त्या फुलांच्या गंधकोषी

त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का ?
त्या प्रकाशी तारकांच्या, ओतिसी तू तेज का ?
त्या नभांच्या नीलरंगी होऊनी आहेस का ?
गात वायूच्या स्वरांनी, सांग तू आहेस का ?

मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का ?
वादळाच्या सागराचे घोर ते तू रुप का ?
जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का ?
आसमंती नाचणारी, तू विजेची रेघ का ?

जीवनी संजिवनी तू, माऊलीचे दूध का ?
कष्टणार्‍या बांधवांच्या रंगसी नेत्रात का ?
मूर्त तू मानव्य का रे, बालकांचे हास्य का ?
या इथे अन त्या तिथे रे, सांग तू आहेस का ?

गीतकार : सूर्यकांत खांडेकर

छान गाणे आहे ना? पण ही अवघी तीनच कडवी आहेत. पुन्हा पुन्हा ऐकले तरी समाधान होत नाही. अजून एक दोन कडवी असती तर मजा आली असती. पण तसे नाही ना...    कुणाला पुढे कडवी रचता येतील का?