विषयांतर

कितीकदा मी फोन तुला केला पण तेव्हा
करीत बसलो भलत्या
गोष्टी:
'कशी चोख व्यवहारी तू अन् स्वभाव माझा असा कलंदर.'
'ह्या विश्वाचा अजब पसारा,
आणि त्याहुनी अजब माणसे.
एकापेक्षा एक नमूने.' (त्यात एक मी.)
'नक्की साऱ्या छापशील
ना माझ्या कविता मी मेल्यावर?'

    (तुला कळावे मनातले मी म्हणून
लिहिल्या होत्या कितीक कविता, बात निराळी.

   
    पण अजूनही का खात्री
नाही?)


'खरे तुझे, एकटेच जगणे असते सुखकर.'
(अरेरेअरे. नाही! नाही
!!!)

   
    'आणि शेवटी विषय लाडका
        कशी
व्यर्थता आयुष्याची....'
   
    (तुझ्याविना हे व्यर्थच सारे)

...थोडक्यात, मी किती फालतू गोष्टींमध्ये गुंतगुंतलो.
असो. खरे हे थोडक्यात की कितीकदा मी फोन तुला केला होता
पण
शब्दांमध्ये प्राण ओतुनी म्हटले
नाही एखाद्या गुलछबूप्रमाणे--
   
    'आहे माझे प्रेम तुझ्यावर. स्वीकारावे!
गुच्छ फुलांचे!!!'
    (हसू मलाही येते आहे. पण माझी ही
मनापासुनी इच्छा होती.)

नाही म्हटले
मी एखाद्या प्रेमपिपासू कवीसारखे--
    'तुझ्यावाचुनी जगता येणे अशक्य आहे.'

    ('मर ना मुडद्या,' म्हणशिल ह्याची भीती
होती)

तोंडाची मी वाफच वाया घालवली पण
कधीच आलो ना
मुद्यावर.
(तुला कळाले असेल आतापर्यंत झालेले विषयांतर, असे वाटते.)
असो.
कळावे.


....................

बैरागी