आम्हाला ऋतुगंध यांची कविता की गझल...? ही रचना आवडली. ( ती कविता आहे की गझल या विषयी मत देणे आम्ही सुज्ञपणे टाळत आहोत. झाकली मूठ सव्वा लाखाची!) त्यावरून सुचलेली एक रचना खाली देत आहोत. आमच्या 'कविते'ची मजल काही केल्या याहून पुढे जात नाही!
सखीच्या मुखी लागण्या वाव आहे
मिठी मारण्यालाच अटकाव आहे ...!
तुला काय सांगू मनी कोण माझी ?
वरण-भात तू, ती वडा-पाव आहे...!
तुझ्याशी सुरू, वाट संपे तुझ्याशी
मलैकाकडे ना मला वाव आहे ! : (
नको 'हाफ' मजला, नको 'फुल्ल' खंबा
पुणेरी तृषेला पुरे 'पाव' आहे
पुन्हा शोधण्याला चला काव्यसावज
पुढे आज कोरा नवा ताव आहे !
फुकाचे यमक जोडसी खोडसाळा
कवींच्यामध्ये ना तुझे नाव आहे !