मनोगत वरील "अनियंत्रित लोकसंख्यावाढ आणि भ्रष्टाचार: भारताच्या प्रगतीआड येणारे मुख्य अडथळे आणि इतर देशांच्या नजरेत असलेली भारताची प्रतिमा!" हा चर्चा प्रस्ताव आणि त्यावरील प्रतिसाद वाचून हा विचार मनात आला. त्यावर चिंतन केल्यावर सर्वांना सांगावे अन् सर्वांचे त्यावर विचार जाणून घ्यावे असे वाटले.
कोणत्याही देशातील लोकांची मानसिकता, त्या देशाचे भविष्य ठरवत असते. देशासाठी, राष्ट्रासाठी जेथे विचार उगम पावतात तेथे अडचणींवर मात करण्याची शक्ती उत्पन्न होत असते. राष्ट्रभावनेच्या अभावामुळेच आज भारतात एकापेक्षा एक अडचणी उद्भवल्या आहेत. त्या संपवायचे प्रयत्न अपुरे पडतात त्यामागचे कारणही हेच आहे.
राष्ट्रभावना म्हणजे काय हे अगोदर बघावे लागेल -
राष्ट्रभिमान, राष्ट्रप्रेम, त्यासाठी जबाबदारी घेण्याची तयारी, राष्ट्राच्या ताकदीवरील विश्वास या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे राष्ट्रभावना.
याचा अर्थ सारखे तलवार काढून कापाकापी करत फिरावे असे नाही. फक्त साधे जीवन जगताना सुद्धा हा विचार मुळाशी असला तरी कितीतरी गोष्टी आपोआप घडून येतील.
डॉ. विक्रम साराभाई या माणसाने आपल्या देशाला एका बाबतीत स्वयंपूर्ण बनवायचे स्वप्न पाहिले. आज जवळपास 40 वर्षानंतर आपण त्याची फळे बघतो आहोत. त्यांची या स्वप्नामागची प्रेरणा राष्ट्रभावना नसेल तर आणखी काय असेल?
आपल्यामुळे किंवा आपणास दिसणाऱ्या इतर लोकांमुळे आपल्या राष्ट्राच्या प्रतिमेस धक्का लागेल, त्याचे नुकसान होईल असे वर्तन घडू न देण्याची जबाबदारी याचमुळे प्रत्येक नागरिकावर पडते. जर ती जबाबदारी पार पडली तर राष्ट्राचे भविष्य बदलण्यास जास्त काळ लागणार नाही.
उदाहरणार्थ, एक साधी सूचना -
२६ जानेवारी, १५ ऑगस्ट या सारखे राष्ट्रीय दिन भ्रष्टाचार मुक्त दिन म्हणून पाळल्या जावेत. मी स्वतः भ्रष्टाचार करणार नाही अन् भ्रष्टाचारास प्रोत्साहन देणार नाही. काय यामुळे एकदम राष्ट्रभावना जागृत होऊ शकेल? नाही. तसे नाही. पण मानसिकता बदलण्यास ही सुरुवात ठरू शकते. १०० कोटी लोकसंख्येत एक जण जरी असा निघाला जो विचार करतोय, "मी भ्रष्टाचार नाही करणार, हे माझ्या देशासाठी हानिकारक आहे. मी असे करता कामा नये!" तर काय कमी झाले? किती मोठा विचार आहे हा!
मला डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे वाक्य फार आवडते -
"असाल तेथून पुढे चला!" (सौ. वीणा गवाणकर यांच्या "एक होता कार्व्हर" या पुस्तकातून).
आज इतर देशांमधली समृद्धी आपण बघतो तर आपल्याला आपल्या देशाची लाज वाटते. पण त्यांची प्रगती अशाच राष्ट्रभावनेतून झालेली आहे हे आपण कसे विसरतो? आपली राज्यप्रणाली इंग्लंडच्या राज्यप्रणालीवर आधारलेली आहे. एखादे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी संसदेत बहुमत असावे लागते हे आपल्याला माहीत आहे. इंग्लंडमध्ये तिथल्या पॉलिटिशियन्सनी पूर्ण बहुमत असताना सुद्धा एखाद्या प्रश्नासाठी लोकमत अजमावण्याची, फिरून निवडणुका घ्यायची हिंमत दाखवली आहे. पुढे जाऊन त्या प्रश्नावर निवडणूक घेतल्यावर, सरकार पडले अन् प्रश्न सर्वमान्य झाला नाही म्हणून पॉलिटिशियन्सना खुर्च्या सोडाव्या लागल्या. आपणास बहुमत आहे म्हणजे एखादा विषय संपूर्ण राष्ट्राला मान्य होईलच असे नाही अन् अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर जनतेचे मत विचारात घेतलेच पाहिजे असे मानणारे लोक तिथे होते (आजची परिस्थिती माहीत नाही!). आज दुर्दैवाने आपल्या देशात तरी अशी परिस्थिती दिसत नाही (ताजे उदाहरण - डॉ. वेणुगोपाल आणि श्री. अंबूमाणी रामाडोस वाद).
लहान असताना एकदा आमच्या शाळेत श्री. विनय वाईकर आलेले होते. हे लष्करातून निवृत्त झालेले अधिकारी आहेत. त्यांनी त्यांच्या भाषणात काही आठवणी सांगितल्या. त्यातली एक आठवण अशी -
एकदा परदेशात गेलेले असताना एके दिवशी श्री. वाईकर त्यांच्या मित्रासोबत एका बागेत उभे होते. त्यांनी एक सिगरेट ओढली अन् विझवताना आपल्या येथील पद्धतीप्रमाणे जमिनीवर टाकून जोड्याने विझवली, आणि परत आपल्या मित्रासोबत बोलत उभे राहिले. इतक्यात कुठुनसा एक मुलगा झाडू न डस्टमेकर घेऊन आला. त्याने श्री. वाईकरांना विनंती केली की त्यांनी आपला पाय बाजूला घ्यावा. यांनी पाय बाजूला घेतल्यावर त्या मुलाने ते सिगारेटचे थोटूक झाडूने डस्टमेकरमधे गोळा केले. आणि यांना थॅंक यू म्हणून तो जाऊ लागला. श्री. वाईकरांना फार ओशाळल्यासारखे झाले. त्यांनी त्या मुलाला माफी मागितली. तर त्यावर तो मुलगा त्यांना म्हणतो, "तसे म्हणू नका. येथे माझी नेमणूक कचरा गोळा करण्यासाठी झालेली आहे. पण कुणी कचराच करत नसल्यामुळे, मी जवळ जवळ फुकटंच पगार घेतो. आज आपण मला काम करायची संधी दिलीत याबद्दल मी आपला आभारी आहे." जेथे अशा भावनेने लोक काम करत असतील तो देश किती भाग्यवान!!
आपले या विषयावर काय मत?