सन २८ नोव्हेंबर २०००, बरोब्बर सात वर्षांपुर्वी डॉ. रॉबर्ट मॅकमिलन एक परीक्षण पुर्ण करून उत्साहात होते. हाच तो शोध होता जो त्यांना खगोलाभ्यासकांत मान मिळवून देणार होता. गेले वर्षे ऍरिझोना विद्यापिठात चालणाऱ्या "स्पेसवॉच" या उपक्रमाचे ते प्रमुख होते. 'नेपच्युनबाह्य वस्तु' या विषयावर काम करणाऱ्या ह्या उपक्रमाच्या नावावर आजपर्यंत "६०५५८ सेशल्स", "५१४५ फोलस", "स्पेसवॉच धुमकेतु" इ. शोध होते. मात्र आज डॉक्टरसाहेबांना मिळालेली वस्तु एका नव्या "लघुग्रहसदृश गोला"चा जन्म होता.
डॉ. मॅकमिलन, यांना हा शोध मानवी पडताळणी करताना लागला. सद्ध्या वापरण्यात येणारी मानवरहित निरिक्षण प्रणाली, इतक्या अंतरावतील इतक्या कमी वेगात फिरणारी वस्तू ओळखू शकत नाही. (त्यासाठी एक दुसरी प्रणाली वर्षाकाठी वापरली जाते.) पण असा हा किचकट शोध डॉ. साहेबांनी मानवी निरिक्षणशक्तीच्या जोरावर लावला. सन २००१ मध्ये याला नेपच्यूनबाह्य लघुग्रहाचा दर्जा देण्यात आला. तेव्हा नेपच्यूनच्या पुढचा प्लुटो आणि शॅरोन (प्लुटोचा उपग्रह) नंतरचा वरूण हा सगळ्यात मोठा ज्ञात गोल होता.
याला लघुग्रह म्हनून मान्यता मिळाल्याने त्याला स्वतःच नाव असण्यास मान्यता मिळाली. वेगवेगळी नावं पुढे आली पण लघुग्रहांच्या नामकरण संस्थेने एम. साराभाई यांनी सुचवलेलं "वरूण" हे नाव निवडलं! "(२००००) वरुण"! आकाश, पर्जन्य, नदी आणि सागराची हिंदू देवता "वरुण" यावरून या गोलाचं नाव वरुण ठेवलं गेलं. तर अश्या या आद्य वरुणाची ही थोडिशी माहीती!
गेल्या दहा वर्षात, नेपच्यून ग्रहाच्या पुढे असणाऱ्या लहानमोठ्या वस्तुंबद्दल बरीच माहिती गोळा होत आहे. या दशकात अश्या सुर्याभोवती फिरणाऱ्या पण आकाराने ग्रहांच्या मानाने लहान पण लघुग्रहांच्या मानाने मोठ्या अश्या गोलांची संख्या वाढतेच आहे. अश्या 'नेपच्युनबाह्य वस्तु' खगोलाभ्यासकांत 'कुपर पट्यातील वस्तु' म्हणून ओळखल्या जातात. या पट्ट्याकडे शास्त्रज्ञांचं आणि खगोल अभ्यासकांचं लक्ष गेलं ते त्याच्या विशिष्ठ गुणधर्मामुळे. याच पट्ट्यातून 'अल्पजीवी धुमकेतुं चा जन्म होतो असा शास्त्रज्ञांचा कयास होता व आहे. त्यानिमित्ताने सूर्यमालेच्या या भागाचे निरिक्षण करता करता असे अनेक गोल सापडले ज्यामुळे हे सिद्ध झालं की "ग्रह" या शब्दाच्या जुन्या (२००६ पुर्वीच्या) व्याखेत हे सगळेच गोल येतात.
यासाठी सन २००६ मध्ये 'बटुग्रह'१ (ड्वार्फ प्लॅनेटस) नावाची संज्ञा तयार केली गेली. आणि या व्याखेत बसणारे आतापर्यंत तीन गोल सूर्यमालेत आहेत, प्लुटो, सेरिझ, आणि इरिज. सन २००६ नंतर प्लुटो हा ग्रह उरला नाही तर बटुग्रह आहे. यापैकी इरिज हा सर्वात मोठा बटुग्रह आहे. इरिझ हा प्लुटोच्याही पुढे 'विखुरलेल्या गोलांच्या पट्ट्यात' येतो.[हाच तो ज्याने दहावा ग्रह असल्याचा 'ग्रह' पसरवला होता] आणि सेरिझ हा लघुग्रहाच्या पट्ट्यातील सर्वात मोठा लघुग्रह (त्याला २००६ नंतर बटुग्रह संबोधण्यात आलं).
आकृती१: वरुणाची एरिझ, प्लुटो इ. नेपच्यूनबाह्य गोलांबरोबर आणि पृथ्वीबरोबर तुलना.
सध्या वरुण हा सूर्याभोवती फिरणाऱ्या नेपच्यूनबाह्य वस्तुंमधील आठवा मोठा गोल आहे. हा गोलसदृश (पण लंबगोलाकार नाही) मार्गातून भ्रमण करत असून त्याचा बृहदअक्ष ४३ ख.ए. (खगोलिय एकक) इतका आहे. वर दिलेल्या आकृती मध्ये निळया रंगांत वरुणाची कक्षा, लाल रंगात प्लुटोची कक्षा आणि करड्या रंगात नेपच्यूनची कक्षा दाखवली आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे प्लूटो आणि वरुणाचा झुकाव मात्र जवळ जवळ एकसारखा असला तरी वरुणाची कक्षा ही नेपच्युनला बऱ्याच अंशी समांतर असून प्लुटो मात्र नेपच्यूनकक्षेला छेदतो.
वरुणाचे परिभ्रमण २८३ पृथ्वी-वर्षे आहे तर परिवलन ३.१७ पृथ्वी-तास इतके जलद आहे. इतक्या जलद गतीने परिवलन करणारा गोल अंडाकृती असला पाहिजे अशीच शात्रज्ञांची समजुत होती. परंतु नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार अशी शक्यता कमी दिसते. याचं कारण म्हणजे नुकतच यावर्षी दाखल झालेलं एक श्वेतपत्र! त्यानुसार, वरुणाची घनता केवळ १००० कि.मी./मी३ इतकी कमी आहे. (याच कारण वरूण छिद्रमय असल्याचं बोललं जातय.) वरुणाचा पृष्ठभाग हा बऱ्याच अंशी लाल आहे. पण हा गोल क्युपिअर पट्ट्यातील इतर गोलांच्यामानाने फारच गडद आहे. याचाच अर्थ त्यावर बराच बर्फ आहे असा लावला गेलाय. पण हा शुष्क बर्फ आहे की पाण्याने बनलेला हे कळलं नसलं तरी यागोलावर पाण्याने बनलेला बर्फ काही प्रमाणात नक्की आहे हे सिद्ध झालं आहे.
जर हा गोल चौथा बटुग्रह म्हणून सिद्ध झाला तर आपल्या सूर्येमालेतील क्रमात प्लुटो आणि इरिज मध्ये हा वरूण नावाच्या एका भारतीय नाव असलेल्या गोलाची भर पडेल.
१ :
बटुग्रहाची व्याख्या:
एखादी खगोलिय वस्तू बटुग्रह म्हणून संबोधली जावी जेव्हा,
अ. ती सूर्याभोवती फिरते.
ब. त्याचे स्वीय गुरुत्वाकर्षण घटक पदार्थांच्या ताठपणावर मात करण्यास पर्याप्त असावे. अशा प्रकारे द्रवस्थितिशास्त्राचा समतोल साधणारा त्याचा आकार (म्हणजे जवळपास घन गोलाकार) असावा.
क. त्याने आपला परिवलन मार्ग मोकळा केला नसल्याने गुरुत्वीय स्वातंत्र्य मिळालेलं नाही.
ड. हा उपग्रह नाही.
ग्रह आणि बटुग्रहात फरक म्हणजे व्याख्येतील 'क' हा घटक. ग्रहांनी गुरुत्वीय स्वातंत्र्य मिळवलेलं असतं. प्लुटोने असे स्वातंत्र्य मिळवलेले नाही. इतर 'प्लुटोनियन्स' अजून मार्गिकेत आहेत.
२ :
सद्ध्या आपली सूर्यमाला पुढील प्रमाणे आहे:
सूर्य (मुख्य तारा) - बुध (ग्रह) - शुक्र(ग्रह) - पृथ्वी(ग्रह) - मंगळ (ग्रह) - लघुग्रहांचा पट्टा - सेरिझ (बटुग्रह) - गुरू (ग्रह) - शनी (ग्रह) - युरेनस (ग्रह) - नेपच्यून (ग्रह) - प्लुटो (बटुग्रह) - एरिझ (बटुग्रह) [याशिवाय अनेक धुमकेतू आहेतच]
- संदर्भसुची
विकिपिडिया
स्पेसवॉच ऍरिझोना यांचे संकेतस्थळा
डेव जेविट यांच्या संकेतस्थळावरील श्वेतपत्र
**हा माझा शास्त्रिय विषयावरचा पहिलाच लेख आहे. यासाठी उपक्रमावरचे श्री. धनंजय व श्री.टग्या यांची मदत झाली - खरंतरं हा लेख २८तारखेलाच टाकणार होतो. पण आधीच पूर्ण झाला त्यामुळे उत्सुकतेपोटी लगेच मनोगत व उपक्रमावर टाकतो आहे.