ही नेहमीचीच हो माझी रामकहाणी...

आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची अप्रतिम कविता  मी दुःख विसरण्यासाठी गातो गाणी... आणि खोडसाळ यांचे अप्रतिम विडंबन  मी कवींस छळण्यासाठी गातो गाणी...

...................................................
ही नेहमीचीच हो माझी रामकहाणी...!
...................................................

ही नेहमीचीच हो माझी रामकहाणी
तोंडाचे माझ्या बघा पळाले पाणी !

ओढून इथे मज तिने आणले होते
कोणी न तिथे हे,नीट जाणले होते...
आहेच सखीही माझी खूप शहाणी !

काळोखच होता खरा... सोबती माझा
तो एकच जिवलग...बरा सोबती माझा
त्यालाच कळे ही अमुची प्रेमकहाणी!

एकांत कधीही सरळ मिळाला नाही...
तडमडे नेमका बाप तिचा तेव्हाही 
मज कधी न लाभे, संधी गोजीरवाणी !

साधीच अपेक्षा...पूर्ण कुठे पण झाली ?
पदरात धुलाई...फक्त धुलाई आली...
मी व्यर्थ याचना केली केविलवाणी !

चोपून काढला इतका मज मेल्याने
लाथा बुक्या आणिक हो जोड्याने
तो नसतो मेला कधीच हा अनवाणी !

आकांत हा मी जरी किती ही केला ...
ह्या देहाचा बघ पुरा...खुळखुला झाला
वेदना-वाजते आहे सर्व ठिकाणी!

ही कशी लपावी कथा आज हो माझी
वेशीवर गेली व्यथा टांगली माझी
परक्यांना ही कळली  सर्व कहाणी

ही नेहमीचीच हो माझी रामकहाणी...!

...................................................
- केशवसुमार
...................................................

रचनाकाल ः १४ व १५ फेब्रुवारी २००८