गंधातून संदेश की संदेशातून गंध?

चित्र १

"शुक्रतारा मंद वारा"हे गाणे माहीत नाही असा मराठी माणूस शोधून सापडणार नाही. ह्या गाण्यात नायिका आपल्या मनीचे भाव प्रियकराला कळावे म्हणून वाऱ्याला "अंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहा" असे म्हणून  वाहून न्यायला सांगते!

काय सुंदर कल्पना आहे की नाही!

असा गंधातून कुणाला संदेश पाठवता येतो की नाही माहीत नाही पण आता भ्रमणध्वनीच्या साहाय्याने संदेशातून गंध इकडून तिकडे नक्की पाठवता येईल. त्याच्या चाचण्या सध्या चालू आहेत. एनटीटी कम्युनिकेशन्स ह्या कंपनीच्या शास्त्रज्ञ आणि तंत्रविशारदांनी हीच कल्पना आता प्रत्यक्षात आणलीय.

चित्र २

काय करतात, जपानमध्ये अशी सुगंध पसरवणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे आधीपासून ठिकठिकाणी कार्यरत आहेतच. आता ह्या उपकरणांना निरनिराळी गंधद्रव्ये निरनिराळ्या प्रमाणात मिसळण्यासाठी जी 'पाककृती' लागते ती आता एनटीटी डोकोमो कंपनीच्या संकेतस्थळावरून आपल्या भ्रमणध्वनीवर उतरवून घेता येईल आणि ती त्या उपकरणावर लगोलग लादता येईल, अशी एकंदर योजना आहे.(चित्र क्र. १ वर टिचकी मारून मोठे चित्र पाहा.) फुलदाणीच्या आकारातल्या ह्या उपकरणामध्ये मूलगंधद्रव्ये साठवलेले एक काडतूस असते. हव्या त्या सुगंधाच्या पाककृतीनुसार ही मूलद्रव्ये मिसळली जातात आणि तो सुगंध पसरू लागतो!(चित्र क्र २ वर टिचकी मारून मोठे चित्र पाहा.)

चित्र ३

आंतरजालावरून ह्या उपकरणाला पाककृती पुरवणे सुलभ करण्यासाठी सेवाद्वार स्वरूपाची एक सेवा उपलब्ध आहे. ही सेवा वापरून दुरूनही आपापल्या उपकरणाला ह्या पाककृती पुरवता येतात, त्यामुळे घरी येण्यापूर्वी हवा तो सुगंध घरात पसरवण्याचीही व्यवस्था करता येते! (चित्र क्र ३ वर टिचकी मारून मोठे चित्र पाहा.) सध्या ही व्यवस्था चाचणी स्वरूपात असली तरी व्यापारी तत्त्वावरही सुविधा उपलब्ध करण्याच्याही योजना आहेत.

शिवाय ह्या सुगंधी पाककृती उतरवण्याचे काम चालू असताना संगीत ऐकता येते किंवा चलद्दृश्येही पाहता येतात!

हे सगळे मी माझ्या मनचे लिहीत नसून एनटीटी कम्युनिकेशन्स , फिजऑर्ग आणि वॉशिंग्टन पोस्ट आणि न्यू यॉर्क टाईम्स च्या संकेतस्थळांवर मिळालेली माहिती मी माझ्या समजुतीप्रमाणे संकलित केलेली आहे. चित्रे एनटीटी कम्युनिकेशन्सच्या संकेतस्थळावरून ओढलेली आहेत.

आणि हो, काही वर्षांपूर्वी येथे मनोगतावर सेलफोनचा सह-वास हा लेख आला होता, त्याचीही मला आठवण हे तंत्रज्ञान पाहून झाली. त्यात लिहिलेल्या काल्पनिक 'सुविधा' प्रत्यक्षात यायला अद्याप खूप वेळ लागेल असे तेव्हा वाटले होते; पण तेही नाही.

एनटीटीच्या त्याही योजना आहेत असे दिसते. केवळ घरात सुगंध पसरवण्यापुरते मर्यादित न राहता, भटक्यातून चित्र पाठवताना त्याबरोबर गंधही पाठवता येईल असे दिसते, म्हणजे प्रियजनांना भ्रमणध्वनीतून फुले (म्हणजे फुलांचे चित्र!) पाठवताना त्याला अनुरूप सुगंधही पाठवता येईल असे वाटते.

म्हणजे आता नजीकच्या भविष्यात नायिका आपल्या अंतरीचा गंध पूर्वीप्रमाणे 'वाऱ्यावर न सोडता' भ्रमणध्वनीतूनच पाठवेल असे दिसते!