दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या 'हॅलो सचिन प्रवासी' कार्यक्रमात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सचिन ट्रॅव्हल्सने आयोजित केलेल्या आशाताईंच्या मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाविषयी ऐकले आणि इतर कुठलाच विचार न करता मैत्रिणींना पटापट फोन करून कार्यक्रमाला जायचे ठरवले. मराठी मनाचा उदंड उत्साह आणि हौस, आशाताईंच्या सुरांची मोहिनी, मराठी गीतांची मेजवानी शिवाय निमित्त कोजागिरीचे! मग आणखी विचार कसला करणार? लगेच तिकिटांसाठी धाव घेतली. तशी तिकिटं जरा महागच वाटली पण आशाताईंचे सूर प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी आणि मराठी माणसाची हौस यापुढे ते वाटणं टिकलं नाही. सर्वात पुढचं तिकिट 2232/- रुपये (करांसहित) होतं. आशाताईंचे गाणे खूप जवळून ऐकायला आणि पहायला मिळावे म्हणून पुढचीच तिकिटं काढली. तिकिटांवरचे आसन क्रमांकही नीट पाहून घेतले. पनवेलच्या स्वप्ननगरीत खुल्या मैदानात कार्यक्रमाचे आयोजन, अर्धवर्तुळाकार बसण्याची व्यवस्था, खाण्या-पिण्याची व जेवणाची व्यवस्था, मुंबई-पुण्याहून पनवेलला नेण्या-आणण्याची वातानुकूलित किंवा साधी वाहन व्यवस्था इत्यादीची व्यवस्थित माहिती तिकिटं काढताना मिळाली होती. सगळं अगदी कसं छान-छान वाटत होतं.
कोजागिरी पौर्णिमा तशी दोन दिवस आधीच होऊन गेली होती, पण लोकांच्या सुट्टीची सोय पाहून पूनम सहल 27 ऑक्टोबरच्या शनिवारी आयोजित केली होती. दुपारी चार वाजता दादरहून शिवाजी पार्कच्या मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळून आमची गाडी सुटणार होती. पण सकाळीच फोन आला की चारच्या ऐवजी तीन वाजता या म्हणून! माझ्या मैत्रिणीला वेळेबाबतच्या या कोटेकोरपणाबद्दल शंकाच होती. तिने "तीन म्हणजे सव्वा तीन, साडे तीन, पावणे चार असे आम्हाला तिष्ठत नाही ना ठेवणार?" असे स्पष्टच विचारून घेतले. यावर "नाही हो, हे सचिन ट्रॅव्हल्स आहे." असे अगदी छातीठोक गर्व से कहो छाप उत्तर मिळाले. आत्तापर्यंत सगळी व्यवस्था स्वत:च करत सर्वत्र प्रवास करणा-या आमच्या सारख्या बिचा-यांना काय कळणार सचिन ट्रॅव्हल्स काय चीज आहे ते ! पण घोडं मैदान जवळच होतं. सचिन ट्रॅव्हल्स काय चीज आहे ते कळायला फार वेळ जावा लागला नाही. पुन्हा फोन...
"मी सचिन ट्रॅव्हल्स मधून बोलतेय. तुम्ही ---- बोलताय का?"
"हो"
"अहो, आता नं कायर्क्रमाच्या ठिकाणात जरा बदल झालाय. आधी तो खुल्या मैदानात होणार होता पण तिकडे डास खूप आहेत. किडेही भरपूर आहेत. शिवाय दव भरपूर पडतं. मग तुम्हाला कार्यक्रमाचा नीट आस्वाद घेता यावा म्हणून आम्ही आता तो वातानुकूलित नितिन देसाई स्टुडिओत करायचा ठरवलंय."
अरे वा! आमची किती काळजी ! आम्हाला डास चावतील म्हणून कार्यक्रम खुल्या मैदानात न करता बंदिस्त स्टुडिओत? आणि मग त्या कोजागिरीच्या चंद्राचं काय? काही तरी गडबड वाटली. म्हणून तिला विचारलंच, "अहो, पण ठिकाण बदलताना आम्हाला कुठे विचारलंत? म्हणजे अगदी आमच्यासाठी करत आहात हे सगळे म्हणून विचारतेय. ए.सी.चा त्रासही होऊ शकतो एखाद्याला. बरं, आहे कुठे हे ठिकाण?"
"पनवेलपासून 17 कि.मी. अंतरावर.... आणि आता तुमचे सीट नंबर बदललेत. कारण आधीची व्यवस्था खुल्यावर होती. तेंव्हा जास्त लोक एका रांगेत बसले असते. पण आता स्टुडिओत असल्याने 17व्या रांगेत 21, 22, 23 ..असे तुमचे.सीट नंबर असतील."
अच्छा, म्हणजे खरी गोम इथे होती तर !
"नाही चालणार. मला आमच्या ग्रूपमधल्या सगळ्यांना विचारावे लागेल. नाही तर सगळे पैसे परत करावे लागतील तुम्हाला. अगदी शेवटच्या क्षणी हे सांगण्याचे कारण?"
"हे कालच ठरलं. कारण तिकडे खूप डास..." पुन्हा तिच्या डासांची भुणभूण सुरू झाली. माझ्या आधी ती माझ्या एका मैत्रिणीशीही बोललीच होती. मला म्हणाली पुन्हा अर्ध्या तासाने फोन करते तोवर तुम्ही तुमच्या ग्रूपमधल्या इतरांना विचारून ठेवा. बरोबर अर्ध्या तासाने पुन्हा फोन. पुन्हा डास-किडे...इ...इ. शिवाय विनम्र विनंती "मॅडम, तुम्ही तिकिटं रद्द करू नका. बाकी कार्यक्रम अगदी आहे तस्साच होणार आहे, त्यात काहीच फरक नाही. फक्त तुमच्या सीट्स आता 17 व्या...." अगदी वैताग आला. अजून सगळ्यांशी बोलणे झाले नसल्याचे सांगितल्यावर पुन्हा अर्ध्या तासाने तिचा फोन. तिकिटं रद्द करणे शक्य नव्हते कारण कोल्हापूरहून एक ग्रूप यायचा होता. तो पुण्यात येऊन सचिन ट्रॅव्हल्सच्या पूनम सहलीत सहभागी व्हायचा होता. त्यांनी कोल्हापूर सकाळी 6 वाजताच सोडलं होतं. कार्यक्रमाचं ठिकाण खुल्यावरून बंदिस्त करण्याचं कारण आशाताईंची सुरक्षा, रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम करण्यात कायद्याची येणारी अडचण असे कोणतेही दिले असते तर ते मान्य केले असते पण 'आपल्याच भल्यासाठी' हा जो आव होता तो संतापजनक होता. शिवाय त्यासाठी आम्ही मागच्या रांगेतले आसनक्रमांक निमूटपणे मान्य करावेत या दृष्टीने चाललेला प्रयत्नही उबग आणणारा होता. लाडिक सुरात कार्यक्रमाला कसा अपेक्षेपेक्षा उदंडच प्रतिसाद मिळाला हेही ऐकविण्यात आले. पण झेपत नसताना ठरल्यापेक्षा जास्त तिकिटं विकायला सांगितलं कुणी होतं? शिवाय सुरुवातीच्या काही रांगा अतिमहत्वाच्या विशेष आमंत्रितांसाठी राखीव होत्या. काहीच पटत नव्हतं तरी केवळ आशाताईंच्या गाण्यासाठी हे सगळं सहन करून आणि सतरावी रांग मान्य करून कार्यक्रमाला जाण्याची तडजोड स्वीकारली.
ठीक पावणे तीन वाजता मीनाताईं ठाकरेंचा पुतळा गाठला. सिल्क साड्यांची सळसळ, गजरे, मंद सुवासाचे सेंट शिंपडलेली गानवेडी सुगंधित गर्दी. थव्या-थव्याने लोक पुतळ्याभोवती जमू लागले. तीन, सव्वा तीन, साडे तीन, पावणे चार, चार, सव्वा चार.... मंडळी तिष्ठत होती. आमची सोडून वेगवेगळ्या बसगाड्यांचा पुकारा होत होता आणि त्या रवाना होत होत्या. पाच-सहा गाड्या गेल्यानंतर आमची गाडी आली आणि सव्वा चारच्या सुमारास सुटली. गाडीमध्येही ठिकाण बदलाबद्दल तीच-तीच माहिती दिली गेली. नंतर कार्यक्रमाची माहिती, यात खाण्या-पिण्याबद्दलची जास्त. आधी नाश्ता, मग यशवंत देवांचा कार्यक्रम, नंतर जेवण, मग आशा भोसलेंचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम, तो झाल्यावर मसाला दूध आणि शेवटी आशा भोसलेंच्या हिंदी गाण्यांवर नृत्यांचा कार्यक्रम. रात्री कार्यक्रमात कुणाला झोप येऊ नये म्हणून सतत चहा-कॉफीची सोय असल्याचेही सांगण्यात आले.
संध्याकाळी सहाच्या सुमारास नितिन देसाई स्टुडिओच्या दारात पोहोचलो. ब-याच गाड्या येऊन ठेपल्या होत्या. पुणे, दादर, बोरीवली, ठाणे नाशिक अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या असंख्य बसगाड्या पाहून आतल्या गदीर्ची कल्पना आली. आत गेलो तर आधी पोहोचलेल्या लोकांचा नाश्ता सुरू झाला होता. ध्वनिवधर्कावरून वेगवेगळ्या सूचना दिल्या जात होत्या. 'बदललेल्या ठिकाणामुळे बदललेले नवे आसनक्रमांक असलेल्या प्रवेशिका देण्याची व्यवस्था समोरच्या झाडाखाली करण्यात आली आहे.', ' 'टॉयलेटची व्यवस्था माझ्या डाव्या हाताला आहे' 'नाश्ता तयार आहे, सर्वांनी नाश्ता करून घ्यावा ' अशा सगळ्या सूचना एका पाठोपाठ एक येत होत्या. पण बोलणारी व्यक्ती दिसत नसल्याने समोरचे झाड कुठे आहे आणि डावा हात कुठे आहे हे कळत नव्हते. मोठमोठ्या रांगा मात्र सगळीकडे दिसत होत्या. नाश्त्याची व्यवस्था समोरच दिसली त्यामुळे तिकडे आधी मोर्चा वळवला. नाश्त्याची सोय अतिशय उत्तम होती.
प्रचंड जनसंख्येमुळे नाश्ता, चहा, नवीन प्रवेशिका आणि टॉयलेट अशा सर्वच ठिकाणी मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. जुन्या आसन क्रमांकांच्या मोजक्याच याद्या आणि नवीन आसन व्यवस्थेची माहिती देणारे अपुरे संगणक. अगदीच तुटपुंज्या यंत्रणेच्या आधारावर काम चालले होते. नवे आसनक्रमांक बसमध्येच देऊन हा प्रश्न सोडवता आला असता. पण कित्येकांना आपली आसनांची रांग अचानक भलतीच मागे गेली आहे याची कल्पनाच नव्हती. त्यामुळे लोकांना एकदा मुक्कामावर नेऊन सोडले की त्यांना कार्यक्रमात सहभागी होण्यावाचून गत्यंतर नाही, तिकिटे रद्द होण्याची शक्यता नाही असा हिशेबी विचार या मागे असावा अशी शंका यायला लागली. भली मोठी रांग झाडाखाली वळसे घेत उभी असतानाच थोड्याच वेळात आतमध्ये कार्यक्रम सुरू होत असल्याची कुणकुण लागली. लोकांमध्ये अस्वस्थता वाढली. रांग तर जागच्या जागीच खिळल्यासारखी होती. शेवटी ज्यांची तिकिटे 2232/- रुपयांची आहेत त्यांनी नवीन आसनक्रमांक न घेताच सभागृहात प्रवेश करावा असे सांगण्यात आले. इतरांचे काय हा विचार मनात घेऊनच तिकडे धाव घेतली. आरंभीच्या कार्यक्रमाचे कलाकार मंचावर स्थानापन्न झाले होते. प्रवेशद्वारावरच सांगण्यात आले, 'सगळे लोक पुढे जाऊन बसले आहेत, आत खूप गोंधळ आहे त्यामुळे आम्ही तुमच्या आसनांची खात्री देऊ शकत नाही.' म्हणजे? 'सचिन ट्रॅव्हल्स' च्या एका गणवेशधारी माणसाला पकडले आणि त्याला 17 व्या रांगेतल्या आमच्या आसनक्रमांकांवर आमची बसण्याची व्यवस्था करून द्यायला सांगितले. कारण 17व्याच काय त्यानंतरच्या कित्येक रांगांवर लोकांनी बसून घेतले होते. आमची आसने मिळवून देणे, ज्यांनी आम्हाला आसनक्रमांक दिले त्यांचेच काम आहे, आम्हाला त्यासाठी व्यक्तिश: कुणाशी भांडावे लागू नये अशी आमची रास्त इच्छा होती. पण त्या स्वयंसेवकाने एकंदरीत परिस्थिती पाहिली आणि बाहेर पळ काढला. आतमध्ये 'सचिन'चा एकही स्वयंसेवक नव्हता. मंचावर यशवंत देवांच्या संचाने आपली वाद्ये परजायला सुरुवात केली होती. आता थेट मंचावरच धाव घेण्याशिवाय पर्याय नव्हता. आमच्यासारखे असंख्य होते. मराठी माणसाच्या सहनशक्तीचा कडेलोट झाल्यावरही तो निमूट राहील हे शक्य नव्हते. आमच्यासारखीच अनेकांनी मंचाकडे धाव घेतली.
संयोजक आणि श्रोते-प्रेक्षक यांच्यात वादावादी सुरू झाली. लोक पैसे परत मागू लागले. पुन्हा परत मूळ ठिकाणी पोहोचविण्याची मागणी करू लागले. सचिन जकातदार स्वत: मंचावर हजर होते. पुन्हा तीच-तीच स्पष्टीकरणं दिली जात होती. 'अपेक्षेपेक्षा खूप जास्त प्रतिसाद', 'डास-किडे-दव', 'ए.सी.ची सोय' इत्यादी इत्यादी. लोक बधेनात. मग 'चुका होतात माणसाच्या हातून जरा समजून घ्या.' हे सुरू झालं. पण या झालेल्या चुका नव्हत्याच, केलेत्या कृती होत्या. एका शब्दाने लोकांना आपआपल्याच आसनांवर बसण्याची विनंती केली जात नव्हती. खरं तर चूक लोकांची नव्हतीच! लोक इमानदारीत आपल्या आसनांवर बसले होते. काही लोकांच्या आसनांबद्दल प्रश्न निर्माण झाला होता. ही मंडळी जेंव्हा आपल्या आसनांबद्दल तक्रार करायला मंचावर गेली तेंव्हा त्यांची योग्य व्यवस्था करणं योग्य ठरलं असतं. प्रश्न सुटला असता. पण त्यांना सूचना दिली गेली, "ठीक आहे, पुढे जिथे कुठे जागा शिल्लक असतील तिथे बसून घ्या. कार्यक्रम थोड्याच वेळात सुरू होत आहे." ही सूचना ध्वनिवर्धकावरून दिली गेल्याने तमाम लोकांना ही सूचना सर्वांसाठीच आहे असे वाटले आणि ते आपल्या आसनांवरून उठून पुढच्या सर्व रिकाम्या आसनांवर जाऊन बसले. इथूनच पुढच्या सगळ्या गोंधळाला सुरुवात झाली.
पाच हजार श्रोत्यांची अपेक्षा करणा-यांना त्याहून कमीच असलेल्या लोकांची व्यवस्था नीट का करता येऊ नये? हे आपल्या आवाक्या बाहेर जाते आहे असे वाटल्यावर तिकिट विक्री थांबवली का नाही? ' मुलं-बाळं असणा-यांनाही कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा म्हणून आम्ही मुलांचीही वेगळी व्यवस्था केली आहे, शिवाय डॉक्टरांचीही उपस्थिती असेल' अशी जाहिरात करणा-यांना साधे पाच-दहा स्वयंसेवक आसनांच्या व्यवस्थेवर का नेमता येऊ नयेत? नवीन आसनक्रमांक आणि सतरावी रांग आम्ही मान्य केली होती तरी ती सुद्धा देण्याची व्यवस्था करणे संयोजकांना अशक्य का व्हावे? प्रश्न अनेक होते. संयोजकांकडे उत्तरे नव्हती.
व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले होते. लोकही ऐकेनात. अतिमहत्वाच्या विशेष आमंत्रित व्यक्तींसाठी सुरुवातीच्या अनेक रांगा खर्ची पडलेल्या दिसत होत्या. त्यांची वक्तव्ये आणि आम्हालाच समजावण्याचे प्रयत्न तर भयंकरच होते. 'अहो, ते म्हणताहेत ना चूक झाली म्हणून, मग आता बसून घ्या ना जागा असेल तिथे. कार्यक्रम सुरू कसा होणार?', 'ही मराठी माणसं म्हणजे जातील तिथे भांडतातच. जरा समजून घ्यायला नको', ' खुर्चीचा मोह मराठी माणसाला कधी सुटलाय ?' ही सगळी मल्लीनाथी आपली मराठी माणसेच करीत होती जी अतिमहत्वाच्या विशेष आमंत्रित व्यक्ती म्हणून कार्यक्रमासाठी दिडकीही न मोजता आली होती! प्रश्न पैशाचा नाही असं कितीही म्हटलं तरी शेवटी प्रश्न पैशाचासुद्धा होताच की! आमच्या खुर्च्या आम्हाला देणं जर शक्य नसेल तर पैसे परत करा या मागणीचा जोर वाढला. आशाताईंच्या गाण्याचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही आलो आहोत, इतके पैसे मोजून मनस्ताप विकत नव्हता घ्यायचा आम्हाला हे लोकांच म्हणणं.
काहीच तोडगा निघत नसल्यानं लोकांनी पैसे परत मागणं यात काही गैर नव्हतं. 'लोक काय हो, करतील थोडा वेळ आरडाओरड आणि कार्यक्रम सुरू झाला की बसतील गप्प दिसेल त्या खुर्चीवर' असं मराठी माणसाला कुठेतरी गृहीत धरल्याचं जाणवत होतं. फसवणुकीचं दु:ख आणि संताप तर होताच. पण मराठी माणूस भांडकुदळच अशी प्रतिमा उभी करताना मराठी माणूस कष्टाने कमावतो आणि ते हौसेखातर खर्च करतो या वास्तवाकडे दुर्लक्ष होत होतं.
मंचाकडे धाव घेणा-यांची संख्या वाढली. शाब्दिक चकमकींना जास्त धार चढली. 'आम्ही काही करू शकत नाही' अशासारख्या उत्तरांनी सन्माननीय तोडग्याची आशा मावळली तशी आदराची भावना लोपून सभ्य भाषा 'अरे-तुरे' वर आली. पुढचे पाऊल धक्काबुक्की आणि शेवटचा टप्पा पोलिसांना पाचारण! क्रमाक्रमाने हे सर्व टप्पे पार पडले. व्ववस्थापक आणि श्रोते-प्रेक्षक यांना एकमेकांपासून दूर करून सुरक्षित अंतरावर ठेवण्यात पोलीस यशस्वी झाले. पण समोरची गर्दी हटली नव्हती. शेवटी मंचापासून विशेष आमंत्रितांच्या पहिल्या रांगेपर्यंतच्या मोकळ्या जागेत खुर्च्या टाकायचे ठरले. मंचावरूनच प्लास्टिकच्या खुर्च्या खाली द्यायला सुरुवात झाली. यात दांडगाई करू शकले ते टिकले. आम्ही ढकलाढकली आणि दांडगाई करून तीन खुर्च्या मिळवू शकलो. ग्रूप पांगला. एकत्रितपणे कार्यक्रमाचा आनंद लुटण्याच्या कल्पनेला सुरुंग लागला. थोड्याथोड्या वेळाने एकमेकींना आपल्या जागा देण्यासाठी मागे-पुढे करायचे ठरवले. संताप धुमसत होता पण प्राप्त परिस्थितीला शरण जाण्याव्यतिरिक्त दुसरा इलाज नव्हता.
क्रमश: