भेट


भेट


बंद खोलीत आसवे काही
काजव्यांचे जणू थवे काही


भेट नव्हतीच ती, धुके होते
भेटले फक्त गारवे काही


बोललो, काय बोललो नाही
आठवे तू , न आठवे काही


दोन डोळ्यांमधील आकाशी
हिंडले मौनपारवे काही


तू न पुसलेस मी कसा आहे
अन् मलाही न बोलवे काही


मान वेळावली अशी तूही
शब्द सुचले मला नवे काही


काय हसलीस तू नकाराचे
वाटले की नको हवे काही


— चित्तरंजन भट 


 नोंद: ही कविता गझल आहे की नाही, मला माहीत नाही.