एक एप्रिल. एक जादुई दिनांक. या दिवशी असे काय घडले असेल की आपली बुद्धी गायब होते? याचा संबंध बहुदा कालगणनेशी असावा. ग्रेगोरियन कॅलेंडर अस्तित्वात येण्यापूर्वी बहुधा दहाच महिने अस्तित्वात होते. मी इतिहासज्ञ नसल्यामुळे मला तपशील अचूक ठाऊक नाही. पण आपल्या संकेतस्थळावर लिहिणारे तज्ज्ञ वस्तुस्थिती लिहितीलच. तर नव्या महिन्यापैकी एप्रिल हा एक असावा. आणि दिनांक लिहिताना नवीन महिना ज्ञात नसल्यामुळे किंवा सवयीमुळे एक एप्रिल ऐवजी एक मे अशी तारीख लोक लिहीत असावेत. जसे आपण जानेवारीच्या आठदहा तारखेपर्यंत जुनेच वर्ष टाकतो. चूक झाली तर खिल्ली उडविण्याचा लोकांचा हक्कच आहे. खास करून टवाळ जनांचा. पण म्हणून तर रुक्ष आयुष्यात रंग भरतात आणि ताजेपणा येतो.
आपणही कित्येकांना मोरू बनवितो. कधी आपण आपणच मोरू बनतो. कधी इतर आपल्याला बनवितात. पण हेतू निर्विष असला तर फारच मजा येते. असेच दोन प्रसंग.
आमच्या काऱ्यालयात एक भगिनी आहेत. गुटगुटीत सुखवस्तू देहयष्टी हे त्यांचे वैशिष्ट्य (बलस्थान?). यांना आपण शोभा म्हणू. यावरून त्यांना काही सज्जनांनी चिडविले तर त्यांना गंमत वाटते. मी त्या भाग्यवंत सज्जनांपैकी एक. एकदा असाच एक एप्रिलच्या दिवशी कार्यालयात येताना चालत होतो. तर पुढे या महोदया. नेहमीपेक्षा अंमळ जरा जास्तच हळू हळू च आस्ते आस्ते चालल्याहेत.
ओ शोभाताई,जरा लवकर पाय उचला. लवकर चला. कोणाला तरी गिऱ्हाईक करू. पोचेपर्यंत निदान ५० ग्रॅम वजन कमी होऊ द्यात. तिने मागे वळून पाहिले. आणि काय सांगू? धरणी दुभंगून मला गिळून का टाकत नाही असे झाले. ती भलतीच महिला होती. नशीब मी शोभाताई म्हणून हाक मारून बोललो होतो. नाहीतर हाडे मोजत बसलो असतो. मी त्वरित माफी मागितली. ती महिला पण हसू लागली. म्हणाली "मी नेहमी पाहते तुम्हाला. कधी बस स्टॉपवर, कधी या रस्त्यावर." (वा! मी सज्जन आहे हे हिला ठाऊक आहे तर. सुदैवाने मनांत कितीही खोडसाळ विचार चालू असले तरी माझा चेहरा मी निर्विकार ठेवू शकतो. रस्त्यात बहुधा निर्विकारच ठेवतो. मुलांच्या शाळेतील सवय. नाहीतर कोणीही मस्ती केली तर सरांकडून मार पडण्याची शक्यता) "आज एक एप्रिल असल्यामुळे हे असं झालं. तुम्ही अमुक अमुक मध्ये ना?"
म्हटलो "हो. पण तेथील सगळेच असे माझ्यासारखे आंधळे आणि वेंधळे नाहीत."
माझी माणसे ओळखण्यात नेहमी अशीच गल्लत होते. मरता मरता बचावलो खरा. हा झाला माझा मोरू.
आता दुसऱ्याचा मोरू. साल बहुधा १९९९ असावे. आमचा एक अविवाहित मित्र आहे. याला आपण जोशी म्हणू. मद्यप्रेमी आहे. बेवडा नाही हो. घरात तो व आई असे दोघेच. आई असल्यामुळे याला मद्यप्राशन करता येत नाही. आई कधीतरी मुलीकडे म्हणजे याच्या विवाहित बहिणीकडे राहायला गेली की याची सोय होते. त्या वेळी ती अचानक मुलीकडे गेल्यामुळे याला काही मित्रांची जमवाजमव करता आली नाही. मग एकेकाला दूरध्वनी केले. सगळे कामावर. आमचा एक सगळ्यात सभ्य आणि सज्जन मित्र आहे. अतिशय मृदू आणि ऋजू असा सौजन्यपूर्ण स्वभाव. "हा तुमच्यात शोभत नाही. तुम्हा नाठाळांशी याने कशी मैत्री ठेवली?" असे आमच्या प्रत्येक एक असलेल्या बायका आम्हाला आश्चर्याने विचारतात. "हा हुशार असल्यामुळे आम्ही किती चांगले आणि सभ्य आहोत ते याला ठाऊक आहे." माझे उत्तर. त्यामुळे याचे नाव देत नाही. याला श्री. क्ष म्हणू. हा नोकरी करत नाही. याचा स्वतःचा व्यवसाय आहे. तर हा आपली व्यवसायाची नित्याची कामे लवकर मार्गाला लावून गेला जोशाकडे. दुपारचे सेशन यशस्वी करायला. याची सर्वशक्तिमान बायको फार कडक शिस्तीची आहे व याला नेहमी फ़ैलावर घेत असते असा एक चुकीचा प्रवाद आहे.
तर 'हा श्री. क्ष व जोशीबुवा असे दोघे जोशीबुवांच्या घरी बसलेत. शक्य असेल तर तू पण जा. मी महत्त्वाच्या कामात आहे. जाऊ शकत नाही' असा मला तिसऱ्याचा दूरध्वनी आला.
मग काय? माझ्या सडेल टाळक्यात चक्र चालू झाले. आता काय करावे? 'आधीच मर्कट, तशातचि मद्य नाही' अशी अवस्था (की दुर्दशा) झाली. माझ्यासमोर स्टेनो बसली होती. डिक्टेशन घेत. नाव ओरिना डी'सिल्व्हा. वसईची. ही तशी शालीन आणि सुस्वभावी पण बालिश आणि महाखोडसाळ. पोरकटपणा करण्यात उस्ताद. माझ्या मुखचंद्रावरचे भाव तो निर्विकार न केल्यामुळे तिला कळले.
तारीख आठवली वाटते. कोणाची खेचायचा विचार करताय?
हिची मातृभाषा वसईची मायबोली. कॉन्वेंटमध्ये शिकली तरी शुद्ध मराठी नेहमी कोब्रांच्या अनुनासिक ढंगात बोलते.
माझ्या रिकाम्या कवटीत वीज लखलखली. गौतम बुद्धांना कसा साक्षात्कार झाला असेल ते कळले. (महापुरुष हो क्षमस्व मला तुमच्याबद्दल नितांत आदर आहे) तिला काय बोलायचे, कसे बोलायचे ते पढवले.
जोशीबुवांना फोन लावला. अपेक्षेप्रमाणे जोशीबुवांनीच उचलला. मी काहीही न बोलता तिच्या हातात रिसीव्हर दिला.
"काय हो? काय चालवलंय काय तुम्ही? स्वतः वाह्यात उद्योग करता? दारू पिता? आणि माझ्या नवऱ्याला बिघडवताय? शरम वाटत नाही? आताच्या आता ताबडतोब माझ्या नवऱ्याला घरी पाठवा. नाहीतर तिथे येते. तुमच्या आईला घेऊन. आणि दोघांनाही बघते. द्या ...... माझ्या नवऱ्याला फोन." आवेशात खडसवायला, खरे म्हणजे खेकसायला तिला मिनिटभरही लागले नाही.
श्री. क्ष ने घेतल्यावर तिने फोन माझ्याकडे दिला.
"मी सुधीर. जोशाला एप्रिल फूल केले. काय प्रतिक्रिया?" याला हसू आवरेना. अगोदर पोटभर हसून घेतले. "अरे चेहरा साफ पडला त्याचा. बेदम मार पडल्यावर पडेल तसा. बेचाळीसला ऑलडाऊन. नाहीतर ० विरुद्ध २५ ने हरलो. अजून सुरुवात पण केली नाही आणि बिचाऱ्याला ऐकून घ्यावे लागले."
त्यांना एका चांगल्या व आनंददायी सेशनच्या शुभेच्छा दिला आणि हे जोशाच्या 'फ़' चे शुभवर्तमान इतर मित्रांना कळविण्याचे पवित्र कार्य पार पाडले.
(व्यक्तिगत वाटलेले संदर्भ वगळले : प्रशासक)