इतिहासाचार्य अनिरुद्ध१९६९ यांच्या इतिहासा पासून प्रेरणा घेऊन आम्हीही इतिहास रचण्याची स्वप्ने बघू लागलो. त्याचीच परिणती खालील पुनर्लिखित इतिहासात झाली.
मीही लिहीन म्हणतो कविता जुन्या नव्याने
संदर्भ चोरलेले कळतील पण अशाने
उकरून काढले मी इतिहास, वाद सारे
झाले जिवंत सारे कंपू पुन्हा नव्याने
काव्यास आज माझ्या का ती बघून हसते
जुंपेल खास अमुची केव्हा तरी अशाने
दमलो जरा सकाळी मी वाद घालताना
सुचले नवीन मुद्दे आता नव्या दमाने
होणार हे असे मज ठाऊक काय नव्हते
बदनाम पार केले मम नाव तोतयाने
ढापू कुणाकुणाच्या ओळी मला कळेना
चाळून पाहिल्या मी कविता क्रमाक्रमाने
ओढून ताणले मी शब्दांस एव्हढे की
फाटून अर्थ सारे गेलेत त्या बळाने
नाही प्रकाशकाने छापावयास नेली
माझी भरून झाली कित्येक तावदाने
फाडून टाक त्यांना, होईल त्रास त्यांचा
वाचू नये दुज्याचे साहित्य लेखकाने
आतून येत आहे आवाज मत्सराचा
समजूत, खोडसाळा, काढू तुझी कशाने ?