आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची अप्रतिम गझल ...त्याचीच ओढा री पुन्हा!!
.............................................................
...फिरवा चला आरी पुन्हा!!
.............................................................
सारे उकिरडे फुंकुनी आलो तुझ्या दारी पुन्हा !
जाऊन मी जाऊ कुठे, तू सांग, माघारी पुन्हा ?
सार्याच विषयांचे असे पेपर तरी देऊ कसे...
लाजू नको नापास हो...येईल रे वारी पुन्हा !
ऐकून माझे घे जरा...मारू नको नुसते मला...
खोडी अधी मी काढली,म्हणलेचना सॉरी पुन्हा !
जीमेत मी जातो जरी... पाले मुळे खातो जरी...
मोजून जेव्हा पाहतो...भरतोच मी भारी पुन्हा !
मी शब्द हा होता दिला नाही शिव्या देणार मी...
येता समोरी आज तू... म्हणलेच "च्यामारी" पुन्हा !
करतो बरा स्वयंपाकही...धूतो तसा भांडी बरी...
नवरा असा माझा गुणी...! असतोच आभारी पुन्हा !
झाडू अधी हातात घ्या...! फरशी पुसा नंतर जरा...
नशिबात अमुच्या शेवटी ही तीच लाचारी पुन्हा !
अध्याय पहिला संपुनी झाला न थोडा वेळ ही...
भलत्याच अन रंगात ही आली पहा स्वारी पुन्हा
फुटले जरी डोळा तरी सजतात दुढ्ढाचार्य हे...
बसती नव्या कट्ट्यावरी लावून हे बारी पुन्हा !
गेला कुठे रे खांब तो , इतक्यात मी जो पाहिला...
डोळ्यापुढे आली कशी माझ्याच अंधारी पुन्हा ?
डोके कशाला खाजवा...? मेंदू कशाला चालवा...?
गझलेवरी निर्धास्त या, फिरवा चला आरी पुन्हा!!
'पाडू विडंबन रे नको...' "केश्या" तुला सांगीतले...
नाही कुणाचे एकले, केलीस ओकारी पुन्हा!!
.............................................................
- केशवसुमार
.............................................................