ना छचोर हळव्या शब्दांसाठी अडलो
ना छचोर हळव्या शब्दांसाठी अडलो
पाहिला चंद्र भर चांदण्यात ओरडलो
हा सुगंध आला पिच्छा पुरवित माझा
मी कुठे फुलांच्या मांडवात बागडलो
चालता-चालता जरा काय अडखळलो
दगडांस वाटले त्यांच्या पायी पडलो
पाहून एकदा हसलो काय व्यथेला
मी व्यथेस माझ्या कायमचा आवडलो
मी दिसलो नाही एकांतात कुठेही
माणसांत आलो मजला मी सापडलो
तू पुस्तक माझे उघडलेस ऐसे की
मी गुंतत गेलो तुला जसा उलगडलो
ही जमीन नाही तुमच्या भाटगिरीची
ही मिरास माझी म्हणून मी कडमडलो
— चित्तरंजन भट