आनन्दाचे डोही

           'कधी वाटतं आयुष्य नुसतंच वाहून गेलं

  मला जगायचंय, मला जगायचंय म्हणताना जगणंच राहून गेलं'

 किती खरंय हे सध्या 'खूप बिझे आहे यार' हे वाक्य 'इंडिया शाईनिंग' पेक्षा जोरात आहे. म्हटलं तर याचा परस्परसंबंधही खूप जवळचा आहे. पण कधी वेळ मिळालाच विचार करायला, तर, वाटतं, बिझी असणं हे खरंच जगणं की जगायचा आटापिटा करणं? आणि जगणं म्हणजे तरी काय? माझ्यासारख्या सामान्यबुद्धीची व्यक्ती म्हणेल, 'निर्मल आनंद'. हो, डोकं शिणवूनही आपली पाटी कोरेच राहत असेल, वर मूळ प्रश्नाला कपाळावरच्या आठ्यांच्या जाळीत अडकून पडायला होत असेल, तर 'निर्मल आनंद' हे सोपं सुटसुटीत उत्तर आहे.

यशोदेलाच कृष्णाच्या आ वासलेल्या तोंडात विश्वदर्शन का झालं? कारण तिला आपल्या मुलाच्या बघण्याची इच्छा झाली, म्हणून. तिला अशी इच्छा का झाली? सोपं आहे, वेळ होता म्हणून. इंटरेस्ट होताच. पण समजा, त्यावेळेसंच नेमका तिचा मोबाईल पचकला असता संधी सधून किंवा तिचं ऑफिसचं मस्टर काउंटडाऊन सुरू झालं असतं तर काय उपयोग होता त्या इंटरेस्ट असण्याचा तरी? जोक्स आपार्ट, पण असं कितीदा तरी होतं, ह्या जगण्याचा जाणता क्षण स्वच्छ चेहऱ्याने आपल्याकडे बघतो, हसतो, हात पुढे करतो. आपण मात्र लक्ष नसल्यासारखे सरळ पुढे निघून जातो. समोर वळणावर कळतं, "अरे,  आपण आपल्या शिदोरीतला सुंदर क्षण मागे सोडून दिलाय. एवढ कशाच्या मागे होतो आपण?" आता हा प्रश्न कित्येकांना कित्येक वर्षं सुटत नाही, तो तेव्हा सुटणार असतो? कधी जीवनच लोभावून बघते आपल्याकडे आणि आपण उगीचच गर्दीत हरवलो असतो. पण कधी मात्र आपण नेमका, सुंदर क्षण वेचतो आणि आपल्या आठवणींच्या शिदोरीत ठेवून देतो. मग तो सखा होतो आपला, आणि जेव्हा मन आठवू लागते,'अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा' तेव्हा तो पाठीवर हात ठेवून मागे उभा राहतो. म्हणतो, "बघ. मी आहे इथे". आपण मागे वळून बघतो. असे कितीतरी असतात तिथे शुभ्र, उजळलेले सोबती. निर्मल आनंदाची ऊब देणारे. एकजात जे जे चांगलं, त्याची सावली असणारे जाणते क्षण.

माझ्याकडे एक सुरेखशी पेटी आहे माझ्या आईची. मी मागून आणलेली. त्यात आहे वाळकी फुलं, छोटेछोटे शंख-शिंपले, मऊ पिसं, पाढरे छोटे खडे, रंगीत काचेचे मणी, मोती. हा माझा हुकुमी निर्मल आनंद. मला माझ्या साडेचार वर्षाच्या मुलाने वेळोवेळी दिलेली 'गिफ्ट्स' आहेत. कुठेकुठे धडपडत आपल्या आईसाठी त्याने ती आणली आहेत. यातले एकेक वस्तू माझ्या तळव्यावर ठेवतांना त्याच्या काळ्याभोर बोलक्या डोळ्यात मला दिसलं होतं प्रेम. अगदी साऱ्या जागात पसरवलं तरी पुरून उरेल इतकं प्रेम आणि " आई, हरवू नकोस हं" सांगतांना आभाळाइतका विश्वास. हे बघातांना न चुकता एक आठवण दार ठोठावते. तो तेव्हा तीन-साडे तीन वर्षाचा असेल. शुभंकरोती झाल्यावर त्याने माझ्या पायांना स्पर्श केला. मे त्याची पापी घेत म्हटलं," खूप खुप मोठा हो." गाल चोळत काहीशा नाराजीने म्हणाला," असं म्हणत जाऊ नकोस. मला आवडत नाही." मी आश्चर्याने विचारलं,"कारे?". तर म्हणाला,"मी मोठा होईन तेव्हा तू म्हातारी होशील. हो नं?" मी म्हटलं, हो तर?". "मग मी आणखीन मोठा होईन तेव्हा तू आणखीन म्हातारी होशील, मग एके दिवशी मरून जाशील. त्यापेक्षा मी छोटाच राहिलेला आवडेल मला." मी थक्कच झाले! त्या चिमुरड्याचे विचार थांबले तिथे माझे सुरू झाले. माझं मन आई झालं. म्हणालं "बाळा, 'आईचं ऋण' हा जो काही प्रकार असतो असं ऐकलंय, त्या ऋणातून, जा, मी तुला आज मुक्त केलंय."

तीन एक वर्षापुर्वी माझी आजी गेली. म्हटलं तर चुलत म्हटलं तर सख्खी. नव्वदीला आलेली, सर्व विसरत गेलेली आजी. तिच्या तेराव्या दिवशी आम्ही नातवंडांनी एकत्र बसून श्लोकपठण केलं, पसायदान म्हटलं. मामाने सर्वांच्या हातात एकेक रेशमी थैली दिली. म्हटल "हे काय?" तर ती होती आजीची इच्छा. 'आपल्याला किती नातवंडं आहेत' हे सुद्धा न आठवणाऱ्या आजीची इच्छा. आपल्या अंगावर जितकं सोनं आहे तितक्या सोन्याची एकेक वळी करून आपल्या नातवंडांना देण्यात यावी, ही इच्छा तिने एकदा व्यक्त केली होती आणि माझ्या मामाने ती पूर्ण केली. मी ते वळं बोटात घातलं. वर्षानुवर्षे आजीच्या अंगावर झिजलेलें हे सोनं. आजीच्या सतत देत आणि करत राहणाऱ्या हातांची साक्ष देणारं हे सोनं. 'इतरांसाठी त्याग' हा आज आपल्यासाठी न पेलवणारा, न परवडणारा शब्द आहे. पण केलेल्या त्यागाची जाणीवही नसणाऱ्याआजीचं जुनं सोनं. सर्व कसोट्यांवर उतरणारं‌ शुद्ध. तिच्यासारखंच. कुठेतरी तिचा अंश माझाजवळ सतत आहे हा दिलासा देणारं.

त्या संध्याकाळी माझ्या छोट्याशा भाचीला घेऊन मी पार्कमध्ये जात होते. तिने आपला तळवा माझ्या हनुवटीला लावून 'पा-पा' केले. माझं लक्ष तिच्या पायाकडे गेलं. तिच्या बुटाचा बंद निघाला होता. आली पंचाईत. हे ध्यान अजून उभं राहत नाही. एका हाताने बंद बांधता येत नाही. कुठे ठेवावं हिला? मी रस्त्यावर बघू लागले. थोड्याच वेळात मला रस्त्यावर ट्रायसिकल चालवत येणारी एक मुलगी दिसली. बहुतेक एक पाय नव्हता तिला. तिला बघून माझा प्रश्न मात्र मिटला."एक्सक्यूज मी", मी आवाज दिला."एक मिनीट जरा धरता हिला? बुटांचा बंद बांधते". "हो, हो, जरुर." तिने अतिशय आनंदाने माझ्या भाचीला मांडीवर बसवले. त्या आनंदाची लागण झाल्यासारखी माझी गोड भाची अधिकच गोड हसली. बंद बांधतांना तिने मुद्दामहून दोनचरवेळा पाय झटकून बंद सोडवून घेतला. मग दुसरा पाय पुढे केला. 'कशी गम्मत केली' या आविर्भावात ती त्या मुलीकडे बघून खुदुखुदू हसत होती. तितक्यात ओळखीच्या काकू दिसल्या. मी त्यांच्याशी चार शब्द बोलले. मग माझ्या बुटांचा निघत आलेला बंद बांधला. एवढा वेळ त्या दोघी अगदी मजेत होत्या. मी भाचीला घ्यायला हात समोर केले. ती माझ्याकडे आली आणि ओठांवर बोट ठेवून तिला अच्छा करू लागली. मी म्हटल, "थॅक यू." ती पटकन मान हलवत म्हणाली, "नाही, नाही आय शुड से धीस. थॅक यू व्हेरी मच."  तिने माझे आभार का मानले, आणि ते ही इतके मनापासून? हा थुईथुई उडणारा आनंदाचा ठेवा सांभाळायला दिल्याबद्दल की कुणी आभार मानायची संधी मी तिला दिल्याबद्दल? हळूहळू आपण किती आरोग्यसंपन्न आहोत याचा साक्षात्कार मला होऊ लागला. काही गोष्टींवर आपण आपला जन्मजात अधिकार समजतो ते किती चूक आहे. आपल्याला देवाने शारिरीकदृष्ट्या सक्षम बनवले याचा इतका आनंद मला ह्यापुर्वी झाला नव्हता. ते तिचं 'थॅक यू' नेहमी मला ह्या आनन्दाची दखल देतं.

मी कॉलेजमध्ये असतांना आम्ही पायऱ्यावर घोळक्याने बसून गप्पा करत होतो. मला काय लहर आली कुणास ठाऊक! मी अगदी तावात म्हटलं, " वो रागिणी नटराजन है ना," आणि वाक्य संपायच्या आधीच माझ्या पायावर मधुराचा पाय पडला, नव्हे तिने दाबला. माझी गाडी बंद पडली. माझ्या थोडं समोर बसलेल्या एक जाड वेणी घातलेल्या मुलीने मागे वळून पाहिले. काहीश्या थट्टेने तिने विचारले, "पता भी है, कौन है रागिणी नटराजन?" मला धक्काच बसला. तीच तर होती. ही इथे कधी येऊन बसली? आणि मी आपली... माझ्या एकंदर आविर्भावावरून मी जे काही बोलणार होते ते रागिणीला आवडलं असतं यावर कोणाचाही विश्वास बसला नसता. पण हर्षाने पुढाकार घेतला. "यू नो रागिणी, इसकी एक स्पेशियालिटी है. यह हमेशा सबके बारे में अच्छाही बोलती है." "हो? हे मला नव्हतं माहिती. इनफॅक्ट मी तर ... आणि मग कूलूप लागलेल्या माझ्या तोंडाला सावरायला अवसर मिळावा म्हणून माझ्या मैत्रीणींनी इतका चांगुलपणा मला बहाल केला! त्यांची मला सांभाळून घ्यायची धडपड बघून आनंदाने माझ्या डोळ्यांत पाणी आलं. प्रत्येकीने वर्णन केलेले गुण माझे नसून त्यांचंच आरशातलं प्रतिबिंब आहे, असं मला वाटू लागलं. शेवटी रागिणीच हसत म्हणाली, "ओके,ओके, आय ऍम कंव्हिंस्ड. इसने इतने सपोर्टिंग दोस्त बनाये हैं, इसलिये तो कम से कम मुझे इससे दोस्ती करनी पडेगी." आणि तिने शेकहॅंडसाठी हात समोर केला. आमची मैत्री जुनी झाल्यावर तिने मला त्या प्रसंगाबद्दल विचारलं. "लेक्चर के बीच स्टुपीड सवाल पूछकर क्लासको और टिचरको डिस्टर्ब करती है." मी वाक्य पूर्ण केलं आणि आम्ही दोघी टाळी देऊन मनापासून हसू लागलो. त्या हसण्याचा 'एको' अजूनही कानांत आहे.

शाळेत असतांना आईस्क्रिमपार्लरसमोर गाड्या पुसण्याचं काम करणाऱ्या छोट्या मुलाला पॉकेटमनीमधला पैसापैसा जोडून आईस्क्रिम खिलवणं आठवलं की त्याच्या डोळ्यातली आनंदाची चमक आठवते.

पेंटिंग करत असतांना हवा तो इफेक्ट जमत नाहीये म्हणून स्वतःवर धुसफूस करत वैतागलेली असतांना त्या छोट्या मुलाचं जवळ येऊन लाजत कानांत सांगणं "ताई, तू मला खूप आवडतेस" अजूनही ते पेंटिंग बाघितलं की आठवतं. वाटतं त्या मुलाचं ते म्हणणं नाहीचे. जीवनच म्हणालं तसं. तो हसरा, लाजरा चेहरा आठवला की एरव्ही  आपल्यातल्या, इतरांतल्या, आपल्या जगण्यांतल्या खुपणाऱ्या गोष्टी लहानखुऱ्या होऊन जातात. येतो तो टवटवीत चांगुलपणाचा सुगंध.

अशा कितीतरी गोष्टी आनंद देऊन जातात आणि एक विश्वास, 'आपण चांगले आहोत" हा. 'आपण चांगले आहोत' हा विचार आपल्याला मोठं करतो, खरंच 'चांगलं' व्हायला प्रवृत्त करतो कारण आपण खरेच देवाची लाडके असतो नं.

रोज असे  कितीतरी मुठीत मावण्याइतके छोटे-छोटे आनंद आपल्याकडे बघून निर्व्याज हसतात कधी हिरव्या गवतात डोलणारं लिलीचं गुलाबी फूल किंवा चौफेरी मोगऱ्याची टपोरी सुगंधी कुपी, पांढऱ्या फुलांचा हळूच डोकावून बघणारा झुबका. कधी आपलं मूल अतीव लाडात येऊन आपल्याला मिठी मारतं. कधी कॉमनवॉलवर असणाऱ्या पण आपल्या आवडत्या वेलीला पहिलं फूल वळवून ठेवतात आणि आपण दार उघडण्याची वाट बघत तिथेच रेंगाळत राहतात. कधी पिटुकला गुटगुटीत चिमणा आपल्या स्वैंपाकघराच्या खिडकीशी बसून "हे काय, बाहेरची ताटली रिकामी आहे, काय करत असतेस दिवसभर?" अशा अर्थाचा गोंगाट करत असतो. कधी आपण आपल्या कुटंबांबरोबर गप्पा करत असतांना आपली आपली बम्हानंदी टाळी लागली असते. कधी खूप सुंदर गाणं रेडियोवर लागतं आणि आपल्याला एखादा जुना मित्र भेटावा इतका आनंद होतो. कधी "चला आज आपण आपल्यालाच खुश करून टाकावं" म्हणून मी नर्सरीत जाते आणि मला आवडणारी तोपं घेऊन येते. कधी एखादं सुंदर पुस्तक मी वाचलेलं असतं आणि मी ते इतरांना देते तेव्हा मला मिळतं ते नव्याने पुस्तक वाचल्याचं समाधान. आपल्या वाढदिवसाला आपल्यासाठी नव्हे तर भेटायला येणाऱ्यांसाठी पदार्थ करतांना आपण मोठे होत असल्याची प्रसन्न जाणीव. किती सांगावे?

असे कितीतरे क्षण येतात आणि चैतन्याची पेरणी करून जातात. धुसमुसळा वारा सांगावा आणतो, दूर कुठेतरी पाऊस पडतो आहे आणि केसांच्या बटा गुंतवून टाकतो. न दिसणाऱ्या पराग-कणांबरोबर माझे मनही मला बरोबर घेऊन वाऱ्याच्या हातात हात घालून त्या आनंदी जगाचा फेरफटका मारायला निघून जाते. पाऊस येवो, न येवो, मन गुणगुणते,

  "मी मधुमालतीचा अमृतमय देठ, मी मातीच्या बाळगंधाची वाट

   मी क्षणात हसता ऊन पडे ते हिरवे, मी नजर उचलता फडफडती पारवे

   मी घुमते, फिरते, सर होऊन कोसळते, नि वाऱ्यासंगे सुगंध होऊन न्हाते"

         मन गुणगुणते.

         माझा परत 'रिप व्हॅन विंकल' होईपर्यन्त.