तर त्यात गैर ते काय?

मीना प्रभू आणि हातकणंगलेकर यांचा अध्यक्ष पदाच्या साठमारीचा खेळ (किंवा कलगी तुरा म्हणा) मन विषण्ण करून गेला. हे तथा कथित बुद्धिवादी (आजकालचे बुद्धिवादी म्हणजे मास्तरकी करणारे, पुस्तके खरडणारे आणि राज्य सरकारचे लाळघोटे पणाने पाय चाटून मिळणारा तुकडा चघळणारे), मराठी भाषेचे रक्षण कर्ते.  वर शहाजोग पणे पत्रके काढून ’मला निवडणूक लढवायची नव्हती’ ’माझ्या चाहत्यांनी आग्रह केला म्हणून’ अशी टिमकी वाजवणारे (अग अग म्हशी मला कुठे नेशी). अरे म्हणा की ’हो मला हाव आहे अध्यक्ष बनायची’ ’माझी लाळ टपकते आहे सरकारी तुकड्यात वाटमारी करायची’

(मीना प्रभू आणि हातकणंगलेकर) दोघेही एकाच माळेचे मणी, आपण रसिकांनी ह्याना डोक्यावर घेतले आहे. ह्यांना आता जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे.

कथा, कादंबरी, कविता, नाटक छान वाटले. दमडा मोजून विकत घेतले. ह्या आम्ही मोजलेल्या दमड्या तुन आणि भरलेल्या करातून (सरकारला) तुमच्या चुली पेटत आहेत आणि मुले बाळे जगत आहेत, हे लक्षात ठेवा, माज कसला करताय लेकांनो, लायकीने जगायला शिका. उगाचच नसते आव आणू नका.

त्यात वर अजून प्रभू बाई पत्रक बाजी करत आहेत, कोर्टाची भाषा करत आहेत. मला तर वाटते ह्या चांभाराच्या देवाची खेटरांनीच पुजा बांधली पाहिजेत. ह्यांच्या लेखी मराठी ही मरत चाललेली भाषा आहे, मग तुम्ही कोण?

ह्यांचे सगळे सोहळे बंद केले पाहिजेत. निवडणुका नकोत, संमेलन नको आणि फुकटचा खर्च ही नको. राज्य सरकारने सुद्धा ह्यांच्या पुढे फुकटचे टाकलेले तुकडे,  मानधने, आरक्षित भुखंडे, अनुदाने, सगळे बंद केले पाहिजेत. असेल हिंमत तर चांगले लिहा, लोकांना विकत घ्यावेसे वाटेल असे प्रसवा आणि ताठ मानेने जगा. अन्नछत्रात जेवायचे वर ’मराठी रक्षणाचे’ मिरपूड मागायचे.

स्वत:ला सरस्वतीचे पूजक समजणारे, खरे तर पोकळ बुद्धी वादाचे आव आणून समाजाचे रस (आणि पैसा) शोषणारे आहेत. 

हातकणंगलेकरांनी प्रभू बाईंनी पैसे वाटल्याचा आरोप केला. कीव येते ह्या लोकांची. शाळेत शिकले होते, साहित्य सेवा हीच ईश्वर सेवा, साहित्याची सेवा करणारे आदरणीय, पूजेस प्राप्त. आता वाटते साहित्य संमेलनाची आणि नगरपालिकेची निवडणुक सारखीच....

पण झाले ते बरे झाले, ह्या लोकांची अब्रू ह्यांनीच वेशीवर टांगली. रसिक जनांचे डोळे उघडले, साहित्यिक म्हणजे कागद काळे कडून पैसे कमावणारा, सत्ते साठी हपापलेला सामान्य माणूस, त्याला समाजात वेगळे आदराचे आणि मानाचे स्थान द्यायची गरज नाही.... असा समज कोणी करून घेतला तर त्यात गैर ते काय?

ता. क.: शुद्धलेखनाच्या चुका आहेत, क्षमस्व.

(काही भाग वगळला. मनोगतावर आपले लिखाण करताना कृपया सभ्य आणि सौम्य भाषेचा वापर करावा. : प्रशासक)