कंत्राट माझ्या कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळणे शक्य
होते. त्यासाठी आवश्यक ती मोर्चेबांधणी करण्यात मी गुंतून गेलो होतो.
बेंगलोर, गुरगाव व मुंबईमध्ये सुरु असलेल्या आमच्या प्रकल्पांना भेटी
देण्यासाठी बराच काळ मला पुण्याबाहेर राहावे लागत होते. माझी आणि
सुश्रुतची भेट महिन्यातून एखादेवेळी होत असे. शिवाय संशोधनात्मक
कामांमध्ये मला काडीचाही रस नव्हता. एखाद्या कामाचे फळ मिळण्यास अनिश्चित
काळ लागणार आहे हे एकदा स्पष्ट झाले की मला ते काम शिळे व उबगवाणे वाटू
लागे. माकडांची प्रयोगात्मक लैंगिक क्रीडा व वासंतीचे विभ्रम यांनाही मी
फार लवकर कंटाळलो. अर्थात एकदा प्राप्त झालेल्या स्त्रीकडे पुढे लक्ष
देणेही मला कंटाळवाणे वाटते हे खरे असले तरी वासंती रतिक्रीडांमध्ये फारच
तरबेज होती हे मान्य केलेच पाहिजे. तिचे बाह्यरुप व एका पावसाळी कुंद
दिवशी झालेले तिचे आगळे दर्शन - सुश्रुत त्यावेळी एका बेडकाच्या नाकामध्ये
इलेक्ट्रोड्स खुपसून काही नोंदी करण्यात मग्न होता - यामध्ये
जमीन-अस्मानाचा फरक होता. स्त्रिया अनाकलनीय असतात हे माझे मत वासंतीमुळे
अधिक ठळकच झाले. मला भेटलेल्या सर्व स्त्रिया या पहिल्या प्रणयप्रसंगातच
आपली सर्व शस्त्रे वापरून घेतात त्यामुळे पुन्हा त्याच स्त्रीला अगदी
पाहणेही माझ्या जीवावर येते. नंतर घडणार्‍या रटाळ पुनरावृत्तीमध्ये
उत्कटतेचा कणभरही अंश नसतो. त्यामुळे वासंतीसोबतच्या प्रसंगानंतर जवळपास
वर्षभर प्रयोगशाळेकडे मी ढुंकूनही पाहिले नाही. त्वरित भेट घेण्यासंबंधीचा
सुश्रुतचा एसएमएस आला नसता तर त्यालाही मी विसरून गेलो असतो.

(क्रमशः)