आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानक आणि एण्डेव्हर अवकाशयान पाहण्याची संधी

सध्या अमेरिकेने एंडेव्हर हे यान (स्पेस शटल) अवकाशात सोडले आहे आणि ते आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकास (ISS) जोडलेल्या (Docked) अवस्थेत आहे. खाली दिलेल्या वेळी अवकाशयानांची ही जोडी मुंबईच्या आकाशात २६ मार्च पर्यंत पाहता येईल.
स्थिरपणे चमकणाऱ्या एका तेजस्वी ठिपक्याच्या रूपात ही याने दिसतील व हा चमकदार ठिपका सावकाशपणे आकाशाच्या एका टोकाकडून दुस-या टोकाकडे जाताना दिसेल.(तक्त्यात दिलेल्या दिशेकडे) 

दिनांक वेळ दिसण्यास सुरुवात इथे दिसेनासे कमाल उंची कालावधी
२४ मार्च रात्री ८:०० पश्चिम-नैरृत्य १० अंशावर २० अंश उत्तर ३५ अंश ४ मिनिटे
२५ मार्च पहाटे ५:४३ पश्चिमेला २९ अंशावर १२ अंश दक्षिण आग्नेय ४० अंश ३ मिनिटे
२६ मार्च संध्या ७:१२ पश्चिम-वायव्य ३७ अंशावर ११ अंश उत्तर-ईशान्य ३८ अंश ३ मिनिटे

सूर्य उगवण्यापूर्वी दीड तास व सूर्य मावळल्यावर दीड तास पर्यंत आकाशनिरीक्षण केल्यास एखाद्या बिंदूप्रमाणे दिसणारे अनेक कृत्रिम उपग्रह आपण सहजपणे पाहू शकतो. कृत्रिम उपग्रहांना विमानाप्रमाणे दिवे अथवा स्वत:चा प्रकाश नसतो. त्यामुळे चंद्र किंवा इतर ग्रहांप्रमाणे ते सूर्याचा प्रकाश पडल्यावर चमकताना दिसतात. उपग्रह हे विमानाप्रमाणे न लुकलुकता स्थिर प्रकाशाच्या बिंदूरूपात दिसतात. रात्रीच्या वेळी पृथ्वी आड आल्याने ते दिसू शकत नाहीत. बहुतेक सर्व उपग्रह अतिऊंचीवर असल्याने फारसे तेजस्वी दिसत नाहीत. वर उल्लेख केलेले अवकाश यान हे पृथ्वीपासून फक्त ४०० किमी अंतरावरून फिरत असल्याने अधिक तेजस्वी दिसते. याची तेजस्विता गुरू ग्रहाएवढी म्हणजे -२ पर्यंत आणि क्वचित शुक्राएवढी दिसू शकते.

ही दोन्ही याने सध्या जोडलेल्या स्थितीत असली तरी वेगवेगळी न दिसता एकाच प्रकाशमान ठिपक्याच्या स्वरूपात दिसतील. कुणाकडे शक्तिशाली द्विनेत्री असल्यास अवकाशयानाचे भाग दिसतात का ते पाहण्याचा प्रयत्न करावा.

काल रविवार दि. २३ ला संध्या. ७:३८ ते ७:४१ यावेळेत ते खूप तेजस्वी दिसले होते. आज रात्री व उद्या पहाटे निरीक्षणाच्या वेळी काळोखे आकाश  असल्याने चांगले तेजस्वी दिसेल. २६ च्या संध्याकाळी सूर्य मावळून जेमतेम अर्धाच तास झाला असल्याने फार तेजस्वी दिसणार नाही.

इच्छुकांनी जरूर या संधीचा लाभ घ्यावा.

नोंदः  वरील वेळा मुंबई व परिसरासाठी आहेत. अवकाशयान तंतोतंत दिलेल्या वेळी दिसते व सहज ओळखता येते.