"बेंचवर कोरलेलं माझं नाव
आणि तुमचं चित्रही तसंच असेल
पाठीवर फुटलेलं तुमचं घड्याळ
अन तुमचंही काचेचं मन असेल
देवाशपथ सांगतो सर,
देवाशपथ सांगतो सर
माझ्यासारखंच तडफडणारं
एक तरी वेडं मन असेल
सर असल्या आठवण वेड्यांची
जत्रा पुन्हा जमवू द्या,
सर मला पुन्हा एकदा तुमच्या शाळेत बसू द्या......"
क्षणभर प्रशांत शांत राहिला.
"आता काहीही होवो, मी तुमच्या साठवण शाळेला हजेरी जरुर लावेन." आबांचे हे उद्गार ऐकताच, प्रशांत आणि मुकेश ह्यांच्या अंगात वीज संचारली. ते पुन्हा जोमाने कामाला लागले. आबा म्हणजे "साधना माध्यमिक विद्यालय, कासोदा" चे निवृत्त मुख्याध्यापक. आबा म्हणजे अगदी हाडामांसाचे शिक्षक. आबांना आधी आमची "साठवण शाळेची" कल्पना आवडली होती, पण २८ जानेवारी, २००७ ला लग्नाला जावं लागणारं असल्याने त्यांनी आमच्या "साठवण शाळेत" येण्यास नकार दिला होता. "साठवण शाळा" ह्या कवितेने अशी काही किमया घडवली की आबा येण्यास लगेच तयार झाले.
८ जानेवारी,२००७ ला आम्ही, मकरसंक्रांतीच्या दिवशी साठवण शाळा भरवण्याचं ठरवलं होतं पण आबाच येणार नसल्याने आम्ही जरा निराश झालो होतो. पण पुन्हा एकदा आम्ही आमची मनं स्वच्छ केली आणि "साठवण शाळा" लिहून आम्ही पुन्हा एकदा आबाचं मन वळवण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही त्यात यशस्वी झालो.१९९९ साली शाळेतून आम्ही आमच्या पंखाच्या बळावर बाहेर पडलो.
मी इथे, पुण्यात बसून एखाद्या प्रोजेक्ट मॅनेजर सारखं काम करू लागलो. ह्या प्रोजेक्ट चा प्लॅन पुणे येथे तयार होत होता आणि त्याच डिप्लॉयमेंट तिकडे कासोदा ह्या माझ्या गावी होत होतं. सर्वात महत्त्वाचं काम होतं आमच्या प्रत्येक वर्गमित्राशी संपर्क होणं आणि त्यांना "साठवण शाळेची" संकल्पना सांगणं.ते काम साहजिकच मी माझ्याकडे घेतलं कारण कॉग्निझंट ह्या कंपनी मधला मला मिळालेला फोन. त्या वरून मी एक रुपया ही खर्च न करता महाराष्ट्रात कुणाशीही संपर्क करू शकत होतो. आधी त्या त्या मुलांच्या घरी जाऊन त्यांचा सध्याचा संपर्क क्रमांक मिळवण्याचं काम प्रशांत,मुकेश ने कासोद्यात केलं. आणि त्या त्या मुलांना मी संपर्क करून "साठवण शाळेची" कल्पना सांगितली.
ह्या माझ्या संपर्क-अभियानास संमिश्र प्रतिसाद मिळाला. काहींना संकल्पना इतकी आवडली की, कुठल्याही परिस्थितीत कार्यक्रमास येण्याचं आश्वासन मला पहिल्याच फोन मध्ये दिलं. मिनल ह्या माझ्या एका वर्गमैत्रिणीने तर मला धक्काच दिला.
"संकल्पना छान आहे.पण कुणालाही वाटेल की हा मुली बघण्याचा पण कार्यक्रम असू शकतो, म्हणजे वरून दाखवायला स्वरूप वेगळं पण मूळ संकल्पना वेगळी." फोन कुठे तरी फेकून द्यावा असं वाटायला लागलं. पण तरीही परत त्याच जोमाने मी माझ्या पुढच्या वर्गमित्राला आमची संकल्पना सांगितली. अश्या रीतीने माझं प्रत्येकाला पहिला फोन करण्याचं काम संपलं होतं.
तिकडे कासोद्यात प्रशांत,मुकेश कार्यक्रमाच्या दिवशी जे जे लागेल ते गोळा करण्यात मग्न होते. त्यांनी त्या दिवसासाठी मंडप आरक्षित करून ठेवला. ध्वनि- यंत्रणा पण आरक्षित करून ठेवली. १०० लाल गुलाबांची त्या दिवशी सोय होईल अशी व्यवस्था केली. प्रश्न उरला होता जेवणाचा. आता १०० लोकांच्या जेवणाचा खर्च, मंडप खर्च आणि गुलाब-फुल खर्च हा सगळा खर्च कुठून उभा करणार? मी ठरलो "सॉफ्टवेअर अभियंता". साहजिकच जास्तीत जास्त खर्च उचलण्याची तयारी मी दर्शविली. मग एक युक्ती सुचली. कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येकाकडून त्याला शक्य असेल तेवढा "खर्चाचा सहभाग" देण्याची विनंती करायची. ह्या युक्तीतून जितके पैसे जमतील तितके बाकी उरलेले सगळे पैसे मी, प्रशांत आणि मुकेश ने भरायचे.
माझा प्रत्येकाला दुसरा फोन करण्याचं काम सुरू झालं. मी प्रत्येकाला विनंत्या करत होतो. परत परत सांगत होतो, जरुर या, जरुर या. हा अनुभव आयुष्यभराची शिदोरी बनून राहील. कुणी झिडकारत होतं, कुणी प्रोत्साहन देत होत तर कुणी इतकं प्रभावित करत होतं की दर वर्षी अशी शाळा भरली पाहिजे. माझं मन प्रत्येकाला विनंती करून एवढं थकलं की मला जगातला सगळ्यात मोठा भिकारी झाल्यासारखं वाटायला लागलं. कार्यक्रमाचा दिवस जसा जसा जवळ येऊ लागला तशी तशी प्रशांत, मुकेश ची धावपळ वाढायला लागली.
आणि तो प्रवास सुरू झाला. २७ जानेवारी २००७ ला मी पुणे हून कासोद्याला औरंगाबाद मार्गे जायला निघालो. मी रात्री ११ वाजता घरी पोहचलो. प्रवासाचा एवढा थकवा आल्यावर मी मात्र चर्चेत भाग घेतला नाही. सरळ झोपी गेलो. आणि अखेर उगवली ती सकाळ, २८ जानेवारी २००७. आयुष्यातील एक संस्मरणीय दिवस. सकाळी ७ वाजेपासून मी शाळेत जाऊन बसलो. कार्यक्रम पार पाडण्यासाठी, मी माझ्या ओळखीची २-४ मुलं मदतीला घेतली. त्यांना प्रवेशद्वारावर उभं करून प्रत्येक "येणाऱ्याला" गुलाबाचं फुल आणि १ कागद देण्यास सांगितलं.हळूहळू सगळे जमू लागले. सगळे शिक्षक आले आणि मुख्य म्हणजे आबा आले.
कार्यक्रमाच स्वरूप ठरल्याप्रमाणे, आबांनी २ कविता शिकवायच्या होत्या. सगळे परत त्या आमच्या वर्गात जमले. आमचे इतर विषयांचे शिक्षक ही आमच्या सोबत बसले. २ तास आबा शिकवत होते. त्यांनी शिकवायला, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू एन. टी. ठाकरे ह्यांच्या २ कविता घेतल्या होत्या. एक होती, "माय गेली तेव्हा, मी मात्र दारातच राहिलो....." आणि दुसरी होती, "मालें कसंसंच व्हस रे......". यापैकी दुसरी कविता अहिराणी भाषेत होती. २ तास आम्ही दंग होऊन ऐकत होतो आणि आबा समाधी लागल्याप्रमाणे तल्लीन होऊन शिकवत होते. ह्या मधल्या वेळेत आम्ही स्वयंपाक्याला स्वयंपाक बनवण्याचे आदेश देऊन ठेवले होते. त्या प्रमाणे त्याने, खिचडी बनवून ठेवली. त्या सोबत, जिलबीची मागणी आम्ही आधीच देऊन ठेवली होती. मग पूर्णं एक पंगत बसली. सगळे सर, मॅडम आणि सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी एक पंगतीत बसले.केळीच्या पानावर खिचडी आणि जिलबी. सगळ्यांनी भोजनाचा मनसोक्त आनंद घेतला.
भोजनानंतर, मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली आणि ते म्हणजे जमलेल्या प्रत्येकाच मनोगत. जी लोकं विद्यार्थी अवस्थेत कधीच स्टेज वर आली नव्हती अशा लोकांनी अर्थपूर्ण मनोगतं मांडली. प्रत्येक जण भावनावश होऊन बोलत होता. आपल्या शालेय जीवनातल्या कडू-गोड आठवणी कथन करत होता. काही मुलींना तर अक्षरशः रडू कोसळलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नेहमी प्रमाणेच माझ्या कडे आलं होतं. प्रत्येकाचं अगदी पूर्णं नाव घेऊन मी त्यांना बोलण्याचं आमंत्रण देत होतो.
शाळेच्या सध्याच्या मुख्याध्यापकांनी तर आम्हा आयोजकांना एक भव्य-दिव्य कार्यक्रम करण्याच आवाहन केलं, की त्यात आज पर्यंत चे साधना शाळेचे सगळे-सगळे विद्यार्थी असतील. आणि त्यात असतील म्हातारे आणि तरुणही. इतर शिक्षकांनीही आम्हाला आमच्या शालेय जीवनातल्या आठवणी सांगून मंत्रमुग्ध केलं.
प्रशांतचं, "आभार-प्रदर्शनाचं" भाषण चालू असताना अचानक माझं लक्ष आमच्या शाळेच्या घड्याळाकडे गेलं आणि मी प्रशांतला मी इशारा केला. आणि त्याने ही भाषण लगेच आटोपतं घेतलं. बरोबर ५ वाजून १० मिनिटांनी आम्ही घंटा वाजवली. ८ वर्षांपूर्वी म्हणजे १९९९ साली आम्ही ही शाळा सोडली होती. आणि सांगायला नको की त्या वेळेस आमची शाळा ५ वाजून १० मिनिटांनी सुटायची. आणि त्या नंतर आम्ही फोटो घेतले. पूर्णं शाळेचे शिक्षक आणि आम्ही सर्व विद्यार्थी.
साठवण शाळा सुटली, सगळे शिक्षक घरी गेले, सगळे बाहेर गावाहून आलेले आमचे वर्गमित्र निरोप घेऊन गेले पण तरीही मी ,प्रशांत आणि मुकेश बघत बसलो होतो त्या शाळेच्या निर्विकार मूर्तीकडे.आजची, २८ जानेवारी २००७ ची साठवण शाळा सुटली पण आम्हाला खूप काही सुख देऊन गेली आणि आवाहन ही देऊन गेली..... पुढची "साठवण शाळा " भरवण्याचं.
अनेक वर्षांपूर्वीची ही आमची कल्पना.तसाच तो आपला वर्ग भरेल,तेच शिक्षक असतील, तोच पंकजचा आगाऊपणा असेल. तसंच आमचं छोट्या चेंडू ने फुटबॉल खेळणं असेल. डाव्या हाताने आबाधाबी खेळणं असेल. चपलेने क्रिकेट खेळणं असेल. आणि कित्येक अशा गोष्टी...... ज्यांची यादी संपता संपणार नाही. आणि आज आम्ही मिळून ती सत्यात उतरवलीच, कुठे तरी कृत-कृत्य झाल्याचं समाधान आमच्या तिघांच्या चेहऱ्यांवर झळकत होतं.