मी तिला माझे म्हणावे मागणे होते तिचे
हाय रे मजला न कळले वागणे होते तिचे!
ह्या जगाच्या वेदनेने मी सदाचा तापलेला
मम जीवाला शांतवाया चांदणे होते तिचे!
रात्रीची माझी भ्रमंती सारखी ती चाललेली
माझिया डोळ्यांत बघण्या जागणे होते तिचे!
"तू जरी माझा न झाला मी तुझी राहीन रे"
पापण्यांच्या फडफडीने सांगणे होते तिचे!
दूर जातांना वळोनी पाहिले मी एकदा ते
आसवांच्या ओहळाला बांधणे होते तिचे!