या नाट्यपूर्ण घडामोडींनंतर खराखुरा कार्यक्रम सुरू झाला. यशवंत देवांचा हास्य-विडंबन काव्यगायनाचा कार्यक्रम होता. झाल्या प्रकारानंतर संताप अजून शमला नव्हता त्यात हा कार्यक्रम म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार वाटला. 'अती झालं आणि हसू आलं' अशी म्हण आहे पण इतके अती होऊनही कशाचंच हसू येईना. काही लोक (अतिमहत्त्वाचे वि.आ.. असावेत) हसलेले ऐकू येत होते, पण त्यांच्यापेक्षाही मंचावरची मंडळीच जास्त हसत आहेत असे वाटत होते. बराच वेळ काय चाललंय काही कळत नव्हते. संतापाने वळलेल्या मुठी टाळ्यांसाठी खुलत नव्हत्या. थोड्या विडंबन गायनानंतर यशवंत देवांनी एका कवितेचे वाचन सुरू केले. गणपतीवरची कविता होती, "दरवर्षी येत होतो, पुढच्या वर्षी येणार नाही" कवितेने चांगलीच पकड घेतली. कविता संपली आणि वळलेल्या मुठी पहिल्यांदाच टाळ्यांसाठी खुल्या झाल्या. मनापासून दाद गेली. यशवंत देवांनीही नेमकं याचवेळी हात जोडून ' सुरुवातीला जे झालं, ते झालं, तुमची दाद मिळाली, तुमच्या-आमच्यामधला पडदा दूर झाला हीच आम्हाला मिळालेली खरी पावती' असं सांगितलं. थोडं वाईट वाटलं. खरंच, कलाकार त्यांचा कार्यक्रम चोखच करत होते. झाल्या प्रकारात त्यांचा काही दोषही नव्हता. पण आम्हीही काही जाणूनबुजून करत नव्हतो. कुठे, कुणाचं, कसं, काय चुकत होतं कळत नव्हतं. हळूहळू कार्यक्रमाचा आस्वाद घेणं शक्य होऊ लागलं. पण आसनांची पर्यायी व्यवस्था फारशी सुखावह नव्हती. आसने मंचाच्या इतक्या जवळ होती की वर मान वर करून-करून दुखायला लागली होती. ध्वनिक्षेपकांचे आवाज छातीवर ढोल पिटल्यासारखे आदळत होते.
कार्यक्रम जसजसा जेवणाच्या वेळेकडे सरकू लागला तशी पुन्हा एक चिंता नव्याने भेडसावू लागली. जेवायला गेल्यावर पुन्हा खुर्च्यांचे काय? कारण नंतरच तर आशाताईंच्या मराठी गीतांचा मुख्य कार्यक्रम होता. जेवायला जावे की नाही? जेवण की आशाताई? आशाताई की जेवण? शेवटी काहींनी जागेचे रक्षण करायचे आणि इतरांनी पटापट जेवून यायचे, ते आल्यावर जागेचे रक्षण करणा-यांनी जेवायला जायचे असे ठरले. या कार्यक्रमाच्या शेवटी जेवण्यासाठी पांगापांग होण्यापूर्वीच श्री विनय आपटे मंचावर आले आणि त्यांनी सांगितले, "आता जेवणाची विश्रांती होत आहे. आसनांच्या बाबतीत सुरुवातीला आपण सर्वांनी सर्वसम्मतीने(?) जो तोडगा काढला आहे तो मान्य करून जेवणानंतरही आता ज्या आसनांवर आपण बसलेलो आहोत त्याच आसनांवर सर्वांनी बसावे." कधी, कुणी आणि कसा तोडगा काढला? 'सर्वसम्मती' चा नेमका अर्थ काय? पुढच्या रांगेचे कित्येक हक्कदार पार मागे नाइलाजाने 60 व्या रांगेतही बसले होते. त्यांची संमती घेतली होती काय? कुणालाच काही कळले नाही. निवेदिकेनेही सांगितले की मग आशाताई आल्यावर सुरळीत कार्यक्रम सुरू होईल. थोडक्यात काय? आशाताई आल्यावर तमाशे नकोत. अदृश्य धमकीवजा हुकूमच वाटला तो! श्री आपटेंच्या निवेदनानंतरही एक दोघं खुर्ची जाण्याच्या भयाने जेवायलाच गेले नाहीत. एकाचं तर म्हणणं पडलं संयोजकांनी 'पैसे परत करू' सांगितले आहे. मग त्यांचे जेवण कसे जेवायचे?' शेवटी मराठी माणूस! पण मराठी माणसाचं हे रूप कुणाला दिसत कसं नाही?
जेवणानंतर घाईघाईने जागेवर परतलो. आसनांच्या रक्षणकर्त्याला सर्वच आसनांचे रक्षण करणे जमले नव्हते. आमच्या आसनांवर एक दांपत्य आपल्या अपत्यासह विराजमान झालेले होते. आम्ही उठायला सांगितल्यावर ते आपण अतिमहत्त्वाच्या व्यक्ती असल्याच्या प्रवेशिका दाखवू लागले. आम्ही त्यांना विनय आपटेंच्या निवेदनाची आठवण करून दिली, तर व्हीआयपीजना निदान पहिली-दुसरी रांग तरी नको का अशी आम्हालाच विचारणा! आम्ही ठणकावून सांगितले, 'बाबारे, आम्ही विशेष महत्त्वाच्या व्यक्ती नाही. पण आम्ही सामान्य माणसं आहोत त्यामुळे आम्ही आवाज करणार, तमाशा नको असेल तर निमूटपणे ऊठ.' तिघींनी तीन तोंडांनी आवाज सुरू केला. आता मात्र असे होऊ लागले तर आशाताई आल्यावर त्यांच्याच शेजारी जाऊन बसावे लागेल असं म्हटल्यावर ते उठले आणि थोड्या अंतरावरच्या दुस-या आसनांवर जाऊन बसले. नंतर तिकडून वाद-विवाद कानावर येत होते. पण सगळ्यांनाच लढाया जिंकता येत नाहीत आणि नेहमीच सत्याचा विजय होतो असे नाही, त्यामुळे नंतरही ते अतिमहत्त्व तिथेच वास्तव्य करून असल्याचे दिसत होते. मनस्ताप संपण्याची लक्षणं दिसत नव्हती. जर प्रतिसाद अपेक्षेपेक्षा जास्त मिळाला होता तर विशेष आमंत्रित इतके कशाला बोलावलेत असं विचारल्यावर उत्तर मिळाले होते की हे विशेष आमंत्रित आशाताईंचेच असतात, त्यांना आम्ही कसे नाही म्हणणार? आता ही उत्तरे देणारे सचिन ट्रॅव्हल्सचे अधिकृत लोक होते की भलतेच कुणी होते हेही कळायला मार्ग नव्हता. आणखी एकीला याच प्रश्नाचे उत्तर मिळाले की तिथल्या पोलिसांनीच सांगितलं आमचे 80 लोक सोडले नाहीत तर कार्यक्रम होऊ देणार नाही, म्हणून त्यांना सोडावे लागले. पोलिसांची रीतसर परवानगी घेऊनच कार्यक्रम होणार होता मग या धमकीला बळी पडण्याचे कारण काय? उलट-सुलट विचारांनी डोकं भणभणून गेलं. याच दरम्यान समदु:खींचे दूरध्वनी क्रमांक, पत्ते, ईमेल पत्ते लिहून दिले-घेतले गेले आणि नंतरही याचा पाठपुरावा करायचे ठरले.
आणि.... इतक्यात दुधाळ रंगाच्या चमचमत्या साडीतल्या आशाताई सुधीर गाडगीळांसोबत मंचावर अवतरल्या. बंदिस्त स्टुडिओतील कोजागरीच्या चंद्र-चांदण्याची कमतरता क्षणात भरून निघाली. सभागृह आपल्या लाडक्या व्यक्तिमत्वाच्या सन्मानार्थ उठून उभे राहिले. अगदी जवळून आशाताईंचे दर्शन घडले. आशाताई रसिकांशी अगदी थेट संवाद साधत तब्बल तीन तास गायल्या. 'मी आशा..' या नव्या गाण्याने सुरुवात करीत 'मागे उभा मंगेश', 'का रे दुरावा', 'मलमली तारुण्य माझे', 'आज कुणी तरी यावे', 'विसरशील खास मला', 'चांदण्यात फिरताना', 'कधी रे येशील तू', 'तरुण आहे रात्र अजुनी', 'पांडुरंग कांती', 'गोमू संगतीनं', 'जांभुळ पिकल्या झाडाखाली', 'रेशमाच्या रेघांनी', 'बुगडी माजी सांडली गं', 'उष:काल होता होता', 'कठिण कठिण किती', 'शूरा मी वंदिले', 'चांदणे शिंपीत जाशी', 'नाचनाचुनी अती मी दमले', 'जिवलगा राहिले रे दूर घर माझे' अशी विविधता असलेली एकाहून एक सरस गाणी त्यांनी पेश केली. रसिक श्रोत्यांच्या आग्रहाला 'दोन ओळी तरी गाते' असं म्हणून त्यांचं मान देणं सुखावत होत. मध्येच विनोद, कधी सुखदु:खाच्या गप्पागोष्टी, गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळेच्या आठवणी यात रसिकांना त्या अगदी सहजपणे सामील करून घेत होत्या. 'रसिकांच्या प्रेमामुळेच मी आजवर अकरा हजारांवर गाणी गाऊ शकले' असं सांगून त्यांनी उपस्थित-अनुपस्थित रसिकांना जो बहुमान दिला त्यामुळे आधीचा मनस्ताप, अपमान, भांडणं याचा काही काळ का होईना अगदी पूर्ण विसर पडला. दु:ख- भोग आशाताईंनाही चुकले नाहीत. त्यांनीच ऐकविलेल्या ' भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले' या ओळींची सार्थकती पटली. 'उष:काल होता होता काळरात्र झाली' या गाण्यानंतर आशाताईंनी सांगितलं ' मला माझ्या वयाच्या पंचाहत्तरीतही आयुष्याच्या मशाली पुन्हा पेटवाव्याश्या वाटतात.' खूप टाळ्या दिल्या रसिक श्रोत्यांनी त्यांच्या या उद्गाराला! तेव्हाच ठरवलं मशाली पेटत्या ठेवायलाच हव्यात. भांडणं, मनस्ताप, फसवणूक, गृहीत धरलं जाणं, एकतर्फी निर्णय लादला जाणं... काहीच विसरता कामा नये. आजूबाजूला मशाली पेटूच न देणारी, पेटल्या तरी त्या विझवायच्या प्रयत्नात असणा-यांची संख्याही अधिक आहे. आपण पडलो सामान्य. पण सामान्यांच्या जगी ही असामान्य सामर्थ्य वसत असते याचीही जाणीव शांता शेळक्यांनी पूर्वीच करून दिलीय. हे सारं विसरता कामा नये.
आता एक शंका अजून डोकं वर काढू लागली, आशाताईंचं गाणं ऐकलं की लोक सगळं विसरून जातील हेही संयोजकांनी गृहीत धरले होते की काय? असं असेल तर चक्क आम्हाला फशी पाडण्यासाठी आशाताईंचाही वापर केला गेला होता असेच म्हणावे लागेल. हे तर फारच भयंकर होते. आशाताईंपर्यंत सुरुवातीच्या वादळाची खबरबात पोहोचू नये, त्यांच्यासमोर सगळं कसं सुरळीत पार पडावं हे प्रयत्न या संशयालाच बळकटी देत होते.
आशाताईंच्या कार्यक्रमात त्यांच्यासोबत मिलिंद इंगळेंनीही थोडा गारवा आणला. ऋषिकेश रानडेंचीही छान साथ होती. त्यांनी 'शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती' गाऊन पुन्हा निर्भयतेची याद ताजी करून दिली. गाणी तीच पण सुरुवातीच्या कटु प्रसंगांमुळे त्यांचे संदर्भ कसे सतत त्याच त्या विचारांभोवती घुटमळत होते. सल असातसा नव्हताच.
कार्यक्रमाबद्दल वर्तमानपत्रातून वृत्तांत आला. आशाताईंच्या गाण्याबद्दल खूप छान आणि भरभरून लिहिलं गेलं. त्यात सुरुवातीच्या वादळाचा ओझरता उल्लेख आला. कित्येकांना तो दुधात पडलेल्या माशीसारखा वाटला असेल, पण त्याचा ओझरता का होईना उल्लेख करणं भाग पडलं हे विशेष. तसा हा मामला अनुल्लेखाने मारण्यासारखा किंवा मरण्यासारखा नव्हताच. पण त्या उल्लेखामध्ये श्रोते-प्रेक्षक नाराज होते आणि त्यांनी आसनांवरून भांडणं केली असा सूर दिसला. प्रत्यक्षात त्यांची भूमिका काय होती, संयोजकांच्या चुका काय होत्या हा कुणाच्या लेखाचा विषयच नव्हता. शेवटी श्रोते-प्रेक्षक असंघटित, त्यांच्याशी कसेही वागले तरी ते काय करू शकतात? ही वृत्ती बळावू नये, तिकिट काढून कार्यक्रमाला येणा-यांनीही आपल्या हक्कांबाबत जागरूक असावे, निदान एकदा घडले हे पुन्हा घडू नये इतपत समज संयोजकांनाही यावी यावर विचार कसा होणार? लोक लवकर अशा घटना विसरतात. पुन्हा-पुन्हा फसतात. मलाही नंतर अंधुकसं आठवलं की आधीच्याही एका कार्यक्रमात खूप काही तरी गोंधळ होता असं कुणीतरी सांगितल्याचं ! म्हणजे आपणच मूर्ख. स्वत:चा मूर्खपणाही मान्य करून टाकला अगदी त्या सतराव्या रांगेसारखा.
ऑफिसमध्ये गेल्यावर सगळ्यांनी विचारलं, कार्यक्रम कसा झाला म्हणून. विशेष काही बोलावं असं वाटत नव्हतं. चर्चेत कळलं की दरवर्षीचंच आहे हे. कार्यक्रम खुल्यावर जाहीर करायचा मग रात्री 10 नंतर खुल्यावर कार्यक्रम करायला परवानगी नाही म्हणून तो बंदिस्त करायचा. जाहिरातीत स्वप्नवत चित्र उभं करायचं. लहान मुलांसह सगळे, आबालवृद्ध कार्यक्रमाला कसे आरामात येऊ शकतात हे ठासून सांगायचं. भरमसाठ विशेष आमंत्रित बोलवायचे, भरमसाठ तिकिटं खपवायची आणि पैसे खर्च करून येणा-या रसिक प्रेक्षकांची कोंडी करायची. हे म्हणे नेहमीचेच आहे. कदाचित एकदा कार्यक्रमाला येऊन गेलेले लोक परत कधी तिकडे फिरकत नसतील पण नवे-नवे बकरे सापडतातच ना! हे जर दरवर्षीच असं होत असेल तर यशवंत देवांची कविता, 'दर वर्षी येत होतो पुढच्या वर्षी येणार नाही' थोडी बदलून म्हणावं वाटलं, 'इतकी वर्ष येत नव्हतो, दर वर्षी येणार आहे.' जाऊ, पुढच्या वर्षीही नक्की जाऊ, अधिक सावध, अधिक संगठित होऊन. बघूच, कालचा गोंधळ बरा होता असा अनुभव येतो की खरंच या अनुभवातून नीटनेटक्या संयोजनाचे काही पाठ गिरवले गेल्याचे जाणवते ते!
एका वयोवृद्ध जोडप्याची प्रतिक्रिया तर फारच विषण्ण करणारी होती. त्यांना सगळीकडच्या प्रचंड रांगांचा इतका त्रास झाला की ते म्हणाले, 'यांनी तिकिटे काढताना म्हाता-यांनी येऊ नका असे सांगितले असते तर फार बरे झाले असते. आम्ही आशाताईंचे गाणे म्हणून आलो.' आशाताईं आपल्या स्वरलहरींचे चांदणे शिंपीत गेल्या ख-या, पण कित्येकांवर पूनम सहलीचा चांद मातला मातला म्हणायचीच वेळ आली. म्हणूनच वाटलं आपण मात्र घेतला वसा टाकून चालणार नाही. मशाली पेटविण्याचा वसा.