सुमोचा मागोवा








ऑटो एक्स्पो २००८ मध्ये टाटा मोटर्स कंपनीने १ लाखाची नॅनो सर्वांना दाखवली आणि वाहन जगतात एक क्रांती घडवून आणली.  नॅनो दाखवत असतानाच टाटांनी आणखीन एक गाडी सर्वांना दाखवली. नावाने जुनी पण पूर्ण पणे नवी - टाटा सुमो - ग्रँडे. 

टाटा सुमो - ग्रँडे आहे कशी? हे पाहण्या आधी आपण सुमोचा थोडा इतिहास पाहू. टाटा सुमो गाडी, वाहनांच्या ज्या प्रकारात ओळखली जाते त्या प्रकाराला बहुपयोगी वाहन (Multi Utility Vehicle) असे म्हणतात. या वाहन प्रकारात तो वर सर्वांना माहीत होती ती गाडी म्हणजे महिंद्राची जीप. अर्थात विली-जीप कंपनीच्या या गाड्या प्रथम महिंद्राने बांधून भारतात विकल्या आणि त्यानंतर या वाहन प्रकारात भारतभर जीप म्हणूनच ओळखले जाऊ लागले. कमीत कमी ५-७ लोकांना घेऊन कोणत्याही रस्त्यावर धावणारे वाहन असे या प्रकारातल्या वाहनांना ओळखले जाते.  महिंद्राच्या जीपने बराच काळ भारतीय रस्त्यांवर अधिराज्य गाजवले. त्या नंतर आगमन झाले ते टेम्पो ट्रॅक्सचे. आकाराने थोडी मोठी आणि डॅम्लर क्रायस्लरचे ओएम ६१६ चे शक्तिशाली इंजिन असलेली हि गाडी लोकांना फारच भावली. अर्थात भावली ती गावाकडे अनेक माणसांची वाहतूक करण्याच्या धंद्यासाठी. पण या गाडीने बहुपयोगी वाहन प्रकारातले महिंद्राचे स्थान थोडे कमकुवत केले.

या गाड्यांमध्ये एक कमी होती. ती म्हणजे या गाड्या बंदिस्त नव्हत्या. अर्थात त्यामुळे थोड्या स्वस्त सुद्धा होत्या. पण दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात सुरक्षिततेचे एक मोठे प्रश्न चिन्ह होते. पावसाळ्यात सुद्धा या गाड्या अनेकदा निरुपयोगी ठरायच्या. तसेच या गाड्या कुलूप लावून बंदिस्त करता येत नसल्याने सामान सुरक्षित राहण्याची मोठी गैरसोय होत होती.

याच दरम्यान मोठे आणि छोटे ट्रक बनवणार्‍या टाटा मोटर्सने (त्यावेळची टेल्को) टाटा इस्टेट हे वाहन बाजारात आणून या प्रकारच्या वाहन क्षेत्रात येण्याचा आपला इरादा स्पष्ट केला होताच. मग बाजारातल्या जीप आणि ट्रॅक्स या वाहनांच्या कमतरतेचा अभ्यास करून टाटांनी सुमो तयार करून बाजारात आणली. पहिली बंदिस्त, बसायला आरामदायक, वातानुकूलित असणारी आणि शक्तिशाली टाटा सुमो १९९४ साली बाजारात विकली जाऊ लागली. लोकांच्या गरजेचा योग्य विचार करून वाहन बनवल्याने सुमोला बरीच मागणी येऊ लागली. सुमोचा खप एवढा झाला की वाहन व्यवसायात जबरदस्त मंदी असताना सुद्धा टाटा मोटर्सची रोजी रोटी म्हणजे टाटा सुमो होती. याच गाडीने कंपनीला मंदीमध्ये देखील तरले होते. त्यानंतर अनेक वर्षांनी मग टोयोटाचे आगमन होऊन क्वालीस आली आणि त्यांनी या गाड्या जास्त आरामदायी अशा असाव्यात याचा पायंडा पाडला. मग महिंद्राची स्कॉर्पिओ (बोलेरो देखील बाजारात आहेच), टवेरा या गाड्यांनी गर्दी केली आणि सुमो या शर्यतीत मागे पडू लागली.

मग २००४ साली सुमोने पहिल्यांदा कात टाकली आणि सुमो व्हिक्टा हे नवे रूप धारण केले. दिसायला तशी जुनीच होती पण अंतर्गत रचना जास्त चांगली होती. पूर्णतः नवे सुकाणू, सुधारीत वातानुकूलित यंत्रणा आणि बसण्यासाठीचे अनेक पर्याय अशा प्रकारची हि सुमो व्हिक्टा आपले वर्चस्व ठेवायचा प्रयत्न करत होती. पण जुन्या आकारात नवे बदल लोकांना फारसे भावले नाहीत. तसेच या वाहनाचे जीवनमान सुद्धा बरेच झाले होते. आता वेळ होती कात टाकण्याची. ऑटो एक्स्पो २००८ ची संधी साधून आता टाटांनी सुमोचे पूर्णतः नवे रूप भारतीयां समोर सादर केले. यावेळी नाव जुने-नवे आहे. सुमो ग्रँडे. पण गाडी पूर्ण पणे नवी आहे.  संपूर्ण नवे रूप, नवीन अंतर्गत रचना, शक्तिशाली २.२ लीटरचे डायकॉर (DICOR - Direct Injection Common Rail ) इंजिन अशा वैशिष्ट्यांसह नवी सुमो बाजारात यायला तयार आहे. या गाडीची किंमत ६.५ ते ७.५ लाखांच्या दरम्यान असणार आहे. ऑटो एक्स्पो २००८ प्रदर्शनात प्रत्यक्ष पाहणार्‍या अनेकांना हि गाडी खूपच आवडली असे ऐकण्यात आहे.

नॅनो प्रकल्पाचा गिरीश वाघ आणि टाटा सुमोच्या नावातच सामावलेले सुमंत मुळगावकर ही दोन मराठी व्यक्तिमत्त्वे टाटा मोटर्सच्या इतिहासात मोलाचे स्थान पटकावून आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.